Home > मॅक्स ब्लॉग्ज > छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा म्हणतात, " ब्राह्मण म्हणून मुलाहिजा केला जाणार नाही" : प्रा.हरी नरके

छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा म्हणतात, " ब्राह्मण म्हणून मुलाहिजा केला जाणार नाही" : प्रा.हरी नरके

छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा म्हणतात,  ब्राह्मण म्हणून मुलाहिजा केला जाणार नाही : प्रा.हरी नरके
X

"जो कोणी धर्मवेडेपणा आणि धर्मद्वेश बाळगतो तो ईश्वरी आज्ञेच्या विरूद्ध वागतो." छ. शिवराय

संघवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रेशीमबागेच्या रंगात पुरते बुडवून टाकलेले आहे. त्यांचे पार ब्राह्मणीकरण करून टाकलेले आहे. ही महाराजांची बदनामी आहे. महाराज जर गोब्राह्मण प्रतिपालक होते. तर त्यांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या अफजलखानाच्या ब्राह्मण वकीलाची हत्त्या कशी केली? महाराज जर गोब्राह्मण प्रतिपालक होते तर जिवाजी विनायक सुभेदार या ब्राह्मण कारकुनाला गद्दारीबद्दल महाराजांनी शिक्षा कशी केली? ब्राहमण म्हणून कोणतीही गय केली जाणार नाही, सवलत मिळणार नाही. असे त्याला ठणकावणारे महाराजांचे हे अस्सल पत्र संघवाले का दडवून ठेवतात?

ब्राह्मणाची गय केली जाणार नाही

पत्र १८ जानेवारी १६७५ चे आहे. अतिशय जळजळीत आणि कठोर आहे. महाराज या ब्राह्मण कारकुनाला नादान म्हणतात.

"गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी राजे" या ब्राह्मणाला "हरामखोर" अशी चक्क शिवी देतात. लाचखोरही म्हणतात. तुमच्यासारख्या लाच खाणारांना "ठिकेठाक" केले जाईल असा सज्जड दम भरतात. महाराज या पत्रात म्हणतात,

" ऎशा चाकरास ठीकेठाक केले पाहिजेत. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो?.. याउपरी बोभाटा आलिया तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनीम जालेस, ऎसे जाणून बरा नतिजा तुम्हास पावेल. ताकीद असे.

"महाराज जर गोब्राहमण प्रतिपालक असते तर म्हणाले असते, " ब्राहमणदेवता, आपण शत्रूचे पैसे खाल्लेत, आमच्याशी गद्दारी केलीत, हरकत नाही, आम्ही आपले धर्माचे चाकर आहोत. आपण आमचे मालक. तेव्हा आपले उत्तम चालूय. असेच पुढे चालू द्या."

ब्राह्मण असलात तरी गर्दन मारली जाईल

पण महाराज तर या ब्राह्मणाला चक्क धमकी देतात. बघून घेऊ म्हणतात. ब्राह्मणाला आपला चाकरही म्हणतात, हे कसे काय? बरे इथे ठीकेठाक केले जाईल म्हणजे गर्दन मारली जाईल. असे महाराज सांगताहेत! धर्मशास्त्रानुसार ब्रह्महत्त्या वर्ज्य असतानाही महाराज चक्क ब्रह्महत्त्येची धमकी कशी काय देतात? त्या काळातले काही ब्राह्मण लाचखोर होते. स्वराज्याशी गद्दारी करणारे होते. याचे हे पत्र हा खणखणीत पुरावाच आहे. म्हणून तर दडवादडवी चाललेली नाही ना?

एक श्लेष काढायचा तर असे म्हणता येईल की, समाजात तोवर ब्राह्मणांना विशेषाधिकार असल्याने ब्राह्मणांच्या लाचखोरीकडे, गद्दारीकडे कानाडोळा केला जात असेल. तसा मुलाहिजा [तशी सवलत ] यापुढे बंद करण्यात आलेली आहे. असे महाराज या पत्रांद्वारे सुनावताहेत. मग महाराज जर गोब्राह्मण प्रतिपालक होते. तर त्यांनी ब्राह्मणांची ही पुर्वापार चालत आलेली ही सवलत तडकाफडकी बंद कशी काय केली बुवा? दया, कुछ तो गडबड है!

" धर्मवेडेपणा आणि धर्मद्वेश बाळगणे म्हणजे ईश्वरी आज्ञेचा भंग करणे होय." - छ. शिवराय

कुठलाच उपलब्ध दस्तऎवज अशा निष्कर्षास येत नाही की, शिवाजी राजांचा संघर्ष धर्मासाठी होता. असे ते मानत होते.

"हिंदवी स्वराज्य"वाली पत्रे बनावट-

महान इतिहासकार द. वि. आपटे, त्र्यं. शं. शेजवलकर आणि ग. ह. खरे यांच्या मते, ज्या पत्रांमध्ये "हिंदवी स्वराज्य" हे शिवाजीराजांचे ध्येय होते. असे म्हटलेले आहे. ती पत्रे विश्वासार्ह नाहीत. [ पगडी, २६] याचाच अर्थ ती पत्रे बनावट आहेत.

राज्य आणि स्वराज्य या शब्दांचे जे अर्थ आज घेतले जातात, त्याकाळात ते शब्द खूप संकुचित अर्थाने वापरले जात असत. १७ जुलै १६५७ ला चाकणच्या पुजार्‍याला दिलेल्या इनामपत्रात शिवाजीराजे आपल्या जहागिरीला राज्य म्हणतात. १६६० पर्यंत त्यांच्या ताब्यातील प्रदेश म्हणजे "मोकासा" म्हणजे देणगी मिळालेली जहागिर असाच होता.[ पगडी, २७]

जहाल धर्मांध आणि वंशवादी औरंगजेब- तो हिंदुमुस्लीम अशा सर्व भारतीयांचा द्वेश करी-

याचा अर्थ आजच्या अर्थाने राजे धर्मनिरपेक्ष होते असेही नाही. ते धर्माने हिंदू होते. हिंदू जीवनपद्धतीत वाढलेले होते. धर्मांध औरंगजेबाची वर्तणूक त्यांना अमान्य होती. औरंगजेब वंशवादी होता.

त्याला त्याच्या तुरेनियन वंशाचा गर्व होता. त्याच्या नजरेत सर्वच हिंदुस्थानी म्हणजे हिंदू आ्णि मुस्लमान दोघेही तिरस्करणीय होते. तो त्यांचा द्वेश करीत असे. याच्या उलट शिवराय धर्मवेडे नव्हते. ते धर्माचे पालन करणारे, धर्माने सांगितलेले पुजाविधी करणारे राजे होते. त्यांचा संघर्ष राजकीय होता. त्यामुळे धार्मिक अवडंबरापासून राजे दूर राहिले.

दुर्दैवाने त्यांच्या अनेक चरित्रकारांनी त्यांचा हा संघर्ष धर्मवादी नजरेने पाहिला. पक्षपाती पद्धतीने रेखाटला. परमानंदाने तर त्यांना परमेश्वराचा अवतारच बनवून टाकले. अर्थातच राजांच्या विरोधकांचे चित्रण त्याने राक्षस असे केले. या परमानंदाचे आजचे सगळे संघीय वारसदार महाराजांचा संघर्ष हा हिंदुमुस्लीम धर्माचा संघर्ष म्हणून रंगवतात. त्यात सगळ्या मुस्लीमांच्या वागण्याला ते अतिरंजित स्वरूपात अत्याचार म्हणून पेश करतात.

बाबा याकुत यांच्या आशिर्वादासाठी राजांची धडपड -

पण ते विसरतात की, राजे सहिष्णू होते. विविध धर्म आणि पंथांबद्दल त्यांना मनापासून आदर होता. इस्लामी धर्मग्रंथ आणि मशिदी, पिरांची ठाणी यांच्याशी ते सन्मानाने वागत. बाबा याकुत यांचे आशिर्वाद मिळवण्यासाठी राजे सदैव धडपड करीत. [पगडी, ३२]

छत्रपती शिवराय औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "जो कोणी धर्मवेडेपणा आणि धर्मद्वेश बाळगतो तो ईश्वरी आज्ञेच्या विरूद्ध वागतो." [ पगडी, १२ ]

कुठलाच उपलब्ध दस्तऎवज अशा निष्कर्षास येत नाही की, शिवाजी राजांचा संघर्ष धर्मासाठी होता असे ते मानत होते. [ पगडी, ११ ]

असहिष्णुतेमुळे विनाश -

कितीही मोठी असली तरी माणसं आणि संस्था यांचा असहिष्णुतेमुळे विनाश होतो. असेही शिवाजीराजे औरंगजेबाला लिहितात. विभिन्न जाती आणि धर्म यांच्याबद्दल सहिष्णुता अवलंबिली तरच मनुष्य जातीला शांतता आणि सुबत्ता लाभेल. अशीही ताकीद शिवराय औरंगजेबाला देतात. [ पगडी, १२ ] अशा शिवरायांना स्वार्थासाठी संघाने कडवे हिंदुत्ववादी बनवून टाकलेय.

कवी परमानंद संघाला सोयीचे-

शिवरायांच्या समकालीन लेखकांमध्ये संस्कृत कवी परमानंद, जयराम, हिंदी कवी भूषण, मराठी बखरकार सभासद यांनी शिवाजी राजे हिंदुंचे कैवारी असल्याचे चित्र रंगवले त्याचे कारण त्यांच्यावर [ या चरित्रकारांवर ] असलेला पौराणिक कथांचा पगडा होय.

समकालीन पर्शियन बखरकार मुहम्मद कासीम आणि मुस्तेखान तसेच दखनी लेखक नुसरती यांनी महाराजांचे वर्णन नेमके उलटे केलेय.

युरोपियन लेखक आधी महाराजांना बंडखोर ठरवतात. मात्र, त्यांची सरशी होऊ लागताच त्यांचे वर्णन उमदा युवराज असे करतात.

शिवराय हिंदूंचे कैवारी होते नी ते मुस्लीमवर्चस्वाविरूद्ध लढत होते. ही मांडणी टोकाची, अतिरेकी असल्याचे सेतुमाधवराव पगडी आपल्या ग्रंथात पुराव्यानिशी दाखवून देतात. [ पगडी, १३] पगडी जरी संघाचे नाव घेत नसले तरी त्यांना संघच अभिप्रेत आहे. हे स्पष्ट दिसते.

संघपरिवाराचा सततचा आंधळा आणि रक्ताळलेल्या असहिष्णुतेचा त्वेष त्यांनी मुत्सद्दी राजकारणी असलेल्या शिवरायांवर शेंदरासारखा लेपून टाकलाय. हा शेंदूर खरवडायला हवा. तेव्हाच महाराजांचे खरे रूप दिसू शकेल. हे काम धर्माचे चष्मे नसलेल्या सत्यशोधकांनाच करावे लागेल.

Updated : 19 Feb 2021 11:09 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top