श्यामची आई !
साने गुरुजींच्या 'श्यामची आई' या अजरामर पुस्तकाचे लेखन आजच्या दिवशी ९ फेब्रुवारी १९३३ रोजी सुरु झाले होते त्यानिमित्ताने आठवणींना उजाळा दिला आहे ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी...
X
प्रेम आणि मातृत्वाचा साक्षात्कार घडवून आणण्याची ताकद ज्यांच्या लेखणीत व वाणीत होती, अशा कै. साने गुरुजी यांच्या त्रिकालाबाधित `श्यामची आई' या अवीट गोडीच्या पुस्तकाच्या लिखाणाची सुरुवात १९३३ साली आजच्याच दिवशी झाली. स्थळ होते, नाशिकचा तुरुंग व समोर श्रोते होते, तुरुंगात विविध गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणारे कैदी.
स्वातंत्र्य चळवळीत सत्याग्रह केल्याच्या `गुन्ह्या'साठी साने गुरुजीही सजा भोगत होते., कैद्यांना रात्री आईच्या गोष्टी सांगतानाच साने गुरुजी त्या आठवणी लिहून काढत राहिले. पाच दिवसांत म्हणजे १३ फेब्रुवारीपर्यंत त्यांनी पुस्तक हातावेगळे केले.
`श्यामची आई' ही साने गुरुजींच्या लहानपणीच्या जीवनाची गोष्ट. पांडुरंग सदाशिव साने नावाचा कोकणातला मुलगा त्याच्या आई-वडिलांसह परिस्थितीशी झुंज देत देत मोठा होतो. वडिलांच्या पडत्या काळात घर सांभाळतानाच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, म्हणून आईची चाललेली धडपड रोजची अनुभवतो. या साऱ्याचे त्याच्या बालमनावर खोलवर परिणाम होत राहतात. तीच स्पंदने `श्यामची आई'मध्ये टिपलेली आहेत. यातला `श्याम' म्हणजे स्वत: साने गुरुजी.
स्वत:ला स्वत:पासून दूर करून आत्मकथन करण्याचा विलक्षण वेगळा व कठीण प्रयोग साने गुरुजींनी `श्यामची आई'ची रचना करताना साकारला. तो कमालाचीचा यशस्वीही झाला. `श्यामची आई'च्या प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक `रात्र' असे आहे. अशा ४२ रात्रींत श्यामच्या आईचे कथानक पूर्ण होते. `श्यामची आई' वाचताना ज्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या नाहीत, असा माणूस क्वचितच सापडेल. हे कथानक म्हणजे खरे तर गद्य रुपात साने गुरुजींनी शब्दबद्ध केलेले काव्यच आहे.
त्यावर आधारित `श्यामची आई' हा मराठी चित्रपट आचार्य अत्रे यांनी १९५३ साली निर्माण केला. तो प्रचंड गाजलाच, शिवाय त्याच वर्षीपासून सुरू झालेला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार याच चित्रपटाला मिळाला. आजही कोणत्याही साहित्य संमेलनात होणाऱ्या पुस्तक प्रदर्शनांत सर्वाधिक विक्रीचा उच्चांक `श्यामची आई'च गाठत राहते. असे हे अजरामर गद्यकाव्य आहे.
भारतकुमार
Print & TV Journalist,Political Analyst and formerMember of Parliament (RS). Worked in India & abroad and in English & Marathi. Opinions are strictly personal.