Home > मॅक्स ब्लॉग्ज > फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अशांत का ?

फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अशांत का ?

पुरोगामी महाराष्ट्रातील शहरे का पेटतायत? जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद का निर्माण केला जातोय? या वादातून नेमका कुणाचा फायदा होणार आहे? वाचा अशोक कांबळे यांचे सखोल विश्लेषण

फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अशांत का ?
X


महाराष्ट्र राज्य पुरोगामी समजले जाते. या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,शाहू महाराज,भारतीय राज्यटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा जन्म झाला. या महापुरुषांनी समाजा - समाजातील जातीय दरी कमी करण्याचा प्रयत्न केला. पण सध्या या महापुरुषांच्या विचाराच्या विरुद्ध दिशेने राज्याची वाटचाल सुरू आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अलीकडच्या काळात सातत्याने महाराष्ट्र अशांत होताना दिसत असून याला कोण जबाबदार आहे ?असा प्रश्न सतत विचारला जात आहे. राज्यात सातत्याने जातीय तेढ निर्माण होणाऱ्या घटना घडत आहे की, त्या पध्दतशीरपणे पेरल्या जात आहेत का ? असा संशय निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र अशांत होण्यासाठी राजकीय पक्ष जबाबदार आहेत का ?

मागील काही वर्षापासून राजकीय पक्ष विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करताना दिसत नाहीत. तरुणाची बेरोजगारी वाढत असून राज्यातील तरुण कामासाठी वणवण फिरत आहेत. परंतु राजकीय पक्ष या तरुणाच्या हाताला काम न देता त्याच्या डोक्यात जात,धर्म यांच्या गोष्टी पेरताना दिसतात. उठसुट जाती,धर्म यांच्यावर व्यक्तव्य करून समाजातील तरुणाची माती भडकवण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. काहीजणाना असे वाटते की, निवडणुका आल्या की जाती,धर्मावरून तेढ निर्माण होईल,अशी वक्तव्य करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न राजकीय लोकांकडून केला जात असतो.

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या वक्तव्यावरून पेटला होता महाराष्ट्र

माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी सातत्याने या ना त्या कारणाने चर्चेत होते. त्यांनी महापुरुषाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र पेटून उठला होता. अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती. माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी वादात सापडल्यानंतर त्यांच्यावर कारवाई अटळ होती. त्यानंतर त्यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली. भगतसिंग कोशारी यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेली सामाजिक तेढ कमी होत असताना राज्य पुन्हा एकदा अशांत होताना दिसत आहेत. परंतु आताचे मुद्दे वेगळे आहे.

हिंदू - मुस्लिम वाद सातत्याने उकरून काढला जातोय

राजकीय पक्ष आणि विशिष्ठ विचारसरणीने ग्रासलेले राजकीय पक्ष आणि संघटना आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सातत्याने मुस्लिमांच्या विरुद्ध वक्तव्य करत असून त्यामुळे देखील राज्यातील हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण होण्याचे प्रकार घडत आहेत. हिंदू आणि मुस्लिम वाद वाढत असल्याने दोन्ही बाजूच्या तरुणाचे अगणित असे नुकसान होत आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. हिंदू - मुस्लिम वादाची सुरुवात 1992 सालापासून सुरू झाल्याचे दिसते. या साली बाबरी मस्जिद पाडण्यात आली. याची प्रतिक्रिया म्हणून 1993 साली मुंबईत साखळी बॉम्ब स्फोट झाले. यामध्ये निष्पाप नागरिकांचे बळी गेले. त्यानंतर हिंदू - मुस्लिम वाद वाढत गेल्याचा दिसतो.

महाराष्ट्र अशांत होण्यासाठी राजकीय परिस्थिती जबाबदार का ?

राज्यात गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्याची नावे बदलली जात असून औरंगाबाद,उस्मानाबाद,अहमदनगर या शहराची मुस्लिम नावे असल्याने ती बदलण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे मुस्लिमांत रोष निर्माण झाला असून त्यामुळे अनेक प्रश्न देखील निर्माण झाले असल्याचे सांगण्यात येते. त्यातच नव्याने औरंगजेबावरून सध्या राज्यात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात घडत असलेल्या घडामोडीला राजकीय परिस्थिती जबाबदार असल्याचे विचारवंतांचे म्हणणे आहे.

दलित तरुणाच्या हत्येने महाराष्ट्र हादरला

नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढल्याच्या कारणावरून गावातील जातीयवादी लोकांनी त्याची हत्या केली. त्यामुळे संबंध महाराष्ट्रभर आंदोलन,मोर्चे करण्यात येत असून त्यामुळे दलित समाज सध्या राज्यात असुरक्षित झाला आहे. त्यांच्यात अक्षयच्या हत्येवरून चीड निर्माण झाली असून मराठा समाज आणि दलित समाज यांच्यातील सलोख्याचे संबंध बिघडले असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात तीन हजार रुपयांच्या कारणावरून मातंग समाजातील व्यक्तीचा खून करण्यात आला. त्यामुळे मातंग समाजात देखील या घटनेवरून रोष निर्माण झाला आहे. या दोन्ही घटनावर सरकार आणि विरोधी पक्ष देखील बोलताना दिसत नाहीत.

औरंगजबचा फोटो आणि स्टेटस वरून राज्यात दंगलसदृश्य परिस्थिती

राज्यात सध्या मुस्लिम नावे असलेल्या जिल्ह्यांची नावे बदलण्यात येत असून त्यामुळे समाजात जाती - धर्मावरून रणकंदन सुरू आहे. औरंगाबादचे नामकरण केल्यानंतर काही दिवस उपोषण करण्यात आले. परंतु त्यानंतर त्या शहरात दंगल झाली होती. ते वातावरण शांत होत असताना उस्मानाबादचे नामकरण धाराशिव करण्यात आले. त्याचबरोबर अहमदनगरला अहील्याबाई होळकरांचे नाव देण्यात आले. त्यामुळे अहमनगर मध्ये निघालेल्या जुलूस मध्ये औरंगजेबचा फोटो हातात घेवून जल्लोष करण्यात आला. राज्यातील समाजमन दूषित झाले असून कोल्हापूरात देखील औरंगजेबच्या स्टेटस वरून गोंधळ झाल्यानंतर त्याठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. कोल्हापुरात अनेक जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले असून औरंगजेबचे फोटों स्टेटस ठेवल्यावरून सोलापूर जिल्ह्यात देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विकास कामांचे मुद्दे पडले बाजूला

सध्या राजकारणाची दिशा जात,धर्म यांच्या बाजूने चालली असून विकासाचे राजकारण बाजूला पडले आहे. विकासावर राजकारणी बोलत नसल्याने सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त करण्यात येतोय.

येणाऱ्या काळात महाराष्ट्र आणखी अशांत होणार ?

येत्या काळात लोकसभा,विधानसभा,जिल्हा परिषदा,नगर परिषदा यांच्या निवडणुका होणार असून जात,धर्म यांचे मुद्दे सातत्याने ऐरणीवर येत राहणार आहेत.धार्मिक, जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न काही पक्ष करतील. या प्रयत्नांमध्ये तरुणांचा वापर करुन घेतला जाईल. त्यांची माथी भडकाउन पुन्हा महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. या परिस्थितीत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने जातीय धार्मिक सलोखा ठेवत महापुरुषांचे विचार आचरणात आणत धर्मांधांचे महाराष्ट्र अशांत करण्याचे डावपेच हाणून पाडायला हवेत…

अशोक कांबळे

Updated : 11 Jun 2023 9:20 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top