Home > मॅक्स ब्लॉग्ज > आयुष्याला उत्तर देणाऱ्या आम्ही मधुमेही

आयुष्याला उत्तर देणाऱ्या आम्ही मधुमेही

आयुष्याला उत्तर देणाऱ्या आम्ही मधुमेही
X

टाईप १ मधुमेह असलेल्यांना जगेपर्यत दररोज इन्सुलिन घ्यावं लागतं ही बाब खरी आहे. इन्सुलिनच्या बाटलीवर अवलंबून असलेलं असं आयुष्य जगायला हिंमत लागते आणि आजमितीला काही मुलींनी ही हिंमत दाखविली देखील आहे. विशेष म्हणजे टाईप १ मधुमेहाशीच नव्हे तर याबाबत मोठ्या प्रमाणात असलेल्या सामाजिक अढीवरही (सोशल स्टिग्मा) मात करण्यात त्यांना काही प्रमाणात यश आलंय. शिक्षणात तर त्यांनी मोठी मजल मारलीच आहे परंतु घराचा आर्थिक डोलाराही स्वत:च्या खांद्यावर पेलण्याइतक्या त्या कणखरदेखील बनलेल्या आहेत. परंतु अजूनही समाज या मुलींना, महिलांना त्यांच्या आजारासह स्वीकारायला तयार नाही ही त्यांची खंत फार मोठी आहे. कुटुंबव्यवस्था, लग्न, मुलं, सासंर अशा बाईपणाच्या प्रवासात भेदभावाचे अनेक चटके त्या सोसत आहेत. मधुमेहाबाबत असलेल्या सामाजिक अढीमुळे निर्माण झालेला हा भेदभाव कुटुंबापुरताच मर्यादित नाही तर शिक्षण, नोकरी अशा टप्प्यांवरही त्या अनुभवत आहेत आणि त्याच्याशी झगडत आहेत. कधी त्या थकतात, गळतात आणि हरतातही. पण अशा अनेक आव्हानांचं अत्तर लावून या मुली आयुष्याला दररोज उत्तर देत आहेत.

....





औरंगाबादच्या सानिकाचा (२३) मागील नऊ वर्षापासून टाईप १ मधुमेहासोबतचा प्रवास सुरू आहे. सानिका आठवीत असताना तिला हा मधुमेह असल्याचं समजलं. जगते की मरते अशी तिची स्थिती होती. परंतु तिच्या पालकांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता आता हीचं लग्न होईल का? सानिकाची प्रकृती हळूहळू सुधारली. पुढे ती सिव्हिल इंजिनिअर झाली. लग्नाचं वय झालं. तिला स्थळं यायला सुरुवात झाली. सासरच्यांना काहीही न सांगता लपवून लग्न करण्याचा दबाव तिच्यावर कुटुंबातून टाकला जात होता. पण मधुमेह असल्याचं समजल्यानंतर लग्न मोडलं तर आपलं काय होणार याची चिंता सानिकाला लागली होती. अखेर तिनं खोटं बोलून लग्न न करण्याचं ठरवलं. येणाऱ्या प्रत्येक स्थळाला ती आपल्याला टाईप १ मधुमेह आहे, दिवसातून चार ते पाच वेळा इन्सुलिन घ्यावं लागतं हे सारं सांगायची आणि शेवटी नकार यायचा. असं जवळपास नऊ ते दहा स्थळांनी टाईप १ मधुमेह असल्यानं सानिकाशी लग्न करण्यास नकार दिला. काही स्थळांनी लग्न करण्याची इच्छा दाखविली परंतु त्यांनी अवाजवी अटी घातल्या. काहींनी मोठ्या प्रमाणात हुंडा मागितला तर काहींनी सासरच्या इतर नातेवाईकांपासून लपवून ठेवण्याचं बंधन घातलं. यामुळं तिचं लग्न अनेक वर्ष जुळतं नव्हतं. अखेर तिच्या वर्गमित्राने तिला मागणी घातली आणि त्यांचा प्रेमविवाह झाला. परंतु हा आंतरजातीय विवाह असल्यानं सासरच्यांनी सानिकाला स्वीकारलं नाही. सानिकाच्या लग्नाला आता दोन वर्षे झाली असून आठ महिन्याचा मुलगा देखील आहे. विशेष म्हणजे बाळ आणि नोकरी करत सध्या घराचा आर्थिक भारही सानिका उत्तमरित्या सांभाळत आहे.

टाईप १ मधुमेह हा तसा असंसर्गजन्य म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीस प्रसार न होणारा आजार. परंतु या आजाराबाबत समाजात असलेली अपुरी माहिती आणि ज्ञान यामुळं टीबी, एचआयव्हीप्रमाणं याबाबतची सामाजिक अढी (सोशल स्टिग्मा) दिवसेंदिवस वाढतच आहे. याची झळ पितृसत्ताक व्यवस्थेमुळं मुली किंवा महिलांना अधिक बसते. परंतु ही झळ सोसूनही सानिकासारख्या अनेक मुली आज धडपडत आहेत केवळ जिवंत राहण्यासाठी नव्हे तर एक सामान्य माणूस म्हणून जगण्यासाठी.

...





टाईप १ मधुमेहाचं गांभीर्य

मधुमेहाचा पहिला प्रकार म्हणजे टाईप १ मधुमेह. या मधुमेहींमध्ये इन्सुलिनचा पूर्णपणे अभाव असतो. कारण त्यांचं स्वादुपिंड अजिबात इन्सुलिन तयार करत नाहीत. त्यामुळं उपचार म्हणून यांना इन्सुलिनचं इंजेक्शन घेणं अनिवार्य असतं.

अन्नाच्या चयापचयासाठी स्वादुपिंडामध्ये स्रवल्या जाणाऱ्या काही अंत:स्रावींपैकी (हार्मोन्स) इन्सुलिनची फार आवश्यकता असते. मधुमेही रुग्णांमध्ये इन्सुलिन स्रवण्याचे प्रमाण कमी होते किंवा काही जणांमध्ये पूर्णत: बंद होते. इन्सुलिनच्या अभावामुळे मधुमेहामध्ये या चयापचय क्रियेमध्ये समतोल राहत नाही. त्यामुळे शरीराचे नीटसे पोषण होत नाही. रक्तातील द्राक्षजा (ग्लुकोज) पेशिकांच्या आतील भागात पोहचविण्याचे महत्त्वाचे काम इन्सुलिन करत असते. या द्राक्षजेपासून पेशिकांना शक्ती मिळते आणि त्यांचे कार्य उत्तम प्रकारे चालते. इन्सुलिन उपलब्ध नसल्यास रक्तातील साखर वाढत राहते व पेशी उपाशीच राहतात. पेशी कार्यरत नसल्यानं मग शरीर कार्यरत राहण्यात अनेक अडथळे निर्माण होतात.

शंभर वर्षापूर्वीपर्यत हा आजार जीवघेणा समजला जात होता. टाईप वन मधुमेही त्या काळी फार जगत नव्हते. रक्तातील साखर नियंत्रणाकरिता काहीच उपाय नव्हता. कारण इन्सुलिनचा शोध लागलेला नव्हता. १९२२ साली इन्सुलिनचा शोध लागला आणि टाईप १ मधुमेहींवरील उपचार करणं सोपं झालं. भारतासारख्या देशामध्ये मात्र टाईप १ मधुमेहासाठी आवश्यक इन्सुलिनसह मधुमेह तपासणीचा वारेमाप खर्च, उपचार आणि आहाराबाबत मार्गदर्शनाचा अभाव यामुळं अजूनही हा आजार जीवघेणाच ठरत आहे.

टाईप १ मधुमेहाची लागण ही बहुतांशपणे लहान मुलांमध्ये होते. विशेषत: चार ते सहा वयोगटामध्ये आणि किशोरवयीन बालकांमध्ये दिसून येतो. हा मधुमेह वयोवृद्ध व्यक्तीमध्येही आढळतो. त्यामुळे टाईप १ हा बालमधुमेह असल्याचा गैरसमज असल्याचं औरंगाबादच्या टाईप १ मधुमेह तज्ज्ञ डॉ. अर्चना सारडा सांगतात.

या मधुमेहींमध्ये वजन कमी होणं, वारंवार भूक आणि तहान लागणं, लघवीला वारंवार होणं ही लक्षणे प्रामुख्यानं दिसून येतात. परंतु केवळ पालकच नव्हे तर स्थानिक डॉक्टरांमध्ये याबाबत फारशी जागृती नसल्यानं या आजाराचं निदान वेळेत होत नाही. बहुतांश वेळा मग ही आपत्कालीन स्थितीमध्ये दवाखान्यात येतात. तोपर्यत बालकाची प्रकृती गंभीर झालेली असते. ग्रामीण भागात तर अनेक बाबींची वानवा असल्यानं अजूनही काही मुलं डायबिटिक केटोएसिडोसिस म्हणजे गंभीर स्वरुपाच्या मधुमेहाच्या टप्प्यापर्यत पोहचल्यावरंच त्यांचं निदान केलं जातं, असंही पुढे डॉ. अर्चना सांगतात.

भारतात टाईप १ मधुमेहाची अनेक मुलं गेल्या कित्येक वर्षात वाचू शकलेली नाहीत. त्यामुळं सध्याच्या घडीला सरासरी ३०-४० वर्षावरील टाईप १ मधुमेही हातावर मोजण्याइतकेच दिसून येतात. जागतिक डायबिटीस फेडरेशन २०२१ च्या अहवालानुसार, भारतामध्ये १९ वर्षाखालील सुमारे २.५ लाख बालकं ही टाईप १ मधुमेहग्रस्त आहेत. टाईप १ आजाराबाबत गांभीर्यताच नसल्यानं या रुग्णांची नोंदणीही भारतात अद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळं देशात या मधुमेहाच्या रुग्णांची ठोस आकडेवारीच उपलब्ध नसल्याची खंत डॉ. अर्चना व्यक्त करतात. ज्युवेनाईल डायबिटीस रिसर्च फाऊंडेशन या जागतिक संस्थेने केलेल्या दाव्यानुसार भारतामध्ये सुमारे ८ लाख बालके टाईप १ मधुमेहानंग्रस्त असल्याचे म्हटलयं. ही आकडेवारी वास्तवतेच्या जवळपास जात असल्याचं मानलं जातं. मात्र अजूनही या आजाराचं गांभीर्य सरकारला ज्ञात झालेलं नाही आणि परिणामी सर्वसामान्यही यापासून अज्ञात राहिले आहेत.

.....

टाईप १ मधुमेह आणि सोशल स्टिग्मा

टाईप १ मधुमेह या आजाराबाबत शास्त्रोक्त माहितीचा प्रसार फारसा झालेला नाही. त्यामुळं ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातही याबाबत अज्ञानच अधिक असल्याचं आढळतं. जेवढं अज्ञान तेवढे गैरसमज. परिणामी या आजाराबाबत सामाजिक अढी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी हा आजार एकापासून दुसऱ्याला होतो असा गैरसमज काही प्रमाणात आहे. दुसरी भीती म्हणजे इन्सुलिनच्या इंजेक्शनबाबत. या मधुमेहींना दररोज दिवसातून चार ते पाच वेळा इन्सुलिन इंजेक्शन घेणे गरजेच आहे. त्यामुळे मग शाळा, महाविद्यालये अशा सार्वजनिक ठिकाणीही यांना इंजेक्शन घेण्याची वेळ येते. इंजेक्शनबाबत एकूणच समाजामध्ये असलेल्या अढीमुळे मग हा काही गंभीर आजार असल्याची मानसिकता सर्वसामान्यांमध्ये निर्माण होते आणि भेदभाव व्हायला सुरुवात होते. तिसरी अढी म्हणजे या महिलांना मुल होईल का याबाबत साशंकता अधिक आहे. त्यामुळं मग यांच्या लग्न जुळण्यातही अनेक अडचणी येतात.

सात वर्षाची रमा (नाव बदललं आहे) हमहमसून रडत होती. तिला रडण्याचं कारण विचारलं तर ती म्हणाली, “मी इंजेक्शन घेते म्हणून माझे मित्रमैत्रिणी माझ्याशी बोलत नाहीत” सात वर्षाच्या रमाचं विश्वच तिच्या मित्रमैत्रिणींभोवती गुंफलेलं. परंतु ते आता तिच्यासाठी संपलयं.

रुची आठवीत होती. अत्यंत हुशार. छान गाण गायची. एके दिवशी शिक्षकांनी भरवर्गात सांगितलं की, तू शाळेच्या सहलीला येऊ नकोस. तुला टाईप १ मधुमेह आहे. सहलीला जाणं छेपणार नाही. तेव्हा तुझ नावं यादीतून काढून टाकलयं. वर्गासमोर झालेल्या या घटनेनं रुची आतून पार हादरून गेली. नैराश्यानं तिला घेरलं आणि यासाठी तीन वर्ष तिला उपचार घ्यावे लागले.

रमा, रुची यासारख्या कोवळ्या जीवांना कधी जाणूनबुजून केलेल्या तर कधी अनावधनाने झालेल्या अशा अनेक भेदभावांना सामोरं जावं लागतयं. शाळेपासूनच सुरु होणारा सामाजिक भेदभाव या मुलींच्या आयुष्यात पुढे लग्न, नोकरी अशा प्रत्येक टप्प्यावर सावलीसारखा त्यांची पाठ सोडत नाही.






लग्न होईल का?

मुलींबाबत सर्वात मोठा स्टिग्मा म्हणजे मुलीचं लग्न. डॉ. अर्चना सांगतात, “मुलगी मरणाच्या दारात असली तरी पालकांचा पहिला प्रश्न असतो मुलीचं लग्न होईल का ? हा अनुभव सरसकट सर्व पालकांच्या बाबतीत येतो. मग ते श्रीमंत असो की गरीब. त्यांना तिच्या लग्नाची एकमेव चिंता असल्याचं जाणवतं. ती जगेल का, शिकेल का, नोकरी करेल का असे प्रश्न कुणीच विचारत नाही, याच फार वाईट वाटतं.”

टाईप १ मधुमेहीच्या मुलींची लग्न जुळवण्यात अनेक अडचणी येत असल्याचं दिसून आलं आहे. मुलगी दिवसातून चार ते पाच वेळा इंजेक्शन घेते म्हणजे तिला काही तरी गंभीर आजार असणार हीच भावना अनेक जणांमध्ये असते. त्यामुळं बहुतांश जण या मुलींना नकार देतात. इन्सुलिनच्या इंजेक्शनबाबतचे अनेक गैरसमज समाजात असल्यानं मुलगी आजारासाठी गोळी खात असेल तर ती सून म्हणून चालेल. पण इंजेक्शन घेणारी मुलगी सून नको अशीच अनेक कुटुंबांची धारणा आहे.

डॉ. अर्चना म्हणतात, “आमच्याकडे अनेक मुली डॉक्टर, इंजिनिअर अशा उच्च शिक्षित आहेत. परंतु केवळ टाईप १ मधुमेह असल्यानं त्यांची लग्न होऊ शकलेली नाहीत.”

मुलीचं लग्न जुळत नाही ही बाब पालकांसाठी फार चिंतेची असते. मुलीचं लग्न करण्याच्या सामाजिक दबावातून सुटका करून घेण्यासाठी मग हताश झालेले पालक मुलाला नोकरी लावण्यासारखी काही आमिष देऊन लग्न उरकून घेतात. काही पालक तर गंभीर आजार असलेल्या किंवा व्यसनी मुलांशीही लग्न लावण्यास तयार होतात हे इथलं वास्तव आहे.

काही वेळेस पालक मुलींवर दबाव आणतात आणि लग्नासाठी येणाऱ्या स्थळांना टाईप १ मधुमेह असल्याचं सांगू नकोस असं सांगतात. लग्न झाल्यानंतर समजलं तरी काही फरक पडणार नाही अशी त्यांची समजूत असते. परंतु अशारितीनं फसवून लग्न केल्याचेही परिणाम खूप वाईट असतात, हे देखील काही मुलींनी अनुभवलयं.

...

बाईपण आव्हानात्मक

मुलींची लग्न झाली तरी तिला तिच्या आजारासह सासरी स्वीकारलं जात नाही. टाईप १ मधुमेह असूनही आम्ही तुझ्याशी लग्न केलं हे उपकार सासरच्या घरी पदोपदी तिला ऐकायला मिळतात. पुरुषप्रधान कुटुंबामध्ये सून म्हणजे सुपरवुमन. तिनं चोवीस तास सतत राबलं पाहिजे हीच अपेक्षा सासरच्या मंडळीची असते. सासरच्या या दबावाखाली मुलीही मग कामाच्या व्यापात गुंतून जातात. इन्सुलिन वेळेत न घेणं, वेळेत जेवण न करणं अशा बाबी मग रोज घडायला लागतात. काही ठिकाणी सासरची जेवणाची वेळ उशीराची असते. सूनेला सर्वांच्या आधी जेवताही येत नाही. मग इन्सुलिन आणि जेवणाच्या वेळा चुकतात. आरोग्याकडं दुर्लक्ष होतं आणि प्रकृती एकदम ढासळते. वारंवार त्या आजारी पडायला लागतात. तू आधी जेवण कर, थोडा आराम कर असं सांगणारं, तिच्या आजाराला सांभाळून घेईल असं वातावरण बहुतांश वेळा सासरी असतचं असं नाही.

काही मुलींना तर हा आजार चार भितींमध्येच लपवून ठेवण्याचं बंधन सासरी असतं. त्यामुळं मग घरी कोणी पाहुणे, नातेवाईक आले की इन्सुलिन लपवणं, किंवा चोरून इन्सुलिन घेण्याशिवाय पर्याय नसतो. आहारावर नियंत्रण ठेवणंही शक्य होत नाही.

रक्तातील मधुमेहाच्या पातळीचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी दंडावर सेन्सर बसविला जातो. १५ दिवस या सेन्सरद्वारे निरीक्षण नोंदविल्यानंतर त्यानुसार इन्सुलिनची मात्रा ठरविली जाते. डॉ. अर्चना सांगतात, “आमच्याकडे तर एक मुलगी लग्न झाल्यापासून सेन्सरच लावून घ्यायला तयार नाही, का तर ब्लाऊजमधून ती मशीन दिसते म्हणून.” परंतु अशारितीनं सेन्सर बसविण्याचीही मोकळीक या मुलींना मिळत नसेल तर इन्सुलिनची मात्रा ठरवण्यात अडचण येत असल्याचं डॉ. अर्चना यांनी स्पष्ट केलं.

मूळची शेगावची असलेल्या पूजाला १७ वर्षाची असताना टाईप १ मधुमेह असल्याचं समजलं. ती औरंगाबादला येऊन शिकली. परिचारिका झाली. पूजाचा तसा प्रेमविवाहच. सासरच्यांचा तसा विरोधच होता. लग्नानंतर काही काळ सर्व ठीक होतं. परंतु हळूहळू कुरबुरी सुरू झाल्या. पूजाला मुलगा झाला तेव्हा तिच्या सासरचे खुश झाले. तिला मूल होईल की नाही हीच शंका त्यांना जास्त वाटत होती. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कावीळ झाल्यानं दोनच दिवसांत तिचा मुलगा वारला. आधीच तब्बेतीनं नाजूक असलेल्या पूजाची प्रकृती या धक्क्यानं आणखी बिघडली. त्यातच तूच मुलाला मारलं असा धोशा सासरच्यांनी सुरू केला. त्यामुळे पूजाच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम व्हायला लागला. पूजा सांगते, “या घटनेनंतर माझं वजन सतत घटत राहिलं. घरामध्ये खूप वाद व्हायला सुरुवात झाली. चार ते पाच महिन्यातच सासरच्यांनी मला घरातून बाहेर काढलं. पण माझा नवरा माझ्यासोबत राहिला हाच मोठा आनंद आहे”. पूजा आणि तिचा नवरा आता स्वतंत्र राहत आहेत.

गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यतचा प्रवास सर्वसामान्य बाईसाठी अवघड असतो. टाईप १ मधुमेहींसाठी तर तो त्याहून अधिक अवघड. “गरोदरपणात साखर अजिबात वाढणार नाही यासाठी आहार, इन्सुलिन यावर मी अगदी काटेकोरपणे लक्ष दिलं. खरतरं हे जास्त आव्हानात्मक होतं परंतु मी ते केलं आणि आज माझं बाळ आणि मी सुखरुप आहे याचाच मला आनंद आहे.” असं सानिका व्यक्त करते.

गर्भधारणा झाल्यानंतर दर महिन्याला सोनोग्राफी करावी लागते. दररोज पाच वेळा साखरेची तपासणी करणे, त्यानुसार इन्सुलिनची मात्रा ठरवणे हे फार जिकिरीचं असतं. कारण नऊ महिने साखर नियंत्रणात ठेवणं खूपच गरजेचं असतं आणि आव्हानात्मक देखील. गर्भधारणेत इतर काळजी देखील खूप घ्यावी लागते. परंतु सासरी हे समजून घेतलं जात नाही. ‘आम्ही दिवस भरत आले तरी काम करत होतो, मग तुम्हाला काम करायला काय होतं’ हे टोमणे तर ऐकून घ्यावेच लागत असल्याचा अनुभव मुली सांगतात.

तिच्या वेळा, तिच जेवणं, तिची औषधं याला कुटुंबामध्ये प्राधान्य नसल्यानं बऱ्याचशा कुटुंबामध्ये वाद होत असल्याचेही आढळले आहे. कारण उत्स्फूर्तपणे कोणतीही गोष्ट करण्यावर बंधने येतात. नवऱ्याला बायकोसोबत चित्रपट बघायला किंवा बाहेर जेवायला जायच असतं. ते तिच्या वेळेनुसार होत नसेल तर तिला करताच येत नाही. मग अनेकदा जोडीदारांच्या विशेषत: नवऱ्यांच्या तक्रारी सुरु होतात. याचा वैवाहिक जीवनावरही परिणाम होत असतो.

टाईप १ मधुमेहाच्या व्यक्तीबाबत विशेषत: महिला आणि मुलींबाबत आणखी एक महत्त्वाची अडचण येते ती म्हणजे हा आजार बाह्यदृष्टीने दिसत नाही. या मुली बाहेरून आरोग्यदृष्ट्या स्वस्थ दिसतातं. त्यामुळं थकवा आला आहे किंवा बरं वाटतं नाही असं त्यांनी सांगितलं तरी फारसा कोणाचा विश्वास बसत नाही. ‘चांगली तर ठणठणीत दिसतेय, तुला काय झालंय’ अस या मुलींना सासरी किंवा कामाच्या ठिकाणी अनेकदा ऐकून घ्यावं लागतं. सून, बायको घरात हवीशी तर असते परंतु तिला आणि तिच्या आजाराला प्राधान्य देण्याची तयारी सासरच्यांची नसते.

डॉ. अर्चना सांगतात, “आमच्याकडे जवळपास २०० हून अधिक मुलींची लग्न झाली आहेत. यातील बहुतांश लग्न ही प्रेमविवाह किंवा आंतरजातीय आहेत. पालक प्रेमविवाह किंवा आंतरजातीय विवाह करण्यास मान्य नाहीत. त्यामुळं लग्न झाली तरी यांना कुटुंबांचा आधार आहेच असं नाही.”

...

कामाच्या ठिकाणी घुसमट

टाईप १ मधुमेहींसाठी नोकरीचा मार्गही सोपा नाही. मधुमेह असल्यानं नोकरीही सर्रास नाकारली जाते. परंतु नोकरी नाकारताना मधुमेह असल्याचं कारण दाखविलं जात नाही. त्यामुळं मग या मुलींना दादही मागता येत नाही. यावर तोडगा काढत मग मुली मधुमेह असल्याचं लपवितात. परंतु यामुळं मग इन्सुलिन किंवा जेवणाच्या वेळा यावर याचा परिणाम होतो.

डॉ. अर्चना सांगतात, “कामाच्या किंवा नोकरीच्या ठिकाणी इन्सुलिन घेता येत नसल्याने दुपारची मात्रा चुकल्याची तक्रार अनेकजणी करत असतात. काही जणी चोरून, लपून छपून इन्सुलिन घेतात.” नोकरीच्या ठिकाणी जेवणाच्या वेळा उशीरा असतात. वेळेत जेवण न केल्यानं मग रक्तातील मधुमेहाची पातळी घसरते. अशावेळी मग या मुली लपून चॉकलेट किंवा गोड खातात. नोकरीच्या ठिकाणी मोकळं वातावरण नसल्यानं मग ही अशी घुसमट त्या सहन करत आहेत.

...

‘उडान’मुळे पंखांमध्ये बळ

सानिका सांगते, मी आज आहे कारण ‘उडान’ माझ्यासाठी आहे. सानिका ज्या उडानचा उल्लेख करते ते म्हणजे टाईप १ मधुमेही रुग्णांसाठी डॉ. अर्चना सारडा यांनी औरंगाबाद येथे सुरु केलेली सामाजिक संस्था. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील टाईप १ मधुमेहींसाठी ही संस्था कार्यरत असून यामध्ये निदानापासून, इन्सुलिन, मधुमेह तपासणीसाठी आवश्यक ग्लुकोमीटर, त्याच्या पट्ट्या या सर्व बाबी मोफत दिल्या जातात. संस्थेच्या पूजा दुसड सांगतात, “एका बालकाला दिवसातून चार ते पाच वेळा इन्सुलिन घ्यावं लागतं आणि तीन वेळा मधुमेहाची तपासणी करावी लागते. म्हणजे एक मूल दिवसातून जवळपास आठ ते नऊ वेळा टोचून घेतं. याचा खर्चही वारेमाप. एका बालकाला महिन्याला जवळपास चार हजार रुपये मोजावे लागतात.” ग्रामीण भागात पालकांना हा खर्च अजिबातच परवडणारा नाही. त्यामुळे इथल्या, पालक आणि मुलांसाठी उडान एका वटवृक्षाप्रमाणं खंबीर आधार बनलं आहे. जगण्याचे पंख देणाऱ्या उडानसाठी काम करण्याचा निर्धार घेऊन सानिका आणि पूजा या आता इतर बालकांना मार्गदर्शन करत आहेत.

“पालकांना आणि मुलांना इन्सुलिन, आहार याबाबतचं मार्गदर्शन उडानमध्ये केलं जातं. स्वत: च्या आहारानुसार इन्सुलिनची मात्रा कशी ठरवावी याचं गणितही शिकविलं जातं. यामुळं मग आम्ही स्वत:च स्वत:ची काळजी घेण्यास सक्षम झालो आहोत,” असं सानिका आर्वजून सांगते. केवळ आजारच नव्हे तर शिक्षण, नोकरी, लग्न अशा प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी उडानचा हात कायम पाठीवर असल्यानं या मुलींच्या पंखांमध्ये बळ आलं आहे. सानिका, पूजासारख्या मुली आज स्वत:चे आरोग्य सक्षमपणे सांभाळत आहेतच शिवाय कुटुंबाचा आर्थिक भारही आपल्या खांद्यावर उचलत आहेत. त्यामुळे या मुली कुटुंबाचा भार नाहीत तर आधारवड बनल्या आहेत.

आवश्यक सोईसुविधा, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास इन्सुलिन आणि आहाराचा समतोल राखत टाईप १ मधुमेही मुलीदेखील सर्वसामान्यांप्रमाणं आयुष्य जगू शकतात हे या मुलींनी सिद्ध करून दाखवलंय. आता समाजमनावरही ते बिंबवण गरजेचं आहे. तरच यांच्यासारख्या अनेक टाईप १ मधुमेही मुली आयुष्याला बिनधास्तपणे भिडतील.

-

Updated : 24 Aug 2023 1:26 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top