शहीद भगतसिंह यांची जेल डायरी
शहीद भगतसिंग यांच्या बलिदान दिनी त्यांना सर्वत्र अभिवादन केले जाते. पण भगतसिंह यांची विचारसरणी नेमकी काय होती, भगतसिंग यांनी तुरुंगात असताना किती वाचन केले, फाशीच्या आधी त्यांची मनस्थिती काय होती, याबद्दल माहिती देणारा शहीद भगतसिंह यांची जेल डायरी या पुस्तकाचे लेखक अभिजीत भालेराव यांचा लेख
X
समजा भगतसिंह जगले असते तर? समजा त्यांची फाशी रद्द झाली असती किंवा त्यांना तुरुंगातून सोडविण्यात क्रांतिकारकांना यश आले असते तर? धर्माच्या नावावर भारताचे तुकडे होत होते तेव्हा धर्मनिरपेक्षतेचा सूर्य म्हणून गणला गेलेला हा तरुण जिवंत असता तर त्याने काय केले असते? त्याला स्वतंत्र भारत कसा पाहिजे होता ? या प्रश्नांनी फार दिवसांपासून डोक्यात घर केले होते म्हणून या विषयावर आधारित कल्पनारम्य ऐतिहासिक कथा लिहिण्याचे मनोमन योजले. मग त्या दिशेने संशोधनाला सुरुवात केली. भगतसिंहांवर लिहिलेल्या कादंबऱ्या, कविता वाचून काढल्या पण तरी त्यांची विचारधारा स्पष्ट होत नव्हती. केवळ शहीद-ए-आझम म्हणून सर्वांनी भगतसिंह यांची व्यक्तिरेखा उत्तमरित्या रंगविली होती पण त्यांच्या व्यक्तित्वाचा एक मोठा हिस्सा बहुतांशी दुर्लक्षित केला गेल्याचे सातत्याने जाणवू लागले. याच संदर्भात यादविंदरसिंह सन्धू (भगतसिंहाचे धाकटे भाऊ कुलबीरसिंह यांचे नातू) यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी या जेल डायरीची मूळ प्रत, भगतसिंहांच्या मूळ हस्ताक्षरासहित, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रकाशित केली होती. यादविंदरजींनी मला 'या डायरीचे मराठीत भाषांतर करणार का?' म्हणून विचारले. मी लागलीच तयार झालो आणि काही दिवसांतच त्यांनी एक प्रत माझ्यासाठी पाठवली.
मी यापूर्वी चे गुवेरा' या क्युबाच्या महान क्रांतिकारकाची डायरी वाचली होती, त्यात त्यांचे दैनंदिन अनुभव आणि विचार होते. भगतसिंहांची डायरीपण अशीच काहीशी असेल असा माझा अंदाज होता. पण पहिल्यांदा मी ही डायरी वाचून संपवली तेव्हा माझा अंदाज साफ खोटा ठरला आणि मला वाटले होते तितके हे काम सोपे नाही हे कळून चुकले. मुळात या डायरीमध्ये भगतसिंहांनी स्वत:चे विचार किंवा अनुभव लिहिलेले नाहीत तर तुरुंगामध्ये त्यांनी वाचलेल्या पुस्तकांमधील महत्त्वाची वाक्ये, कविता नोंदवलेल्या आहेत.
जमेल तितक्या ठिकाणी भगतसिंह स्वत: प्रत्येक वाक्याचा संदर्भ देतात पण इंग्रजीत सरसकट वाचन केल्यानंतरसुद्धा मला बऱ्याच मुद्यांचा अर्थ लागत नव्हता. १९९४ साली भूपिंदर हुजा यांनी ही डायरी प्रथम प्रकाशित केली होती. नंतर प्राध्यापक चमन लाल आणि इतर भरपूर इतिहासकारांनी ही डायरी वेगवेगळ्या भाषेत प्रकाशित केली. मराठीमध्येसुद्धा या डायरीचे भाषांतर याआधी प्रकाशित झाले आहे. त्याबद्दल या सर्वांचे आभार मानायला हवेत.
पण त्यातील बहुतेक जणांनी मुद्यांचे स्पष्टीकरण दिले नाही किंवा सोप्याभाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित म्हणून सामान्य वाचकापासून ही डायरी दूरच राहिली. आता माझ्यापाशी मूळ हस्ताक्षराची प्रत होती, पण तिचे पुन्हा शब्दशः भाषांतर करण्यात मला काही अर्थ वाटत नव्हता. प्रत्येक मुद्दा जमेल तितक्या सोप्या भाषेत, जास्तीत जास्त विश्लेषण करून समजावून सांगावा, त्यामुळे ग्रामीण भागातील शाळकरी मुलानेही भाषांतर वाचले तरी त्याला त्यातील बहुताश भाग समजावा, अशी माझी इच्छा होती.
पण हे शिवधनुष्य उचलण्यासाठी सगळे मुद्दे प्रथम मला समजणे, ही पहिली गरज होती. त्यासाठी मी डायरीत लिहिलेल्या प्रत्येक वाक्याचा संदर्भ शोधण्यासाठी मूळ पुस्तके जमा करून वाचून काढायला सुरुवात केली. मगहळूहळू डोक्यात प्रकाश पडू लागला. उदाहरणार्थ 'आयर्न हिल' ही कादंबरी वाचताना त्यातला नायक बोलू लागतो तेव्हा मला त्याच्या जागी भगतसिंह दिसू लागले. बट्राँड रसेल वाचताना भगतसिंहांच्या नास्तिकवादाचे तर्क आणखी स्पष्ट झाले. मार्क्स, रूसो, थॉमस पेन वाचल्यानंतर आजूबाजूला घडणार्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. जतीनदा वारले तेव्हा भगतसिंहांनी लिहिलेली कविता वाचून त्यांचे पराकोटीचे दुःख जाणवले. पराक्रमाची वीरगीते वाचताना भगतसिंहांच्या निधड्या शौर्याचे रहस्य उमगले, अशी कित्येक उदाहरणे देता येतील.
मला एका गोष्टीचे फार नवल वाटले. भगतसिंहांना तुरुंगात इतकी पुस्तके कशी काय मिळाली? अर्थात ती सगळी पुस्तके लाहौरच्या द्वारकादास लायब्ररीमधून येत होती. तरीपण त्या काळच्या वाचनसंस्कृतीला सलाम करावासा वाटतो कारण आज जेव्हा मी तीच पुस्तके शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुंबई विद्यापीठाचे वाचनालय, एशियाटिक लायब्ररी आणि इंटरनेट या तिघांचा आधार घेऊनसुद्धा मला सर्वच पुस्तके सापडली नाहीत. आपली आजची वाचनसंस्कृती ठिसूळ होत आहे, याचा हा पुरावाच समजावा. जमेल तितक्या वाक्यांचे संदर्भासहित स्पष्टीकरण देत भाषांतर करण्यासजवळपास दीड वर्ष लागले. त्यात अजूनही बरेच संदर्भ मला सापडलेले नाहीत. हे संशोधन आणि भाषांतर माझ्यासाठी एका प्रवासासारखे होते. याप्रवासात मला जगातील उत्तमोत्तम विचारवंत आणि लेखक भेटले. प्रत्येक लेखकाने आपल्या लेखणीतून जणू मला भगतसिंह समजावून सांगितले.
शहीद भगतसिंहाच्या जेल डायरीची गोष्ट
दिनांक ४ एप्रिल १९२९ रोजी भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी सेंट्रल असेम्ब्ली मध्ये बॉम्ब फेकले. तिथे त्यांना अटक करून दिल्लीतच खटला चालवला गेला आणि दोघांना १२ जून १९२९ रोजी जन्मठेप सुनावण्यात आली. नंतर काही दिवसांनी भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांनी जाणूनबुजून सोडलेल्या धागेदोऱ्यांमुळे साँडर्सच्या खुनाचा खटला पुन्हा सुरू करण्यात आला आणि या दोघा क्रांतिकारकांना दिल्लीवरून लाहौरच्या 'मियाँवाली तुरुंगा'त हलविण्यात आले. इथे होणाऱ्या अत्याचाराविरोधात भगतसिंह आणि अन्य क्रांतिकारकांनी जून १९२९ मध्ये आमरण उपोषण सुरू केले. ते तब्बल ११६ दिवस चालले. उपोषणाच्या शेवटी शेवटी ब्रिटीश सरकारने क्रांतिकारकांच्या काही मागण्या मान्य केल्या. त्यातीलच एक म्हणजे भगतसिंहांना ही डायरी जेल प्रशासनाकडून १२ सप्टेंबर १९२९ रोजी देण्यात आली.या डायरीच्या पहिल्या पानावर भगतसिंहांची डायरी स्वीकारताना केलेली स्वाक्षरी आणि जेल अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे.
ते जवळपास अडीच वर्ष तुरुंगात होते. शेवटी २३ मार्च १९३१ रोजी त्यांना, राजगुरू आणि सुखदेवांना फाशी देण्यात आली. हा अडीचवर्षाचा काळ त्यांनी दुःखात किंवा ध्यानसाधना करण्यात नाही तर दिशाबद्ध अभ्यासात व्यतीत केला. त्यांच्या ७१३ दिवसांच्या तुरुंगवासात जेल रेकॉर्डनुसार त्यांनी ३०२ ग्रंथवाचून काढले म्हणजेच ते जवळजवळ दर दोन दिवसाला एका ग्रंथाचा फडशा पाडत असत. द्वारकादास वाचनालयाचे ग्रंथपाल त्यांचे मित्र होते, तेच भगतसिंहांना पुस्तके पुरवीत असत. त्यांनी एका ठिकाणी म्हटले आहे, "तो मागत होता तितकी पुस्तकं मला कधीचपुरविता आली नाहीत. तो एका वेळी १०-१२ पुस्तकांची नावं देत असे."
ही पुस्तके म्हणजे इंग्रजी, बंगाली, उर्दू, हिंदी भाषांतील उत्तमोतम साहित्य होते. स्वत:ला राजकीय, वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ करण्यासाठी आणि तत्कालीन भारताच्या समस्यांवर तोडगा शोधण्यासाठी त्यांनी साहित्याचा आधार घेतला त्यांना ज्या समस्यांवर उपाय किंवा विश्लेषण सापडले ते त्यांनी या जेल डायरीमध्ये संदर्भासहित टिपून ठेवले. शिववर्मा हे क्रांतिकारक भगतसिंहांचे सोबती होते. त्यांनी म्हटले आहे, 'भगतसिंहांनी तुरुंगात चार ग्रंथ लिहून काढले होते.'
1) Idea of Socialism
2) Autobiography
3) History of Revolutionary Movement in India
4) At The Door of Death
यात भर म्हणजे ही जेल डायरी आणि 'Why I am an Atheist' हा लेख. भगतसिंहांनी हे सर्व साहित्य कुमारी लज्जावती देवी यांच्या हाती गुप्तपणे तुरुंगाबाहेर पाठवले. लज्जावतीदेवी या भगतसिंहांच्या डिफेन्स कमिटीच्या सेक्रेटरी होत्या म्हणून त्यांना तुरुंगात नेहमी येण्याजाण्याची परवानगी होती. लज्जावती देवींनी काही भाग पिपल वृत्तपत्राचे संपादक फिरोज चंद यांच्याकडे दिला. भगतसिंहांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे २७सप्टेंबर १९३१ रोजी Why I am an Atheist' फिरोज चंद यांनी प्रकाशित केले. उरलेले साहित्य लज्जावत्तींनी बिजोयकुमार सिन्हा यांना अंदमानवरून सुटून आल्यावर दिले. सिन्हांनी ही पुस्तके त्यांच्या एका मित्राकडे दिली पण त्याने पोलिसांच्या भीतीने ती जाळून टाकली. हे अनमोल साहित्य अशा प्रकारे नष्ट होणे हे फार दुर्दैवी होते.
सुदैवाने भगतसिंहांचे लहान भाऊ कुलबीरसिंह यांनी ही जेल डायरी मिळवली, या डायरीमध्ये भगतसिंह विविध विषयांना हात घालतात आणि प्रत्येक मुद्याची तर्कसंगत मीमांसा करतात. मानवाच्या उत्पत्तीपासून, कुटुंबसंस्था तयार होण्यापासून ते राज्यसंस्थेच्या उगमापर्यंत, सामंतशाहीच्या 'उदय आणि पाडावा'ते साम्राज्यवाद आणि भांडवलदारांच्या वर्तमानापर्यंत, धर्माच्या विवेचनापासून ते नास्तिकतेच्या तर्कापर्यंत, गुलामगिरीपासून क्रांती आणि अराजकतेच्या भीतीपर्यंत, कायद्याच्या अभ्यासापासून ते मृत्युदंडाच्या शिक्षेपर्यंत आणि फ्रेंच राज्यक्रांतीपासून रशियनराज्यक्रांतीपर्यंत, प्लॅटो-सॉक्रेटिसच्या तत्त्वज्ञानापासून बट्रेंड रसेलच्या चिकित्सेपर्यंत ते सर्व मुद्यांचा अभ्यास करताना दिसतात. समाजातील स्त्रियांची दयनीय अवस्था, बालकामगारांची समस्या, तुरुंगातील एकाकीपणा, मातृभूमीसाठी केलेल्या बलिदानांचे महात्म्य या सर्व विषयांवर त्यांनी भरभरून लिहिले आहे.
ते समाजवादाचे कट्टर पुरस्कर्ते होते पण याचा अर्थ ते कम्युनिस्ट होते, असा नाही. मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता पण प्रसंगी त्यांनी मार्क्सवरसुद्धा भरपूर टीका केलेली आहे. वस्तुतः ज्येष्ठ इतिहासकार बिपीन चंद्र म्हणतात, 'भगतसिंह कोण्याएका विचारधारेपुरते सीमित नव्हते. ते सगळ्या तत्त्वज्ञानांचा अभ्यास करत होते. त्यात ते भारताच्या आणि पर्यायाने जगाच्या समस्यांवर तोडगा शोधत होते. ते जगले असते तर कोणत्या विचारधारेकडे झुकले असते, हे सांगणे कठीण आहे. किंबहना त्यांचा अभ्यास पाहता त्यांनी स्वत:चीच नवी विचारधारा निर्माण केली असती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बिपीन चंद्रांचे हे मत डायरी वाचल्यानंतर आपल्या पटेल.
समजा त्यांनी डायरी स्वत:च्या शब्दात देशाला संदेश म्हणून लिहिली असती तर ब्रिटिशांनी ती नष्ट केली असती, कदाचित या भीतीमुळेच भगतसिंहांनी महान लेखकांच्या लेखणीचा आधार घेतला आणि त्यांच्याच शब्दांत देशवासियांसाठी हा संदेश दिला, असाही एक तर्क या डायरीबाबत मांडला जाऊ शकतो.
ही डायरी म्हणजे एक प्रकारचे कोडे आहे. संदर्भासहित वाचल्यास भगतसिंहांचा संदेश आपण सहज समजून घेऊ शकतो. देशासाठी ते फासावर चढले, त्यांचे आणि साथीदारांचे हे बलिदान अतुलनीय तर आहेच पण त्याशिवाय भगतसिंह एक फार मोठे काम करून गेले. ते स्वतंत्र भारताचे, स्वतंत्र जगाचे एक सुंदर स्वप्न या डायरीमध्ये रंगवून गेले. ते रंग आपल्याला उमजले तर आणि तरच फासावर चढताना भगतसिंहांच्या ओठावर असलेल्या स्मितहास्याचे रहस्य आपल्याला समजेल. फाशीच्या तक्ताला विचारांचे व्यासपीठ बनविणारा असा नरवीर जगात दुसरा झाला नाही. महाकवी पाश म्हणतात, "भगतसिंह फासावर चढण्यापूर्वी क्रांतिकारी लेनिनचे पुस्तक वाचत होते, जाता जाता ते पुस्तकाचे एक पान मुडपून गेले. आजच्या पिढीला तिथून पुढे वाचण्याची गरज आहे."
गेल्यावर्षी 23 मार्च 2021 रोजी मधूश्री प्रकाशनातर्फे दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. करोंना महामारी ची दुसरी अन तिसरी लाट असून सुद्धा एका वर्षात आवृत्ती संपली ही केवळ जनतेच भगत सिंहावर असलेल प्रेम दर्शवते. आज या ऐतिहासिक दस्तावेजची तिसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे, यावेळी सुद्धा वाचकवर्गाचे भरभरून प्रेम मिळेल यात शंकाच नाही.
-अभिजीत भालेराव