सिग्नल शाळा…
सिग्नल वर नेहमी दिसणारे ही मुलं कधी शाळेत गेली असतील का? असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल… मात्र, या मुलांसाठी शाळा असावी असा विचार एका संस्थेने केला आणि ही मुलं शाळेत पोहोचली. या आगळ्या वेगळ्या शाळेला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भेट देऊन दिवाळी साजरी केली आहे… त्या निमित्ताने त्यांनी या शाळेबद्दल दिलेली माहिती राजकारणाच्या पलीकडे जाऊन नक्की वाचा..
X
काल परवा घरी येत होतो, संध्याकाळ होऊन दिवेलागणीची वेळ झाली होती, वरळी वरून पुढे आलो. येताना पहात होतो दुकाने, घरे दिवाळी निमित्ताने केलेल्या रोषणाईने झगमगून गेले होते. सर्व रस्ते, दुकाने सारेच उजळून गेले होते. साहजिकच पाहून खूप छान वाटलं. पुढे गेल्यावर गाडी सिद्धिविनायक सिग्नल ला थांबली आणि काही लहान मुले गाड्यांच्या काचा आशेने टकटक करत दिवाळीचे समान घेण्याची विनंती करत होती.
यांच्या छोट्या हातात ते सामान आणि इवल्याशा डोळ्यात दिवाळीचा आनंद मावत नव्हता. ते पाहून माझं मन विषण्ण झालं. काही वेळापूर्वी सुखावलेला मी परिस्थितीच्या विरोधाभासाने सुन्न झालो. एकच सण, तो साजरा करण्यासाठी केलेल्या कल्पना, त्यातून मिळणारा आनंद हा प्रत्येक व्यक्ती साठी किती वेगळा असू शकतो. सण समारंभ जाऊदे पण जीवन जगण्यासाठी केला जाणारा संघर्ष सुध्दा प्रत्येकाचा वेगळा.
"सारेच दीप कसे मंदावले आता
ज्योती विझू विझू झाल्या "
मला भोवताली सर्व असे जाणवायला लागलं. सिग्नल सुटला आणि विचाराच्या तंद्रीत मला एक जुना प्रसंग आठवला. मागे एकदा ठाण्याहून परतत असताना तीन हात नाक्याला सिग्नलवर गाडी थांबली होती, डस्टबीन बॅग ले लो साहब .... असं म्हणत एक मुलगी आली. वय साधारण 8 ते 10 वर्षे ..त्या चुणचुणीत मुलीची देहबोली,रहाणी, तिची भाषा ऐकून मला अप्रूप वाटले .मी म्हंटले कांय गं... नाव काय तुझे... शाळेत जातेस कां... तर तिची इटुकली वेणी उडवत म्हणाली हो तर... आहे ना आमची सिग्नल शाळा,तिथे शिकतेय.
माझे नाव राधा. रस्त्यावर डस्टबीन बॅग्ज विकणा-या राधाच्या हातात पेन पेन्सील असल्याचे चित्र मी डोळ्यासमोर आणले होते. सिग्नलवर गजरे, फुले आणि प्लास्टिकच्या वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी शाळेत शिकणे ही कल्पनाच कठीण. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या या मुलांना पोटासाठी पैसे कमावण्यासाठी वणवण करत भटकण्याशिवाय पर्याय नसतो. राहायला घर नाही, फूटपाथवर झोपणे, काहीही शिळेपाके खाणे. अशा स्थितीत आपण शिकावे ही इच्छा या मुलांमध्ये निर्माण होत असेल का?
आज असंख्य सोयीसुविधा यांनी युक्त अशा शाळा, त्यांच्या लाखात असणाऱ्या फिया, दप्तराचे ओझे वागवत अभ्यासात आणि जीवघेण्या स्पर्धेत स्वतःला झोकून देणारी मुले पाहिली की वाटतं… या स्पर्धेत जगणं आणि शिक्षण ही सांगड ही सिग्नल शाळेतील मुले कशी घालत असतील? त्यांच्या आकांक्षा स्वप्ने ध्येय काय असेल? आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न सिग्नल शाळेने कसा केला असेल ?
सिग्नलवर जिणे जगणा-या अशा मुलांसाठी शाळा सुरु करणे हीच काय भन्नाट कल्पना आहे नाही ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळावीत म्हणून थेट सिग्नलच्या शाळेतील मुलांना भेटून दिवाळी साजरी करावी असे मला वाटले. माझ्यापरिने आनंदाची देवाण-घेवाण करण्याचा माझा छोटासा प्रयत्न मी केला.
मी शाळेत आलो तेच नव नव मला दिसत होत. मालवाहू कंटेनरलाच छान शाळेच रूप देण्यात आले आहे. आणि इथे ही अजब शाळा भरते. माझं स्वागत याच मुलांनी केल. दिवाळीसाठी सजलेली शाळा आणि छान बागडणारी मुले. इथे दिवाळी निमित्त पाटी पूजन मुलांनीच केलच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मुलांनी मातृपूजन केलं. आपल्या आईला समोर बसवून तिच्या पायावर डोकं ठेवणं म्हणाल तर साधी कृती पण केवढा संस्कार. पाटी पूजन, मातृपूजन मग मुलांची छोटी नाटीका ज्यात मास्क लावायचा संदेश. यात दीड तास कसा निधून गेला कळलंच नाही. मग सुरू झाला फराळ आणि गप्पा...
विविध वयोगटातील साधारण 50 एक मुले आहेत या सिग्नल शाळेत.. सिग्नलवरची मुले हेरून त्यांच्या पालकांना आणि मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे महान कार्य समर्थ भारत व्यासपीठ ठाण्याला तीन हात नाका इथे करत आहेत. मुलांच्या अंघोळीपासून जेवणापर्यंतची सगळी व्यवस्था, गणवेष, सामान ठेवण्यासाठी लॉकर्स अशी सगळी सोय इथे केली जाते असे संचालक भटू सावंत म्हणाले. मराठी,इंग्रजी,गणित,विज्ञान, कंप्युटर हे सगळे इथे त्यांना शिकवले जाते.
इथे आपल्या मुलांना सगळ्या सोईसुविधा मिळत असून देखील अभ्यासाचा आनंद बऱ्याचदा नसतो,पण ह्या मुलांचा संघर्षच वेगळा. मेहनत जिद्द, चिकाटी याच्या बळावर या सिग्नल शाळेच्या मुलांनी विज्ञान प्रयोग सादर करून थेट इस्रोची वारी करण्याची संधी मिळवली होती, हे ऐकून तर थक्कच झालो .पण कोरोनामुळे तिकडे जाण्याची संधी हुकली असली तरी सुद्धा या मुलांचे आयुष्य सिग्नल शाळेमुळे आज प्रकाशमय होतेय तसेच ही मुले आज सिग्नलवर वस्तू विकत,सिग्नल शाळेत शिकतायत हे किती कौतुकास्पद आहे. अशा अनेक संधी ते पुन्हा मिळवतील.
खरंच आपल्या अवतीभवतीच अशी भन्नाट कार्य करणारी माणसे असतात आणि शिकण्याचे स्वप्न घेऊन अपार कष्ट करणारी अशी विशेष मुलेही असतात याची जाणीव सर्वांनाच व्हायला हवी. केवळ परिस्थिती नाही म्हणून शिकता येत नाही ,अशा मुलांसाठी ही सिग्नल शाळा म्हणजे एक आशेचा किरण आहे.
एक पणती माणुसकीची,आपुलकीची तेवत ठेवणारी सेवाव्रती माणसे आज सिग्नल शाळेत आहेत म्हणून अनेकांचे आयुष्य आज उजळून निघत आहे. आज महाराष्ट्रात सिग्नलवर वस्तू विकणा-यांची संख्या 11 लाखांच्या घरात आहे,त्यांच्याही आयुष्यात अशीच आदर्शवत माणसे आली तर त्यांचेदेखील आयुष्य तेजोमय होईल.
दिपोत्सव अनेकांच्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येत असतो, सर्वत्र आनंदाला भरते आलेले असते. या पारंपरिक सणाची उंची आपण समाजभान जपत वाढवू शकतो. एकदा कुठेतरी वाचनात एक वाक्य आले ते खूप मनाला स्पर्षून गेले. The greatest cruelty is our casual blindness to the despair of others…. सुखवस्तू कुटुंबातील आपल्याला समाजातील उपेक्षित,विशेष घटकांबद्दल तितकीशी माहिती नसते किंबहुना ती करून घ्यावी इतपत वेळ देखील नसतो.
आपण ज्या समाजात रहातो त्या समाजाचे आपण देणे लागत असतो, कुणी विशेष घटक असतील तर त्यांना जास्तीत जास्त आनंद सणावाराला देण्याचा प्रयत्न करण्याचे समाजभान अभाविपचे काम करताना आले. आपण जेव्हा दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करत असतो तेव्हा नेहमी अशा घटकांची आवर्जून आठवण असावी.
अंधाराकडून प्रकाशाकडे नेणा-या या शाळेतील सर्व मुलांची स्वप्ने पूर्ण होवोत हीच मनोमन शुभेच्छा देत मी शाळेतून बाहेर पडलो. पण मनापासून सांगतो ,या मुलांनी आणि तिथल्या शिक्षकांनी माझी दिवाळी खूपच खास केली हे मात्र खरे...