Home > मॅक्स ब्लॉग्ज > #BuddhaJayantiविपश्यना ध्यानधारणा साधना एक अनुभव

#BuddhaJayantiविपश्यना ध्यानधारणा साधना एक अनुभव

दिनांक 16 मे 2022 रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. अर्थात भगवान गौतम बुद्धांची जयंती. त्यानिमित्ताने भगवान गौतम बुद्धांनी पुनर्रसंशोधीत केलेल्या विपश्यना ध्यान धारणेबाबत अवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकारी आबासाहेब कवळे यांचा विशेष लेख...

#BuddhaJayantiविपश्यना ध्यानधारणा साधना एक अनुभव
X

मंत्रालयातील मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयातील उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी व आमचे वरिष्ठ सहकारी श्री. वळवी साहेबांचं अचानक जाणं चटका लावून जाणार होतं. त्यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिव श्री. परशुरामे साहेबांचही. दोघेही वरिष्ठ अधिकारी. एक मुख्यमंत्री कार्यालयात व दुसरे मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयात कार्यरत होतो. दोघेही मितभाषी व कमालीचे संयमी. वळवी साहेबांबरोबर मी गेली साडेतीन वर्षे काम केले. अतिशय संयमी व कामात प्रचंड डेडिकेशन असणार व्यक्तिमत्व! गेल्या 24 वर्षांपासून निवडणूक विभागात काम करीत होते.

त्यांना कोणताच अजार नव्हता! ना बीपी ना डायबिटीस! त्यामुळे कोणतेच औषध घेण्याचा प्रश्नच नव्हता! कामाचा ताण असला तरी दुसऱ्या बाजूला त्यांचे कणखर मन व कणखर शरीर यामुळेच कदाचित त्यांनी आपल्या शरीराकडे दुर्लक्ष केले असावे असे वाटते. त्यांच्याबरोबर काम करीत असताना आमच्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा व्हायच्या. नियमित व्यायाम व वर्षातून एकदा तरी संपूर्ण शरीराची वैद्यकीय तपासणी त्यांनी केली नसावी असे वाटते. त्यामुळेच रजेवर गावी गेले असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. झटका तीव्र असल्यामुळे उपचाराची साधी संधीही त्यांना मिळाली नाही. ते त्यांच्या कुटुंबाला व आमच्या निवडणूक विभागाला पोरकं करून गेले. अशी कित्येक प्रसंग आपल्याही आठवत असतील. अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांचाही ताण सहन न झाल्याने बळी गेला हे आपल्याला माहीत आहेच!





खरंच या ताणतणावाला उपाय नाही का? अर्थात नक्कीच आहे! आजच्या धकाधकीच्या जीवनात समतोल जीवन जगण्याकरिता मन व शरीराचे नियमित व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे व त्याबरोबर अधून मधून शरीराच्या वैद्यकीय तपासण्या करणेही आवश्यक आहे. परंतु कामाच्या ओघात आपले याकडे नक्कीच दुर्लक्ष होत आहे ही वस्तुस्थिती आहे.

त्यातही मनाचे आरोग्य खूपच जास्त महत्त्वाचे आहे! कारण मानसिक ताणतणावाला व शारीरिक व्याधींनाही तेच कारणीभूत आहे! त्यामुळे मनाचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे! त्याकरिता नियमित ध्यान धारणा करणे हा प्रभावी उपाय आहे! त्यात विपश्यना मेडिटेशन हा तर रामबाण उपाय आहे! माझ्या 14 वर्षाच्या अनुभवानंतर मी हे ठामपणे सांगू शकतो. विपश्यना ध्यानधारणा नियमितपणे केल्यास शारीरिक ताण तणावावर अद्भुत नियंत्रण मिळविता येते! त्याच बरोबर मानसिक व शारीरिक व्याधींपासूनही मुक्तता मिळविता येते! विपश्यना ध्यानधारणा नियमित करणाऱ्या व्यक्तीला मानसिक आजार होऊच शकत नाहीत हे मी माझ्या अनुभवावरून ठामपणे सांगू शकतो. विपश्यना ध्यानधारणा नियमित करणाऱ्या व्यक्तीच्या अंतर्मनातील द्वेष, आसक्ती, सूडाची भावना, इर्षा, मोह, नकारात्मक भावना इ. विकार दूर होत असल्यामुळें अशा व्यक्तींच्या सुख व समाधानात उत्तरोत्तर वाढच होत जाते. हे अतिशय महत्वाचे भौतिक फायदे असले तरी, या साधनेचा एवढाच मर्यादित हेतू नाही! तर माणसाची संपूर्ण मुक्ती हा या साधनेचा उच्च अध्यात्मिक हेतू आहे!

प्राचीन भारतात ऋषी हे शास्त्रज्ञ होते. निसर्ग नियमांचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. निसर्गनियमाप्रमाणे कसे जगावे, अंतर्मन कसे निर्मळ करावे याचे शास्त्र त्यांनी विकसित केले होते. तसेच त्याबाबत साधनेची आदर्श पद्धतही विकसित केली होती. हे ऋषी मुनी जंगलात जाऊन साधना करीत असत. प्राचीन काळात ध्यान व समाधीही अध्यात्मिक उन्नतीची प्रधान साधना असताना दुर्दैवाने हल्लीच्या युगात मात्र देवपूजा, कर्मकांड व उत्सव हेच मुख्य मार्ग झाले आहेत.

भारतातील प्राचीन ध्यानधारणा पद्धत असून हजारो वर्षापासून ऋषीमुनी साधू, संत यांनी या पद्धतीचा अवलंब करून मन निर्मळ व स्वच्छ करून समतोल मनाने उच्च अध्यात्मिक प्रगती साध्य केली आहे. परंतु काळाच्या ओघात ही विद्या लुप्त झाली. सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सुमारे 2500 वर्षापूर्वी या विद्येचे पुनर्रसंशोधन केले. मानव जातीच्या कल्याणा करिता सिद्धार्थ गौतम बुद्धांनी त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत सुमारे 45 वर्ष विपश्यना साधना भारत देशात व भारताबाहेर शिकविण्याचे कार्य केले.त्यामुळे ही विद्या संपूर्ण भारत व भारताबाहेर प्रसार पावली. भगवान गौतम बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणानंतर सुमारे 500 वर्षे ही विद्या संपूर्ण भारतभर मानवाच्या उत्थानाचे अखंड कार्य करीत राहिली. परंतु त्यानंतर मात्र या विद्येचा भारतातून समुळ नाश झाला. मात्र ही विद्या गुरू-शिष्य परंपरेने ब्रह्मदेशात जतन करून ठेवण्यात आली.




ब्रह्मदेशात कायमस्वरूपी स्थाईक झालेले मूळ भारतीय/ हिंदू वंशाचे प्रसिद्ध उद्योगपती श्री. सत्यनारायण गोयंका यांना या विद्येचे मिळालेले अद्भुत लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत अशी त्यांच्या मनात प्रेरणा जागृत झाली. ब्रह्मदेशात उद्योगधंद्यांचे झालेले राष्ट्रीय करण व त्यांच्या मनात जागृत झालेली इच्छा यामुळे त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. 1969 पासून लहान लहान शिबिरांमधून जास्तीत जास्त लोकांना या विद्येचा लाभ देण्याचे कार्य सुरू केले. 1976 मध्ये त्यांनी स्वखर्चाने भारतातील पहिले विपश्यना केंद्र इगतपुरी, जिल्हा नाशिक येथे सुरू केले. प्रत्येक माणसाचा उद्धार करू शकणारी जीवनदायिनी व मुक्तिदायिनी विद्या भारतात आणून व तिचा प्रसार सर्व जगात करून त्यांनी मानव जातीवर मोठे उपकार केले आहेत. केवळ मानव जातीच्या कल्याणाकरिता त्यांनी स्वतःच्या संपत्तीमधून ही साधना भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली आहे. यात त्यांचा कवडीचाही स्वार्थ दिसून येत नाही. आजमितीस भारतात 100 पेक्षा जास्त विपश्यना साधनेची प्रशिक्षण केंद्र आहेत. त्यात महाराष्ट्रातील 32 केंद्रांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र आहे. याशिवाय जगाच्या पाठीवर 250 पेक्षा जास्त विपश्यना केंद्राद्वारे जागतिक पातळीवर अंतर्मनात मूलभूत परिवर्तन करणारी जीवनदायिनी व मुक्तीदायिनी विद्येचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत अव्याहतपणे पोहोचविण्याचे काम सुरू आहे. विपश्यना ध्यानधारणा पद्धती

साधनेचा उद्देश

प्रत्येक जण चांगले जीवन जगू इच्छितो. परंतु सर्वांनाच नाही जमत. कारण आपले मन आपल्या ताब्यात नाही. मनात आसक्ती आहे, द्वेष आहे, मोह आहे. त्यामुळे आपले मन आपल्या ताब्यात राहू शकत नाही. आपले मन आपल्या ताब्यात ठेवण्याकरिता पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे आपले मन निर्मळ असणे आवश्यक आहे. त्याकरिता मन एकाग्र असणे आवश्यक आहे. त्यामुळे दुसरे आवश्यक काम मन एकाग्र करणे होय. आपले मन आपल्या ताब्यात असल्यास आपण नक्कीच चांगले जीवन जगू शकतो.

विपश्यना म्हणजे विशेष रूपाने पाहणे. या ध्यानधारणा पद्धती मध्ये स्वभाविक श्वासाचे सतत सजग तटस्थ मनाने निरीक्षण करणे व त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या सूक्ष्म मनाने शरीरातील प्रत्येक अवयवातील संवेदनांचे (स्थूल व सूक्ष्म) क्रमवार निरीक्षण करत राहणे व त्याचवेळी संवेदनांची अनित्यता, नश्वरता व भंगुरता यांची सतत जाणीव ठेवणे ?????ही विपश्यना साधना आहे.

ही साधना साधकांना दहा दिवसीय शिबिराद्वारे शिकविली जाते. या प्रशिक्षणाकरिता राहण्याची व जेवण्याची उत्तम व्यवस्था केली जाते. साधकांनी व इतर दानशूर व्यक्तींनी दिलेल्या दानातून शिबिरांची पुढील सत्रे आयोजित केली जातात. दहा दिवसाच्या या प्रशिक्षणाकरिता, तसेच निवास व भोजन व्यवस्था याकरिता कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दानशूर लोकांनी दिलेले दान व पूर्व पाठ्यक्रमातील लाभान्वित सहभागी साधकांनी दिलेल्या दानावर पुढील प्रशिक्षण चालविले जाते. या प्रशिक्षणाकरिता नेमण्यात आलेले आचार्यदेखील कोणतेही मानधन स्वीकारीत नाहीत. सेवा भावनेने ही साधना शिकविली जाते.

सकाळी 4 ते रात्री 9 या वेळेत हे प्रशिक्षण चालविले जाते. या प्रशिक्षणा दरम्यान 9 दिवस मौन ठेवावे लागते. हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे, नशा न करणे, ब्रह्मचर्यपालन हे पंचशील पालन करावे लागते. अलिकडे इच्छुकांची संख्या जास्त वाढल्यामुळे या कोर्सला सहजासहजी प्रवेश मिळणे अवघड झाले आहे.

प्रशिक्षणातील महत्त्वाचा भाग

स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या मनाची शक्ती या पुस्तकात नमुद केले आहे की, सुरुवातीच्या काळात ते स्वत: मनाची एकाग्रता कशी करावी हे शिकले. परंतु एखाद्या गोष्टीतून मन काढून घेण्याची कला न शिकल्यामुळे त्यांना सुरुवातीला अतीव दुःखला सामोरे जावे लागले. मात्र उत्तर आयुष्यात एखाद्या गोष्टीतून मन काढून घेण्याची कला शिकल्यामुळे दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग त्यांना मिळाल्याचे नमूद केले आहे.

बहुतांश ध्यानधारणा पद्धती मध्ये मनाची एकाग्रता वाढविणे यावर भर दिलेला असतो. परंतु विपश्यना ध्यानधारणा पद्धतीमध्ये श्वासाचे निरीक्षण करता करता मनाची एकाग्रता वाढविणे व भटकणारे मन विचार व आठवणी यापासून काढून घेवून पुन: श्वासाचे निरीक्षण करण्यास लावणे अशी ध्यानधारणा पद्धती आहे.

अंतर्मन निर्मळ व स्वच्छ करणे हा या कलेचा मुख्य उद्देश आहे. या क्रियेत द्वेष व आसक्ती हे मनाचे प्रमुख विकार व इतर सर्व प्रकारचे विकार हळूहळू दूर होत जातात. मन निर्मळ व स्वच्छ होत जाते. आपले मन आपल्या ताब्यात येते. आजार व दुःख दूर होत जातात. मानवी मनात शांतता, स्थिरता व समाधान प्राप्ती होत राहते.

विपश्यना एक शास्त्र

स्थूलमानाने मनात चार प्रकारच्या प्रक्रिया घडतात असे साधनेमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या लक्षात आले. अर्थात मनाचे चार कप्पे आहेत. ते म्हणजे जाणीव (विज्ञान Consciousness), आकलन (संज्ञा Perception), संवेदना (वेदना Sensation), आणि प्रतिक्रिया (संस्कार Reaction)

विज्ञान (Consciousness)- पहिला भाग माहिती गोळा करण्याचे कार्य करतो. माहिती गोळा करणे व तिची नोंद करण्याचे काम करतो. परंतु त्याला कुठलीही लेबल देत नाही.

संज्ञा (Perception)- जाणिवेने गोळा केलेल्या नोंदीची छाननी करून वर्गीकरण करून त्यांना योग्य ते लेबल लावणे. नोंदीचे योग्य-अयोग्य अनुकूल-प्रतिकूल असे मूल्यांकन येथे होते.

संवेदना (Sensation)-मिळालेल्या माहितीचे मूल्यांकन झाले की संवेदना सुखदायक किंवा दुःखदायक आहेत हे या भागाकडून ओळखले जाते.

प्रतिक्रिया (Reaction)

जेंव्हा संवेदना सुखकारक असतात, तेंव्हा त्या अधिक हव्यात असे वाटते. दुःखकारक असतात, तेंव्हा त्या नकोशा वाटतात. अशाप्रकारे मन आसक्तीच्या व द्वेषाच्या प्रतिक्रिया करत असते, जे संस्कार बनविण्यास कारणीभूत असते.

उदाहरणार्थ आपल्या कानावर संगीत पडले तर पहिला भाग आपल्याला त्याची जाणीव करून देतो. दुसरा भाग ते आपल्या पूर्वीच्या अनुभवावर पडताळून पाहतो व ते आपल्याला आवडणारे गीत आहे असा ध्वनित अर्थ काढतो व पुढच्या क्षणी आपले मन सुखद संवेदनाच्या जाणीवेने भरून जाते हे तिसऱ्या भागाच्या कामामुळे व ते संगीत पुन्हा पुन्हा ऐकावे अशी इच्छा चौथ्या भागात निर्माण होते.

मन निर्मळ करण्याकरिता मनाच्या तिसऱ्या भागाचा अर्थात संवेदनांचे तटस्थ भावनेने प्रत्येक गोष्ट अनित्य/ भंगुर /अशाश्वत समजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता तटस्थपणे निरीक्षण करणे आवश्यक असते. आपल्या प्रतिक्रिया नवीन संस्कार बनविण्याचे कार्य करीत असतात. तटस्थ भावनेने निरीक्षण केल्याने नवीन संस्कार निर्माण होऊ शकत नाहीत व जुने संस्कार ध्यानधारणेच्या नियमित तटस्थ साधनेमुळे हळूहळू नष्ट होत जातात व मन शुद्ध होत जाते. स्वभावाला औषध नसते असे म्हणतात. परंतु ही साधना नियमित पणे केल्यास तुमच्या स्वभावात नक्की परिवर्तन येऊ शकते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

फायदे

अत्त दीप भव: म्हणजे स्वत: प्रकाशित व्हा. अर्थात स्वत: अनुभव घ्या व स्वत:ला

अनुभव आला तरच विश्वास ठेवा अन्यथा विश्वास ठेवू नका. भगवान गौतम बुद्धांचा हा दृष्टीकोन शास्रीय असाच होता.

विपश्यना ही अंतर्मनात करणारी भारतीय पुरातन साधना असून हजारो वर्ष ऋषी, मुनी, साधू, संत यांनी ही साधना निरामय जीवन जगण्यासाठी उपयोगात आणली असून या साधनेद्वारे अध्यात्मिक उंची गाठली आहे.

विपश्यना साधनेचा सराव नियमित केल्यास त्याचे खूप चांगले व सकारात्मक परिणाम दिसून येतात. या धकाधकीच्या व ताण-तणावाच्या जीवनात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकविण्याकरिता मनाची शांतता व समाधान प्राप्त करण्याकरिता विपश्यना साधना अत्यंत उपयुक्त आहे. त्याबरोबर ही जीवन जगण्याची एक कला व आध्यात्मिक उंची गाठण्याचा एक राजमार्ग आहे! त्यामुळे आपल्या सुख व समाधानात उत्तरोत्तर वाढच होत जाईल.

ही साधना तुमच्यासाठी सख्खा, मित्र, सोबती म्हणून आयुष्याच्या अंतापर्यंत तुम्हाला साथ देईल. तुमच्या दैनंदिन जीवनामधील ताण, तणाव, क्रोध, असक्ती, द्वेष, सूडाची भावना, गंभीर आजार यात अडकू नये यासाठी तुम्हाला मदत करील. तुमच्या मनाचे व शरीराचे व्यवस्थापन करून तुम्हाला सुखी व समाधानी बनविण्यासाठी अत्यंत उपयुक्त साधना आहे. ही साधना करताना आपले मन नेहमीच सजग व वर्तमानात असल्यामुळे आपल्याला मानसिक आजारांपासून दुर ठेवील. आपण नियमितपणे ही साधना केल्यास ताण तणाव, क्रोध सूडाची भावना द्वेष यामुळे निर्माण होणारे रक्तदाब, शुगर, हृदय विकार, कॅन्सर यासारखे गंभीर आजारांपासून दूर ठेवेल.





विपश्यना साधनेचा सराव नियमित केल्यास राग (आसक्ती), मोह, द्वेष, नकारत्मकता, आळस हे मनाचे दोष (विकार) कमी होत जातील. सुख, आनंद, मनशांती, सद्भावना, करुणा, मैत्री भावना, सकारात्मकता, उत्साह वाढीस लागेल.

माणसाच्या जीवनात व अंतर्मनात परिवर्तन करू शकणारी अशी ही विद्या आहे. जगातील सर्व जातिधर्मातील लोक त्याचा लाभ घेत असून नियमित साधना करून कित्येक लोकांनी त्यांच्या शारीरिक व मानसिक व्याधींपासून मुक्तता मिळविली आहे. त्याचबरोबर ते ताण तणाव मुक्त, आनंदी व समाधानी जीवन जगत आहेत. विज्ञान, वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, खगोल, वाणिज्य व्यवस्थापन इ. शाखेतील शिक्षण घेताना आपण जात, धर्म, प्रांत, देश असा कोणताही पूर्वग्रह ठेवित नाही. चला आपण हा जाती-धर्माचा चष्मा उतरुन आपले सर्व पूर्वग्रह व गैरसमज बाजूला ठेवून केवळ ज्ञान मिळविणे हा दृष्टिकोन ठेवून या पुरातन भारतीय विद्येच्या साह्याने आपल्या मनाचे व शरीराचे व्यवस्थापन करूया. या विद्येचा लाभ घेऊन ताण- तणाव मुक्त, आनंदी व समाधानी जीवन जगू या. अध्यात्मिकतेत रस असणाऱ्यांनी अध्यात्मिक उंचीही गाठुया! चला आपण आपलं कल्याण व उद्धार करून घेऊया व आपला मानवी जन्म सार्थकी लावूया!

ही साधना प्रामाणिक व नियमितपणे करणाऱ्या साधकांमध्ये अंतर्मनातून परिवर्तन घडून येते. मनाच्या खोल अंतरंगात परिवर्तन घडविणारी व साधकाला शारीरिक व मानसिक आरोग्य प्राप्त करून देणारी व त्याचे कल्याण करणारी ही साधना निशुल्क शिकविली जाते. म्हणूनच मनाचे/ स्वभावाचे परिवर्तन करण्याकरिता सशुल्क प्रशिक्षण देणाऱ्या जगातील कोणत्याही प्रशिक्षणापेक्षा हे प्रशिक्षण उजवे व अधिक प्रभावी आहे. कारण हे प्रशिक्षण मनाच्या अंतरंगात (अंतर्मनात) बदल घडविते. मानवी बाह्यमन व अंतर्मनात सतत संघर्ष चालू असतो. त्यामुळे निर्णय प्रक्रिया जलद होत नाही व ताण तणाव निर्माण होतो. विपश्यना साधनेचे प्रशिक्षण पूर्ण करून या साधनेचा नियमित सराव केल्यास मनाची शक्ती एकत्र होते. निर्णय प्रक्रिया जलद होते. मन निर्मळ झाल्यामुळे कुठलाही संशय/संदेह मनात राहत नाही. मानवाचं व जगाचं कल्याण करू शकणारी व जगात सर्वत्र शांतता निर्माण करू शकणारी ही विद्या आहे.

परंतु ही प्राचीन भारतीय विद्या असूनही धर्माच्या चष्म्यातून या साधनेकडे पाहात असल्यामुळे त्याबाबत बरेच सार्वत्रिक गैरसमज आहेत. जे चुकीचे व अनाठाई आहेत. विपश्यना ध्यानधारणा साधनेत धर्म परिवर्तनासारखे काहीच अंतर्भूत नाही. ही साधना केवळ बौद्ध धर्मियांकरिता आहे. विपश्यना साधनेद्वारे इतर धर्मीयांचे बौद्ध धर्मात परिवर्तन केले जाते. त्यामुळे ही साधना केल्यास आपले देखील बौद्ध धर्मात धर्मांतर होईल. असे पूर्वग्रह असल्यामुळे आपल्या देशातील बहुसंख्य लोक या साधनेचा लाभ घेत नाहीत. त्यामुळे त्यांचे स्वतःचे मोठे नुकसान होत आहे. आचार्य सत्यनारायण गोयंका यांनी सुरू केलेल्या व आता जगाच्या पाठीवर सर्वत्र प्रसार झालेल्या विपश्यना साधनेमध्ये धर्मांतराचा लवलेशही नाही. केवळ मानव जातीचा उद्धार, कल्याण व सर्वांचे मंगल व्हावे हा उद्देश आहे. त्यामुळे जगातील सर्व जाती धर्माचे लोक गेल्या पन्नास वर्षांपासून विपश्यना साधनेचा लाभ घेत आहेत व त्याद्वारे द्वेष, क्रोध, भीती, आसक्ती, मोह, सूडाची भावना व ताण- तणाव दूर करण्याकरिता व मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता लाखो लोकांना या साधनेचा फायदा झाला आहे.

विपश्यना ध्यानधारणा क्षेत्रातील ही सर्वोच्च संस्था आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. 1969 मध्ये सुरुवात झालेली ही संस्था पन्नास वर्षात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. जास्तीत जास्त लोकांना या विद्येचा फायदा मिळावा हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे. आपण नशीबवान आहोत. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी महाराष्ट्रात या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, भारतातील प्रत्येक राज्यात व जगातील प्रमुख देशांमध्ये ही संस्था निरपेक्ष भावनेने आपले काम करीत आहे. लाखो लोकांना या साधनेचा फायदा झालेला आहे. ही संस्था मानवतेचे मोठं काम करीत असूनही प्रसिद्धी व जाहिरातीच्या मागे नाही. अन्यथा कधीच या संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला असता.

मला वाटतं, मला मनुष्य जन्म मिळाला व माझा उद्धार करू शकणारी साधना मला मिळाली हे माझं मोठं भाग्य आहे! ज्यांच्यामुळे मला ही विद्या मिळाली त्या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे! माझ्या दृष्टीने ही एक अद्भुत साधना असून या साधनेच्या मदतीने माझ्या स्वभावात बऱ्याच अंशी परिवर्तन करण्यात मी यशस्वी झालो असेही मी ठामपणे म्हणू शकतो.

जास्तीत लोकांना या साधना पद्धतीची माहिती व्हावी व सर्वांचाच फायदा व्हावा या करिता हा लेख मी लिहीत आहे. या साधनेकरिता महाराष्ट्र शासनाने व महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागांनी देखील विशेष रजा मंजूर करण्याचे शासन निर्णय/ परिपत्रक काढलेले आहेत. सर्वांच मंगल होऊ दे!

अधिक माहितीसाठी संपर्क साधा: https://www.giri.vridhamma.org

Whatsapp @ +91 8956297219, +91 8956297220

आबासाहेब कवळे, अवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकारी, साप्रवि, मंत्रालय, मंबई.

Updated : 15 May 2022 7:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top