रामाची बिनविरोध निवड!
X
राम मंदिराच्या भूमिपूजनासह मोदी-शहांनी आपल्या निरंकुश वर्चस्वाची मूहूर्तमेढ रोवली आहे. संघ, पक्षांतर्गत नेते, इतर राजकीय पक्ष, नागरी समाज, न्यायसंस्था, माध्यमं आणि जनता या सा-यांना भेदून जाणारी त्यांची ही झेप आहे.
संघाच्या केडरचा यथेच्छ ‘वापर’ त्यांनी करुन घेतला. ज्यांनी रथयात्रा काढली ते जाहीरपणे मशीद तोडल्याचं कबूल करु शकत नाहीत. सल्लागार मंडळात त्यांची जन्मठेप केव्हाच सुरु झाली आहे. अटलजींच्या भाजपचं विसर्जन केव्हाच झालं आहे. सध्या भाजपमधील कोणताही नेता मोदी-शहांशी स्पर्धा करण्याचा मनात विचारही करु शकत नाही!
संघ नाही, जुनी भाजप नाही.. आता आहेत ते दोघेच मोदी आणि शहा !
कॉंग्रेसची, डाव्या, आंबेडकरवादी पक्षांची आणि नागरी समाजाची पूर्णपणे कोंडी करण्यात मोदी- शहा जोडगोळी यशस्वी झाली आहे. राहुल, सोनिया गप्प आहेत. प्रियंकांनी ‘जय सियाराम’ चा नारा दिला आहे. कुठे हनुमान चालिसा सुरु आहे. तर कुठे विरोधही होतो आहे. एकूणात देशातला प्रमुख विरोधी पक्ष पूर्णतः गोंधळून गेला आहे.
काही डाव्यांनी विरोध केलेला असला तरी जनतेसोबतचा त्यांचा ‘कनेक्ट’ हरवला आहे. त्यामुळे या विरोधातून आवाज निर्माण होत नाही.
आंबेडकरवादी म्हणवून घेणा-या मायावतींनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य असल्याचं म्हटलं आहे. तर आठवलेंचा पक्ष भाजपसोबतच आहे. मुळात आंबेडकरवादी राजकीय पक्षांचीही एकवाक्यता नाही. इतर पक्ष तर कधी तळ्यात, कधी मळ्यात, अशा अवस्थेत असतात, त्यामुळे त्यांचा प्रश्नच नाही.
नागरी समाजातील विखुरलेल्या सुट्या सुट्या व्यक्तींनी विरोध केलेला असला तरीही त्यातून राजकीय संभाषिताची धार निर्माण होत नाही, हे खरंच आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदी शहांनी न्यायालयीन संस्थांना ज्या कुशलतेनं वाकवलं त्याला तोड नाही. ते केवळ अभूतपूर्व आहे. इंदिराबाईंनी आणीबाणीत जे काही केलं ते मोदी- शहांच्या ‘बुलडोझर’ पुढं किरकोळ आहे !
आजची माध्यमं या सरकारच्या इव्हेंट कंपन्या आहेत. आणि पत्रकार त्याचे इव्हेंट मॅनेजर. IPL मध्ये नाचणा-या चीअरगर्ल्सप्रमाणे ॲन्कर्स आणि वार्ताहर उन्मादात मस्त आहेत.
सर्वांत मोठा विजय मोदी- शहांचा आहे तो जनतेवरचा. जगण्याच्या प्रश्नांहून अस्मितांचे प्रश्न महत्त्वाचे वाटतील, असं संभाषित रचण्यात त्यांना दैदीप्यमान यश आलेलं आहे.
तुम्हाला आवडो किंवा नावडो, हे वास्तव आहे. ते स्वीकारल्याशिवाय त्या विरोधात लढताही येणार नाही.संघाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे. विरोधी पक्षांची तर अभूतपूर्व गोची आहे. इतरांनी सत्तेसोबत अनुकूलन साधलं आहे.
थोडक्यात, रामाची 'बिनविरोध' निवड झाली आहे, प्रभू रामाचा वनवास संपला आहे, आता वनवासात जाण्यासाठी 'व्हॅकन्सी' तयार झाली आहे ! गदिमांनी एका गाण्यात म्हटलं आहेः
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई?
-श्रीरंजन आवटे