सॅपिअन्स - मानवाच्या इतिहासाचा अन्वयार्थ
X
युवल नोहा हरारी या इस्रायली लेखकाचे "Sapiens-A Brief History of Humankind” हे पुस्तक २०११ साली हिब्रू भाषेत आणि २०१५ साली इंग्रजीत प्रसिद्ध झाले. दहा लाखांपेक्षा जास्त प्रती विकल्या गेलेल्या या पुस्तकाचा समावेश सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या यादीत झाला आहे. या पुस्तकाचे मराठी भाषांतरही उपलब्ध आहे.
जवळपास पाचशे अशी भलीभक्कम पृष्ठसंख्या असलेले हे पुस्तक आहे आणि ती तेवढी होणे साहजिकच आहे. कारण यात पृथ्वी आणि मानव जमातीच्या ४५० कोटी वर्षांच्या इतिहासाचा धावता आढावा घेतला आहे. यात पृथ्वी निर्माण झाली. त्यापासून ते जीवसृष्टी निर्माण कशी झाली, उत्क्रांत कशी झाली, मानव कसा उत्क्रांत झाला, आदिमानव ते आज अंतराळात वसाहती निर्माण करू पाहणारा आधुनिक मानव ही प्रगती कशी झाली, आणि त्याहीपुढे जाऊन लेखकाने यात मानवाच्या भविष्याचा विस्मयकारी वेध देखील घेतलेला आहे.
बीबीसीच्या समीक्षकाने तर "Jaw-dropping from the first word to the last. It may be the best book I have ever read” असे या पुस्तकाचे वर्णन केले आहे.
आता या पुस्तकात एवढे काय आहे? मानव जातीचा निव्वळ इतिहास या पुस्तकात असता तर त्याचे एवढे कौतुक होण्याची गरजच नव्हती, कारण तो शेकडो पुस्तकात अगोदरच उपलब्ध आहे. आपली मानवी जमात, तिने लावलेले विविध शोध, निर्माण केलेल्या समाजव्यवस्था (म्हणजे राज्यपद्धती, भांडवलशाही, साम्यवाद,इत्यादी,) परमेश्वराची कल्पना, धार्मिक तत्वज्ञान, अशा एक ना अनेक गोष्टींबद्दल यात जी मांडणी केली आहे. ती मुळातच वाचण्यासारखी आहे. क्वचितच काही लेखक असे असतील, जे आपल्या डोक्यात या प्रत्येक गोष्टींबद्दल ज्या मूलभूत संकल्पना किंवा गृहीतके असतात, त्यांना एवढे मुळापासून हलवून टाकतात. अनेकदा तर असे एक दोन परिच्छेद वाचल्यावर पुस्तक बाजूला ठेवून विचार कारण बसायची पाळी येते. एवढे मूलभूत धक्के आपल्याला बसतात.
या लेखकाचे एक वैशिष्ट्य जाणवले ते असे की राज्यशास्त्र असो की, अर्थशास्त्र, मानववंश शास्त्र असो की भौतिक व रसायनशास्त्र, या सगळ्या विषयातील गोष्टी तो एवढ्या सोप्या आणि रंजक पद्धतीने सांगतो की, सामान्य वाचकालाही त्या समजून घ्यायला काहीही अडचण येत नाही. याचे एक कारण म्हणजे प्रत्येक गोष्ट सोप्या उदाहरणातून सांगायची लेखकाची हातोटी!
उदाहरणार्थ आजची बँकिंग प्रणाली कशी काम करते ते तो अशा उदाहरणातून समजावून देतो की ते किचकट वाटत नाही. आणि त्यातून पुढे घोटाळे निर्माण होऊन युरोप आणि अमेरिकेत मंदी कशी आली ते ही समजते.
कोणत्याही अर्थशास्त्राच्या मोठ्या पुस्तकाने जे कळले नसते, ते दोन पृष्ठात इथे समजते. मानवाने जीवसृष्टीची (यात वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक इत्यादी सगळे आले) जी अपरिमित हानी केली आहे. ती वाचून कोणालाही हतबुद्ध व्हायला होईल. आफ्रिकेतून मानव जसा जसा जगभर पसरत गेला, तशी तशी त्या सगळ्या प्रदेशातील जीवसृष्टी पाच ते दहा टक्के उरली.
अगदी निअँडर्थल मानव ही जी एक वेगळी जमात निर्माण झाली होती, तिचा समूळ नायनाट आपल्या होमो सापियन या पूर्वजाने करून मग पृथ्वीवर आपले निरंकुश साम्राज्य स्थान केले. अमेरिका असो वा न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको असो, मानवाने त्या भागातील जीवसृष्टीची वा मूळ रहिवासी असलेल्या मानवांचा जो निर्वंश केला तो वाचून कोणीही हादरून जाईल.
मागील तीनशे वर्षात युरोपिअन लोकांचा आशिया, आफ्रिका, अमेरिका, मध्यपूर्व, थोडक्यात संपूर्ण जगात फोफावलेला साम्राज्यवाद जगाने पाहिला आहे. अगदी शालेय शिक्षणात देखील हे मूठभर देश जगावर राज्य का करीत होते हे समजायचे नाही, किंवा साधारण दोन लाख इंग्रज तीस कोटी भारतीयांवर राज्य कसे करीत होते हे कळायचे नाही. अशा प्रश्नांची उत्तरे इथे मिळतात.
१७५० साली आशिया खंडाचा जीडीपी हा जगाच्या जीडीपीच्या ८० टक्के होता आणि केवळ भारत आणि चीन या देशांचा जीडीपी जगाच्या जीडीपीच्या ३३ टक्के होता.. त्यानंतर मागील तीनशे वर्षात संपूर्ण जग बदलून टाकणारे जेवढे काही शोध विज्ञानाच्या सर्व शाखांत लागले, ते फक्त युरोप आणि अमेरिकेतच लागून ते देश एवढे पुढे का निघून गेले ते इथे कळते.
लेखक म्हणतो की आधुनिक विज्ञानाच्या सर्व शोधांची सुरवात "Ignoramus" या लॅटिन शब्दाने होते. या शब्दाचा अर्थ आहे "मला हे माहित नाही". म्हणजे थोडक्यात आपल्या अज्ञानाची कबुली देऊन ज्ञानाचा शोध सुरु होतो. एवढेच नव्हे तर जे ज्ञान नव्याने मिळविले जाईल ते देखील परिपूर्ण असेलच असे नाही, हे गृहीत धरले जाते. त्यामुळे ज्ञान मिळविण्याची ही प्रक्रिया निरंतर सुरु राहील हे मानून विज्ञानाची प्रगती झाली. त्यामुळे जे समाज "आम्हाला सर्व काही माहित आहे, किंवा आमच्या पूर्वजांना सर्व काही माहित होते" अशा समजुतीत होते, ते अर्थातच मागे पडले.
मागील शंभर वर्षातील शेकडो नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ काही विशिष्ट देशातूनच का असतात. याला कारण ही वैज्ञानिक दृष्टी आहे. या सर्व विज्ञानशाखांतील शोधांची युरोपातील देशांनी त्यांच्या औद्योगिक, आर्थिक आणि लष्करी व्यवस्थेशी सांगड घातली आणि त्या सर्व क्षेत्रात ते प्रचंड वेगाने पुढे निघून गेले आणि आशिया व आफ्रिका ही खंडे जी मागे पडली ती आतापर्यंत!. याच वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर युरोपिअन देशांनी मग जगभर साम्राज्ये स्थापन केली. ते करतांना त्यांनी क्रूरतेचे जे नवीन मापदंड स्थापन केले ते ही लेखक सांगतो.
सध्या जगभर जे शोध लागले आहेत आणि जे अनेक शास्त्रीय शोधांसाठीचे प्रकल्प सुरु आहेत त्याबद्दल जी माहिती लेखकाने दिली आहे. ती चक्रावून टाकणारी आहे. होमो सेपियनपेक्षा, म्हणजे आपल्यापेक्षा, हजारपट जास्त कार्यक्षम आणि बुद्धिमान असणारा कृत्रिम मानव, किंवा त्याला यंत्रमानव म्हणणे जास्त योग्य राहील, अस्तित्वात येणे हे काल्पनिक वैज्ञानिक कथांत जे वाचले होते, ते प्रत्यक्षात येणे आता फार लांब नाही. कारण लेखकाने सांगितल्याप्रमाणे पुढील ५० किंवा २०० वर्षे या मानवजातीच्या १० लाख वर्षांच्या इतिहासाशी तुलना करता फार मोठा कालावधी नाही.
थोडक्यात सांगायचे तर Sapiens हे एक असे पुस्तक आहे, जे न वाचून चालणारे नाही.
सुनील सांगळे
(लेखक लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सहायक विक्रीकर आयुक्त या पदावर १९९१ साली रुजू झाले व विक्रीकर खात्यातून सहआयुक्त पदावरून निवृत्त झाले आहेत. तसेच ते “जातीव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जातीजमाती” या पुस्तकाचे लेखक आहेत.)