Home > मॅक्स ब्लॉग्ज > भारतीय उपखंडातली सर्वात आदर्श जमात... कोरकू..!

भारतीय उपखंडातली सर्वात आदर्श जमात... कोरकू..!

भारतीय उपखंडातली सर्वात आदर्श जमात... कोरकू..!
X

कोरकू...अमरावती जिल्ह्यातल्या धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यात वास्तव्य करून असलेली आदिवासी जमात, आजही जंगलाशी पूर्णपणे एकरूप आहे. बांबू आणि साग हे या आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य भाग, धारणी आणि चिखलदरा या दोन्ही तालुक्यातला डोंगरी भाग हा थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे. आजही इथली हवा अत्यंत निरोगी आहे. सुंदर जगण्याची हौस असलेल्या इंग्रजांच्या नजरेतून ही भाग सुटेल तर नवलच... देश स्वतंत्र झाल्यानंतरही आपलं प्रशासन ज्या मेळघाटात पूर्ण ताकतीने पोचलं नाही त्या मेळघाटात शेकडो वर्षांपूर्वीच इंग्रज पोचले होते. आजही मेळघाटात जो काही विकास दिसतो तो इंग्रजांनी केलेला आहे. तिथले छोटे मोठे दगडी पूल आणि रस्ते हे इंग्रजांनी उभारलेले आहेत. आजही ते कमकुवत झालेले नाहीत किंवा तिथल्या धो धो पावसात वाहून गेलेले नाहीत. इंग्रज अधिकारी हे आठवड्यातले कामाचे पाच दिवस आटोपले की, शनिवार रविवार सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी या मेळघाटात येत असत, आजही मेळघाटातल्या त्या दुर्गम डोंगरी परिसरात दर १५ किलोमीटरला एक गेस्ट हाऊस (विश्राम गृह) सापडतं, इंग्रजांनी त्या काळात उभारलेली विश्रामगृह आणि त्याला वापरलेलं लाकूड आजही जसंच्या तसं तिथे पाहायला मिळतं, काळ माघे पडला आणि ती गेस्ट हाऊस मोडकळीस आलीत, इंग्रज सरकारच्या आठवणी आजही तिथला आदिवासी सांगतो. रुई पठार या गावातला एक नवद्दीच्या पुढे सरकलेला म्हातारा सांगत होता की गोरेपान, धिप्पाड, उंची कपडे घातलेले पायात गुडघ्यापर्यंत बूट असलेले इंग्रज त्या गावात यायचे, घोड्यावरून फिरायचे कधी कधी रात्रभर शिकार करणे हा त्यांचा छंद. इंग्रज पक्के शिकारी होते अर्थात लढवय्ये, शिकार केल्यानंतर त्याचं कातडं किंवा शिंगं सोबत न्ह्यायचे आणि मांस मात्र शिकारीत मदत करणाऱ्यांना वाटायचे...

लाकूड तोडण्याची कहाणीही तशीच वेगळी आहे. मेळघाटच्या जंगलातलं सागाचं लाकूड हे खूप मजबूत आणि टिकाऊ समजण्याचा प्रघात त्याकाळी होता तो आजही आहे. इंग्रज त्याकाळी कोरकूना लाकूड तोडण्याच्या कामावर जुंपायचे, एकदा लाकूड तोड सुरू झाली की, महिनोंमहिने सुट्टी नसायची त्यामुळे काही वेळेला आदिवासी पळून जायचा तेंव्हा त्यांना मार मात्र ठरलेला असायचा, पण या लाकूडतोडीचा मोबदला मात्र चांगला मिळायचा त्याकाळी इंग्रज लाकूड तोडीसाठी एक रुपया महिन्याला आणि एकरभर जमीन आदिवासींना द्यायचे आजही कोरकू आदिवसिंकडे जी जमीन आहे ती इंग्रजांनी बहाल केलेली आहे. मी जेंव्हा मेळघाटामित्रचे रामभाऊ फड यांना इंग्रज अत्याचारांबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले की "इंग्रजांनी काय अत्याचार केलाय जेवढा आपल्याच वनखात्याने केलेला आहे. इंग्रजांनी आदिवासींना जमिनी दिल्या आणि आपलं वनखाते साधं लाकूड घेऊ द्यायचे नाहीत" इतकं वाईट भारतीय प्रशासन इथल्या आदिवसींसोबत वागत आलंय त्यामुळे या भागात फिरताना इंग्रजांच्या आठवणी इथला आदिवासी सांगतो मात्र वनखात्याचे नावही सांगायला तो तयार नसतो. कारण वनखात्याचे अत्याचार अमानवीय होते, म्हणून वनखात्याच्या लोकांना जांगडी म्हणण्याची पद्धत या भागात रूढ झाली होती. ज्या इंग्रजांविरोधात संपूर्ण देशात रणकंदन माजलं स्वतंत्र लढा लढला गेला त्याच देशात या कोरकू आदिवासींच्या पट्ट्यात मात्र कुणीच आवाज उठवला नाही, इथे कधीच बंड झालं नाही. कारण इथल्या कोरकूना प्रशासन काय असतं ते कुणाचं असतं आपलं असतं की ते लोकांचं असतं, स्वातंत्र आणि पारतंत्र्य ही संकल्पनाच त्यांना माहीत नव्हती. कारण इंग्रजांआधी त्या भागात इथला कोणताच राजा त्याचा प्रधान किंवा कुणी मुन्सी पण गेला नव्हता, तिथे प्रशासन म्हणून सगळ्यात पहिल्यांदा पोचले ते इंग्रजच... त्यामुळे इंग्रज हे परके आहेत ते गोरे आहेत, ते देशाबाहेरन आलेत देश म्हणजे कुठवर असतो त्याला सीमा असतात का.? तो काय असतो हे यातलं त्यांना काहीच माहीत नव्हतं... त्यामुळे तिथे स्वतंत्र लढा कधीच लढला गेला नाही. इंग्रजी अत्याचार मात्र त्या भागात होत असत, जेंव्हा आदिवासी पुरुष महिनोंमहिने साग तोडायला जात तेंव्हा त्यांच्या बायपोरी घरीच असत, इंग्रजही परदेशातून आलेले एकेकटे त्यामुळे क्रॉस ब्रिडिंग या भागात झालेलं अनेकजण बोलतात पण त्याबाबत जाहीर वाच्यता कुणीही करत नाही. हा प्रकार कमीअधिक प्रमाणात संपूर्ण देशभर पाहायला मिळतोच...मात्र त्याही विरोधात इथे कधी आवाज उठल्याचं ऐकिवात नाही...

कुणी थोर पुरुष लढवय्या किंवा धाडसी व्यक्ती या कोरकू आदिवासींमध्ये घडून गेल्याचं कुठेच ऐकिवात येत नाही, कुणीतरी कुणाशी लढा केलाय, कुणी पराक्रम गाजवलाय किंवा कुणी थोर साधू पुरुष होऊन गेलाय असंही ऐकण्यात येत नाही, आदिम काळापासून इथे जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती सर्वसामान्यासारख्या अस्तालाही गेला. इथे कुणाच्या मनात महत्वकांक्षा निर्माण झाल्याचं दिसलं नाही, कुणाला तरी राज्य निर्माण करण्याचं, सत्ता भोगण्याचा इतरांना गुलाम करण्याचं विलासी जगण्याचं प्रदेश काबीज करण्याचं संपत्ती गोळा करण्याचं स्वप्न कधीच का पडलं नसेल, इंग्रज सातासमुद्रापार असलेल्या एका छोट्या बेटावरून पार मेळघाटपर्यंत पोचतात पण इथल्या आदिवसीला साधा घाट उतरण्याचं औत्सुक्य का वाटलं नसेल हा थक्क करणारा सवाल आहे. सत्ता प्रस्थापित करणं, हुकूम गाजवनं हा माणसाचा स्थायीभाव पण त्याला हा कोरकू आदिवासी अपवाद कसा ठरला असेल समन्यायाने वागणारी कोरकू ही आदिवासी जमात या पृथ्वीवरली सर्वात आदर्श जमात समजावी का असाही सवाल या आदिवसिंकडे पाहून पडतो. आजही निवडणूका लढवण्याच्या बाबतीत कोरकू फार उत्साही नसतात, इथं अजूनही लोक ग्रामपंचायतिच्या निवडणूका हजार पाचशे रुपयात लढवतात आणि निवडूनही येतात. आता आतापर्यंत तर इतकी उदासीनता होती की गावचा ग्रामसेवकच हवं त्याला निवडणुकीत उभं करायचा आणि निवडून आणायचा...आजही या भागात ग्रामसेवकच सर्वेसर्वा असतो. पण हळूहळू सुरू झालेल्या जागृतीमुळे आता ग्रामसेवकांची सत्ता संपुष्टात येऊ लागली आहे. आणि थोडाफार का असेना कोरकू आदिवासी गावगाडा चालवू लागला आहे...

कुणाला उच्च नीच समजण्याचा किंवा हलकं भारी गृहीत धरण्याचा प्रघात या भागात कुठेच नाही. अकरामाशी, बारामाशी, म्होत्राचे, औरस अनौरस असला काहीच प्रकार इथे दिसून येत नाही, जातीबाहेर काढणं वाळीत टाकणं हे तर त्यांच्या कल्पनेतही नाही. महिलांनाही खूप सन्मानाची वागणूक इथले लोक देतात आजही लग्न झालेल्या एखाद्या विवाहित महिलेला लग्नानंतर दुसऱ्या व्यक्तीबरोबर निघून जावं वाटलं तर ती खुशाल निघून जाऊ शकते मग तिला कुणीही आवारा, बच्चलन किंवा बाजारू समजत नाही तर तिला आवडत्या व्यक्तीसोबत राहण्याचं आणि त्याच्याशी लग्न करण्याचं पूर्ण स्वतंत्र दिलं जातं आणि ते अगदी आजही सुरू आहे. यासाठी तिला तिच्या पहिल्या पतीची परवानगी घ्यावी लागत नाही आणि घटस्फोटही गरजेचा नसतो ती खुशाल दुसऱ्याच्या घरात जाऊ शकतो आणि तिला स्वीकारणारा तिचा नवा नवरा हा तिला तिच्या मुलांसह स्वीकारतो आणि त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारीही घेतो. आणि त्या महिलेचा आधीचा नवरा सुद्धा कुठलीच आदळ अपट न करता त्याला मुकसंमती देतो. आणि तोही दुसऱ्या कोणत्याही महिलेशी विवाह करून मोकळा होतो. मुलं कुणाकडे राहणार यावरून त्यांची कधीही भांडणं होत नाहीत त्यासाठी कुणी कोर्टातही जात नाहीत. त्या महिलेला जो कुणी नव्याने करून घेईल तिच्या मुलांची जबाबदारी आपसूकच त्याच्यावर येऊन पडते... जंगल जगवणारं असल्यामुळे रोजच ज्याने त्याने कष्ट करून खायचा प्रघात आहे त्यामुळे कुणी कुणाला पोटगी देण्याचा प्रश्नही नसतो. महिलेला इतकं मुक्त स्वातंत्र्य देणारी कोरकू ही जगातली एकमेव जमात नसली तरी तिचे महिलेसोबतचे व्यवहार मात्र इतर जमातींपेक्षा नक्कीच आदर्श आहेत...

कोरकू ही एकही ऑनर किलिंग किंवा स्त्रीभ्रूणहत्या न झालेली जमात आहे. गावात भांडणे सुद्धा खूप कमी होतात मुळात त्यांचं एकमेकांशी बोलणंच कमी असतं त्यामुळे भांडणं अभावानेच होतात, मेळघाट आणि परिसरात खोज या संस्थेच्या माध्यमातून काम करणारे सामाजिक कार्यकर्ते बंड्या साने सांगत होते की, "आजही इथला आदिवसी आपण विचारलेल्या प्रश्नांना फक्त हो किंवा नाही आशा वस्तुनिष्ठ स्वरूपाचीच उत्तरे देतो. विनाकारण सवंग बोलत राहणे, रिकाम्या गप्पा मारणे, चर्चा करणे हा प्रकार इथल्या आदिवसिंकडे कधीच पाहायला मिळत नाही. आता आता ते थोडाफार बोलायला लागले आहेत. पण अगदी सुरुवातीला आम्ही जेंव्हा या भागात काम सुरू केलं तेंव्हा इथला आदिवासी काहीच बोलायचा नाही त्यामुळे काम करायला खूप अडचणी यायच्या" या भागातला आदिवासी हा असा इतका शांत आहे. या भागात अशी अनेक गावंच्या गावं अशी सापडतील की त्यातल्या असंख्य घरांनी आणखी पोलीस स्टेशनची पायरी सुद्धा पाहिलेली नाही. कोर्ट कचेऱ्याच्या भानगडीत हा आदिवासी कधीच जात नाही. जातीची प्रमाणपत्र काढण्यासाठीच काय ते फक्त या आदिवासींना प्रशासकीय कार्यालयात जावं लागतं नाहीतर इतर वेळी खाली मान घालून गुमान आपल्या शेतात काम करणे किंवा, जंगलात खोल खोल जाऊन गुरं चारने हा त्यांचा रोजचा दिनक्रम सुरू असतो. हल्ली जंगल विरळ झाल्यामुळे हरीण ससा रानडुकर असे प्राणीही कमी झालेत त्यामुळे शिकार करणंही खुप कमी झालंय. पण परिसरातले पाणवठे वर्षभर खळाळत राहत असल्यामुळे मासेमारी मात्र वर्षभर सुरू असते. मासे या आदिवासींच्या आहारातील मुख्य भाग आहे. आणि तो आदिवासींचा आवडता आहार सुद्धा आहे. मुलं महिला आणि गडी वेळ मिळेल तेंव्हा आपापल्या परीने ओढे तलाव आणि नदीत मासेमारी करत असतात. चेलटी गावाच्या पाठीशी असलेल्या एका ओढ्यात घोणाई नावाची महिला मासेमारी करताना मला दिसली. तिच्या मासेमारी करण्याचं टेक्निक हे खूप सोपं आणि वेगळं होतं. घोणाईने एक मोठ्या आकाराची कटोरी आणली होती. या कटोरित ती मेलेला खेकडा टाकायची काटोरीला वरून एक पांढरं बांधायची त्या कापडाला बोटभर छिद्र पडलेलं होतं. ही काटोरी घोणाई पाण्यात ठेऊन द्यायची मेलेला खेकडा खाण्यासाठी छोट्या छोट्या मासे त्या छिद्रातून कटोरित उतरायचे आणि कटोरी पूर्ण भरून जायची मग हळूच जाऊन घोणाई ती कटोरी उचलून आणायची या पद्धतीने तिला भरपूर मासे मिळायचे... मासेमारीचा हा छंद असा वेगवेगळ्या मार्गाने इथला आदिवासी जपत असतो.

पूर्वी या भागात शिक्षणाचं प्रमाण अगदीच नगण्य होतं. आजही इथले मुलं प्राथमिक शिक्षणापर्यंतच मर्यादित राहिले आहेत. या भागात अंगणवाडी आणि प्राथमिक शिक्षणाची चांगली सोय झाली आहे. पण अंगणवाड्या या पोषण आहार देणारे किचन बनलेत तर शाळा या वेळ घालवण्यासाठीची ठिकाणं आहेत की काय असा प्रश्न पडतो. परिस्थिती इतकी वाईट नसली तरी त्यात एक मोठी मेख आहे. जी इथल्या आदिवासींना शिकण्यासाठी मोठा अडथळा बनली आहे. कोरकू आदिवासींची मातृभाषा भाषा ही कोरकू भाषा आहे. जी मराठीपेक्षा खूप वेगळी आहे. घरात जन्माला आल्यापासून त्याला कोरकू याच भाषेत बोलायला शिकवलं जातं. पण तो जेव्हा सहा वर्षांचा झाल्यानंतर तेंव्हा त्यांना पहिल्यांदा मराठी शब्द कानावर पडतात. महाराष्ट्रातलं सगळं शिक्षण हे मराठी भाषेतून असल्यामुळे कोरकू आदिवासी मुलांची पंचाईत होऊन जाते. या आदिवासी मुलांची पहिली चार वर्षे ही फक्त मराठी भाषा शिकण्यात निघून जातात. या दरम्यान अनेक विद्यार्थी गळतात उरलेली थोडीफार मुलं ही तोडकी मोडकी मराठी बोलत शिकत राहतात पण भाषेचा अडसर मोठा असल्यामुळे ते पुढे शिकू शकत नाहीत. त्यामुळे आजही या आदिवासी मुलांचे उच्च शिक्षणाचे प्रमाण हे नगण्य आहे. यावर सांगताना लालसू नागोटी हे आदिवासी कार्यकर्ते सांगतात की, "मराठी भाषा ही आम्हा आदिवसीसाठी फॉरेन लँग्वेज आहे. मराठीचा आणि आमचा काहीही संबंध नाही पण तरीही मराठी भाषेतलं शिक्षण आमच्यावर थोपवलं जातं, आदिवासींवर वेगवेगळे अत्याचार केले जातात. मराठी भाषेतून शिक्षण देणे हा त्यापैकीच एक अत्याचार आहे असं आम्हाला वाटतं."

शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे आदिवसी भागात असंख्य मुलं मुली हे घरी गुरं चारण्याचीच कामं करतात. त्यातच मुलं आणि मुलींना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार असल्यामुळे मुलं मुली थोडीफार वयात आली की, त्यांच्यात प्रेम संबंध जुळू लागतात आणि लहान वयातच त्यांची लग्न सुद्धा होतात. श्रावण महिना सुरू झाला की या भागात डोलार नावाच्या गायन प्रकाराला सुरुवात होते. यात घरात मोठ्या अडयाला बांबूच्या लाकडाचा डोला अर्थात मोठा झोका बांधला जातो. या झोक्यावर एकच वेळी पाच ते सहा मुलं किंवा मुली बसू शकतात. श्रावण महिन्यात जेंव्हा बाहेर संततधार पाऊस कोसळत असतो तेंव्हा या भागात वयात आलेले आदिवासी मुलं आणि मुली रात्रभर या झोक्यावर बसून गाणे म्हणत असतात. यात एक फेरी मुलींची होते आणि दुसरी फेरी मुलांची होते. या फेरीत मुली गाण्याच्या माध्यमातून मुलांना आव्हान देतात प्रश्न विचारतात. मग मुलं डोलारा वर बसून गाण्यातून मुलीला उत्तरं देतात आणि पुन्हा आव्हान देतात हे असं रात्रभर सुरू असतं. हे सुरू असतानाच मध्यरात्री केंव्हा तरी या डोलारवर बसून गाणं म्हणणाऱ्या एखाद्या मुलीला किंवा मुलाला आपला साथीदार निवडण्याचा अधिकार असतो आणि तो निवडलाही जातो. मग त्यातून पुढे या मुलामुलींचे शारीरिक संबंध प्रस्थापित होतात. हे संबंध आजही आदिवसींमध्ये पवित्र समजले जातात. विशेष हे असे संबंध कुणावरही ओझं किंवा बंधन बनत नाहीत. डोलार मधून संबंध प्रस्थापित झाले म्हणून पुन्हा त्या दोघांवर लग्न करण्याचं बंधनाही नसतं, इतकंच नाही तर अगदी दुसऱ्या दिवशी आपला दुसरा साथीदार निवडण्याचा अधिकारही या डोलार मध्ये मुलांना आणि मुलींना आहे. मेळघाट मित्र या संस्थेत काम करणाऱ्या दिलीप नावाच्या मुलाने मला सामोरी या गावात सुरू असलेला डोलार दाखवला. या गावात डोलारवर बसून गाणे म्हणताना मुलं आणि मुली पाहायला मिळाल्या. मुली अत्यंत लाजळू त्यांच्याशी फार बोलता आलं नाही पण मुलांशी बोलू शकलो. पण मुलंही त्यांच्या खाजगी विषयात फार बोलत नाहीत. मला ज्या दिलीपने हा डोलार दाखवला त्या दिलीपलाच जेव्हा हे सगळं विचारलं तेंव्हा त्यानं लाजत लाजत त्याची खाजगी बाबा मला सांगितली. लग्नाच्या आधी या डोलारकडे जायला परवानगी असायची. दिलीप सांगत होता," डोलार मध्ये भेटलेली माझीही एक मैत्रीण होती. आमची पुढे अनेक वर्ष मैत्री होती. पण नंतर तिचं लग्न झालं आणि मग आमची मैत्री संपली. त्यानंतर दुसऱ्या गावातल्या मुलीशी माझं लग्न झालं आणि मग माझाही डोलार बंद झाला." शेवटी मी दिलीपला राग येईल हे गृहीत धरूनच एक अवघड प्रश्न विचारलं पण त्याने मात्र त्याचं अगदी सहज उत्तर दिलं, त्यानं ते दिलेलं उत्तर पचवणं खूप कठीण होतं. मी विचारलं की, "तुझं ज्या मुलीशी लग्न झालंय ती मुलगीही अशीच कधीतरी डोलारवर बसलेली असणार ना मग त्याचं काही वाटत नाही का.? " तेंव्हा दिलीप म्हणाला "आमच्याकडे लग्न झाल्यानंतर डोलार मधला भूतकाळ आमच्यासाठी अजिबात महत्वाचा नसतो. आम्हाला सगळ्यांना हे माहीत असतं की डोलार मध्ये हे असं काहीतरी घडलेलं असतंच, पुरुषाचंही आणि स्त्रीचंही त्यामुळे तो भाग आम्ही वगळून टाकतो. त्याबाबत कुणीही कधीच आपल्या बायकोला प्रश्न विचारात नाही. लग्नानंतरही डोलार मधले मित्र मैत्रिणी एकमेकांना भेटतात पण तिथेही जुनं काहीच समोर येत नाही. डोलार ही आमच्यासाठी एक पवित्र परंपरा आहे.आणि आम्ही त्याचं पवित्र आयुष्यभर जपतो."

अशा अनेक वेगवेगळ्या पवित्र मुक्त आणि स्वतंत्र परंपरा जपणारी कोरकू ही जमात आदर्श जमात म्हणायला हवी..!

Updated : 30 Oct 2018 1:56 PM IST
Next Story
Share it
Top