Home > मॅक्स ब्लॉग्ज > सोशल मीडियाने आपलं माकड केलंय

सोशल मीडियाने आपलं माकड केलंय

सोशल मिडीया आला आणि आपल्या इंटरनेट विश्वात एक वेगळी क्रांती घडली. जगामध्ये आणि आपल्यामध्ये फक्त एका क्लिकचं अंतर शिल्लक राहिलं आहे. आपलं जगणं सोशल मिडीयाने सहज सोपं केलंय. पण याच सोशल मिडीयाने आपलं अप्रत्यक्षपणे माकड कधी केलं हेच आपल्याला कळालं नाहीये. कसं हे जाणून घ्यायचं असेल तर वाचा समीर गायकवाड यांचा हा लेख...

सोशल मीडियाने आपलं माकड केलंय
X

सोशल मिडीया आला आणि आपल्या इंटरनेट विश्वात एक वेगळी क्रांती घडली. जगामध्ये आणि आपल्यामध्ये फक्त एका क्लिकचं अंतर शिल्लक राहिलं आहे. आपलं जगणं सोशल मिडीयाने सहज सोपं केलंय. पण याच सोशल मिडीयाने आपलं अप्रत्यक्षपणे माकड कधी केलं हेच आपल्याला कळालं नाहीये. आपल्याला एखादा ट्रेंड कधी आणि कसा नाचवून जातो हेच आपल्याला कळत नाहीये. हे सगळं कसं घ़डतंय? जाणून घ्यायचं असेल तर वाचा समीर गायकवाड यांचा हा लेख...

सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले तेंव्हा त्या घटनेविषयीची माहिती मिळताच पहिले काही तास लोकांच्या प्रतिक्रिया धक्का बसल्याच्या नि शोकमग्नतेच्या होत्या. रात्र सरली नि दुसऱ्या दिवशी सकाळनंतर संतापाच्या उद्वेगाच्या प्रतिक्रिया पाहण्यात आल्या. रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल, धोकादायक वळणांवर फलक नसल्याबद्दल, अरुंद रस्त्यावरील दिशादर्शक फलकाबद्दल लोक त्वेषाने व्यक्त होत होते.

संध्याकाळ होईपावेतो लोकांचा त्वेष ओसरला आणि शंकेचे कुशंकेचे किडे दिसू लागले. घातपात तर नाही ना, सुपारीचा मॅटर आहे की काय, राजकीय व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांनी तर गेम केला नाही ना इथंपासून ते श्रीमंतांना माज खूप आलाय ते असेच मरणार, श्रीमंतांनी अनेकांना चिरडलंय आता ते देखील याच मौतीने मरणार,

पैशांचा माज बरा नव्हे आदी सूर लोकांच्या व्यक्त होण्यातून दिसू लागले. तिसऱ्या दिवशी मॅटर आणखीनच बिथरला आणि एअर बॅग्जपासून सुरु झालेला प्रवास सीटबेल्टपर्यंत येऊन ठेपला. लोकांनी मीम्स बनवायला सुरुवात केली. व्हॉटसअप पासून ते ट्विटरपर्यंत सगळीकडे सीटबेल्ट्सचे विनोद आणि मीम्स झळकू लागले.

सायरस मिस्त्री मरण पावल्याचं दुःख कधीच मागे पडलं होतं लोक आता त्या घटनेतील संशयबिंदू असणाऱ्या पॉईंटला एन्जॉय करत होते. भरभरून विनोद झाले आणि त्यावर खंडीभर लाईक कमेंट्स झाल्या. मूळ समस्या जैसे थे राहिली, एक उमदा उद्योगपती अकाली मरण पावला. लोकांनी त्याच्या मृत्यूवर आधी शोक संताप केला नि नंतर त्याला एन्जॉय केलं!

सोशल मीडिया हेच करवतो.

तो तुमच्या आमच्या भावना बोथट करतो, बधीर करतो, संवेदनांच्या निष्फळ लाटा आणतो. युजरला सात्विक संतापाचाही आनंद देतो, शोक व्यक्त केल्याची मनःशांती देतो. या लाटांचे बहर ओसरल्यावर त्याला विनोदाची झालर लावतो.

दोनेक दिवसांपूर्वी आपण ज्या गोष्टीवर शोक संताप व्यक्त केलेला असतो त्याचा आपण अघोरी विनोद करतो. मित्रांनो सोशल मीडियाने आपली शोकांतिका केलीय. त्याच्या लाटांत तो सर्वांना वाहवत नेतोय आणि लोकही बेलाशक वाहत जाताहेत.

मिस्त्रींच्या मृत्यूच्या घटनेचा अंतिम परिणाम काय झाला? तर सीटबेल्ट विषयीचा नवा कायदा आला.मोटर वाहन विषयक अनेक कायदे आहेत त्यात आणखी एकाची भर पडली. लोकांनी विनोद करून यातलं गांभीर्य घालवलेलं असल्याने या कायद्याविषयी फारसा विरोधाचा सूर कुठे लागला नाही.

वास्तवात रस्त्यांवर असलेले खड्डे, अरुंद ठिकाणी पुरेसे फलक नसणे, धोक्याच्या वळणावर रस्ता नीटनेटका असणं याविषयी ठोस काम व्हायला हवं मात्र त्याऐवजी नवा कायदा माथी आला ज्यातून चिरीमिरी देऊन सुटका करून घेतली जाईल.

मुळात खड्डे असलेले रस्ते, वाहतूक नियंत्रण नसलेली रहदारी हे आपल्या अंगवळणी पडलं आहे. आपण त्याविषयी अधिक बोलू शकत नाही कारण त्यावर आपण निमिषार्धासाठी व्यक्त होतो आणि त्याला आपला अविभाज्य घटक मानून पुढे जातो. सोशल मीडियाने असं अनेक घटकांविषयी केलंय. अगदी बलात्कार जरी कुठे घडले तरी आपण त्याविषयी निव्वळ व्यक्त होतो आणि पुढे व्यस्त होऊन जातो. व्यक्त होण्याच्या भोंगळ समाधानाने आपण अल्पसंतुष्ट होत आहोत,

आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण पेटून उठत नाही. कारण आपला संताप एका लाटेसारखा आलेला असतो लाट ओसरली की तो विझून जातो, पुन्हा नवी संतापाची लाट येईपर्यंत आपण त्यावर मौन राहतो.

दर उन्हाळ्यात पक्षांना पाणी ठेवा आणि हरेक बलात्कार झाला की संताप व्यक्त करा, एखादी दुःखद घटना घडली की शोकमग्न व्हा इतकं आपलं भावविश्व सोशल मीडियामुळे खुरटं झालं आहे.

केवळ व्यक्त होण्याच्या समाधानातून आपण स्वतःचीच पाठ घेऊ लागलो आहोत. आंदोलने, मोर्चे काढण्यापासून आपण कोसो दूर झालो आहोत. सत्याग्रह करणं वा सार्वजनिक निषेध नोंदवणं हे देखील आताशा आपल्याला जमत नाही. आताशा आंदोलने देखील मजेशीर (यालाच अभिनव असं गोंडस नाव दिलं गेलंय) पद्धतीने केली जात असल्याने त्यात आक्रोश नसतो मात्र फोटोबाजी जरूर असते, आंदोलन केल्याचे लटके समाधान असते.

राज्यकर्त्यांना जसा समाज हवाय तसा समाज अगदी विनासायास घडवण्याचं काम याद्वारे होतेय. 'आपण आता उरलो व्यक्त होण्यापुरते' इतकाच हा मामला नाही तर आपल्या संवेदना अल्पायुष्यी होताहेत हे चिंताजनक आहे.

सायरस मिस्त्री यांचा अपघात जिथे झाला त्या ठिकाणी मी प्रत्यक्षात गेलेलो नाही पण मी दाव्यानिशी सांगतो की, त्या अपघातस्थळापाशी आता एखादा ट्रॅफिकशी संबंधित चिन्ह असणारा फलक लागला असेल आणि त्या परिसरात थोडीशी डागडुजी झाली असेल, खड्डयांवर थोडे डांबर पडले असेल, अरुंद रस्त्यावरचे अडथळे हटवले गेले असतील. मात्र हे फक्त त्याच जागेपुरते घडले असेल.

वास्तवात जिथे जिथे सडक आहे तिथे तिथे हे घडायला हवं. मात्र स्वच्छ हवा, चांगले रस्ते, शुद्ध पाणी, उत्तम दिवाबत्ती आणि चांगली आरोग्ययंत्रणा या प्राथमिक बाबींविषयी आपल्या मनात अनास्था निर्माण झालीय कारण याविषयी आपण वर्षानुवर्षे केवळ व्यक्तच होतो आहोत. आपल्या मेंदूत दुसरेच काही तरी प्राधान्यक्रमात आहे ज्यात आपण गुंतून पडलो आहोत. ते काय आहे ते शोधायला गेलं तर आपल्यातला पशू समोर येईल!

सोशल मीडियाने तुमचे आमचे माकड केले आहे. आपल्याला नाचवणारा मदारी कोण आहे हे ओळखण्यासाठीचा विवेक शाबूत नसेल तर ही दुरवस्था देखील स्वर्गवत वाटू लागते.

- समीर गायकवाड

स्तंभलेखक

Updated : 7 Sept 2022 8:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top