येरळामायच्या पुलाची धगधगती संघर्षगाथा
मृत्यूचा पूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील रामापूर कमळापूर गावदरम्यान असलेल्या येरळा नदीच्या पुलाचे आज भूमीपूजन होत आहे. या पुलासाठी संघर्ष केलेल्या ग्रामस्थांच्या संघर्षाच्या धगधगत्या इतिहासावर प्रकाश टाकला आहे मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक सागर गोतपागर यांनी
X
“दिवस पावसाळ्याचे होते. रामा-कमळापूर नदीच्या पुलावरून पाणी वाहत होतं. रात्री आठच्या सुमारास दुचाकीवरून दोघे आले. सुरवातीच्या टोकाला पाणी कमी दिसत होतं म्हणून त्यांनी गाडी पाण्यात टाकली. रामापूरच्या कडेला नदीचा मुख्य प्रवाह वाहत होता. तिथे आल्यावर गाडी डगमगायला लागली. गाडी आडवी झाली. पाहता पाहता गाडीसोबत दोघेही पाण्यातून वाहत जाऊ लागले त्यातील एकजण कसाबसा बाहेर आला. एकजन वाहून गेला”
रामापूर गावचे कृष्णात गायकवाड हा प्रसंग सांगता सांगता हळवे होतात. येरळा नदीच्या पुलावरून वाहून जाण्याची केवळ ही एकच दुर्घटना नाही. प्रत्येक पावसाळ्यात घरातील कुणीतरी वाहून जाण्याच्या आर्त किंकाळ्यांनी येरळाकाठ दरवर्षी हादरून जातो. शेतकऱ्यांच्यासाठी संजीवनी असलेली येरळामाय पूल नसल्यामुळे कित्येक घरातील कुंकू पुसण्याला हातातील नवा चुडा फुटण्याला कारणीभूत ठरत होती. या संकटातून विद्यार्थी देखील सुटत नव्हते.
दरवर्षी कुणी वाहून गेलं की पुलासंदर्भात गावकरी एकत्र यायचे निवेदने द्यायचे पण प्रशासन राज्यकर्ते मात्र त्यांची दखलच घेत नव्हते. किडे-मुंग्या वाहून जाव्या त्या प्रमाणे माणसाचं मरण स्वस्त झालं होतं. या गोष्टीची दोन गावातल्या प्रत्येकालाच चीड येत होती. पण दररोजच्या पोटा-पाण्याच्या संघर्षातून पुलासाठी संघर्ष करावा हे करणे अशक्य होत होते.
या कठीण प्रसंगात कुणीतरी प्रामाणिक व्यक्तीने पुढे यावे येरळा नदीच्या पुलासाठी संघर्ष उभा करावा त्याचे नेतृत्व करावे असे वाटत होते. पण या प्रश्नाला नेतृत्व मिळत नव्हतं. संकटात एकत्र येऊन हळहळणारी लोकं कुठल्यातरी राजकीय पक्षाशी बांधील होती. पुलासाठीचा संघर्ष म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच राजकीय पक्षासोबतचा संघर्षच होता. या भीतीतून प्रत्येकजण मागच्या टोकाला होता.
प्रत्येक पावसाळ्यात अडीज महिने पूल पाण्याखाली जात होता. इतका काळ गावातील वाहतूक सेवा बंद होते. दोन्ही गावे एकमेकांवर अवलंबून असल्याने शेतकरी तसेच इतर अत्यावश्यक गरजांसाठी नागरिकांचा खोळंबा होत होता. धक्कादायक म्हणजे याचा दुष्परिणाम रामापूर गावाच्या अर्थकारणावर देखील होत होता. अत्यावश्यक गरजांसाठी कमळापूरच्या लोकांना रामापूर ही सोयीची बाजारपेठ होती. पण हळूहळू लोक आळसंदला जाऊ लागले. या प्रकारे गावाच्या आर्थिक विकासाला देखील या पुलाने खीळ घातलेली आहे.
एक दिवस शरद यादव हे आपल्या कामानिमित्त विटा येथे जात होते. पुलावर पाणी असल्याने ते बंधाऱ्यावरून निघाले. तेथे रामापूर शाळेतून कमळापुरला जाणारी एक चिमुकली त्यांना दिसली. धोकादायक पुलावरून, पुढे असलेल्या चिखलातून ही चिमुकली घरी कशी पोहोचणार या विचाराने शरद अस्वस्थ झाला. ही अस्वस्थता त्याने काही लोकांसमोर बोलून दाखवली. याच दरम्यान कमळापूर-रामापूर गावचे काही लोकांनी या प्रश्नावर चर्चेसाठी बसायचं ठरवलं. लोकं एकत्र आली दोन्ही गावातील अस्वस्थ असलेल्या काही प्रामाणिक लोकं एकत्र आली. एक ग्रुप तयार झाला. प्रश्नाची सखोल चर्चा झाली. शेतीत जाण्याची समस्या आहे, वाहतुकीची समस्या आहे, पोरांच्या शाळेत जाण्याची समस्या आहे, दवाखान्यात जाण्याची समस्या आहे, प्रत्येक वर्षी लोकं मरतात हा पूल म्हणजे इथल्या माणसांच्या जीवन मरणाची समस्या आहे. या प्रश्नावर सर्वांच एकमत झालं. प्रश्न आहे पण प्रश्न सोडवायचा कसा ? हा सवाल कुणीतरी उपस्थित केला. सर्वजन नवीन कुणाला या क्षेत्रातला अनुभव नाही. पण कुणीतरी सुचवलं “आंदोलन करू”. आंदोलन केल्यावर केस पडतील कुणीतरी शंका उपस्थित केली. शरदने स्वतः हून या लढ्यासाठी सक्रियता दाखवली. आंदोलन करायचं तर याचा अनुभव असणारं कुणीतरी पाहिजे असे एकाने सुचवले. लगेच कुणीतरी अॅड. दिपक लाड यांचे नाव सुचवले. त्यांना बोलावून येरळेच्या पुलासाठीच्या पहिल्या आंदोलनाचा पाया शरद यादव यांच्या नेतृत्वात दोन्ही गावाच्या नागरिकांनी घातला. या पायावर अनुभवातून एक एक इमले रचले जाऊ लागले. पहिल्या आंदोलनामुळे पुलाच्या प्रश्नाची दाहकता वाढली. लोक या आंदोलनात सक्रीय झाले. या संघर्षाला दोन गावांचे पाठबळ मिळू लागले. काही झालं तरी पुल खेचून आणायचाच हा निर्धार सर्वसामान्य लोकांनी केला. कधी विटा तहसील कार्यालयाबाहेर रक्तदान आंदोलन केलं तर कधी पुलावर निषेध केला.
आंदोलन झालं की लोक पुन्हा आपापल्या कामात व्यस्त व्हायची. पोटा-पाण्याच्या प्रश्नाच्या मागे लागायची. पण शरदला पुलाशिवाय काहीही सुचत नव्हतं. तो नीट शेतातही लक्ष देत नव्हता. याला भेट त्याला भेट विनंती कर, पाय धर असा सपाटा त्याने चालू ठेवला. अभिमानास्पद बाब म्हणजे त्याचा सहकारी राहुल पाटील आणि त्यांची टीम, प्रा. विश्वनाथ गायकवाड, कमळापूरचे सरपंच जयकर साळुंखे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच त्याला सहकार्य मिळत गेलं.
पुलाचा प्रश्न टोकदार तर बनला होता पण प्रशासन लोकांच्या संघर्षाला दाद देत नव्हतं. लोकं धक्का देत राहिले पण शासनारूपी हत्ती मात्र जागचा हलायला तयार नव्हता. लोकांचा आत्मविश्वास कमी होऊ लागला. आपण फक्त लढतोय पण काहीच होतं नाहीय ही निराशा येऊ लागली. पहिल्या दिवसाचा उत्साह कमी झाला. एक एक करून लोकं मागे जावू लागल्याचे जाणवताच शरदने आंदोलनाचे दुसरे हत्यार उपसले. पुलाला मंजुरी मिळत नाही तोवर येरळेच्या पुलावरच ठिय्या मांडण्याचा निर्णय घेतला. मंडप ठोकला, लोक जमू लागले आणि विझत आलेल्या आंदोलनाचा पुन्हा एकदा वणवा पेटला. आता काहीही झाले तरी माघार नाही असा चंग संघर्ष समितीने बांधला. तरीही प्रशासन आंदोलनाची दखल घेईना. पण शरदचा प्रामाणिकपणा पाहून परिसरातील प्रामाणिक पत्रकारांनी या आंदोलनाची दखल घ्यायला सुरवात केली. मॅक्स महाराष्ट्र, वज्रधारी, दै. पुढारीच्या पत्रकारांनी टोकदार बातम्या केल्या. मॅक्स महाराष्ट्रमुळे हे आंदोलन राज्याच्या पटलावर आलं. शरदची तब्येत खालावत चालली होती. दत्तकुमार खंडागळे यांनी विश्वजीत कदम आंदोलकांचा जीव गेल्यावर भेट देणार का ? या दाहक बातमीने विश्वजीत कदम यांना सवाल केला. लोकांचा सहभाग वाढतोय, लोक संतप्त होत आहेत याचा अंदाज आल्यावर तत्कालीन कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी या आंदोलनाची दखल घेतली. त्यांनी पुलावर सुरु असलेल्या आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. निधी मंजूर करून लवकरच या पुलाच्या कामाचे उद्घाटन करेन असे आश्वासन विश्वजीत कदम यांनी दिले. दिलेल्या आश्वासनाला जागत त्यांनी डिसेंबर मध्ये सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. गावागावात विश्वजीत कदमांच्या कार्यकर्त्यांचे बोर्ड लागले. आंदोलनात नसलेल्या अनेकांनी आपापली पाठ थोपटून घेतली.
आता आपल्या संघर्षाला यश आलं असे संघर्ष समितीला वाटू लागले पण हा आनंद फार काळ टिकला नाही. महाविकास आघाडीचे सरकार काही महिन्यातच कोसळले. निधी तर मंजूर झाला पण पुढे काहीही होईना. ना टेंडर ना वर्क ऑर्डर ना कुठला अधिकारी पुलाकडे फिरकेना. ज्या राजकीय कार्यकर्त्यांनी बोर्ड लावले होते तेच पुन्हा शरद आणि त्यांच्या टीमवर टीका करायला पुढे आली. काय झालं ? आंदोलनाने कुठे पूल होतो का ? हे तुमचे काम नव्हे अशा टिका टिपण्णी करू लागली. निधी पडून तब्बल दोन वर्षे उलटली. सगळे नाराज झाले होते. पण पूल करायचाच या निर्धाराने पेटलेला शरद अजूनही खचला नव्हता. त्याने वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांच्या सोबत जाऊन आ. गोपीचंद पडळकर यांची भेट घेतली. त्यांनीही या पुलासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यकर्त्यांची टीम पडळकरांना असतील तिथे जाऊन भेटू लागली. एक दिवस गोपीचंद पडळकर त्यांना घेऊन थेट मंत्रालयात गेले. शरद, राहुल पाटील,प्रा. विश्वनाथ गायकवाड, सरपंच जयकर साळुंखे या टीमने मंत्रालय गाठलं. गोपीचंद पडळकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना पुलाच्या निधीसाठी पत्र दिले. त्यांनी तात्काळ होकार दिला. परतीच्या प्रवासात पुन्हा एकदा आशा निर्माण झाली. खुद्द बांधकाम मंत्र्यानेच होकार दिलाय म्हणजे पूल झालाच असा विश्वास आला. पण तो पण फार काळ टिकला नाही. कुणीतरी राजकीय नेत्याने हा पूल अडवून धरलाय असे एका आमदाराने सांगितले.
दरम्यानच्या काळात आणखी एक पावसाळा आला. नव्या पुलाला वाढीव निधी मिळत नव्हता परंतु जुन्या पुलाच्या डागडूजीसाठी पुन्हा ३० ते ४० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. येरळा नदीचा हा पूल म्हणजे कंत्राटदारांसाठी धार देणारी म्हैस होती. सातत्याने दुरुस्तीसाठी निधी मंजूर करून डागडुजी केली जात होती. शरदने नेमके वर्मावर बोट ठेवले. ही गोष्ट थांबवायला हवी तरच पुढील कामास गती येईल. त्यांने या पुलाची दुरुस्ती करू देणार नाही असा प्रशासनाला इशारा दिला. प्रशासनाने सरकारी कामात अडथळा आणत आहात तुमच्यावर गुन्हा दाखल करू अशी धमकी शरद व सहकाऱ्यांना दिली. त्या ठिकाणी संपादक दत्तकुमार खंडागळे आले. त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. त्यांचा चढलेला पारा पाहून अधिकाऱ्याने माघार घेतली. धक्कादायक म्हणजे या आंदोलनातील काहींनी मात्र त्या प्रतिकूल काळात शरदची साथ देण्याऐवजी कंत्राटदारासोबतचे हितसंबंध जपले. आंदोलनात असे चांगले वाईट अनेक अनुभव येत गेले. राजकारणी वेगवेगळ्या चाली खेळत गेले पण आंदोलक मात्र त्या प्रत्येक चालीत त्यांचा पराभव करत गेले.
निवेदने दिली, पुलासाठी आंदोलन केले, निधी मिळाला एवढ्यावरच संघर्ष थांबला नाही तर टेंडर काढले जात नाही म्हणून शरद प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या पुलावर आंदोलनाला बसला. राजकीय लागेबांधे असलेले लोक या आंदोलनातून गायब होते. दत्तकुमार खंडागळे प्रशासनाशी संबंधित सर्व फॉलो अप घेत होते. अध्ये मध्ये माजी मंत्री बच्चू कडू हे देखील अधिकाऱ्यांना फोन करत होते. यामुळे प्रशासनाने या आंदोलनाला सुरवातीपासूनच गांभीर्याने घेतले. विशेष आणि अभिमानास्पद बाब म्हणजे शरदला पोलीस विभागाचे पूर्णतः सहकार्य होते. पोलिसांना या प्रश्नाची दाहकता आणि शरदचा प्रामाणिकपणा कळला होता. त्यांनी या आंदोलनात शरदला पाठबळ दिले.
प्रशासन दखल घेईल असे वाटत असतानाच त्यांनी तांत्रिक बाबीकडे बोट दाखवायला सुरवात केली. पण टेंडर निघाल्याशिवाय आंदोलक मागे हटायला तयार नव्हते. कधी नव्हे ते राजकीय पक्षांचे नेते युवानेते या आंदोलनाला भेट देऊ लागले. श्रेयासाठी नाटकी धडपड करू लागले. पण कोणताही स्वार्थ न ठेवता शरद आणि त्याची टीम मात्र प्रामाणिकपणे नेटाने संघर्ष करत होती. त्यांनी उपोषणाला सुरवात केली. पावसाचे दिवस होते. शरद दिवस रात्र पुलावर झोपत होता. मच्छर चावायचे, पाठीमागून कुठल्या गाडीने धडक देण्याची भीती होती पण लोकांसाठी लोकांच्या वाट्याचा संघर्ष करण्यात हा तरुण मग्न होता. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने भेट देऊन टेंडर काढत असल्याबाबत पत्र दिले. आंदोलन थांबवण्यात आले.
निधी पडला, टेंडर निघाले आता आपला पूल होणार. परिसरातील लोकांचा पुलाचा वनवास संपला म्हणून प्रत्येकाने सुटकेचा निश्वास टाकला. आपापल्या कामात सगळे व्यस्त झाले. पण शरदला राहवेना. टेंडर निघूनही ठेकेदार काही काम सुरु करेना अशी शंका येऊन त्याने पुन्हा अधिकाऱ्यांना फोन केला. तर टेंडर अबोव्ह झालं आहे आणि साधारण एक कोटीचा निधी कमी पडतोय. काही दिवसात आचार संहिता लागणार आहेत. निधी मिळाला नाही तर काम प्रलंबित राहील असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. शरदने तातडीने विश्वजीत कदमांना गाठले. त्यांनी अडचण समजून घेतली. पुन्हा कामाच्या घाईत ते विसरून गेले. शरद दत्तकुमार खंडागळे हे दोघे पुन्हा विश्वजीत कदम यांच्या भेटीला गेले. वस्तुस्थिती सांगितली. विश्वजीत कदम यांनी त्यांना गाडीत घेतले अमरापूर ते डोंगराई दरम्यान प्रश्न समजून घेतला. गाडी डोंगराई देवस्थानात पोहचली. विश्वजित कदम यांचे स्वीय सहाय्यक सचिन सावंत यांनी कंत्राटदाराला फोन लावून दिला. विश्वजीत कदम यांनी काम सुरु करण्यासंदर्भात सूचना दिल्या. अधिकाऱ्यांना फोन लावला. विश्वजीत कदम शरदच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले शरद निधी मी मंजूर केलाय पण खरे श्रेय तर तुझे आहे. तू लढलास म्हणून आम्हाला हा प्रश्न या प्रश्नाची दाहकता आम्हाला समजली. स्वर्गीय पतंगराव कदमांचा लोक कल्याणाचा हा वारसा मी असाच पुढे चालू ठेवेन. साहेब गाडीतून निघून गेले. साहेबांच्या गाडीत बसताना शरदने स्वतःची गाडी अमरापूर कडेगाव दरम्यान लावलेली होती. आता तिथपर्यंत जायचं कसं या विचारात ते दोघे अर्धा डोंगर चालत खाली आले. वांगीच्या प्रशांत होनमाने यांना बोलावून घेतलं. त्यांनी गाडीपर्यंत सोडलं. गाडी घेऊन शरद गावात पोहचतोय तोवर गावातील वॉट्सअप ग्रुपवर गावागावातील युवा नेत्यांच्या नावाचे पूल मंजूर करून आणल्याच मेसेज फिरत होते. जे कधीही आंदोलनाकडे फिरकले नाहीत, ज्यांनी ऐन केन प्रकारे आंदोलनाला विरोध केला ते सर्वजण कुठे कुणाचा बोर्ड लावायचा या विचाराने झोपलेले नाहीत. उद्या पूर्ण गावांमध्ये बोर्ड लागतील. या मोठमोठ्या बोर्डमध्ये शरदचा फोटो असेल की नाही माहित नाही पण येरळा मायने नव्या पुलाबरोबरच एका राजकीय नेत्याला जन्माला घातलंय. नव्या पुलाबरोबरच शरद यादव नावाचा एक नवा नेता जन्माला आलाय.....