Home > मॅक्स ब्लॉग्ज > लालू प्रसाद , चित्रा रामकृष्ण आणि मध्यमवर्गीय !

लालू प्रसाद , चित्रा रामकृष्ण आणि मध्यमवर्गीय !

देशात सध्या चित्रा रामकृष्ण आणि नॅशनल स्टॉक एक्सेंजमध्ये हिमालयीन बाबा संदर्भातल्या बातम्या येत आहेत. तर दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांना पुन्हा शिक्षा झाली आहे. पण या सगळ्याचा मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने अर्थ काय, भ्रष्टाचार कऱणाऱ्यांसोबत देशातील कोणता वर्ग या भ्रष्ट यंत्रणेला जबाबदार आहे, याचे विश्लेषण केले आहे, संजीव चांदोरकर यांनी..

लालू प्रसाद , चित्रा रामकृष्ण आणि मध्यमवर्गीय !
X

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) च्या माजी मुख्याधिकारी चित्रा रामकृष्ण यांनी त्या जागतिक पातळीवर नावाजल्या गेलेल्या कॉर्पोरेटमध्ये घातलेला धुमाकूळच्या बातम्या गेले काही दिवस निनादत आहेत .

आणि काल लालू प्रसाद यांची चारा घोटाळ्यातील अजून एका शिक्षेची बातमी देखील आली. माझ्या उच्च शिक्षित , कॉर्पोरेट मध्ये काम केलेल्या , देशाच्या भवितव्याची काही प्रमाणात चाड असणाऱ्या मित्राशी गप्पा मारत होतो, लालू भ्रष्ट आहे त्यामुळे त्यांना न्याय प्रक्रियेप्रमाणे शिक्षा झाली तर त्यात काय चर्चा करायची ; हि गेट व्हॉट हि डिझर्व असे तो म्हणाला.

पण चित्रा रामकृष्णच्या सविस्तर बातम्यांच्या येणाऱ्या लाटां मागून लाटांमुळे मात्र तो मित्र नर्वस झाला होता. तो चित्रा रामकृष्णला अजिबात ओळखत वगैरे नाही ; पण चित्रा रामकृष्ण माझा मित्र ज्या वर्गाचे प्रतिनिधीत्व करतो त्या वर्गासाठी आयकॉन होती. ह्या वर्गाला देशातील सर्वच व्यवहारांमध्ये स्वच्छ , पारदर्शी कारभार व्हावा अशी आंतरिक इच्छा आहे ; ती सर्वांची इच्छा आहे, असावी, त्यात काहीही गैर नाही.

पण हा वर्ग मात्र सर्व भ्रष्टाचाराचे मूळ खालील व्यक्तिमत्वात आहे असा समज पसरवतो. कमी शिकलेल्या, इंग्रजी भाषा न बोलणाऱ्या किंवा तुटकी, गावंढळ भाषा बोलणाऱ्या, सिगार किंवा सिगरेट नव्हे तर तंबाखू किंवा तत्सम व्यसन असणाऱ्या, गबाळे कपडे घालणाऱ्या , जातीचे राजकारण करणाऱ्या , दुसऱ्या शब्दात सरंजामदारी जीवनशैली असणाऱ्या व्यक्तीमध्ये आहे अशी धारणा ठेवतो. आणि लालू प्रसाद वरील गोष्टींचे प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे , लालू या वर्गाची आवडती पंचिंग बॅग आहे

यावर उपाय काय?

तर उच्च शिक्षण, ते देखील अमेरिकेत घेतलेल्या, सुटेड बुटेड, जग फिरलेल्या, इंग्रजी भाषेवर प्रभूत्व असणाऱ्या, कम्प्युटर्स आणि तत्सम गॅजेट्स लीलया पेलणाऱ्या, पॉवर पॉईंट आणि इंग्रजी वर्तमानपत्रात आपले म्हणणे मांडणाऱ्या, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करून नफा करून दाखवणाऱ्या मध्यम / उच्च मध्यम वर्गीयांकडे सारा देश सोपवला पाहिजे.

चित्रा रामकृष्ण त्यांनी अनेक दशके उराशी बाळगलेल्या त्यांचा या विश्वसाला मधोमध चिरते ; आणि त्यातून त्यांना खरे दर्शन होते ; त्यामुळे मध्यमवर्गीय लोकात नर्वसनेस आहे

चालू म्हटले तर त्यांना राग येतो ; पण बौद्धिक अप्रामाणिक वर्ग आहे हा...देशातील बाहेर आलेला (१ टक्के ) आणि बाहेर न आलेला (९९ टक्के) भ्रष्टाचार मध्यमवर्गीयांच्या सक्रिय किंवा निष्क्रिय साहाय्याशिवाय झाला नाही, भविष्यात होऊ शकणार नाही.

चार्टर्ड अकाउंटंट, कॉर्पोरेट लॉयर्स, सर्व मंत्रालयातील अधिकारी , बँकर्स आणि सर्व वित्तसंस्थांतील अधिकारी मर्चंट बँकर्स , क्रेडिट रेटिंग , रिझर्व्ह बँक, सेबी , आयआरडीए या नियामक मंडळातील अधिकारी, खाजगी कॉर्पोरेट उच्चपदस्थ, कंपन्यांच्या बोर्डावर बसणारे डायरेक्टर्स, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, सत्ताधीशांना अडचणीची वाटणारी आकडेवारी आणि संशोधन करायला नकार देणारे विश्वविद्यालय आणि थिंक टँक्स

थकलो ; तुम्हीच काढा यादी

चित्रा रामकृष्ण, हिमालयीन योगी वगैरे विषय चहा, बियर किंवा दारू पितांना चकणा म्हणून ठीक आहेत.

गोष्टी खूप खोलवर मुरल्या आहेत ; आता सुरुवात केली तरी सुधारायला दोन एक पिढ्या खर्ची पडतील

संजीव चांदोरकर (२२ फेब्रुवारी २०२२)

Updated : 22 Feb 2022 11:00 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top