Home > मॅक्स ब्लॉग्ज > जगभरात चक्रीवादळाचं प्रमाण का वाढलं आहे?

जगभरात चक्रीवादळाचं प्रमाण का वाढलं आहे?

जगभरात चक्रीवादळाचं प्रमाण का वाढलं आहे? चक्रीवादळ तयार होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत? जाणून घेण्यासाठी वाचा उदय देवळाकर यांचं विश्लेषण

जगभरात चक्रीवादळाचं प्रमाण का वाढलं आहे?
X

सध्या महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, ओडिसा या राज्याला गुलाब चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. पावसाने रौद्र रूप धारण करत मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईला चांगलचं झोडपलं असून राज्यात अनेक ठिकणी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक धरणांनी, नद्यांनी आपली पातळी ओलांडली. अनेक गावांना या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. अजून दोन-तीन दिवस असंच वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

गेल्या काही वर्षांपासून हवामानात होत असलेल्या बदलांमुळे चक्रीवादळांचं प्रमाण मोठ्याप्रमाणावर वाढलं असल्याचं जाणकारांचं मत आहे. त्यामुळे अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, तर काही ठिकाणी भीषण दुष्काळाला मानवजातीला तोंड द्यावं लागत आहे.

मात्र, हवामानात अशा प्रकारे अचानक बदल कशामुळे होत आहे. समुद्रात चक्रीवादळांची संख्या अचानक कशी वाढली आहे ? शक्तिशाली चक्रीवादळ येण्यामागील कारणे कोणती? यापूर्वी येणाऱ्या चक्रीवादळांची तीव्रता आणि कालावधी कसा होता? चक्रीवादळाचा इतिहास नेमका काय आहे? यांसदर्भात कृषी अभ्यासक उदय देवळाणकर यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रने बातचीत केली.

उदय देवळाणकर सांगतात की, बंगालच्या उपसागराकडून येणारी चक्रीवादळं ही भारतीय उपखंडात प्रवेश करायची तसेच ती बऱ्याच वेळा उत्तर दिशेने निघून जायची. काही वेळा महाराष्ट्रच्या दिशेने सुद्धा यायची. परंतु गेल्या २ वर्षामध्ये सातत्याने आपण अशी वादळं पाहिलीत की, ही वादळं बंगालच्या उपसागराऐवजी अरब सागराकडून महाराष्ट्रच्या दिशेने आली. तोक्ते वादळ दिल्लीकडे गेलं आणि काही वादळं मध्यप्रदेशात जाऊन धडकली. या वादळांमुळे शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

शक्तिशाली वादळं नेमकी कशी तयार होतात?

मे आणि जूनमध्ये खास करून पावसाळा संपताना किंवा संपल्यावर ही वादळं तयार होतात. मान्सूनला ज्यावेळेस सुरुवात होते .त्यावेळेला उत्तरायणाची सुरुवात मकर संक्रांतीनंतर होते. मकरसंक्रांतीनंतर उत्तर गोलार्धातल्या सगळ्या भागातील तापमान वाढायला सुरुवात होते. कारण पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सुर्याच्या दिशेने वळतो. आणि सूर्याची किरण उत्तर गोलार्धात पडायला सुरूवात होते.

भारतीय उपखंडामध्ये तापमान वाढायला सुरुवात होते. साधारणतः मे महिन्यापर्यंत चरणसीमेवर पोहोचल्यावर आपल्याकडील हवा पातळ होते. आणि पातळ झालेल्या हवेचा गॅप भरून काढण्यासाठी किंवा कमी दाबाचं क्षेत्र भरून काढण्यासाठी विषुववृत्ताकडून आपल्याकडे वारं खेचलं जातं. त्या वाऱ्याला आपण मान्सून वारे म्हणतो. आणि ते ७ जूनच्या आसपास भारतीय उपखंडामध्ये हे वारे प्रवेश करतात.

या दरम्यान मान्सून तयार होताना काही भौगोलिक प्रक्रिया तयार होतात. त्यामध्ये भारतीय उपखंडामध्ये बाष्पयुक्त हवेचा एक थर तयार होतो. हा थर तयार झाल्यानं चक्रीवादळं तयार होण्याची शक्यता कमी होते.

कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळ हे दोन वेग-वेगळे प्रकार आहेत. चक्रीवादळ साधारणतः समुद्रावर तयार होतात. आणि ते जमीनीवर आल्यानंतर त्याचं रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होतं. परंतु मान्सूनला सुरुवात झाली की, त्याचा विस्तार भूभागावर होतो आणि मोठा पाऊस पडतो.

चक्रीवादळाचं प्रमाण का वाढलं?

बाष्पयुक्त हवेचा थर कमी झाल्यानं चक्रीवादळ तयार होत असतात. गेल्या २ वर्षापासून चक्रीवादळाचं प्रमाण वाढलं आहे. ही वादळं तयार होताना महत्त्वाची बाब म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्यानंतर तेथील हवा पातळ होऊन ती वरच्या बाजूला फेकली जाते. आणि या हवेची जागा घेण्यासाठी आसमंतातून त्या दिशेने हवा घुसायला सुरुवात होते. आणि सगळ्याबाजूने हवा आल्यामुळे कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे ती हवा भोवरा तयार करते. त्याला आपण कमी दाबाचं क्षेत्र म्हणतो. या क्षेत्राचा दाब वाढेपर्यंत ही उर्जा आणि शक्ती कायम राहते.

जिथे कमी दाबाचं क्षेत्र मिळेल आणि हवेचा सोयीस्कर दाब सापडेल. त्या दिशेने जायला सुरुवात करते आणि जाताना आपल्या आजू-बाजूचं बाष्प ही ती गोळा करून ती प्रवास करत असते. त्यामुळे या प्रवासमार्गामध्ये संपत्तीचं नुकसान, पर्यावरणाचं नुकसान, प्रचंड पाऊस पडणे, अतिवृष्टी होणे, दगफुटी होणे हे सगळे प्रकार होताना आपण पाहत असतो.

सध्या भारतामध्ये गुलाब चक्रीवादळ आलेलं आहे. हे त्याच्या निर्मितीपासून एक-दीड तासांतच ती हवा जमीनीवर घासली गेली. बंगालच्या उपसागराकडून चक्रीवादळ सुरु झालं आणि भारतीय उपखंडात ते येऊन धडकलं. परिणामी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यांचा जोरदार फटका बसला आहे. आता हे कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेकडे जात अरब सागराकडे गेलेलं आहे. आणि अरब सागरमध्ये प्रवेश केल्यानंतर याचं रुपांतर पुन्हा चक्रीवादळात होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे चक्रीवादळ पुन्हा एकदा बाष्प गोळाकरून पाकिस्तानच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणीही मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आणखी एक चक्रीवादळ

गुलाब चक्रीवादळ निवळत असतानाच बंगालच्या उपसागरात पुन्हा एक नवीन चक्रीवादळ तयार झालेलं आहे. वारंवार तयार होणाऱ्या वादळांना हवामानात होणारे बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगच हेच कारणीभूत आहे. सतत येणाऱ्या वादळांमुळे पुन्हा एकदा आपल्याला शेतीची पुर्नमांडणी कशी करता येईल यावर विचार करणं गरजेचं आहे.

चक्रीवादळामुळे पाऊस येतो का?

आपल्याकडे असा समज आहे की, चक्रीवादळ तयार झाल्यामुळे मुसळधार पाऊस पडतो. परंतु हे अर्धसत्य आहे. हे वर्ष अलनीनोचा प्रभाव (कमी पाऊस असलेलं वर्ष) आहे. प्रशांत महासागर आणि पॅसिफिक महासागराच्या समुद्राच्या पृष्ठभागावरती उष्ण पाण्याचे प्रवाह येतात. त्यामुळे विषुववृत्ताजवळ समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढतं. वाढलेलं तापमान कमी दाबाचे क्षेत्र विस्तारीत करत त्याची ऊर्जा प्रचंड असते. त्यामुळे भारतीय उपखंडापासून ते दक्षिण आशियामधील वारं त्याच्या दिशेने ते खेचायला सुरुवात करतं. सतत खेचल्या जाणाऱ्या वाऱ्यांमुळे जो नियमित मान्सून आहे. म्हणजे हिंदी महासागरातून, बंगालच्या उपसागरातून, विषुववृत्तीय प्रदेशातून आपल्या देशाकडे जे बाष्पयुक्त वारं येतं त्याच्यामध्ये मोठा खंड पडतो.

या वाऱ्याचं प्रमाण तिकडे ओढलं जातं आणि प्रमाणापेक्षा कमी पाऊस आपल्याकडे पडतो. आणि दुष्काळ सारखी परिस्थिती उद्धभवते. दुष्काळालाही काही वादळं कारणीभूत ठरतात.

सध्या मराठावाडा आणि पश्चिम महाराष्ट्रावर कमी दाबाचं क्षेत्र स्थित आहे. याच वेळेला कलकत्तेच्या दक्षिणेला एक वादळ तयार झालं आहे. त्याचबरोबर व्हिएतनमच्या दिशेला एक वादळ तयार झालं आहे. ते बंगालच्या उपसागरात जाऊन काय करेल हे येणाऱ्या आठवड्यात कळेलच.

येत्या दोन-तीन दिवसात जपानच्या दिशेने एक शक्तिशाली वादळ जात आहे. सतत येणारी शक्तिशाली वादळं आपल्याकडील हवा पूर्णपणे खेचून घेतात आणि पावसाचे फार मोठे खंड पडतात.

२०१५ रोजी अशी तीन समांतर शक्तिशाली वादळं तयार झाली होती. या सगळ्यात चक्रीवादळाच्या बाबतीत एक बाब लक्षात घेतली पाहिजे. ती चक्रीवादळं फक्त पाऊस आणत नाही. ज्यावेळेला कमी पावसाचे वर्ष असतात. त्यावेळेला उरलं-सुरलं बाष्प पाऊस देखील खेचण्याचं काम करत असतात. हवामानतला बदल संपूर्ण मानवजातीला आव्हानं निर्माण करणारं आहे. त्यामुळे इथून पुढे या आव्हानाला कसं सामोरं जायचं यावर उपाययोजना आणि विचार करणं गरजेचं आहे. असं मत कृषी अभ्यासक उदय देवळाणकर यांनी सांगितलं आहे.





Updated : 29 Sept 2021 3:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top