#GandhiJayanti : समजा महात्मा गांधी अजूनही जिवंत असते तर ?
देशातली सध्याची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती पाहता महात्मा गांधी यांनी आपले विचार बदलले असते का? आजच्या पिढीने गांधींजीकडून काय शिकले पाहिजे? जाणून घेण्यासाठी वाचा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचा लेख
X
आज २ आॅक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या यानिमित्ताने जर महात्मा गांधी जिवंत असते तर आजच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीवर त्यांचे विचार कसे असते? यासंदर्भात अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांनी आपले मत मांडले आहे.
ते म्हणतात, समजा महात्मा गांधी अजूनही जिवंत असते तर ? तर मला खात्री आहे कि त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेली सामाजिक, आर्थिक विषयांच्या संदर्भात केलेली अनेक विधाने, संदर्भ बदललेले असल्यामुळे बदलली असती.
"I am not at all concerned with appearing to be consistent. In my search after Truth I have discarded many ideas and learned new things. When anybody finds any inconsistency between two writings of mine, if he has still faith in my sanity, he would do well to choose the later of the two on the same subject" (Harijan April 29 1933)
" सत्याचा शोध खरा. विचारव्यूह / आयडीयाज त्या सत्या पर्यंत जाण्याच्या मार्ग आहेत. सत्याचा शोध घेतांना मांडलेल्या विचारात सातत्याचा आग्रह मी धरत नाही. पुढे जाऊन आपण भूतकाळात कवटाळलेले विचार चुकीचे होते असे मला वाटले तर मी पूर्वीच्या विचारांचा त्याग करतो"
स्वतंत्र प्रज्ञा असणाऱ्यांचे हे सामायिक लक्षण म्हणता येईल. गांधीजींच्या बाबतीतच खरे आहे असे नाही तर प्रत्येक दार्शनिकाच्या बाबतीत खरे आहे. निसर्गक्रमानुसार दार्शनिक काळाच्या पडद्याआड जातात. आणि मग खेळ सुरु होतो त्यांच्या समर्थकांचा आणि विरोधकांचा दार्शनिकाचे समर्थक आपल्याला काय करायचे आहे याचा निर्णय आधी घेतात आणि मग त्या दार्शनिकानी केलेली विधाने, खरेतर फक्त आपल्या सोयीची विधाने कृत्रिमपणे उचलून तीच आपल्या कृतीच्या समर्थनासाठी वापरतात; एकाच विचारवंताला, तत्वज्ञाचे कुंकू भाळी लावणारे अनेक गट तयार होतात.
दार्शनिकाचे विरोधक तर त्याच्याही पुढे; कारण त्यांना काही सोयरसुतक नसते. दार्शनिकाची विधाने, त्याच्या जीवनातील घडलेले, न घडलेले प्रसंग तिखट मीठ लावून सतत हाय वोल्टेज प्रचारासाठी वापरतात. आणि वेळ पडलीच तर त्याला बिनधास्त "क्लेम" करतात मनुष्य केंद्री मानवी समाज, अर्थव्यवस्था निर्मिती हा अजून कोणीही प्रवास न केलेल्या "भविष्य" नावाच्या रस्त्यावरून करायचा प्रवास असतो. वर्तमानातील पिढी / तिचे विचारवंत त्या त्या वेळी ड्रायव्हिंग सीटवर असते.
आधीच्या वळणावर आधीच्या विचारवंतांनी नक्की काय केले ? काय सांगितले, त्यांनी बनवलेले नकाशे, याचा जरूर फायदा उठवला पाहिजे. पण आव्हान आहे ते माहित नसलेल्या रस्त्यावरून, समोर येणारे खाच-खळगे, उलटा येणारा ट्रॅफिक हे बघत गाडी नीट चालवण्याचे, गाडीला कमीतकमी डॅमेज होईल, ती पुढच्या ड्रॉयव्हरच्या हातात देता येईल अशा पद्धतीने आज (आज !) ड्रायव्हिंग करण्याचे.
गांधीजींच्या स्मृतींना वंदन !
संजीव चांदोरकर (२ ऑक्टोबर २०२१)- गांधी जयंती