मी का आणि कसा लिहितो ? : अच्युत गोडबोले
विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, मानसशास्त्र, संगीत या वेगवेगळ्या क्षेत्रात सहजपणे वावरणारा ‘मुसाफीर’ म्हणजे अच्युत गोडबोले....जेव्हा देशात माहिती तंत्रज्ञान क्षेत्र जन्माला येत होते, तेव्हाच जगभरातील दिग्गज आयटी कंपन्यांच्या प्रमुखपदी राहिलेले अच्युत गोडबोले यांनी कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजच्या नोकऱ्या नाकारुन भारतात राहणं पसंत केले. एवढेच नाही तर त्यांनी विविध विषयांवरील ४० मराठी पुस्तकं लिहिली आहेत...पण या लिखाणाचा एक हेतू आहे....तो हेतू काय आहे आणि या साहित्य प्रवासाची कहाणी काय आहे वाचा त्यांच्याच शब्दांमधून....
X
माझी आजपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरची जवळपास ४० एक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत तसंच असंख्य लेखही प्रकाशित झाले आहेत. त्यातली २० एक पुस्तकं, जरी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यावर असली तरी अनेक पुस्तकं मॅनेजमेंट, कायदा, अर्थशास्त्र, संगीत, चित्र-शिल्पकला, साहित्य, मानसशास्त्र अशी विविध विषयांवर आधारलेली आहेत.
'तुम्ही का आणि कसं लिहिता ?' हा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. माझ्या वाचनामागे आणि लिखाणामागे माझ्यातलं कुतूहल हे मुख्य कारण आहे. मला अनेक विषयांबद्दलचं कुतूहल असतं. माझ्यातला विद्यार्थी कायम जागा असतो. एक प्रश्न पडला की त्याबद्दल जी काही माहिती आणि ज्ञान जिथून कुठून मिळेल तिथून मी गोळा करायचा प्रयत्न करतो. स्वत: विद्यार्थी म्हणून शिकतो आणि मग तो सोप्या भाषेत इतरांना समजावा म्हणून मग मी लिहितो.
आपलं विश्व कसं निर्माण झालं?बिग बँगपासून निर्माण झालेलं आपलं विश्व १४००कोटी वर्षांपूर्वी सुरू झालं. मग मला प्रश्न पडतो त्याच्या अगोदर काय होतं? पण आजच्या विज्ञानाच्या दृष्टीनं त्याच्या अगोदर काय होता हा प्रश्नचं विचारणंच चुकीचं आहे. कारण वेळच १४०० कोटीवर्षांपूर्वीपासून सुरू झाली. ही किती गंमतशीर गोष्ट आहे बघा. बिग बँगपासून विश्व निर्माण झाल्यावर, तारे, गॅलेक्सीज अशा सगळ्यागोष्टी निर्माण झाल्या. मग ४७५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाली. नंतर मग पहिला जीव ३७५ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाला. आणि त्यानंतर उत्क्रांती होत होत माणूस जन्माला आला. त्यानंतर माणसांनी एकत्र राहायला सुरुवात केली. त्याला आजूबाजूला इंद्रधनुष्य दिसलं असेल, समुद्राची भरती-ओहटी दिसली असेल, सूर्याचं उगवणं-मावळणं दिसलं असेल, ज्वालामुखी दिसले असतील, वादळं, भूकंप दिसले असतील. या सगळ्याला माणसाने 'का ?' हा प्रश्न विचारला आणि त्यातून प्रश्न विचारत विचारत त्या कुतूहलातून विज्ञान निर्माण झालं. हा 'का ?' हा प्रश्न माणसांनं विचारला नसता तर आपण आज सगळे मान खाली घालून गुरांसारखे चरत बसलो असतो. 'का' हा प्रश्न माणसानं त्यावेळी विचारला म्हणून विज्ञान निर्माण झालं. त्या विज्ञानाचा आपल्या फायद्याकरता उपयोगकरून त्याच्यातून काही वेगवेगळ्या गोष्टी माणसानं बनवायला सुरुवात केली; आणि त्यातून तंत्रज्ञान निर्माण झालं. माणसानं एकत्र राहायला सुरुवात केली, तेव्हापासून वेगवेगळे विचारप्रवाह निर्माण झाले आणि त्यातून अर्थशास्त्र, मानसशास्त्र, अनुवंशशास्त्र, समाजशास्त्र, तत्वज्ञान अशा अनेक वेगवेगळ्या ज्ञानशाखा निर्माण झाल्या. त्यानंतर माणूस आपल्या आयुष्याचा अर्थ शोधायला लागला आणि स्वतःला व्यक्त व्हायला लागला. त्यातूच संगीत, साहित्य, चित्रकला अशा सगळ्या कला निर्माण झाल्या. हे सगळंच भन्नाट आहे. या सगळ्यांचा इतिहास, त्यांची मूलतत्वं आणि त्यांच्यामधले मुख्य शिलेदार म्हणजे वैज्ञानिक, तंत्रज्ञ, गणितज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, संगीतकार, साहित्यकार, चित्रकार या सगळ्यांविषयी जाणून घेण्याची मला प्रचंड उत्सुकता असते. हे सगळं कसं घडलं असेल ? तसंच 'का ?' आणि 'कसं ?' हे प्रश्न मला नेहमी पडतात आणि मी त्याकडे ओढला जातो.
माझं साहित्य-संगीत, चित्रकला, शिल्पकला या सगळ्या गोष्टींवर प्रचंड प्रेम आणि त्यांच्याविषयी मला लहानपणापासून कुतूहल आहे. हे वरवरचं नाही. संगीत, साहित्य आणि चित्रकला या आपल्या आयुष्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याइतक्याच किंवा यांच्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत हे संस्कार माझ्यावर लहानपणीच झाले होते. तसं लहानपणापासूनच विज्ञान आणि गणित अशा अनेक विषयांमध्ये मला रस निर्माण झाला होता, त्यांच्यामधला मी तज्ज्ञ नसलो, तरी त्यांच्यामध्ये मला 'इनसाईट'ही मिळाली होती. पण आयआयटीमध्ये असताना मी आणखीन काही विषयांकडे ओढला गेलो, ते माझ्या मित्रांमुळे. आमच्या ग्रुपमध्ये अनेक जणांना अनेक विषयांमध्ये रस होता. म्हणजे शिक्षण एका विषयाचं चालू असलं तरी इतर अनेक विषयांत खोलवर रस असणारे आम्ही सगळे होतो. त्यातले अनेक जण प्रचंडच हुशार होते. नुसते हुशार नव्हते त्यांच्या विषयात तर ग्रेट होते ! आम्ही काही मित्र एकत्र जमलो की अनेक विषयांवर भरपूर विषयांवर चर्चा व्हायच्या. अगदी रात्ररात्रभर आम्ही चर्चा करायचो. अनेकदा गाणीही ऐकायचो. सिनेसंगीत आणि क्लासिकल म्युझिकपासून वेर्स्टन म्युझिकपर्यंत सगळं मनमुराद ऐकलं. नुसतं ऐकणं आणि सोडून देणं हा प्रकार नसायचा. त्यात खोलवर डुबकी मारणं असायचं. त्यावर आमच्या चर्चाही व्ह्याच्या. अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान, इतिहास अशा विषयांचही तसंच. हे काही परीक्षेला येणार नव्हतं. पण मार्क्स बरोबर की केन्स ? फ्रॉईडचं कुठे चुकलं ? आईन्स्टाईननं फोर्थ डायमेंशनल जिऑमेट्री कशी वापरली ? बिग बँग कशी झाली ? भारतात गरिबी का आहे ? कॅटची 'थिअरी ऑफ नॉलेज (एपिस्टिमॉलॉजी) किंवा विटगेन्स्टाईनचं ट्रॅक्टॅटस या काय भानगडी होत्या ? इंग्रजी साहित्यातला 'थिएटर ऑफ दी अॅब्सर्ड' हा काय प्रकार होता ? क्युबिझिम म्हणजे काय ? हे आमच्या समोरचे गहन प्रश्न होते. थर्ड ईअरनंतर आयआयटीमध्ये पास होण्यापुरता अभ्यास केला; पण बाकीचा वेळ आमचा असाच जायचा.
पण हा वेळ वाया गेला किंवा वायफळ गेला असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण यातून आमचं ज्ञान वाढायचं. विचारांची देवाणघेवाण व्हायची. त्यामुळे मला अनेक विषयांमध्ये डुंबायची सवयच लागली. कुतुहलापोटी मला अनेक प्रश्न पडणं आणि त्याची उत्तरं शोधत शोधत त्या विषयाच्या खोलवर जाणं या सगळ्या गोष्टी मग सुरूच झाल्या त्या आजतागायत सुरूच आहेत. त्यामुळे मी स्वतःला कुठल्याच विषयातला तज्ञ मानत नाही. पण विद्यार्थी मात्र मानतो.
कुठल्यातरी परिक्षेत पास व्हायचं, जीआरई द्यायची आणि अमेरिकेत जाऊन सेटल व्हायचं असं कधीचमाझ्या डोक्यात आलं नाही. उलट अनेक विषयांमध्ये डोकावून बघावं, ते विषय समजून घ्यावेत असंच मला वाटत राहिलं. हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे. आपण त्यातले तज्ज्ञ होणं शक्य नाही. परंतु पण त्या सगळ्यातली मूलतत्वं समजली पाहिजेत. त्यातले मुख्य शिलेदार, शिल्पकार कोण होते, त्याचा इतिहास काय होता हे सगळं समजून घेण्यामध्ये इतका प्रचंड रस निर्माण झाला की संपूर्ण आयआयटीची खोली वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांनीच पूर्णपणे भरलेली असायची. अजूनही माझं हे शिक्षण चालूच आहे.
नंतर माझ्या आयुष्यात प्रचंड चढउतार आले. मी काही काळ आदिवासी चळवळीतही सहभागी झालो आणि एका शांततामय सत्याग्रहात जेलमध्येही गेलो. नंतर मी इन्फर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये शिरलो.मग कालांतरानी मी तिथे ३२ वर्षं काम केलं. त्यात २३ वर्षं सीईओ, मॅनेजिंग डायरेक्टर होतो. हजारो सॉफ्टवेअर इंजिनिअर्सच्या जागतिक कंपन्यांचा मुख्य म्हणून काम केलं. आणि त्यात मी इंग्रजीत इन्फर्मेशन टेक्नोलॉजीवरती ४ पुस्तकं लिहिली. ऑपरेटिंग सिस्टम्स ७०० पानी, बाकीची डेटा कम्युनिकेशनआणि नेटवर्क्स, वेब टेक्नॉलॉजी, डीमिस्टिफाईंग कॉम्प्युटर्स अशी ५००-६०० पानी पुस्तकं लिहिली. ती मग मॅग्रोहिल्सनं, चिनी भाषेत भाषांतरीत केली. जी आता जगभर मिळतात.
माझ्या मुलाला ऑटिझम असल्यामुळे मी त्याच्या उपचारासाठी पैसे जमा करत होतो. पण एका क्षणी मात्र मुलासाठी लागतील तेव्हढे पैसे जमा करण्यापर्यंत ठीक आहे; पण त्यापेक्षा आणखीन पैसे मिळवण्यासाठी धडपड करणं हे कितपत योग्य आहे असं वाटायला सुरुवात झाली. कारण मला अलिशान गाड्या, बंगले, परदेशवाऱ्या अशात सुरुवातीपासून फार रस नाहीच. हे जग मी नोकरीत असताना अनुभवत होतोच. पण आता मात्र हे सगळं सोडून पुस्तकांच्या जगात यावं असं मला वाटायला लागलं. यातून मला दोन गोष्टी साध्य करायची इच्छा होती. एक तर मला 'मराठी ही ज्ञानभाषा' व्हायला हवी असं वाटत होतं आणि दुसरं म्हणजे समाजासाठी काहीतरी करावं अशी माझी इच्छा होती. मग मी चक्क वार्षिक २-३ कोटी रु. पगाराच्या नोकऱ्या सोडून दिल्या. हा निर्णय काही सोपा नव्हता. प्रचंड वैभव, मोठ्मोठ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहणं, अमेरिकेत गेलं तरी तिथल्या माझ्या कंपन्यांतल्या व्हाईस प्रेसिडेंटकडून स्वागत होणं अशा सगळ्या दिमाखदार गोष्टी या एकदम सोडून देऊन साधेपणानं राहून पूर्णपणे मराठी लिखाणाकडे वळण हे नक्कीच सोपं नव्हतं. शिवाय एव्हढं करून आपलं लिखाण कुणाला आवडलंच नाही, तर ? तर आपण आयुष्यात काहीच केलं नाही असं वाटलं असतं. पण ती रिस्क मी घायायची ठरवली आणि मला आजपर्यंत माझ्या निर्णयाचा पश्चाताप झालेला नाही.
याचं कारण म्हणजे मला वाचकांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद. आत्तापर्यंत मराठी ४० एक पुस्तक झाली आणि जवळपास सगळीच गाजली. माझं आत्मचरित्र 'मुसाफिर' ७० हजार, मानसशास्त्रावरचं पुस्तक 'मनात' ६० हजार, इतर ६०-७० हजार इ. असा प्रचंड प्रतिसाद माझ्या अनेक पुस्तकांना मिळाला. किती कॉपीज गेल्या यापेक्षा मला हजारो मुलांचे फोन येतात की, 'त्या अमुक एका पुस्तकांमुळे आमचं आयुष्य बदललं'. पुस्तकं आवडतात अशा कॅटेगरीमध्ये लाखोंच्या संख्येने लोक आहेत. त्याचबरोबर हजारो चाहत्यांचे लेखी स्वरूपात इमेल्स/मेसेजेस आहेत. पुस्तकामुळे त्यांच्या आयुष्यात काय बदल झाला, नैराश्य गेलं, करिअर झालं, किमयागार वाचलं आणि सायन्समध्ये पीएचडी केली आणि आता अमेरिकेतल्या लॅबमध्ये कार्यरत आहेत असं अनेक जण मला सांगतात. तसंच 'मी आत्महत्येचा विचार करत होतो; पण तुमच्या लिखाणामुळे माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आणि आत्महत्येचा विचार सोडून दिला' असं मला आतापर्यंत १४ जणांनी सांगितलं आहे ! शिक्षकांचं, पालकांचं, विद्यार्थ्यांचं, व्यवसायिकांचं खर म्हणजे सगळ्या आबालवृद्धांचं प्रचंड प्रेम मला मिळालं. आणि इथेच मला माझ्या कामाची खरी पावती मिळते. आपण कुणाच्यातरी आयुष्याला स्पर्श करतोय असं वाटतं आणि मी उत्साहानं लिहितच जातो.
मला एखादा विषय आवडला की मी त्या संबंधित जे काही मिळेल ते एखाद्या विध्यार्थ्यासारखं समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यासाठी मी त्या विषयातल्या तज्ञांनाही विचारायला लाजत नाही. तसंच मी जगात जिथे जाईन तिथून पुस्तकं गोळा करत असतो. माझ्याकडे तब्बल ४००० च्या वर पुस्तकं आहेत. तो विषय एकदाबऱ्यापैकी समजला की त्याच धुंदीत मला तो इतरांनाही सांगावासा वाटतो आणि यातूनच पुस्तक घडतं. पण यात कुठेही 'बघा मी किती हुशार आहे', 'मला किती ज्ञान आहे' अशा भावना नसतातच. कारण ते खरंही नाहीये आणि याचं कारण खोटा विनयही नाहीये. मी माझ्या आयुष्यात जगातली एव्हढी मोठी आणि ज्ञानी माणसं बघितली आहेत, की त्यांच्यापुढे आपण म्हणजे 'किस झाड की पत्ती' याचं मला नेहमीच भान असतं.
उलट 'हे किती छान आहे. मला जे समजलं आहे, ते मला तुम्हाला सांगायला आवडेल' आणि 'तुम्हीही माझ्या बरोबरीनं ते समजून घ्या' अशा माझ्या कुठलंही पुस्तक लिहिताना भावना असतात. 'ज्ञान' म्हणजे आणखीन काय असतं ? विचारांची देवाणघेवाण असते. ती देवाणघेवाण चांगल्या, सोप्या आणि रंजक पद्धतीनं झाली तर त्यात आणखीनच मजा येते. मला नेमकं हेच करायचं होतं. त्यामुळेच मी माझ्या लिखाणात कुठेही जड शब्दांचा वापर करत नाही. उगाचंच एखाद्या तांत्रिक शब्दाला ओढूनताणून पर्यायी मराठी शब्द लिहित नाही. कारण तो वाचकांना समजलाच नाही, तर लिखाणाचा मूळ हेतूच बाजूला पडतो असं मला वाटतं. त्यामुळे माझ्या पुस्तकात किंवा लेखांमध्ये तुम्हाला अनेकदा इंग्रजी शब्द देवनागरीमध्ये लिहिलेले दिसतील. पुस्तक रंजक असलं की ते वाचकांना वाचताना रटाळ वाटत नाही आणि विषयात रस निर्माण होतो याचीही मला जाणीव आहे. त्यामुळे पुस्तकात अचूकता, रंजकता, साधी सोपी भाषा असायलाच हवी याकडे माझा कटाक्ष असतो. माझ्या पुस्तकात सोप्या भाषेत तांत्रिक बाबी समजावून सांगितलेल्या असतातच, शिवाय त्या संदर्भातला इतिहास, त्यातले संशोधक, त्यांची आयुष्यं, त्यांच्यातले वाद हे सगळंच एका गोष्टीसारखं वाचकांना वाचायला मिळतं. त्यामुळेच माझी पुस्तकं म्हणजे कथाकादंबऱ्या नसूनही त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला. गंमत म्हणजे मी स्वत: PhD नाहीये, पण माझ्या लिखाणावर आज ३ लोक PhD करताहेत !
मला स्वत:ला या सगळ्या संशोधकांबद्दल कुतूहल आहे. पण अर्थशास्त्रात अँडम स्मिथ, मार्क्स, केन्स, मानसशास्त्रात फ्रॉईड, एलिस यांच्या थिअरीज किंवा गणितात पायथॅगोरसपासून ते अगदी गॅल्वा, गाऊस, रीमान आणि रामानुजन तसंच विज्ञानात गॅलिलिओ, न्यूटन, आईनस्टाईन, फाईनमन, हॉकिंग अशा सगळ्या मंडळींनी मला प्रचंड मोहित केलं आहे. त्याचबरोबर सामाजिक चळवळी आणि प्रगतीशील विचार याचाकडे मी आर्कषित होतो. मी आतापर्यंत संपूर्ण आयुष्यात कुठलाही धर्म मानला नाही, जात मानत नाही, मला रंग भेद हा तर वर्ज्य आहे. मीस्त्री-पुरुष भेद करत नाही. नोकरीमध्ये मी स्वतः मुलांना नोकऱ्या दिल्या तेव्हा कधीही मुलगा-मुलगी फरक केला नाही. स्त्री पुरुष समानता, जातीमूल्य समानता, धर्मामूल्यं समानता या सगळ्यांच्या बाबतीमध्ये समान संधी निर्माण व्हावी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, विज्ञानवाद, विवेकवाद आणि माणुसकी ही तत्वंआणि मूल्यंपाळायचा मात्र मी प्रयत्न करत असतो, आणि त्याचं प्रतिबिंबही माझ्या लिखाणात दिसतं असा माझा प्रयत्न असतो. मी स्पिनोझा किंवा आईनस्टाईन यांच्याप्रमाणेच विज्ञानाला देव आणि माणुसकीला धर्म मानतो.
गेल्या अनेक वर्षांत माझी अनेक पुस्तकं वेगवेगळ्या सहलेखकांबरोबर आणि कित्येकजणं मला याचं कारण विचारतात. गेल्या काही वर्षांपासून मात्र मला बीपी, डायबेटीस असे अनेक आजार जडले. स्पोंडिलायटिस आणि सायटिका यामुळे मला बराच वेळ सलग बसता येईनासं झालं. पण अनेक विषय डोळ्यात अजूनही घोळत होते. म्हणून मग मी सहलेखक आणि सहलेखिका यांच्याबरोबर लिखाण सुरू केलं. पुस्तकाची संकल्पना, त्याची मांडणी, त्याचं शीर्षक, त्यातले विचार, त्याचा क्रम (सीक्वेन्स), त्यांची लांबी, त्याकरता वापरायची पुस्तकं, त्यातली भाषा याचं संपूर्ण नियोजन हे बरेचदा माझं असतं; आणि मग चर्चेनंतर त्यात काही फेरफार होतात. त्याविषयीचं मी जर पूर्वी काही लिखाण करून ठेवलेलं असेल, तर ते मी त्या सहलेखकांना देतो. मग त्यांच्याबरोबर पूर्ण पुस्तकांची चर्चा करतो. त्या नंतर उरलेलं प्रत्यक्ष लिखाण मात्र बरंचसं ते करतात. त्यानंतर ते लेख संपूर्ण तपासणं, त्याची पाहिजे तिथे भाषा बदलणं, त्यात आणखी काही भर टाकणं हे सगळं मी पुन्हा करत असतो. तरीही माझ्या आता अलिकडल्या पुस्तकांमधली जी पुस्तकं पूर्ण झाली त्याचं बहुतांशी सगळं श्रेय मी माझ्या सहलेखकांनाच देईल. ही सगळी मंडळी प्रचंड हुशार तर आहेतच, पण मेहनती आणि अभ्यासू वृत्तीचीही आहेत. माझी पुस्तकं भराभर येताहेत त्यांचं एक म्हत्त्वाचं कारण म्हणजे माझे सहलेखक/लेखिका ! त्यांच्याशिवाय हे होऊच शकलं नसतं.
माझी अगदी नुकतीच प्रकाशित झालेली पुस्तकं म्हणजे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स', 'प्रवास' आणि 'सजीव'. ही तीनही पुस्तकं अतिशय गाजताहेत.त्यांच्या २ महिन्यातच ४-५ आवृत्त्या संपल्या आहेत. आता 'इन्फोटेक' नावाचं माझं पुस्तक येतंय. कॉम्प्युटर कसा चालतो, इंटरनेट कसं चालतं, मोबाईल कसा चालतो, शिवाय क्लाऊड, थ्रीडी प्रिंटिंग आणि बिग डेटा, IOT, IIOT, सेन्सर्स, जीपीएस, गुगल मॅप्स, जीआयएस, ५G कम्युनिकेशन, ऑग्मेंटेड/व्हर्च्युअल रिअॅलिटी, बिटकॉईन, ब्लॉकचेन या सध्या सतत ऐकत असलेल्या तंत्रज्ञानांबद्दल सोप्या भाषेत समजावून सांगणारं हे पुस्तक दिवाळीत येतंय.
त्यानंतर माझं 'इंडस्ट्री ४.०' नावाचं पुस्तक येईल. त्याचबरोबर माझी 'अन्न', 'प्रकाशतंत्र' आणि 'हवा' म्हणजेच 'आपल्याला जगण्यासाठी गरजेच्या तीन गोष्टींवरची पुस्तकं दिवाळीनंतर एका महिन्यातच प्रकाशित होणार आहेत. यातलं 'प्रकाशतंत्र' हे पुस्तक माझं एकट्याचं आहे; 'अन्न' हे अमृता देशपांडेबरोबर तर 'हवा' अविनाश सरदेसाईबरोबर लिहिलं आहे. त्याचबरोबर 'शरीर' हे ५४५ पानी 'ह्युमन अँनॅटॉमी आणि फिजियॉलॉजी'वर पुस्तक अमृता देशापांडे हिच्याबरोबर, त्याचबरोबर 'माय लोर्ड' हे पुस्तक म्हणजेच 'जागतिक कायद्याचा इतिहास'अॅड. माधुरी काजवेबरोबर लिहिलेलं आहे. अमृता देशपांडे आणि आसावरी निफाडकर या दोघींबरोबर माझी अनेक पुस्तकं चालू आहेत.
माझं डॉ. वैदेही लिमियेबरोबर 'सूक्ष्मजंतू' नावाचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. तिच्याबरोबरची'रक्त' आणि व्हिटॅमिन्स ही यापूर्वी प्रकाशित झालेली पुस्तकंही गाजली. या सगळ्या सहलेखकांमुळे माझी पुस्तकं भराभर होत आहेत.
माझी पुढची १५ एक पुस्तकं, विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित इ. विषयांवरती ठरलेली आहेत. पण त्याशिवाय माझ्या डोक्यात इतरही अनेक पुस्तकं आहेत. 'टेक्नॉलॉजी-करंट अँड फ्युचर','आयडीयाज दॅट चेंज दी वर्ल्ड', 'आयडीआय इन इकोनॉमिक्स', 'आयडीआयज इन मॅथॅमॅटिक्स', 'आयडीआयज इन सायकॉलॉजी', 'आयडीआयज इन फिलॉसॉफी'अशी मिळून 'आयडीयाज'ची ७-८ पुस्तकं असतील.
तसंच सोशॅलिझम, कॅपिटॅलिझम, कम्युनिझम, फॅसिझम, अनार्किझम, फेमिनिझम अशा सगळ्या इझ्मसवरती ७-८ पुस्तकं असतील. तशी माझ्या डोक्यात पुस्तकांच्या विषयांची बरीच मोठी यादी आहे. पण आता माझं वय आणि इतर अनेक प्रश्न लक्षात घेता हे सगळं काही होणं मला फार सोपं वाटत नाहीये. त्यामुळे मी माझी पुस्तकं ज्यांना रस आहे त्यांना वाटून त्यांनी एकट्यानं पुढे लिहीत रहावं यासाठी प्रयत्न करणार आहे.
माझ्याकडे मी स्वत: आयुष्यात जमा केलेली ४ हजार पुस्तकं आहेत. ती मी चक्क वाटून टाकणार आहे. माझ्या डोक्यातले २०० एक विषयसुद्धा मी फेसबुकवर टाकणार आहे. ज्यांना जे लिहावंसं वाटेल किंवा अमुक एका विषयात रस असेल त्यांना मी शक्य झालं तर पुस्तकं तर देईनच शिवाय मार्गदर्शनही करेन. पुस्तकावर माझं नाव आलं नाही तरी चालेल. मराठी भाषेमध्ये हे सगळं आलं पाहिजे आणि मराठी ही ज्ञानभाषा व्हायला हवी या धडपडीतनं आणि तळमळीने मी हे काम सुरू ठेवलं आहे. 'मराठी ज्ञानभाषा' बनवण्यातआपण १ % जरी योगदान करू शकलो तरी मला धन्य वाटेल !
अच्युत गोडबोले
email : [email protected]
website: http://achyutgodbole.info