Home > मॅक्स ब्लॉग्ज > महात्मा फुले मला का भावतात?

महात्मा फुले मला का भावतात?

महात्मा फुले यांचे विचार आणि कृती यामध्ये अंतर का नव्हते? महात्मा फुले यांनी मांडलेले विचार आजही महत्त्वाचे आहेत. वाचा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचे विश्लेषण

महात्मा फुले मला का भावतात?
X

महात्मा फुले मला भावतात कारण...

  • ते विचारही करतात आणि कृतीही करतात.जग जेव्हा उत्तर शोधील तेव्हा शोधील पण आज मला जे सुचते आहे ती कृती मी माझ्यापुरती करील ही त्यांची मनोभूमिका मला भावते. त्याअर्थाने ते one man army आहेत.

  • ते एकाचवेळी व्यवस्था बदलाचे लांबचे उत्तर सांगतात आणि जवळची करायची ती कृतीही करतात think globally act locally चे ते प्रतिक आहेत.

  • ते एकाचवेळी शिक्षण, धर्म, परंपरा, शेतकरी, स्त्रिया, राजकारण, शोषण ,साहित्य या जीवनाच्या सर्वच क्षेत्रावर भाष्य आणि कृती करतात.

  • हंटर कमिशन ते आसूड पर्यंत वंचित समूह हाच त्यांच्या सर्व मांडणीचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक मुद्दा ते शेवटच्या माणसापर्यंत नेतात. वंचित हाच त्यांच्या चिंतनाचा गाभा आहे.

  • एका वर्तुळात अडकलेले शिक्षण त्यांनी मुक्त केले त्यामुळे आज बहुजन आणि स्त्रिया यांचा सहभाग वाढून आजचा समाज अधिक एकजिनसी झाला.याचे श्रेय त्यांना आहे.

  • एखाद्या प्रश्नावर ते बोलून थांबत नाहीत किंवा आपल्यासारखी फेसबुक पोस्ट टाकून कृतीचे खोटे समाधान ते मिळवत नाहीत. ते लगेच कृती करीत होते. साहित्य संमेलनावर मोर्चा, राजपुत्राला निवेदन, न्हाव्यांचा संप,अशा कितीतरी छोट्या मोठ्या या प्रत्येक बाबतीत ते कृती करतात . क्रियावान या पंडित: या उक्तीप्रमाणे ते खरे पंडित आहे.

  • आज शिक्षणानेच विकास होईल ही सर्व तळातल्या जातीत निर्माण झालेल्या आकांक्षा,दलित आदिवासी भटके यांच्यात झालेली जाणीव जागृती, तळातून झालेली राजकीय घुसळण, धर्मसत्तेला दिले गेलेले आव्हान आणि शेतकरी आंदोलने हे त्यांनी मांडलेल्या तर्कावर विकसित झालेल्या प्रक्रिया आहेत.

  • डावे धर्माला झोडपतात आणि सामान्य माणसापासून तुटतात.कार्यकर्ते समुहापासून तुटणे शोषक असलेल्या व्यवस्थेला हवेच असते.. महात्मा फुलेचे वैशिष्ट्य हे की त्यांनी धर्माचे ठेकेदार झोडपले आणि माणसातील आदिम धर्माची भूक जाणून सत्यधर्म ही दिला. हा विवेक आपण कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून शिकायला हवा.

  • कार्यकर्ते लेखनाला महत्व देत नाहीत पण फुलेंनी इतक्या गर्दीच्या आयुष्यात लेखन ही केले.कविता ,नाटक वैचारिक सर्वप्रकारे लिहिले.त्या लेखनातून शोषण कसे होते ? हे समजून सांगितले आणि व्यवस्था सहजपणे कसे लुटते हे कसब उकळून सांगितले. धर्मसत्तेची फसवणूक त्यांनी पुढे आणली. लेखनाचे महत्व त्यांच्याकडे बघून पटते.लिहिण्याला वेळ नाही हे सांगणाऱ्या सर्वांसाठी हे महत्वाचे आहे.

  • आपल्याला एखादी गोष्ट पटली असेल तर जगाविरुद्ध परिणामाची पर्वा न करता उभे राहण्याची हिंमत त्यांनी मला दिली. त्यासाठी सामाजिक बदनामी ,हल्ले याचा विचारही मनात आणला नाही. ही हिंमत फुले मला देतात.

  • विचार करा पण कृती त्यापेक्षा जास्त महत्वाची आहे हे फुलेंनी मला शिकवले ...कृती करण्याची आणि जगाविरुद्ध ठाम उभे राहण्याची धमक ते आपल्याला देतात म्हणून महात्मा फुले मला खूप भावतात.

    माझ्या घराच्या hall मध्ये त्यामुळे फक्त एक आणि एकच फोटो लावलेला आहे तो म्हणजे महात्मा फुलेंचा -

    (हेरंब कुलकर्णी )

Updated : 11 April 2021 11:36 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top