Home > मॅक्स ब्लॉग्ज > रुको जरा सबर करो...

रुको जरा सबर करो...

: हिंदुस्तानी भाऊ आणि दहावी बारावीच्या ऑनलाईन परीक्षांची मागणी या अनुषंगाने झालेले आंदोलन आणि ढासळत्या सामाजिक व्यवस्थेवर विवेचन केलं आहे समीर गायकवाड यांनी..

रुको जरा सबर करो...
X

जेमतेम काही वर्षांपूर्वी एका युट्यूबरची आपल्या अख्ख्या देशात 'हवा' झाली होती. 'कॅरीमिनाटी' हे त्याचं नाव. एक तरुण पोरगा अत्यंत अर्वाच्च शिव्या देत त्याचं म्हणणं मांडत होता आणि लोकांनी त्याला डोक्यावर घेतला होता, किंबहुना अजूनही लाखोजण त्याला फॉलो करतात. त्याच्या फॉलोअर्समध्ये अत्यंत उच्चशिक्षित नि हायप्रोफाईल तरुण तरुणींचा भरणा मोठ्या प्रमाणात होता नि आहे.

कालपरवा पिंपरी परिसरात अटक झालेल्या 'थेरगाव क्वीन' नामक तरुणीचा गुन्हा आहे की ती अत्यंत अश्लील अर्वाच्च शिव्या देतानाच धमक्याही देते. तिच्या फॉलोअर्समध्ये ग्रामीण आणि शहरी युवावर्गाची भरती आहे. ती इन्स्टाग्राम रील्स बनवत होती.

इथे फेसबुकवर प्रोफाईल लॉक करून आपली ओळख लपवून बसणाऱ्या अनेक भेकड नि छद्मी युजर्सकडून त्यांना न आवडणाऱ्या पोस्ट्सवर गोंधळ घातला जातो.

आईबहिणींवरून शिव्या दिल्या जातात. अत्यंत गलिच्छ भाषा वापरली जाते. विशेष बाब म्हणजे त्यांच्या बाजूने असणाऱ्या अन्य महिला पुरुष युजर्सना याचे काहीच वाईट वाटत नाही. उलटपक्षी चेकाळून जाऊन अशांना खतपाणी घातले जाते.

टीकटॉक जोमात होते तेंव्हा तलवारीने कथित 'बड्डे' केक कापण्याचे फॅड जोरात होते, 'मुळशी पॅटर्न'मधल्या एका पात्राची ती देण होती. आता सर्रास खेडोपाडीदेखील तलवारीने केक कापला जातो.

आयुष्यात बाकी काही आलं नाहीतरी चालेल मात्र छपरीपणा आला पाहिजे हे आताच्या पिढीवर छान बिंबवले जातेय.

अलीकडील काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या स्थानिक वा राज्य पातळीवरील प्रवक्त्यांचे, नेत्यांचे बाइट्स पाहिले तर लक्षात येईल की बेलाशक शिवराळ भाषा वापरली जाते.

वाहिन्यांवरील चर्चा देखील विषय समजून घेण्याच्या पद्धतीने न होता आरडाओरडा नि गोंगाट यांत पार पडतात.

डॉनल्ड ट्रम्प हाराकिरी करत होते तेंव्हा अमेरिकेत कॅपिटॉल इमारतीवर हल्ला करत तिथली तरुणाई जेंव्हा लोकशाहीवर चालून गेली होती तेंव्हा त्याचे आवतण जेक अँजेली उर्फ केनॉन शेमन या सोशल मीडियावरच्या धटिंगणाने दिलेलं होतं.

विविध मान्यवर दैनिकांचे वेबपोर्टल्स नुसते चाळले तरी दिसेल की अमक्या नटीने कसे क्लिवेज दाखवले, तमकी नटी कशी पाठ उघडी टाकून ब्रालेस आहे, फलाणा कुठे हनिमूनला गेलाय आणि बिस्ताना कुठे भानगडी करतोय ! अशा एक ना अनेक बातम्यांचा भडीमार देतानाच अत्यंत भडक बीभत्स नि कथित मादक छायाचित्रांचा तिथे भडीमार असतो !

अपवाद वगळता कुणालाही खोलात जाऊन वाचायचे नसते, मुद्दे जाणून घ्यायचे नसतात, आपला आवाका वाढवून घ्यायचा नसतो, अचूक खरी माहिती नि ज्ञानसंवर्धन इत्यादी बाबी तर जणू गौणच ठरताना दिसताहेत.

इथे कुणी जेंव्हा बोलत असतो वा काही मते मांडत असतो तेंव्हा मुळात ते ऐकले जाते केवळ प्रतिवाद करण्यासाठी ! भूमिका जाणून घेऊन आपली मते वा आपलं म्हणणं त्यानुसार पारखून घेणं इत्यादी आता होत नसतं.

अशा काळात उगम पावलेलं एक बांडगूळ 'हिंदुस्थानी भाऊ' आहे !

हा इसम अत्यंत गलिच्छ भाषेत शिव्या देत असतो त्यामुळे त्याची देशभक्ती खरी ठरत असावी.

त्याचं ते पचास तोला टाईप राहणं अनेकांना आवडतं,

त्याची भडक वेशभूषा अनेकांना आवडते.

त्याचे फॉलोअर्स लाखोत आहेत. ते देखील इतरांच्या पोस्ट्सवर जाऊन आईबहिण एक करत असतील तर त्यात नवल ते काय ?

हे सर्व कुठून आलं ?

हे आजूबाजूला होत असताना आपण सर्व काय करत होतो ?

की आपणही यात सामील होतो ?

या सर्व गदारोळात आपली भूमिका कशी होती आणि आता त्याविषयी काय वाटते ?

हा प्रश्न ज्याने त्याने स्वतःला विचारायचा आहे.

शून्य कर्तृत्व असताना कुणालाही शिव्या देणं, तद्दन बाजारू राहणं, लोकहिताला बाधा आणणारा लोकानुनय करणं, भडक जहाल व्यक्त होत राहणं याच्या आधारे काही माणसं लोकमानसावर राज्य करून आहेत.

आता असे काय उरलेय ज्यात सौम्य, सात्विक, विचारी नि शैलीदार व्यक्त होता येतं ? बहुधा काहीच नाही. अपवादांना सर्वंकष स्वरूप देता येत नाही हे शल्य अशा वेळी डाचते, नाही का !

'हिंदुस्थानी भाऊ' नामक फटीचर बोलभांड आपल्या सर्वांच्या मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरमध्ये आणि सोशल मीडिया अकाउंटमध्ये सामील आहे.

तो आपल्या अवतीभवती नि गल्लीबोळात आहे, इव्हन तो आपल्यापैकी काहींच्या घरांत देखील पोहोचला असावा.

त्याला आवरायचं कसं हा खरा प्रश्न आहे.

कालपरवाचे विद्यार्थी आंदोलन नि त्यात रस्त्यात उतरलेले विद्यार्थी इतकेच याचे स्वरूप असेल असे कुणाला वाटत असेल तर त्याच्यासाठी मी इतकेच म्हणेन की, "रुको जरा सबर करो !"... ये तो सिर्फ झांकी थी पुरी पिक्चर अभी बाकी हैं !

आपण जे पेरलेय तेच उगवते आहे !

- समीर गायकवाड.

Updated : 2 Feb 2022 9:50 AM IST
Next Story
Share it
Top