Home > Top News > Mahakumbh : महाकुंभमेळ्यातली डुबकी आणि डुबणारी गंगा !

Mahakumbh : महाकुंभमेळ्यातली डुबकी आणि डुबणारी गंगा !

13 जानेवारीपासून 26 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महाकुंभमेळ्यात आजवर जवळजवळ 50 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केल्याचा अंदाज आहे. महाकुंभमेळ्यामुळे विशेषतः गंगा आणि यमुनेची परिस्थिती चिंताजनक आहे.

Mahakumbh : महाकुंभमेळ्यातली डुबकी आणि डुबणारी गंगा !
X

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) ने फिकल कोलिफॉर्मची पातळी गंगेमध्ये प्रमाणापेक्षा 1,400 पट आणि यमुनेमध्ये 600 पट आढळल्यामुळे, ते पाणी स्नानासाठी अयोग्य बनल्याचा अहवाल दिल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांना सार्वजनिक आरोग्याच्या समस्या वाढवल्याबद्दल समन्स बजावले. प्रयागराजमधील पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विष्ठेत असणारे जिवाणू, फिकल कॉलिफॉर्म आढळल्याचे केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात म्हटले आहे. उत्तर प्रदेश सरकारचा दावा आहे की सरासरी एक कोटीहून अधिक भाविकांनी यात्रेदरम्यान दररोज गंगा आणि यमुना नद्यांमध्ये पवित्र स्नान केले आहे. मात्र जिथे हे स्नान केलं गेलं तिथलं पाणी स्नानासाठी योग्य नव्हतं असं आढळून आलं आहे. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित लवादाला (NGT) दिलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. या अहवालात संगमावरील पाण्यात फिकल कॉलिफॉर्मचे - प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि मानवी आणि प्राण्यांच्या मलमूत्राच्या उपस्थितीचे मुख्य सूचक - प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे असा निष्कर्ष नोंदवला आहे.

हा निष्कर्ष उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी फेटाळून लावला आहे. पाणी दूषित झाल्याच्या बातम्या हा महाकुंभला बदनाम करण्याच्या कटाचा भाग असल्याचा दावा आदित्यनाथ यांनी केला आहे. खोट्या कथनाने महाकुंभमेळ्याला बदनाम करण्याचे आणि सनातन धर्माचा अवमान करण्याचे असे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले की, “गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या संगमावरील पाणी केवळ स्नानासाठीच नाही, तर आचमन करण्यासाठीही योग्य आहे.”

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ (CPCB), त्याच्या महाकुंभ 2025 डॅशबोर्डमध्ये गंगा आणि यमुनेच्या विविध ठिकाणांवरील पाण्याच्या गुणवत्तेबद्दल पाण्यात फिकल कोलिफॉर्म <=2,500 MPN/100ml असावा असे नमूद करते. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (UPPCB) दावा केला आहे की महाकुंभ मधील पाणी हे स्नानासाठी योग्य आहे. UPPCB च्या अहवालात नदीच्या पाण्यात फिकल कोलिफॉर्मची पातळी 2,400 MPN/100ml असल्याचे नोंदवले गेले आहे. तथापि, 4 फेब्रुवारीच्या फिकल कोलिफॉर्मवरील शेवटच्या रेकॉर्ड केलेल्या डेटामध्ये, CPCB ने गंगेमधील पातळी शास्त्री पुलाच्या आधी 11,000 MPN/100ml आणि संगम येथे 7,900 MPN/100ml नोंदवली आहे. गंगेवरील शास्त्री पूल हा संगम स्थळापासून सुमारे 2 किमी पुढे आहे. संगम येथे गंगेच्या संगमापूर्वी, यमुनेमध्ये जुन्या नैनी पुलाजवळ रीडिंग 4,900 MPN/100ml होते. वर नमूद केलेला डेटा शाही स्नान दिवसांपैकी एक असलेल्या बसंत पंचमीच्या एका दिवसानंतर नोंदवला गेला. यावर्षी 3 फेब्रुवारीला बसंत पंचमी होती.

NGT ने उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ (UPPCB) आणि उत्तर प्रदेश सरकारला प्रयागराजमधील गंगा नदीतील फिकल कोलिफॉर्म आणि ऑक्सिजनच्या पातळीसारख्या इतर पाण्याच्या गुणवत्तेच्या मापदंडांवर पुरेसे तपशील सादर न केल्यामुळे फटकारले. तसेच महाकुंभमेळ्याच्या ठिकाणी नदीच्या वेगवेगळ्या जागेवरील पाण्याच्या गुणवत्तेचे अद्ययावत विश्लेषण अहवाल रेकॉर्डवर ठेवण्यासाठी राज्य सरकारला एका आठवड्याची मुदत दिली. एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव, न्यायिक सदस्य सुधीर अग्रवाल आणि तज्ज्ञ सदस्य ए सेंथी वेल यांच्या खंडपीठापुढे डिसेंबरच्या आदेशाच्या पालनाबाबतच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. प्रयागराजमधील नाल्यांमधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी गंगेमध्ये सोडल्याबद्दल तक्रारी मांडणाऱ्या याचिकेवर निकाल देताना NGTचा डिसेंबर 23चा आदेश पारित करण्यात आल होता. त्या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला (CPCB) कुंभ दरम्यान स्नानासाठी व पिण्यासाठी गंगा आणि यमुना नद्यांमधील पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले होते.

17 फेब्रुवारी रोजी, NGT च्या डिसेंबरच्या आदेशाचे पालन करून, CPCBने एक अहवाल सादर केला ज्यामध्ये असे दिसून आले की जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात केलेल्या देखरेखीदरम्यान फिकल कोलिफॉर्म आणि बायोकेमिकल ऑक्सिजनची मागणी पातळी स्नानाच्या पाण्याच्या निकषांची पूर्तता करत नाही. एनजीटी खंडपीठाने सोमवारी CPCBचा अहवाल रेकॉर्डवर घेतला आणि नमूद केले की UPPCB ने डिसेंबर 23च्या आदेशाचे पालन करून कारवाईचा अहवाल दाखल केला नाही. 19 फेब्रुवारीला, UPPCB ने सांगितले की त्यांनी अनुपालन अहवाल दाखल केला आहे, परंतु त्यांनी CPCB कडून नेमक्या कोणत्या ठिकाणाहून पाण्याचे नमुने गोळा केले याचा तपशील देखील मागवला आहे. यामुळे ते CPCBच्या अहवालावर विवाद करत आहेत का, अशी विचारणा खंडपीठाने केली. तथापि, खंडपीठाने CPCBच्या वकिलांना ज्या ठिकाणाहून पाण्याचे नमुने गोळा केले होते त्या ठिकाणांचा तपशील तसेच प्रयोगशाळेतील चाचणी अहवाल देण्यास सांगितले. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त अॅडवोकेट जनरल गरिमा प्रसाद यांनी आपल्या निवेदनात सांगितले की UPPCB, CPCB च्या अहवालात केलेल्या खुलाशांची तपासणी करेल आणि पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल.

13 जानेवारीपासून 26 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महाकुंभमेळ्यात आजवर जवळजवळ 50 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केल्याचा अंदाज आहे. महाकुंभमेळ्यामुळे विशेषतः गंगा आणि यमुनेची परिस्थिती चिंताजनक आहे. पाण्याच्या प्रदुषणामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. उत्तम सांडपाणी व्यवस्थापनाची गरज, पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी प्रभावी प्रदूषण नियमन, समुदायाचा सहभाग आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर यांचा मेळ घालून ही परिस्थिती सुधारण्यासाठी पुष्कळ काम करावे लागणार आहे हे निश्चित!

सिरत सातपुते

[email protected]

Updated : 16 March 2025 3:00 PM IST
Next Story
Share it
Top