Home > मॅक्स ब्लॉग्ज > कुणी घालवली तमाशाची ‘हवा’ ?

कुणी घालवली तमाशाची ‘हवा’ ?

टीव्ही मोबाईलमुळे तमाशाचा प्रेक्षक संपला. लोकांना गण गवळण बतावणी कलगी तुरा नको झालाय. त्यांना नाचायला केवळ आयटम लागते. वगनाट्य पहायला कुणी येत नाही. गणपत मानेंचे इंदिरा पुन्हा ये जन्माला हे वगनाट्य पाहायला जी गर्दी व्हायची त्यातून ठिके भरून पैसे जमा व्हायचे. मेकअप केलेल्या इंदिरा गांधींला बघायला प्रेक्षक कनात वर करून नोटा हातात घेऊन यायचे म्हणायचे, “हे एवढे पैसे घ्या पण फक्त इंदिरा गांधीच तोंड दाखवा.” इतकी अभिरुची असणारा हा प्रेक्षक नक्की हरवला कुठे ? वाचा तमाशा कलावंतांची व्यथा मांडणारा सागर गोतपागर यांचा वास्तववादी लेख…

कुणी घालवली तमाशाची ‘हवा’ ?
X

कोरोना काळात तमाशा कलावंतांच्या समस्यावर ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी कलावंतांना भेटत होतो. कलावंत आपापल्या समस्या सांगत होते. त्यांना शेतीच काम होत नाही. म्हणून कुणी कामाला बोलवत नव्हते. जगायचं कसं हा प्रश्न त्यांना पडलेला. हे दुःख मांडताना देखील त्यांच्या बोलण्यावर त्यांच्या कलेचाच प्रभाव होता.

आम्हाला कोण काम सांगत नाय, हाल सुरु हायत कलाकार बोलत होते.

इतर कुणी असतं तर आमच्यावर आत्महत्या करायची वेळ आलीय असे म्हणाले असते. पण हे कलाकार म्हणत होते

“हा कोरोना असाच चालू राहिला तर आमच्यावर ‘यमुनेच्या डोहात’ आत्महत्या करण्याची वेळ येईल.”

आयुष्याच्या जगण्यामरण्याच्या लढाईत देखील यमुनेच्या डोहाचा सांस्कृतिक वारसा जतन करणाऱ्या तमाशा कलावंतांना आपण काय दिले ? आज तमाशा संपत चाललाय. टीव्ही मोबाईलमुळे तमाशाचा प्रेक्षक संपला. लोकांना गण गवळण बतावणी कलगी तुरा नको झालाय. त्यांना नाचायला केवळ आयटम लागते. वगनाट्य पहायला कुणी येत नाही. गणपत मानेंच्या इंदिरा पुन्हा ये जन्माला हे वगनाट्य पाहायला जी गर्दी व्हायची त्यातून ठिके भरून पैसे जमा व्हायचे. मेकअप केलेल्या इंदिरा गांधींला बघायला प्रेक्षक कनात वर करून नोटा हातात घेऊन यायचे म्हणायचे हे एवढे पैसे घ्या पण फक्त इंदिरा गांधीच तोंड दाखवा. अभिरुची असणारा हा प्रेक्षक नक्की हरवला कुठे ? वगनाट्य सादर करत असलेल्या वयस्कर कलाकारांना “तू मागे जा तिला पाठव” म्हणणारा प्रेक्षक व्हरायटी शो चालू करा म्हणणाऱ्या प्रेक्षकांची अभिरुची नक्की बदलली कशामुळे? तमाशा, हलगी, वगनाट्य असे शब्द तरी भविष्यात ऐकायला मिळतील का ?

आयुष्य देशोधडीला लाऊन हा कलेचा वारसा टिकवणाऱ्या कलावंतांना नक्की आपण काय दिलं. आज तमाशात मागे झील गाणारा झिलकरी संपत आलाय. प्रेक्षकांना हसवून लोटपोट करणारे गाजलेले सोंगाडे मरून गेले. आज जे आहेत ते काही वर्षात निघून जातील. अनेक सोंगाडे अगदी घरचा जीवलग व्यक्ती मेलेला असतानाही मैताला पोहचले नाहीत. पडद्यामागे येऊन रडायचं आणि पडद्यापुढं जाऊन लोकांना हसवायचं. कलेची इतकी सेवा करणाऱ्या कलाकारांना आपण सन्मान तरी दिला का? घसा फोडून गाणाऱ्या, अभिनय करणाऱ्या कलाकारांचे जीव गेले तरी कलाकार मानधनाचे हजार रूपडे या कलाकारांना मिळू शकले नाहीत. त्यांना साधे कलाकारांच्या कमिट्यांवर प्रतिनिधित्व मिळाले नाही. विधानपरिषद, राज्यसभेवर प्रतिनिधीत्व मिळाले नाही.

या उलट याच कलाकारांची नक्कल करुन टीव्हीच्या शोमध्ये नाटकी अभिनय करणाऱ्या कलाकारांना सरकार राजाश्रय देते. तमाशा कलावंतांना मात्र तमासगीर म्हणून हिणवले गेले. सरकारी सांस्कृतिक कार्यक्रमात तरी किती तमाशाचे कार्यक्रम घेतले जातात? तमाशाचा समृध्द वारसा म्हणायच आणि या कलाकारांकडे दुर्लक्ष करायच हा करंटेपणा किती काळ करणार? यामध्ये प्रेक्षक म्हणून आपणही मोठे गुन्हेगार आहोत.

Updated : 6 Sept 2023 11:06 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top