खडसे आणि पक्ष विचारधारेचं समीकरण जुळलं नाही का?
गोपिनाथ मुंडे, एकनाथ खडसे, अण्णा डांगे यांची बांधिलकी भाजपच्या हिंदुत्ववादाशी का नव्हती? संघ-भाजप परिवाराचं नक्की उद्दीष्ट काय? खडसेंसारखा पक्ष स्थापनेपासून पक्षासोबत असलेला नेता पक्ष सोडत असताना संघाची भूमिका का दिसून आली नाही...? खडसे आणि पक्ष विचारधारा यांचं समीकरण? वाचा सुनिल तांबे यांचा लेख
X
एकनाथ खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित आहे. सुस्मृत गोपिनाथ मुंडे, अण्णा डांगे आणि एकनाथ खडसे या नेत्यांची बांधिलकी भाजपच्या हिंदुत्ववादाशी कधीही नव्हती. ते मूलतः आपआपल्या जातींचे प्रतिनिधी होते आणि जातीचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला सत्तेत वाटा मिळाला पाहीजे, म्हणजे मुख्यमंत्रीपद वा तत्सम मंत्रीपद आपल्याला मिळायला हवं अशा त्यांच्या आकांक्षा होत्या.
भाजप हा केडर बेस्ड राजकीय पक्ष आहे. पक्षाच्या विचारधारेशी बांधिलकी असणार्यांना त्या पक्षात उच्चपद मिळतं. अशा नेत्याची जात केवळ जातिसमूहांची मतं मिळवण्यासाठी उपयोगी असते, पक्षात स्थान मिळवण्यासाठी त्याचा फारसा उपयोग नसतो. भाजपची सरकारं अनेक राज्यांत आहेत. किती राज्यांमध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री भाजपने दिला आहे.... विविध जात समूहांच्या सत्ताकांक्षा पूर्ण करताना आपली विचारधारा पुढे जायला हवी असं भाजपचं धोरण आहे. अटलबिहारी वाजपेयी ब्राह्मण नव्हते, नरेंद्र मोदी ब्राह्मण नाहीत, योगी आदित्यनाथ ब्राह्मण नाहीत, शिवराज सिंग चौहान ब्राह्मण नाहीत, प्रज्ञासिंग ठाकूर ब्राह्मण नाही, सुशील मोदी ब्राह्मण नाहीत.
भाजप मध्ये विचारधारेला प्राधान्य दिलं जातं. ही विचारधारा म्हणजे हिंदुत्व आणि राष्ट्रवाद असं ते सांगतात. प्रत्यक्षात त्याचा अर्थ मुस्लिम व ख्रिश्चन वा परधर्मीयांचा विरोध आणि हिंदू धर्मीय जातींची एकात्मता असा त्याचा अर्थ आहे. त्यासाठी ते प्रत्येक राज्यातील सत्तेपासून वंचित असलेले जातसमूह वा आदिवासी समूह ते जोडतात आणि त्यांना सत्तेचं आमिष दाखवतात आणि सत्तेत सहभागी करून घेतात. मात्र, ज्या नेत्यांची बांधिलकी भाजपच्या विचारधारेशी नाही. त्यांना सर्वोच्च पद म्हणजे मुख्यमंत्रीपद कधीही देत नाहीत, द्यावं लागलं तर त्यांच्यावर संघाचा अंकुश राहील याची खबरदारी घेतात. या कारणामुळेच रामविलास पासवान, रामदास आठवले यासारख्या आंबेडकरवादी नेत्यांना त्यांनी सत्तेत सामावून घेतलं.
कारण संघ-भाजप परिवाराचं उद्दीष्ट सांस्कृतिक फॅसिझमचं आहे. राजकीय फॅसिझमला ते प्राधान्य देत नाहीत. त्यामुळे विविध राज्यांतील सत्तेपासून वंचित असलेल्या समाजाला ते राजकीय सत्ता मिळवण्यासाठी आकर्षित करतात, त्या समूहांना सत्तेत वाटाही देतात. मात्र, सांस्कृतिक फॅसिझमला त्यांनी पाठिंबा देणं ही पूर्वअट असते. आसामच्या मुख्यमंत्र्यांची त्यांनी अशीच कोंडी केली आहे. महाराष्ट्राचं राजकारण ब्राह्मण-ब्राह्मणेतर या चौकटीत अडकलेलं आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारखा ब्राह्मणेतर जातीतला नेता संघ विचाराशी बांधिलकी मानणारा आहे. मात्र, त्याच्या नेतृत्वगुणांबद्दल भाजप पक्षश्रेष्ठींना शंका असावी म्हणून त्यांना क्रमांक दोनचं स्थान देण्यात आलं. आणि मराठेतरांना आकर्षून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना क्रमांक एकच स्थान देण्यात आलं.
भाजपच्या पक्षश्रेष्ठींमध्ये सुस्मृत प्रमोद महाजन होते तोवर गोपिनाथ मुंडे यांची चलती होती. मात्र, प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर मुंडे भाजपमध्ये अनाथ झाले होते. शिवसेनाप्रमुखांनी सांगितल्यामुळे ते भाजपमध्ये राह्यले. ब्राह्मणेतर राजकारणाचा पुरस्कार जेवढ्या उच्चरवाने होईल. त्या प्रमाणात महाराष्ट्रात भाजपला बळ मिळेल. कारण ब्राह्मणेतरांमधील मराठेतर व सत्तेपासून वंचित असलेले मराठे भाजपच्या आश्रयाला जातील. हे भाजपचं राजकारण आहे. २०१४ वा २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसशी सोयरीक जमवली असती तर अर्थातच चित्र वेगळं असतं. गवत खाणार्या सिंहाचं भय भाजपलाच काय कुणालाही वाटणार नाही.