Home > मॅक्स ब्लॉग्ज > "लस" आणि "औषध" यात फरक काय?

"लस" आणि "औषध" यात फरक काय?

अलिकडे लसीची चर्चा वारंवार तुमच्या कानावर पडलीच असेल. मात्र, लस आणि औषध यातील फरक नक्की काय आहे. हे तुम्हाला माहित आहे का? | #MaxMaharashtra

लस आणि औषध यात फरक काय?
X

"लस" आपल्याला साथीची बाधा होऊ नये म्हणून आपण टोचून घेतो; घेतली पाहिजे. बाधा होईपर्यंत लस टोचून घेण्यासाठी कोणी थांबत नाही.

"औषध" रोगाची लक्षणे दिसू लागली की लगेच घेतात; दुसऱ्या शब्दात जर लक्षणे दिसली नाहीत तर कोणीही उगाचच औषधे घेत नाही.

"लस" "पब्लिक गुड" आहे का "प्रायव्हेट गुड" ?

"लस" टोचल्यावर त्या व्यक्तीला विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते; त्या अर्थाने ती एक व्यक्ती लसीची लाभार्थी असते. पण शर्ट, साडी विकत घेऊन घातल्यावर ज्या अर्थाने त्या अर्थाने लाभार्थी नसते. संपर्कात येऊ शकणाऱ्या सर्वाना, नोकर चाकर, ड्रायव्हर, सेवा पुरवणारे यांना देखील लस मिळणे हे श्रीमंतांच्या हिताचे आहे.

सर्वाना लस मोफत मिळाली पाहिजे ही मागणी मानवतावादी वगैरे नसून व्यावहारिक आहे. सर्व जगात औषध संशोधन आणि निर्माण उद्योगावर खाजगी मालकीचे प्राबल्य आहे. जेवढे लोक रोगग्रस्त तेवढा त्यांचा धंदा वाढणार असतो.

अशा आदर्श जगाची कल्पना करा. ज्यात सर्व व्यक्ती निरोगी आहेत; सर्व औषधं कंपन्यांचे शेअर्स शून्यावर येतील. त्यामुळे 'रोग निर्माणच होऊ नये" यावर संशोधन करण्यात त्यांना रस नाही; आत्महत्या करायला ते काही वेडे नाहीत.

पृथ्वीतलावर जवळपास काही लाख विषाणू अस्तित्वात आहेत आणि मानवजातीला त्यातील फक्त काही हजार (३ ते ४ हजार) विषाणूंची माहिती आहे. माणसाचे पक्षी, प्राणी जगतावरचे आक्रमण ज्या प्रमाणात वाढेल तसे विषाणूंचे माणसावरचे आक्रमण वाढू शकते.

गेल्या काही वर्षांमध्ये सार्स, मार्स, एबोला, निपाह अशा पद्धतीच्या विषाणूंचा प्रसार झाला; अनेक शास्त्रज्ञांनी या नंतरही महाभयानक विषाणूंच्या साथी येऊ शकतात असे इशारे अनेक वेळा दिले होते. कोरोना येऊन आदळेपर्यंत वैद्यकीय संशोधन क्षेत्राने त्याकडे दुर्लक्ष केले.

कोरोनाचा सर्व जगाला धडा म्हणजे: विषाणूवरील भविष्यवेधी लस संशोधन फक्त सार्वजनिक पैशातून झाले पाहिजे. लगेच नका मान्य करू; पण थोडा वेळ काढून विचार तर कराल ?

संजीव चांदोरकर (२० ऑक्टोबर २०२०)"लस" आणि "औषध" यात फरक काय?

Updated : 21 Oct 2020 12:32 PM IST
Next Story
Share it
Top