जागतिक पर्यावरण दिन, आढावा एका वास्तवाचा !
जागतिक पर्यावरण दिन साजरा करताना कोणते वास्तव आपण लक्षात घेतले पाहिजे, प्रदुषणामुळे वातावरणातील कोणते बदल आपण आताच अनुभवत आहोत, ते टाळण्यासाठी काय केले पाहिजे, याचे विश्लेषण करणारा वन्यजीव अभ्यासक अमोल कुंभार यांचा लेख नक्की वाचा...
X
नमस्कार मित्रांनो, आज ५ जून जागतिक पर्यावरण दिवस. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंम्बलीने १९७२ च्या स्टोकहोम येथील पर्यावरण विषयक परिषदेच्या निमित्ताने "५ जून" हा "जागतिक पर्यावरण दिन" म्हणून जाहीर केला. पर्यावरणविषयक जागतिक जनजागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी व त्याबाबत साहाय्य व कृती वाढवण्यासाठी हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या दृष्टीने आपल्यासाठी फार महत्वाचा आहे.
UNEP म्हणजे United Nations Environment Programme द्वारे दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन वेगवेगळ्या संकल्पना मांडून साजरा करण्याचे आवाहन केले जाते. अशीच या वर्षीची म्हणजे 2022 ची संकल्पना आहे "Only One Earth", focusing on Living sustainable in Harmony with Nature" म्हणजे पृथ्वी एकच आहे त्यामुळे निसर्गाशी सुसंवाद साधत शाश्वत जीवन जगण्याचा प्रयत्न आपल्याला करता आला पाहिजे, जेणेकरून आपल्या सोबत आपल्या पुढच्या पिढीला पृथ्वीवर उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा वापर करता येईल. नैसर्गिक संसाधनांचा वापर हा मर्यादित असला पाहिजे त्याला पर्याय म्हणजे अक्षय उर्जेचा वापर.
अन्न, पाणी, हवा, वस्त्र आणि निवारा अशा आपल्या दैनंदिन अनेक गरजा असतात, ह्या गरजा परिसरातूनच पूर्ण होतात. प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जिथे पूर्ण होतात, तिथेच ते सजीव आढळतात हे आपल्याला निसर्गाकडूनच शिकायला मिळते, जसे की जंगल.
जंगल ही एक मोठ्या स्वरूपाची परिसंस्था असते वेगवेगळ्या लहान मोठ्या अधिवासानी बनलेली. आपणही त्या अधिवासाचा एक भाग आहोत, ना की त्याचे मालक. या अधिवासात राहणारा प्रत्येक सजीव आणि निर्जीव त्या अधिवासासाठी काम करतो, जसे की फुले, फुलातील मधावर अनेक कीटक अवलंबून असतात, त्या किटकांवर अवलंबून असतात पक्षी, त्या लहान पक्ष्यांवर अवलंबून असतात मोठे पक्षी आणि मोठे सरीसृत. निसर्गातील वनस्पतींवर अवलंबून असतात शाकाहारी प्राणी जसे की हरणे, त्या हरणांवर अवलंबून असतात मांसाहारी प्राणी जसे की वाघ. पालापाचोळा, प्राण्यांची मृत शरीरे, मलमूत्र हे पदार्थ कुजवण्याचे काम मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव करत असतात. यामुळे मातीमध्ये वनस्पतींना पोषक असे पदार्थ तयार होतात, त्यांचा वापर करून वनस्पती वाढतात. ह्याला अन्नसाखळी म्हणतात. आपणही ह्या अन्नसाखळीचा एक भाग आहोत, हे आपल्याला विसरता कामा नये. आपल्या पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या असतात. जसे प्रत्येक सजीव ही अन्नसाखळी टिकवण्यासाठी काम करत असतो तसे आपणही आपले पर्यावरण टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यातूनच निसर्गाशी समतोल साधत आपला शाश्वत विकास केला पाहिजे. पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडपणे चालू राहिली, की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते.
याच परिसंस्थेतून आपली पाण्याची गरज पूर्ण होते, डोंगरातून उगम पावणाऱ्या नद्या आपली पाण्याची गरज पूर्ण करतात. ती शुद्ध राखण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप नाही, अशा ठिकाणी वाहत्या प्रदूषित पाण्याचे नैसर्गिकरित्या काही प्रमाणात शुद्धीकरण होत असते. याउलट आपण त्या नद्या सांडपाण्याने आणि जागतिक औद्योगिकी करणांच्या शर्यतीत अशुद्ध करत आहोत. शहराचे, गावाचे सांडपाणी एकत्र करून सोयीच्या ठिकाणी मोठ्या जलसाठ्यात सोडतात. राहत्या इमारतीमधून, उद्योग कारखाने यांतून निघणाऱ्या सांडपाण्यात अनेक प्रकारच्या रासायनिक अशुध्दी असतात. त्या मैलपाण्यात रोग पसरवणारे सूक्ष्मजीव असू शकतात. हे सर्व सांडपाणी जसेच्या तसे जलसाठ्यात सोडले तर जलस्रोतांचे प्रदूषण होऊन ते घातक ठरते. असे पाणी पिण्यासाठी किंवा इतर कुठल्याच कामासाठी वापरता येत नाही. अशा सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते बाहेर सोडण्याची सक्ती सर्व इमारती आणि कारखानदारांवर असते. त्यासाठी सरकारने जलशुद्धीकरण केंद्रे उभारली आहेत. ती केंद्रे सुस्थितीत राखणे हे एक जबाबदारी नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. पाण्याच्या शुद्धीकरणासोबतच त्याचे व्यवस्थापन ही होणे तितकेच गरजेचे आहे. पाणी अडवून, जिरवून किंवा साठवून पावसाळ्यानंतरच्या काळात उपलब्ध करून देणे, याला जलव्यवस्थापन म्हणतात.
वायू प्रदूषणाचे मुख्यतः तीन स्रोत आहेत त्यात दोन नैसर्गिक ह्यात ज्वालामुखी मधून सल्फर आणि पाणथळ जमिनी मधून मिथेन पण हे दोन्ही निसर्ग निर्मित असल्याने त्यावर निसर्गाचे नियंत्रणही असते. मानवनिर्मितमध्ये वाहने आणि कारखाने, इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक म्हणजे नायट्रोजन डायॉक्साईड, कार्बन डायॉक्साईड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायॉक्साईड आणि काजळी, हे वायू थेट वातावरणातील हवेत मिसळतात. त्यामुळे वातावरणाचा समतोल बिघडतो, याला वायू प्रदूषण म्हणतात. हे सर्व घटक वातावरणातील ओझोन च्या थराला मारक आहेत.
एखाद्या ठराविक ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेली ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानातले उतार चढाव म्हणजेच क्लायमेट चेंज- हवामान बदल. ओझोनचा थर हे आपले संरक्षक कवच असते, वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो. हवामानातील ओझोन वायूच्या कमी होण्याने पृथ्वीवरील तापमान वाढीला सुरुवात होते.
१९ व्या शतकाच्या तुलनेने आता जगभरातलं तापमान १.२ सेल्सिअसने वाढलेलं आहे. तर वातावरणातील कार्बन डायॉक्साईड चे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढलं आहे. हवामानात होणाऱ्या बदलांमुळे आपल्या दैनंदिन जीवनावर आणि आरोग्यावर जे परिणाम होतात ते आपल्या लक्षात येत आहेत. उन्हाळ्या आधीच तापमान वाढही आपण मार्च – एप्रिल 2022 मध्येच अनुभवली, अवकाळी पाऊस आणि महापूर ह्यालाच हवामान बदल म्हणतात.
निसर्गात हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित होणार नाही, यासाठी जगभरातील सर्व देश कायदे करत आहेत.
वरील सर्व दुष्परिणाम टाळायचे असतील तर, आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीमुळे प्रदूषण होऊ नये, जैवसृष्टीचे नुकसान होऊ नये यासाठी व जैवसृष्टीच्या संवर्धनासाठी आपण शक्य तेवढे प्रयत्न करूया आणि याची सुरुवात आज आणि आत्तापासूनच झाली पाहिजे. हे जग सोडून जाताना आपण पुढच्या पिढीला, आपला निसर्ग संवर्धनाचा वारसा अभिमानाने देऊन जाणार अशी शपथ आज आपण घेऊ.
अमोल कुंभार
वन्यजीव अभ्यासक
इकॉलॉजीकल कॉन्सर्वेशन सोसायटी, मुंबई