तो कलेक्टर जॅक्सन कोण आणि काय होता ?
छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्शवत राज्यव्यवस्था उभी केली होती पण त्या संकल्पनेला पुढील काळात पेशव्यांनी एकेक करीत सुरुंग लावला आणि अखेर ती पूर्ण उध्वस्थ केली.."अशी मांडणी करीत जॅक्सन सर्वत्र भाषणे द्यायचा,लेख लिहायचा. हे अर्थातच तत्कालीन उच्चवर्णीयांना झोंबणारं होतं. आणि तेच त्याच्या हत्येला कारणीभूत अशी मांडणी लेखक रवींद्र पोखरकर यांनी केली आहे.
X
"...तारुण्याच्या ऐन भरात,ज्ञान मिळवण्याच्या निर्भर उन्मादात,अधिकारांच्या फुलत्या दर्पात तुझे कार्यही तू रचू लागला होतास.ज्ञात्यांचे जग तुला प्यारे. मानवजातीची दैनंदिन वाटचाल तुझ्या कुतूहलाचा विषय.सुसंस्कृत व असंस्कृत मानवांच्या भाषा बोली तुला सारख्याच प्रिय.प्राचीनांच्या वाणीचे तुला फार आकर्षण.व्याकरणाचा तुला लळा.त्यातल्या त्यात भारतीय जीवनाबद्दलची तुझी जिज्ञासा अपार. तृष्णाच लागली होती तुला भारतीय परंपरेबद्दल माहिती गोळा करण्याची.पण..गोळी लागली आणि ती जिज्ञासा अपुरी राहिली..!"
कोणी लिहिलंय हे माहिती आहे ? थोर लेखिका दुर्गा भागवत यांनी..आणि कुणाविषयी लिहिलंय ठाऊक आहे ? आर्थर मॅसन टिपेट्स जॅक्सन म्हणजे तेच कलेक्टर जॅक्सन,ज्यांची २१ डिसेंबर १९०९ रोजी अनंत कान्हेरे यांनी नाशिकला हत्या केली ! उच्च विद्याविभूषित आणि भारतीय संस्कृती, भाषा, कला, इतिहास हे सगळं जाणून घेण्यासाठी प्रचंड मेहनत करणारा,त्यावर लिहिणारा,बोलणारा निर्गवी असा हा व्यासंगी माणूस.त्याने भारताविषयी लिहिले गेलेले शेकडो ग्रंथ जगभरातून जमा केले आणि स्वतःही खूप लिहिलं.हा सर्व ठेवा मुंबईतील जगप्रसिद्ध एशियाटिक लायब्ररीमध्ये सांभाळून राखला गेलाय. एक मोठं दालनच आहे तिथे फक्त जॅक्सनच्या ग्रंथसंपदेसाठी.
त्याची ही सगळी ग्रंथसंपदा एशियाटिकमध्ये कशी गेली त्याचाही एक करुण आणि हेलावून टाकणारा इतिहास आहे.आपली सारी जमा पुंजी जॅक्सनने जगभरातून ग्रंथसंपदा गोळा करण्यात संपवली होती. इथे कलेक्टर म्हणून त्याला मिळणाऱ्या वेतनातील बराचसा भागही याच ज्ञानलालसेत खर्च व्हायचा. सावरकरांच्या भडकावण्याने कान्हेरे आणि त्याच्या साथीदारांनी जॅक्सनची हत्या केली तेव्हा त्याच्या खात्यात अगदीच किरकोळ रक्कम शिल्लक होती. आपल्या नवऱ्याची तर हत्या झालीय,आता इथे राहून काय करणार म्हणून जॅक्सनची विधवा बायको लंडनला परत निघाली तर तिच्याजवळ तिकिटापुरतेही पैसे नव्हते.मग जॅक्सनच्या सर्व मित्रांनी मिळून त्याची सर्व ग्रंथसंपदा एशियाटिकसाठी विकत घेतली आणि त्यातून मिळालेल्या पाच हजार रुपयांतून ती बाई इंग्लंडला परतू शकली !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी जॅक्सनने प्रचंड अभ्यास केला होता.स्वराज्य निर्माण करताना लोकांमधील जातिभेदांची तीव्रता,कटुता कमी व्हावी यासाठी महाराजांनी काही योजना अमलात आणायला सुरुवात केली होती असं निरीक्षण त्याने एका लेखात नोंदवून ठेवलं आहे. राष्ट्रीयत्वाची भूमिका रुजवण्यासाठी विविध जाती-जमातींना प्रगती करायची संधी शिवाजीराजांनी उपलब्ध करुन दिली होती.त्यांना राज्य करायला आणखी काही काळ मिळाला असता तर कदाचित भारतातील जातीव्यवस्था आज जशी भयावह वाटते तशी नक्कीच राहिली नसती,असं त्याचं म्हणणं होतं.महाराजांच्या अनेक गड- किल्ल्यांची त्याने भ्रमंती केली होती.नाशिकला कलेक्टर असताना तो लोकांना सतत भेटत राहायचा.त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा.त्यामुळे जनतेत तो प्रिय होता.भारतीय जनता,त्यांची स्वातंत्र्याविषयीची भावना याविषयी त्याला आस्था होती.त्यामुळे त्याचे अनेक सहकारी इंग्रज अधिकारी त्याचा राग करायचे.अशा चांगल्या माणसाविषयी सावरकरांना इतकं काय खटकलं असावं की त्यांनी त्याचा थेट जीव घेण्याचा कट रचला ?
"छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्शवत राज्यव्यवस्था उभी केली होती पण त्या संकल्पनेला पुढील काळात पेशव्यांनी एकेक करीत सुरुंग लावला आणि अखेर ती पूर्ण उध्वस्थ केली.."अशी मांडणी करीत जॅक्सन सर्वत्र भाषणे द्यायचा,लेख लिहायचा. हे अर्थातच तत्कालीन उच्चवर्णीयांना झोंबणारं होतं. आणि तेच त्याच्या हत्येला कारणीभूत ठरलं असणार. शिवाजीचं स्वराज्य म्हणजे 'काकतालीय न्याय' अशी भावना मनात बाळगणाऱ्या सावरकरांना एक गोरा अधिकारी त्याच शिवाजीचं महत्व वर्णित करतोय आणि पेशव्यांना कमी लेखतोय,हे खटकलं असणारच.अन्यथा बाबाराव सावरकरांना झालेल्या शिक्षेचा जॅक्सनशी काहीच संबंध नव्हता.ती शिक्षा सुनावणारे न्यायधीश वेगळे होते.वंदे मातरम वादाचा दाखला दिला जातो,पण त्याच्याशीही जॅक्सनचा काहीही संबंध नव्हता.तेव्हा ते नाशिकला बदली होवून आलेच नव्हते.म्हणजेच त्यांच्या हत्येसाठी दिली जाणारी ही कारणं बोगस आहेत.ते आपल्या लिखाणातून आणि भाषणांतून जे काही मांडत होते ते सावरकरांच्या पचनी पडलं नाही आणि मग कान्हेरे,देशपांडे,कर्वे यांना भडकावून,पिस्तुले पुरवून त्यांची हत्या करण्यात आली.न्यायालयात ते सिद्धही झालं आणि प्रत्यक्ष हत्या करणाऱ्या तिघांना फाशी आणि कटाचे सूत्रधार म्हणून सावरकरांना जन्मठेप सुनावण्यात आली.
जॅक्सन ते महात्मा गांधी..सावरकरांनी स्वतः गोळ्या चालवण्याचे धाडस कधी दाखवले नाही पण अनेक युवकांना चुकीच्या पद्धतीने भ्रमित करून त्यांना या हत्या घडवायला प्रेरित केले.त्यामुळे दुहेरी नुकसान झाले.चांगली माणसं मारली गेली हे एक..आणि कोवळ्या वयातील हे युवक त्यासाठी फासावर लटकले हे दुसरं..
स्वतः सावरकर मात्र उदंड आयुष्य जगले..