युक्रेन-आत्ताची परिस्थिती
रशिया युक्रेन युद्धाचे पडघम जगभर वाजत असताना जागतिक महासत्ता अमेरिकेमध्येही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. युक्रेनची सद्यपरिस्थिती रेखाटली आहे अमेरिकास्थित मिलिंद पदकी यांनी...
X
युक्रेनमध्ये खरेच सैन्य घुसवून पुतीन यांनी जगाला प्रचंड धक्का दिला आहे. निदान दीड -दोनशे युक्रेनियन सैनिक चकमकीत मरण पावले आहेत. किएव्ह या राजधानीपासून रशियन सैन्य २० मैलांवर आले आहे. प्रत्यक्ष किएव्ह मध्ये बॉम्बस्फोट घडत आहेत. पोलंडमध्ये येऊ पाहणाऱ्या युक्रेनियन निर्वासितांच्या गाड्यांच्या रांगेत आता २० तास वाट पाहावी लागत आहे.
जगभर पुतीन यांच्या निषेधाचा आवाज उठत आहे- अगदी रशियनांकडूनही, जे युक्रेनियनांना आपले "स्लाव्ह" बंधू मानतात. तिथे सेंट पीटर्सबर्ग मध्ये एक हजाराहून अधिक युद्ध-विरोधी निदर्शकांना अटक झाली आहे.
पण या सर्व कोलाहलात, गेली दहा वर्षे युक्रेनियन फॅसिस्टांकडून तिथल्या रशियन भाषिकांवर चालू असलेल्या अन्याय-अत्याचारांबाबत एकही शब्द उठत नाही हे थक्क करणारे आहे. या हिंस्त्र मंडळींनी ७ वर्षांपूर्वी ओडेसा हत्याकांडात ४३ लोकांना एका इमारतीत जाळून मारले होते. हजारो रशियन-भाषिक निर्वासित म्हणून रशियात गेले आहेत. गॅस न मिळाल्यामुळे थंडीने मेले आहेत. जी रशियन भाषा किमान वीस-पंचवीस टक्के लोक आपली मातृभाषा म्हणून बोलतात, आणि निदान तितकेच लोक रशियन-युक्रेनियन द्विभाषिक आहेत, त्या रशियन भाषेचाच अधिकृत दर्जा त्यांनी रद्द केला. डॉनबास मधील यादवी युद्धाचे हे मूळ आहे. तिथे गेल्या ७ वर्षात किमान १५,००० मरण पावले आहेत आणि पंधरा लाख निर्वासित झाले आहेत.
"बायडेन" यांचे नेतृत्व दुबळे आहे म्हणून पुतीन यांचे 'डेअरिंग" वाढले आहे" अशी एक मूर्ख बडबड त्यांच्या रिपब्लिकन विरोधकांकडून अर्थातच चालू आहे. युक्रेनला हवी असलेली सर्व शस्त्रास्त्रे अमेरिका पुरवीत आहे. अमेरिकन दडपणाखाली जर्मनीने "नॉर्ड स्ट्रॉम २" या रशिया-जर्मनी गॅस पाइपलाइनचे काम बंद केले आहे. अमेरिकेने (आणि नाटो, जपान, ऑस्ट्रेलिया यांनी) रशियावर अत्यंत कडक आर्थिक निर्बंध लादायला सुरवात केली आहे. पुतीन यांच्या आधुनिक "पेट्रो-स्टेट" मध्ये आता उच्च मध्यमवर्गीयांची प्रचंड संख्या आहे, जे युरोप-अमेरिकेला जायला, तिथल्या चैनीच्या वस्तूंना चटावलेले आहेत. त्यांच्याकडून पुतीन यांच्यावर जोरदार प्रेशरही येऊ शकते. पण युक्रेन हा सध्या नाटोचा सदस्य नाही. त्यामुळे अमेरिकन किंवा नाटोचे सैन्य युक्रेनच्या भूमीवर उतरू शकत नाही. मग रशियाशी अणुयुद्ध करावे असे या रिपब्लिकन मंडळींचे म्हणणे आहे काय? अमेरिका/नाटो यांच्याइतकेच अणुबॉम्ब आणि आंतर -खंडीय क्षेपणास्रे ( सुमारे ८ ते ९ हजार) रशियाकडेही आहेत हे नम्रपणे!
या युद्धाबाबत कोणत्याही बाजूचे समर्थन करणे अशक्य आहे. "हिंसा अनिष्ट आहे, आणि सर्व प्रश्न चर्चेने सोडविले जावेत " ही भारताने यूनोत घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होऊ लागल्याने चीनही विचलित झाला आहे, आणि त्यांनी मध्यस्थी करण्याची ऑफर दिली आहे. रशियाबरोबर त्यांचे सध्या घट्ट साटेलोटे असल्यामुळे ते यात यशस्वी होऊ शकतील.
पुतीन यांनी शेजारच्या बेलारूसच्या मिन्स्क या राजधानीत युक्रेनशी बोलणी करण्याची ऑफर दिली आहे. त्या बातमीने अमेरिकन शेअर बाजार आत्ता ७६० ने वधारला आहे. बघायचे!
मिलिंद पदकी यू एस ए