दहा मार्चला भाजप काय सांगणार?
सर्व राज्यांच्या मतदानोत्तर कल-चाचण्या आल्या आहेत. त्यात उत्तर प्रदेशात साधारण २४० ते २९० च्या आसपास जागा मिळतील असं भाकित आहे. आज सर्व वृत्तपत्रांनी उत्तर प्रदेशात पुन्हा भाजप असे मथळे दिले आहेत. अकरा मार्चलाही बहुदा ते तसेच असतील. भाजपला गेल्या वेळी ३१२ जागा मिळाल्या होत्या. म्हणजे सुमारे पन्नासेक जागा यावेळी कमी होण्याची शक्यता आहे, जेष्ठ संपादक राजेंद्र साठेंनी केललं विश्लेषण...
X
काँग्रेसच्या काळात अशा जागा कमी झाल्या तर माध्यमे ती काँग्रेसची हार मानत. आपल्याला आत्मपरीक्षण करायला लागेल असे काँग्रेसचे नेते म्हणत. पण दहा मार्चला काहीतरी वेगळे घडेल. देशविरोधी शक्तींनी एकत्र येऊन हरवण्याचे सर्व प्रयत्न केले तरीही भाजपने त्यांच्यावर मात केली असे आपल्याला सांगितले जाईल. भाजपचे मतदार व भक्त यांचा यावर अर्थातच मनापासून विश्वास बसेल. आपण देशविरोधी कट हाणून पाडला याचा त्यांना आनंद होईल. उलट ज्यांनी भाजपला मतं दिली नाहीत त्यांना आपण अशा कटात सामील होतो की काय अशा शंकेने खंतावून जायला होईल. त्यामुळे २०२४ ला पुन्हा ते अशी चूक करणार नाहीत.
प्रश्न असा आहे की हे कल खरे ठरले तर हा भाजपचा खरोखरीच विजय असेल का?
गेल्या सुमारे चार-सहा महिन्यांपासून भाजपने आसेतुहिमाचल सर्व देशांतल्या वृत्तपत्रांमधून योगींच्या आणि उत्तर प्रदेशाच्या पान-पानभर जाहिरातींचा प्रचंड मारा केला होता. अगदी दक्षिणेतल्या तमीळ आणि मल्याळम वृत्तपत्रात, जिथे योगी आणि उत्तर प्रदेशाचा काहीही संबंध नाही तिथेदेखील या जाहिराती प्रसिध्द होत होत्या. यावर किती शेकडो कोटी खर्च झाले हे कधीच कळणार नाही. माध्यमेही त्यावर काही बोलणार नाहीत. कारण ते त्यांना सोईचे नसेल. बाकीच्या राज्यांमध्ये जर योगींची पंतप्रधानपदासाठी इमेज तयार करायला इतका पैसा ओतला असेल तर उत्तर प्रदेशामध्ये माध्यमांमध्ये दिसणारा आणि न दिसणारा किती पैसा वाहिला असेल याची कल्पनाच केलेली बरी. माध्यमांच्या बातम्यांमध्ये ते दिसत होतेच.
याखेरीज अयोध्या, वाराणसी, मथुरा इथले धार्मिक कार्यक्रम वेगळे. इतके करूनही भाजपला निवडणूक जड जात असल्याचं दिसत होतं. मायावतींचा बसप हा महत्वाचा असून त्याला मुस्लिमांची मतं मिळतील असं अमित शहा एक्स्प्रेसला शेवटी शेवटी दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते. ही इच्छा होती, बसपला घोड्यावर बसवण्याचा प्रयत्न होता आणि बहुदा भाजपच्या प्रयत्नांची दिशाही होती.
पण भाजपविरुध्दची कमालीची नाराजी, असंतोष दहा मार्चच्या जल्लोषात वाहून जाईल. ती विसरली जावी यासाठी मिडिया चोख कामगिरी करील. खाल्या मिठाला जागावं तर लागेलच.
अखिलेश यादव यांना आता कितीही जागा मिळाल्या तरी त्या गेल्या वेळपेक्षा (४७) अधिक असतील. त्यांनी जोरदार कामगिरी केली यात शंका नाही. पण मुद्दा असा आहे की, त्यांना समजा १५० जरी जागा मिळाल्या तरी विरोधी पक्ष म्हणून प्रभावी कामगिरी करू शकतील का याविषयी शंका आहे. विरोधातला मिडिया, भाजपच्या प्रचाराचा झंझावात आणि इडीसारख्या यंत्रणा यामुळे ते दबूनच राहण्याची शक्यता अधिक. शिवाय सत्ता नसेल तर फाटाफुटीचाही धोका कायम राहील. शिवाय यंदाचा जोर पुढच्या वेळी टिकवणं कठीण आहे. तसं ते करू शकले तर चांगलंच आहे.
बिहारमध्ये तेजस्वी यादवांनी जोरदार लढत दिली. पण आता त्यांचा आवाज कमी झाला आहे. याउलट महाराष्ट्रात विरोधात असूनही सर्व राजकारण भाजपभोवती फिरत असतं. मिडियाची गंमत अशी असते की इथे ते सत्तारुढ म्हणून सेना-काँग्रेसला जाब विचारतात आणि दिल्लीत नेहरू, मनमोहन, सोनियांना जाब विचारतात.