संगमनेरच्या पाण्याची कथा आणि व्यथा
X
संगमनेर हे ऐतिहासिक शहर आहे, कोणतेही शहर वसण्यासाठी तेथे शाश्वत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी लागते. संगमनेर परिसरात प्रवरा व म्हाळुंगी, नाटकी,म्हाणुटी,आढळा या पाच नद्या वाहतात. मुबलक पाणी उपलब्ध होते म्हणूनच हे शहर येथे वसले आणि विकसित झाले.
स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळेस या शहरात मोठमोठे वाडे होते, त्या प्रत्येक वाड्यात पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी आड असत. 'आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार' अशी म्हण आपल्याला परिचित आहे पण या शहरात भूगर्भातील पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. घरोघर आड होते, त्यांना मुबलक पाणी होते, त्यामुळे पोहऱ्यात देखील भरपूर पाणी येत होते. महिला आडावर पाणी शेंदायच्या. पिण्याचे पाणी, धुणीभांडी, आंघोळी या साऱ्यासाठी आडाचेच पाणी वापरत असत.
सर्वच आड शुद्ध किंवा गोड पाण्याचे नव्हते, त्यातील काही आड खाऱ्या पाण्याचे होते. काही संमिश्र होते. त्यामुळे आजार वाढत होते, यावर उपाय म्हणून १९४१ पासून बंद नळातून घरपोच पाणीपुरवठा योजना राबवा असा आग्रह धरला गेला. नगरपालिका प्रशासनाने त्याचे प्लॅन देखील बनवले पण सदर योजनेचा खर्च करण्यास नगरपालिका आर्थिक दृष्ट्या सक्षम नव्हती. शासन आणि काही कर्ज असा यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला पण १९५६ पर्यंत त्याला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही.
१९५६ला खुपमोठा महापूर आला, शहरातील नदी काठच्या सखलभागात जे आड होते त्यात पुरामुळे गाळ साचला आणि आड तुंबले, दूषित झाले. संगमनेर शहराचे जलव्यवस्थापन बिघडले. रोगराई वाढली. नागरी असंतोष वाढला. शासनाने याची दखल घेऊन संगमनेर साठी बंद नळातून पाणी पुरवठा योजना मंजूर केली. त्यासाठी सुमारे नऊ लाखांचा खर्च महाराष्ट्र शासन आणि नगरपालिका यांनी निम्मा निम्मा खर्च करावा असे ठरले. नगरपालिका आर्थिक सक्षम नसल्याने नगरपालिकेने बाजारातून कर्ज उभारून सदर ₹ ४४०७५०/- रकमेचा भरणा राज्यसरकारकडे केला व काम मार्गी लागले.
नदी पात्रात विहीर घेतल्यास सरकारचा ₹ १५०००/- वाटर टॅक्स भरावा लागला असता, तो टाळण्यासाठी नदीकाठी विहीर खोदून तेथे पम्पिंग स्टेशन उभारले तहसीलदार कचेरी मागे २ लक्ष गॅलन पाणी साठा करणारी पाण्याची टाकी उभारली, सर्वत्र गावात भूमिगत पाईप लाईन टाकली. सदर पाणीपुरवठा योजनेचे उदघाटन १६ ऑक्टोबर १९५९ रोजी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. शहरात अनेक मालमत्ता धारकांना नळ कनेक्शन घेणे परवडणारे नव्हते, त्यामुळे शहरात निरनिराळ्या गल्ली व चौकात १६ ठिकाणी नगरपालिकेने सार्वजनिक स्टॅण्डपोस्ट उभारून लोकांना पाणी पुरवठा केला. हा पाणीपुरवठा सकाळ संध्याकाळ दोन वेळा केला जात असे. पूर्ण दाबाने मुबलक पाणी पुरवठा होत असे. सदर पाणी पुरवठा योजना आर्थिक दृष्टीने आतबट्ट्याची होती. पाणीपुरवठा नियंत्रण व देखरेख, व्यवस्था ,विजखर्च इ.साठी सरकारला दरवर्षी ₹ ३६०००/- भरावे लागत आणि पाणी पट्टी मात्र फक्त ₹२५०००/- जमत असे.
१९५९ ते १९७५ पर्यंत हि योजना सुरळीत चालली, पुढे गाव वाढले, पाण्याची मागणी वाढली ,त्यासाठी नासिक रस्त्यावर मोठी नवीन पाण्याची टाकी बांधण्यात आली. परंतु आता नवाच प्रश्न उभा राहिला. १९७५ पर्यंत प्रवरा नदीत बारमाही पाणी होते परंतु १९७५ नन्तर परिस्थिती बदलली.प्रवरा नदीच्या दोन्ही बाजूंनी लिफ्ट इरिगेशन वाढले, पाण्याचा प्रचंड उपसा सुरू झाला. नदी आटू लागली. नदीकाठच्या विहिरीत पाण्याचा उदभव कमी पडू लागला. नगरपालिकेने नदीपात्रात विहिरी खोदून पाणी उपसा सुरू केला. खडकात खोदलेल्या विहिरीत जो झिरपा असतो त्या झिरप्याचे पाणी निसर्गत: फिल्टर होते. नदीपात्रातील जॅकवेल मधून उपसले जाणारे पाणी असे फिल्टर होत नाही, त्यातच नदीच्या दोन्हीबाजूला ऊस बागायत वाढले, ऊस चांगला पोसवा यासाठी रासायनिक खतांचा वापर करावा लागतो, त्यामुळे जमिनीत क्षार वाढतात, ते क्षार पाण्यावाटे नदीपात्रातील पाण्यात मिसळू लागले. संगमनेरचे गोड पाणी मचुळ झाले. त्याची चव बिघडली. शहरात सर्वत्र कावीळ व पोटाचे आजार वाढले. सर्व हॉस्पिटलमध्ये पेशंट खचाखच भरलेले असत.
भंडारदरा धरणातून जेंव्हा पाणी सोडलेले असे तेंव्हाच चांगले आणि मुबलक पाणी मिळे, क्लोजर सुरू झाला की मचुळ पाणी, पाणी तुटवडा सुरु होई. पाण्याच्या टाक्या भरत नसत, त्यामुळे पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसे. त्यावर मार्ग म्हणून लोकांनी घरापुढे मोठमोठे खड्डे खोदून तेथून पाणी भरणे सुरू केले. शहरात कोठेही कोणत्याही, रस्त्यावर, गल्लीत,बोळीत जिकडे तिकडे खड्डेच खड्डे दिसत होते. पाणी कमी येते म्हणून डायरेक्ट नळाला मोटर लावून पाणी खेचणे हा प्रकार सुरू झाला, त्यामुळे नवे प्रश्न सुरू झाले, मातब्बरांना पाणी आणि बाकीच्यांना पाणी टंचाई असे चित्र सुरू झाले. त्यातून भांडणे,तंटे, मारामाऱ्या सुरू झाल्या.
नगरपालिका प्रशासनाने पाणी टंचाईवर उपाय म्हणून अनेक ठिकाणी बोअरवेल खोदून तेथे हापशे बसवले परंतु भूगर्भातील पाणी क्षारयुक्त होते ते पिण्याच्या आणि धुण्याच्या योग्यतेचे नव्हते.खाजगी बोअरवेल घेणाऱ्यांची संख्या वाढली,भूगर्भातील उपसा वाढला,भूजल पातळी खोल गेली आणि हळूहळू हापशे बंद पडले.
यातच भरीस भर म्हणून शहराचा आकार वाढला शहरात नवनवीन उपनगरे निर्माण झाली. तेथे नवनवीन बांधकामे वाढली, शहराची लोकसंख्या वाढली,घरांची संख्या वाढली. त्यासाठी नगरपालिकेकडे कोणतीही नियोजनबद्ध शास्त्रशुद्ध योजना नव्हती.अंदाधुंद पध्दतीने पीव्हीसी पाईपलाईन टाकली जात होती. ती कुठे किती, कशी कोणती पाईपलाईन टाकावी याचे शास्त्रीय ज्ञान असलेले तंत्रज्ञ ,एक्सपर्ट नगरपालिकेत नव्हते. पीव्हीसी पाईपलाईन टाकल्यामुळे अनेक गैरप्रकार सुरू झाले. पीव्हीसी पाईप असल्याने त्यावर नगरपालीकेला नियंत्रण ठेवणे कठीण होते. अनधिकृत कनेक्शनचा सुळसुळाट माजला होता, पीव्हीसी पाईपचा भ्रष्टाचार हा विषय नगरपालिका निवडणूकीत हमखास चर्चेत येत असे.
शहरातील १९६० पूर्वी टाकलेली लोखंडी बिडाची पाईपलाईन जुनी आणि कालबाह्य झाली होती, तिने आतून गंज पकडला होता,त्यात क्षारांचे थर साठले होते. त्यातून लिकेज सुरू झाले होते. त्या प्रश्नाने नगरपालिका हैराण झाली होती.
पाण्याचा उदभव कमी, उपलब्ध पाणी कमी, मागणी जास्त त्यामुळे नळाद्वारे पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होत नव्हते. तात्पुरता उपाय म्हणून टँकर द्वारे पाणी पुरवले जाई, टँकर कमी आणि मागणी जास्त त्यामुळे जीसकी लाठी उसकी भैस असा प्रकार सुरू होई. प्रभावी नगरसेवक आणि प्रभावशाली कार्यकर्ते आपला प्रभाव वापरून टँकरची पळवापळवी करीत असत. यातून अनेक अप्रिय घटना, भांडणे, तंटे - बखेडे, पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी होत असत. यातूनच शहरात अधूनमधून अशांतता निर्माण होत असे.
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नदीपात्रात वसंत बंधारा बांधण्याची मागणी पुढे आली, १९८७ ते ८९ या काळात 'पिण्यासाठी पाणी - पाण्यासाठी बंधारा' हि टॅग लाईन घेऊन मोठे जनआंदोलन झाले, त्यात शहरातील सर्व पक्ष,संघटना सहभागी झाले पण संगमनेर शहारालगतची प्रवरानदी हि नदी नसून कालवा आहे असा तांत्रीक मुद्दा उपस्थित करून त्यात प्रशासकीय खोडा घालण्यात आला. त्यामुळे 'पिण्यासाठी पाणी पाण्यासाठी बंधारा' हि मागणी मागे पडली.
१९९१ नंतर नदीपात्रात भूमिगत बंधारा टाकून पाणी अडवण्याचा प्रयत्न काहीप्रमाणात यशस्वी झाला पण तो अल्पकालीन उपाय होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी शाश्वत व दीर्घकालीन उपाययोजना गरजेची होती.
१९९९ नंतर उर्ध्व प्रवरा प्रकल्प म्हणजेच निळवंडे धरणाचे काम मार्गी लागले. निळवंडे धरणातून संगमनेर शहराला थेट पाणी पुरवठा करा हि मागणी महाराष्ट्र शासनाने मान्य केली. तज्ज्ञांनी तशी योजना सरकारकडे सादर केली होती त्याला मंजुरी मिळाली. ३२ कोटींची हि योजना होती. त्यात निळवंडे धरणाच्या पायातच संगमनेर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वाल टाकणे, निळवंडे धरण ते संगमनेर पाईपलाईन टाकणे, शहरात दोन नवीन पाण्याच्या टाक्या बांधणे, उपनगरासह संपूर्ण शहरात लोखंडी बिडाची नवीन पाईपलाईन टाकणे इ. कामे होती. संगमनेर शहरातील मालमत्ता धारक आणि पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांनी सुमारे एक कोटी रुपये लोकवर्गणी जमा केली, संगमनेर नगरपालिकेने ती राज्य शासनाकडे भरली आणि योजना कार्यान्वित झाली. २००१ ते २००९ या काळात हि संपूर्ण योजना पूर्ण झाली. संपूर्ण शहरात उपनगरासह गावातील गल्ली बोळात नवीन लोखंडी बिडाची पाईपलाईन टाकण्यात आली. नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. २००९ मध्ये नैसर्गिक उतारामुळे निळवंडे धरण ते संगमनेर विना वीज पाईपलाईनने पाणी आले. संगमनेरच्या इतिहासातील हा ऐतिहासिक क्षण होता. 'गंगा आली हो अंगणी' असा तो क्षण होता. या योजनेमुळे संगमनेर शहरात पुरेसा,मुबलक आणि पूर्ण दाबाने शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. धरणातील प्रदूषणरहित शुध्द पाणी, गोड चवीचे अमृतवाहिनी प्रवरेच्या पाण्याने शहरातील नागरिक सुखावला आहे, दूषित पाण्यामुळे होणारे आजार संपुष्टात आले आहेत.
आज शहरात नेहरू गार्डन(१४ लाख लीटर), जनतानगर(१६.५ली.) , कॉलेज रोड(१४ लाख ली.) , वडजे मळा(१४लाख ली), ज्ञानमाता(९ लाख ली.), परदेशी पुरा (१० लाख ली.)अशा सहा पाण्याच्या टाक्या कार्यरत आहेत. कोल्हेवाडी रोडची टाकी (१२लाख ली.) लवकरच कार्यान्वित होईल. पम्पिंग स्टेशन जवळ फिल्टरेशन प्लांट आहे. सद्या नगरपालिका शहर हद्दीत सकाळ संध्याकाळ मिळून दररोज सुमारे एक कोटी लिटर पाणीपुरवठा करते. निळवंडे धरणाजवळ एक फिल्टरेशन प्लॅन्ट प्रस्तावित आहे. तो जर कार्यान्वित झाला तर संगमनेर शहरातील सर्व पाण्याच्या टाक्या उतारामुळे नैसर्गिकरित्या भरतील.वीज खर्च कमी होईल. हे सगळे जरी आज सुखदायी असले तरी, भविष्यात हे असे कायम सुरळीत राहीलच याची खात्री नाही. शहर हद्दी शेजारी घुलेवाडी, गुंजाळवाडी, ढोलवाडी,निंभाळे, कासारवाडी आदी ग्रामपंचायत हद्दीत प्रचंड नागरीकरण झाले आहे, त्यांना शाश्वत पाणीपुरवठा होत नाही, निळवंडे धरणाचा उजवा व डावा कालवा सुरू झाला आहे, त्यामुळे निळवंडे धरणाच्या पाण्याची वाट पाहणारे शेतकरी सुखावले आहेत. आता त्यांना त्यांचे हक्काचे पाणी द्यावे लागणार आहे. निळवंडे ते संगमनेर रस्त्यालगतच्या गावांचीही पिण्याच्या पाण्याची मागणी आहे. भविष्यात पाणीसाठा कमी पडणार आहे.
प्रवरा खोऱ्यात भंडारदरा धरण ११ टीएमसी, निळवंडे ९ टीएमसी आणि जायकवाडीला सोडायचे ७ टीएमसी असे एकूण २७ टीएमसी पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. निळवंडे धरणाला मान्यता देतांना सह्याद्रीचे पश्चिमेकडे जाणारे ४ टीएमसी पाणी अडवून पूर्वेकडे वळवायचे असे हिशोबात धरले होते. ते चार टीएमसी पाणी जो पर्यंत आपण प्रवरा खोऱ्यात वळवत नाही तो पर्यंत दोन्ही धरणाच्या लाभक्षेत्राची पाण्याची गरज पूर्ण होणार नाही. या पार्श्वभूमीवर भविष्यात पाणी टंचाईचे संकट उदभवू शकते याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे.
हि आहे संगमनेरच्या पाण्याची कथा आणि व्यथा. पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे अमृत. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरला पाहिजे. आपण जास्तीत जास्त पाणी वाचवले पाहिजे. त्यामुळे अधिक शेती पिकेल ,व्यवसाय वाढतील,अधिक लोकांची तहान भागवता येईल. तेंव्हा पाणी वाचवा, जीवन वाचवा.
- हिरालाल पगडाल, संगमनेर
९८५०१३०६२१