सत्तेत बसल्यानंतरच माणसाचं खरं चारित्र्य समोर येतं
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर राजकीय लढाईत त्यांचा पराभव झाल्याचे सिद्ध झाले. पण गेल्या अडीच वर्षातील त्यांची वागणूक, बंडानंतर त्यांनी दाखवलेली सामंज्यस्याची भूमिका यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा आदर का वाढला याबाबतचे मनोगत व्यक्त केले आहे पत्रकार वैभव छाया यांनी..
X
आयुष्यात कधी शिवसेना किंवा शिवसेनेशी संलग्न असलेल्या कोणत्याही व्यक्ती, समुह अथवा संघटनेचे समर्थन करू किंवा त्यांच्या संर्थनात लिहेन अथवा बोलेन किंवा कृती करेल असे वाटले नव्हते. शिवसेनेवर पारंपारिक पद्धतीने असलेला राग जो त्यांच्या धर्मांध राजकीय इतिहासामुळे होता तोच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर येणे क्रमप्राप्त होतेच. ते झालेही.
अब्राहम लिंकन यांचं एक फेमस वाक्य आहे, सत्तेत बसल्यानंतरच माणसाचं खरं चारित्र्य समोर येतं. २०१९ साली मुख्यमंत्री बनल्यानंतर ठाकरेंचे आयुष्य खऱ्या अर्थाने पब्लिक डोमेन मध्ये आले. सेनाप्रमुख ते मुख्यमंत्री बनणं प्रवास सोपा नव्हता. अगदी पहिल्याच प्रेस मध्ये सेक्यूलर शब्दावरून त्यांची झालेली गोची कोण विसरला असेल बरं. पण त्यांना अजून कॅरेक्टर मध्ये येणं बाकी होतं.
हळूहळू ते आलेही. मी आधीही म्हटलं होतं तसंच.. उद्धव ठाकरे हा माणूस वेगळा ठाकरे यासाठीच आहे कारण त्या माणसाला स्वतःच्या मर्यादा ठाऊक आहेत. त्यामुळेच प्रबोधनकारांची लाईन धरून राजकारण उभं करण्याचा त्यांचा प्रयत्न बिल्कूल दिखाऊ वाटला नाही.
पक्ष आणि संघटन नेतृत्व पातळीवर ते हरलेत का? तर हो, हरलेत. एक मार्गर्शक म्हणून हरलेत का? तर हो हरलेत. अपयशी ठरलेत. सध्या ते हरलेत. हरवले गेले आहेत. यशाला हजार बाप असतात. अपयशाला कुणी वाली नसतो. त्या न्यायाने ते हरलेच आहेत. अगदी जसे बाळ ठाकरे हरले होते, अगदी जसे इंदिरा गांधी हरल्या होत्या.
अडीच वर्षाच्या कालावधीत राज्याने अनेक संकटे पचवली. सुरूवात झाली ती सीएए एनआरसी पासून. उद्धव ठाकरेंनी ठणकावून डिटेंशन कँप होणार नाही असं सांगितलं. लाखोंचे मोर्चे निघाले पण एक दंगल कुठे घडली नाही.
त्यानंतर कोविडच्या आलेल्या तीन लाटा. त्यात त्यांनी केलेले प्रशासकीय नियोजन हे देशातील सर्वोत्तम नियोजन होते. एपिडेमिक ॲक्ट लावणं, जनता कर्फ्यू ५ वाजता संपल्यानंतरचे नियोजन, अचानक ८ वाजता येऊन पूर्ण लॉकडाऊन केल्यानंतर उडालेली तारांबळ सावरण्यासाठी केलेले नियोजन, मेणबत्त्या पेटवण्यासाठी वीज न वापरण्याचं केलेलं आवाहन ग्रीड फेल्यूरसाठी कारणीभूत ठरू नये याचं नियोजन असो किंवा लसीकरणाचं नियोजन असो.
एक वेळ अशी होती की, मोदी लाईव यायचे काहीतरी बोलून जायचे मग सीएमना लाईव यावं लागायचं. लोकांचे संभ्रम तेव्हा दूर व्हायचे. गृहीणींकडून प्रेम कमावलेला कदाचित पहिलाच सीएम असावा हा माणूस इतकं आपुलकीचा भाव होता त्यांच्या वर्तनात.
अगदी विरोधी पक्षाने लाख काड्या करूनही, यंत्रणांचा गैरवापर, खोटे आरोप, अटकसत्र, सुशांतसिंग, आर्यन प्रकरण होऊनही भाषेचा संयम सुटू न दिलेला संयमी माणूस आमच्या पीढीने पाहीला. ही मोठी गोष्ट आहे. तब्येतीच्या कुरबूरींनी त्यांना वेढलेलं असलं तरी तीन वादळं येऊन गेली तरी ते ग्राऊंडवर हजर होतेच. असो.
सध्या तरी इतकंच की त्यांचा पराभव झाला आहे. आपल्याच माणसांनी दगा दिल्याचे दुःख फार मोठे असते. ते गरजेचेही होतेच. हा फटका सेनेला मिळणं गरजेचं होतंच. त्याशिवाय राजकारण सिरियसली घेतलंच नसतं त्यांनी. असो. लोकशाहीचा गळा घोटून केलेलं राजकारण देखील पाहीलं.
असो. उद्धव ठाकरेंचं मूल्यमापन करण्याची ही वेळ आणि जागा दोन्ही नाहीच. बंड झालं तेव्हाच सर्व निश्चित झालेलं होतं. पण वेळ काढावाच लागतो. या सरकारनेही तो काढला. आम्हीही तो काढलाच.
उद्धव ठाकरेंना अनेक धन्यवाद. शिवभोजन थाळीसाठी, कोविड नियोजनासाठी, दंगल न घडू देण्यासाठी विशेष धन्यवाद. राज्यानेच नव्हे तर देशाने एक डिसेंट जंटलमन सीएम म्हणून पाहीला. त्यांचं नाव इतिहास कायम लक्षात ठेवेल आणि आठवणही काढत राहतील सर्व..
महागाईचे दर पाहील्यानंतर जशी आज सर्वजण मनमोहन सिंग यांची आठवण काढतायेत ना अगदी तशीच..
उद्धव ठाकरेंना उत्तम आरोग्याच्या मंगल कामना.