माणसाने आयुष्यात नेहमी लक्षात ठेवायची गोष्ट...
आपल्या आकाशगंगेसारख्या 200 अब्ज आकाशगंगा या विश्वात सामावलेल्या आहेत. आपले अस्तित्व आणि आपले समस्त देव, देश, धर्म, संस्कृती, इतिहास, संपत्ती, अस्मिता, अभिमान, विचारधारा वगैरे गोष्टी या अनंत विश्वात आपल्यासारखाच शून्य किंमतीच्या नाहीत का? वाचा डॉ. विनय काटे यांचा लेख
X
मानवी उत्क्रांतीचा इतिहास साधारण 5.5 कोटी वर्षांपूर्वी primates पासून सुरू झाला. एवढ्या मोठ्या उत्क्रांतीत homo sapiens (आधुनिक मानव) अवघ्या 2 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. शेतीचा शोध आणि त्यामुळे संस्कृतीची सुरुवात साधारण 10 हजार वर्षे आधी अस्तित्वात झाली. धर्म ही संस्था फक्त ३ - 4 हजार वर्षे जुनी आहे. आजचा माणूस सरासरी 70 वर्षे जगतो. थोडक्यात मानवी अस्तित्व आणि संस्कृती 4.5 अब्ज वर्ष जुन्या पृथ्वीच्या इतिहासापुढे नगण्य आहेत.
आज जगात तुमच्या माझ्यासारखे 750 कोटी लोक अस्तित्वात आहेत. ही सगळी माणसे पृथ्वीच्या अवघ्या 29% भूभागावर वसलेली आहेत. आपल्या सुर्यामध्ये जवळपास 13 लाख पृथ्वी सामावू शकतात. सूर्यासारखे 100 अब्ज तारे फक्त आपल्या आकाशगंगेत आहेत. आणि आपल्या आकाशगंगेसारख्या 200 अब्ज आकाशगंगा या विश्वात सामावलेल्या आहेत. थोडक्यात काळ आणि स्थळ या दोन्ही बाबतीत माझं किंवा तुमचं सोडाच, अख्ख्या पृथ्वीचं आणि मानवजातीचं अस्तित्व या अनंत विश्वात शून्याच्या जवळ आहे.
त्यामुळे स्वतःला आणि जगाला खूप गांभीर्याने घेऊ नका. जोवर आयुष्य आहे. तोवर दुसऱ्या कुणाला त्रास न देता सुखाने जगून घ्या. आपले अस्तित्व आणि आपले समस्त देव, देश, धर्म, संस्कृती, इतिहास, संपत्ती, अस्मिता, अभिमान, विचारधारा वगैरे गोष्टी या अनंत विश्वात आपल्यासारखाच शून्य किंमतीच्या आहेत. स्वतः सुखाने जगा आणि इतरांनाही सुखाने जगू द्या!!