World Hepatitis Day 2021 : दरवर्षी लाखो लोकांचा बळी घेणारा हिपॅटायटिस रोग काय आहे?
हिपॅटायटिस रोग म्हणजे काय? याचा संसर्ग कसा होतो? संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? भारतात हिपॅटायटिसमुळे किती लोकांना जीव गमवावा लागतो? तसेच काय आहे जागतिक हिपॅटायटिसचा दिवसाचा इतिहास? जाणून घ्या एका क्लिक वर..
X
जगातील अनेक लोकांना आपल्याला नेमकं काय होतंय हेच समजत नाही आणि ज्यावेळी हे समजतं त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. हिपॅटायटिस हा असाच एक संसर्गजन्य रोग आहे. अनेकांना याची लागण झालेली समजत नाही. त्यामुळे जगभरातल्या लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. या रोगाबद्दल सामान्य लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै हा दिवस जागतिक हिपॅटायटिस दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय.
हिपॅटायटिस हा एक संसर्गजन्य रोग असून त्यामुळे यकृताला सूज येते, जळजळ निर्माण होते. हिपॅटायटिसचे ए, बी, सी, डी आणि ई असे पाच प्रकार आहेत. हा संसर्गजन्य रोग जरी असला तरी अनेकवेळा अल्कोहोलचे अतिरिक्त सेवन, टॉक्सिन, अनावश्यक औषधांचा अतिरिक्त डोस अशा इतर कारणांमुळेही याची लागण होते. हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई या रोगाची लागण दूषित पाणी आणि दूषित अन्नामुळे होते. हिपॅटायटिस बी, सी आणि डी ची लागण संक्रमित रक्त आणि संसर्गातून होते. त्याचसोबत आईकडून मुलाला या रोगाचे संक्रमण होऊ शकते, तसेच असुरक्षित शारीरिक संबंध, असुरक्षित सुयांच्या वापरामुळेही या रोगाचे संक्रमण होऊ शकते. ज्या लोकांना हिपॅटायटिस बी ची लागण झाली आहे त्या लोकांना हिपॅटायटिस डी चीही लागण होते.
दररोज तीन हजारांहून जास्त जीव जातात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका आकडेवारीनुसार, हिपॅटायटिस बी मुळे 2020 साली जगभरातील जवळपास चार कोटी लोक संक्रमित झाले होते तर जवळपास 1.2 कोटी लोक हे हिपॅटायटिस सी मुळे संक्रमित झाले होते. हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी मुळे दररोज तीन हजारांहून लोकांना आपला जीव गमवावा लागतोय असं जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. याचा अर्थ दरवर्षी 11 लाख लोकांना केवळ हिपॅटायटिस या आजारामुळे मृत्यूमुखी पडावं लागतंय. भारताचा विचार करता दरवर्षी किमान अडीच लाख लोकांना हिपॅटायटिस मुळे आपला जीव गमवावा लागतो.
जागतिक हिपॅटायटिसचा दिवसाचा इतिहास...
नोबेल पुरस्कार विजेते डॉ. बारुक एस ब्लुमबर्ग यांच्या सन्मानार्थ जागतिक हिपॅटायटिस दिवस साजरा केला जातो. 28 जुलै 1925 साली जन्मलेल्या या वैज्ञानिकाने हिपॅटायटिस बी चा शोध आणि त्यावरील औषधाचाही शोध लावला होता. 2010 साली पार पडलेल्या 63 व्या जागतिक आरोग्य परिषदेमध्ये जागतिक हिपॅटायटिस दिवस साजरा करण्यास मंजुरी देण्यात आली.
जागतिक हिपॅटायटिसचा दिवसाची थीम
या वर्षीच्या जागतिक हिपॅटायटिसची थीम ही 'Hepatitis Can't Wait'अशी आहे. जागतिक स्तरावर 2030 सालापर्यंत हिपॅटायटिसचे निर्मूलन करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे.
संकलन - साहेबराव माने. पुणे.
9028261973.