Home > मॅक्स ब्लॉग्ज > उध्दव ठाकरेंबाबत सहानुभूती बाळगणाऱ्यांसाठी ...

उध्दव ठाकरेंबाबत सहानुभूती बाळगणाऱ्यांसाठी ...

शिवसेना फुटल्यानंतर उध्दव ठाकरेंच्याबद्दल सहानुभूती वाढली. आजारी असताना त्यांना अशा पद्धतीने धोका द्यायला नको होता वगैरे वगैरे. सामान्य माणसांना-राजकीय निरिक्षकांना असं वाटणं स्वाभाविक आहे. मात्र या सर्वांकडे राजकीय निरीक्षक आणि पत्रकार म्हणून पाहत असताना मला अद्याप पर्यंत उध्दव ठाकरे यांचं वस्तूनिष्ठ मूल्यमापन होत नाही याबद्दल आश्चर्य वाटतं.

उध्दव ठाकरेंबाबत सहानुभूती बाळगणाऱ्यांसाठी ...
X

उध्दव ठाकरे बोलायला लागले की घरातला माणूसच बोलतोय असं वाटतं, ते देशातील बेस्ट सीएम होते, साधा-सोज्वळ माणूस इथपासून WHO ने ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला हवे इथपर्यंत कहाण्या आपण ऐकल्या आहेत. शिवसेना फुटल्यानंतर उध्दव ठाकरेंच्याबद्दल सहानुभूती वाढली. आजारी असताना त्यांना अशा पद्धतीने धोका द्यायला नको होता वगैरे वगैरे. सामान्य माणसांना-राजकीय निरिक्षकांना असं वाटणं स्वाभाविक आहे. मात्र या सर्वांकडे राजकीय निरीक्षक आणि पत्रकार म्हणून पाहत असताना मला अद्याप पर्यंत उध्दव ठाकरे यांचं वस्तूनिष्ठ मूल्यमापन होत नाही याबद्दल आश्चर्य वाटतं. भाजपच्या ट्रोल्स नी त्यांच्यावर केलेली टीका हे विश्लेषण नाही, तो त्यांचा वैयक्तिक राग आहे. ट्रोल आर्मी आणि या विश्लेषणात दर्जात्मक फरक जरूर आहे, आणि तो वाचकांनी तसाच वाचला पाहिजे.

महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले तोच मुळी अनैसर्गिक प्रयोग होता असं आम्ही २०१९ मध्येच म्हटलं होतं आणि या भूमिकेत आम्हाला आज ही बदल करावासा वाटत नाही. उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा त्यांच्यातील गुणांमुळे नाही तर राजकीय परिस्थितीमुळे झाला होता. त्याऐवजी अजित पवार निश्चितच उजवे मुख्यमंत्री ठरले असते. उध्दव ठाकरे यांनी कोविडच्या काळात फेसबुक लाइव्ह चा आधार घेतला, मोदी ही बाहेर पडले नाहीत, पण जे फिल्ड वर काम करतात त्यांना उध्दव ठाकरेंच्या फेसबुक लाइव्ह ची फार भुरळ पडलेली दिसली नाही. या संपूर्ण काळात अजित पवार दररोज मंत्रालयात येत होते. शरद पवार फिरत होते. कोविडच्या संपूर्ण स्थितीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उल्लेखनीय काम केले. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी ही राज्यभर दौरे केले. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आपापल्या मतदारसंघातून बाहेर पडले नाहीत. उध्दव ठाकरे घरातून बाहेर पडले नाहीत, मंत्रालयातही गेले नाहीत. राज्याचा मुख्यमंत्री मंत्रालयात गेला की बातमी होत होती अशी परिस्थिती तर मी ही माझ्या करिअर मध्ये कधी पाहिली नाही.

कोविडच्या काळात मी अनेक वेळा महाराष्ट्र दौरे केले, लोकांशी भेटलो. कडक लॉकडाऊन च्या काळात परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्याकाळात किमान आदित्य ठाकरेंनी फिरायला पाहिजे होतं, मात्र त्यांना ही वेळ मिळाला नाही. सुनसान रस्ते अंगावर येत होते इतकी भयाण शांतता सगळीकडे होती. माझ्या अनुभवावरून सांगतो एका दिवसात तुम्हाला तीन जिल्हा मुख्यालयं कव्हर करता येतात. आदित्य ठाकरेंना १०-१५ दिवसांत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढता आला असता. याच काळाच मुंबईतल्या अनेक शिवसैनिकांना मी भेटलो. कोविडमुळे हिंदू-मुसलमान वाद ही वाढला होता म्हणून डोंगरीतील पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या, किडनीच्या आजारामुळे अतीधोकादायक परिस्थितीत असलेले डॉ लहानेंही दिवसरात्र काम करत होते त्यांना भेटलो आणि मुद्दाम मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना भेटायला गेलो.

कोविडसारख्या महामारीत एक महिला मुंबईचा कारभार सांभाळत होती, याचा मला अभिमान वाटतो. मी अनेकांना म्हटलंही की हे योगदान लक्षात ठेवलं पाहिजे. किशोरी पेडणेकरांच्या अधिकृत निवासस्थानावर मदत साहित्याचे ढीग होते. वरळी भागातील लोकांना वाटण्यासाठी किट तयार करून ठेवलेले होते. चौकशी केल्यावर कळलं की यातील बरचसं साहित्य एकनाथ शिंदे यांनी पाठवलं होतं. खरंतर आदित्य ठाकरे या भागातील आमदार आहेत, मात्र त्यांच्याकडून फार मदत आली नसल्याचं पेडणेकर यांच्या काही स्टाफ ने सांगीतलं होतं. अनेक वरिष्ठ शिवसैनिकांशी भेटलो, त्यांच्याकडून मिळत होती ती माहिती धक्कादायक होती. त्या आधारावर २०२० मध्ये मॅक्सवुमन वर एक बातमी आम्ही प्रसिद्ध केली होती. शिवसैनिकांमध्ये असंतोष असल्याबाबत.

उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोविड आला आणि ते कोषात गेले. सरकार काय आहे, कसं चालतं याचं भान येण्याआधीच त्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाली. 26/11 चा हल्ला झाला तेव्हा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला काही तासांचा विलंब झाला यावर गहजब झाला, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. अनेक पोलीस अधिकाऱ्यांचं करिअर किनाऱ्याला लागलं. इथे तर मुख्यमंत्री कार्यालयच सुन्न पडलं होतं. बायोबबल मध्ये गेलं होते. फिल्ड वर काम करणारा रिपोर्टर म्हणून मला हे अस्वस्थ करणारं वाटत होतं. तुम्ही कितीही चांगले असा मात्र, जर तुम्हाला फिल्ड वर काम करता येत नसेल तर त्याचा उपयोग काय?

कोविडच्या काळात धारावी जागतिक पातळीवर पुन्हा चर्चेत आली. त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करण्याची गरज होती पण ठाकरे परिवार गायब राहिला. शिवसेनेचे नेते ही तेच आणि मुख्यमंत्रीही तेच. या परिस्थिती स्थानिक नेत्यांची कुचंबणा होत गेली. महापालिकेचा कारभार पालिका आयुक्तांनी ताब्यात घेतला. नगरसेवकांचं महत्व संपून गेलं. पालिका आयुक्तांनी बिना टेंडर कामांचं वाटप सुरू केलं, आणि ठाकरेंच्या हातातून पक्ष वाळूसारखा निसटून गेला. त्यावेळी जर उध्दव ठाकरेंनी आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांना पक्षाची जबाबदारी दिली असती तरी काही प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात आली असती.

उध्दव ठाकरे यांच्या बडव्यांबद्दल नेहमीच बोललं जातं. ते आज ही त्यांच्या विशिष्ट कंपू मधून बाहेर पडले नाहीयत. ज्यावेळी एखाद्या पक्षातील वरिष्ठ नेते सोडून जाताना तेच तेच रेकॉर्ड वाजवत असतील तर थोडं आत्मचिंतन पक्षाच्या नेत्यांनी ही करणे गरजेचं आहे. शिवसेनेत मोठे झाले, पैसा कमवला आणि आता शिव्या देऊन बाहेर जाताय अशी रेकॉर्ड सातत्याने वाजवण्याच्या पलिकडे शिवसेनेच्या नेतृत्वाने जायला हवे होते. शिवसेनेची रचना नेमकी काय होती? रस्त्यावरच्या माणसांना उचलून मोठं करणे हे काम शिवसेनेने केले. त्यात त्या रस्त्यावरच्या माणसातील कलागुणांचा कितपत वाटा होता? यातील बरेच लोकं हे स्थानिक भागातील रॉबीनहूड होते. कुणाला तरी लुबाड आणि लोकांची कामे करा अशीच रचना होती. मराठी माणसांना रोजगार-अस्मिता देणाऱ्या भारतीय कामगार सेना, स्थानिय लोकाधिकार समिती यांचा शिवसेनेच्या वाढीत महत्वाचा वाटा आहे. त्यांचं पक्षात आता नेमकं स्थान काय आहे?

उध्दव ठाकरे हे चांगले संघटक आणि रणनितीकार आहेत. बाळासाहेब गेल्यानंतर त्यांनी निवडणुकांमध्ये यश मिळवून दाखवलं हे नाकारता येणार नाही, पण मुख्यमंत्रीपद त्यांना झेपलं नाही. त्यांचा सरकार आणि पक्षावरचा ताबा गेला. कोविड आणि वैयक्तिक आजारपण ही तत्कालिक कारणे होती. ती नसती तरी शिवसेना फुटली असती. शिवसेना फुटीत भाजपचा वाटा मोठा असला तरी ठाकरेंचे स्वतःचे योगदान ही नाकारून चालणार नाही.

उध्दव ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात घेतलेली भूमिका ही राजकीयदृष्ट्‍या योग्य भूमिका आहे, मात्र त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडीत राहणं हे ही पक्षाला येत्या काळात महाग पडणार आहे. आज जेव्हा पक्ष फुटलेलाच आहे, सगळं काही गेलेलंच आहे, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ही शिवसेनेचे सगळे वरिष्ठ नेते अडचणीत आहेत, ईडी आणि सीबीआय ही भाजपची हत्यारे ही जोरदार काम करत आहेत. याचा मुकाबला करायचा असेल तर अशा वेळी एकला चलो रे ची भूमिका घेत उध्दव ठाकरेंनी लोकांमध्ये जाऊन पक्षबांधणी केली पाहिजे. सहानुभूतीच्या इंधनावर राजकारणाची गाडी फार काळ चालत नाही.

- रवींद्र आंबेकर

Updated : 14 Sept 2022 4:08 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top