Home > मॅक्स ब्लॉग्ज > स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूवर राजकारणी गप्प का? हेच का महाराष्ट्राचं पुरोगामीत्व…

स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूवर राजकारणी गप्प का? हेच का महाराष्ट्राचं पुरोगामीत्व…

स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूवर राजकारणी गप्प का? हेच का महाराष्ट्राचं पुरोगामीत्व…
X

Photo courtesy : TheLeaflet

विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, यांच्या नावानं मतं मिळत नसतात हे सत्य आहे. मान्य. पण विरोधी पक्षात असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ज्या बिनधास्तपणे स्वतःला पुरोगामीत्वाशी चिकटवून घेतात, त्या निर्लज्जपणामागं कोणतं गणित असतं ते कळत नाही मग? तुमच्या निवडणुकांपुरते सभांना येऊन बसणं, कॉन्फरन्स अटेंड करणं, हे करण्यासाठी सगळ्या चळवळी असतील आणि तुमच्या 'शातीर' डोक्यानं हे वापरून घेणं तुम्हाला जमत असेल तर किमान धडधडीत त्याचा गवगवा तरी करा. सार्वजनिक स्तरावर पुरोगामीत्व मिरवायचं आणि खाजगीमध्ये 'ते काय आदर्शवादी येडे' म्हणून चळवळीतल्या माणसांकडं पाहायचं हे प्रकार बोर झाले आता. तुमच्यात आणि केंद्र सरकारच्या ढिम्म अमानुषतेत काहीच फरक नाही.

फादर स्टॅन स्वामी जग सोडून गेले. त्यांना ज्या युएपीए कायद्याखाली अटक झाली, कोणताही आरोप सिद्ध झालेला नसताना, ती तुमचीच देण. स्वामींना एनआयएनं अटक केली असली, त्यांचा तुरुंगवास मात्र महाराष्ट्राच्याच देखरेखीतल्या तळोजा तुरुंगात होता! कोणी विसरलं असेल पण मी विसरणार नाही, ८३ वर्षाचा एक तुरुंगात म्हातारा तुम्हाला स्ट्रॉ असलेला कप मागत होता फक्त आणि तुम्ही तितकंही देऊ शकला नाहीत त्यांना. एक स्ट्रॉ असलेला कप! खासदार सुप्रिया सुळे, बहुमानानीय इंग्रजी वक्ते खासदार शशी थरूर, यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातल्या या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुटकेवर आम्ही काही तरी करू असं आश्वासन दिलेलं. ऑनलाईन कॉन्फरन्स होती. आज एक शब्दानं किमान मरणाचं दुःख तरी व्यक्त करू वाटलं का? विधानसभा शरमेनं २ मिनिट मौन तरी राहू शकली का? किमान निषेध तरी नोंदवण्याइतपत महत्त्व वाटलं का?

नाही वाटणार. कारण तुमच्या मोठ्या बुद्धिबळाच्या पटावर माणसं तुमच्यासाठी वापरून घ्यायची प्यादी आहेत. विचार म्हणजे रणनीती आहेत. तुम्ही पांडव असा नाहीतर कौरव असा, तुम्ही आहात तसलेच युद्धखोर. हा महाराष्ट्र कदाचित निर्लज्जपणे या विचारवंतांच्या दमनाला विसरेल....आणि उद्या उठून तितक्याच निर्लज्जपणे स्वतःला पुरोगामी म्हणवेल....आपली आपली लाज वाटली तरी मिळवलं असं म्हणूयात...जय पुरोगामीत्व!

Updated : 8 July 2021 10:47 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top