Home > मॅक्स ब्लॉग्ज > शिवराज्याभिषेक दिन: भूमीपुत्रांच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक

शिवराज्याभिषेक दिन: भूमीपुत्रांच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक

'समुद्र उल्लंघन हे पाप आहे' असं धर्म मार्तंड सांगत असताना शिवरायांनी आरमार दलाची स्थापना का केली? शिवरायांना The Last Fort Architect का म्हटले जाते? शिवरायांना तुम्ही क्षुद्र आहात, असे म्हणणारे कोण होते? वाचा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त डॉ. देविकाराणी पाटील यांचा छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभारावर प्रकाश टाकणारा लेख. हा लेख आम्ही पुनःप्रकाशित करीत आहोत.

शिवराज्याभिषेक दिन: भूमीपुत्रांच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक
X

या जगी सर्व पृथ्वीवर मलेच्छ बादशहा।
मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही ।।

वर मी जे या लेखाला टायटल दिले आहे ते मुद्दाम दिले आहे. हे वाक्य कृष्णाजी अनंत सभासदांनी शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेने लिहिलेल्या बखरीतील आहे. यामध्ये त्यांनी हे शिवछत्रपतींचे राज्य हे कोणाचे आहे हे अगदी स्पष्ट निर्देश केले आहे. ते राज्य मराठा पातशहाचे होते. मराठा पातशहा म्हणजे शिवछत्रपती आणि मराठ्यांचे हे राज्य म्हणजे फक्त मराठा जातीचे नव्हते. तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर स्वातंत्र्यासाठी लढणारे जे भूमीपुत्र होते. अशा सगळ्या भूमीपुत्रांचे हे राज्य होते. हे सभासदांच्या वरील वाक्यातून अधोरेखीत होते.

शिवछत्रपतींनी राज्याभिषेक करून घेतला, खरं तर शिवछत्रपतींनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली. त्याचवेळी एखाद्या राजानं स्वतःस राज्याभिषेक करून घेतला असता, पण शिवाजी महाराजांनी त्यावेळी स्वराज्याची शपथ घेतली असे म्हटले जाते. येथून ते इ.स.१६७४ पर्यतच्या साधारणतः २७ - २८ वर्षाच्या कालखंडात त्यांनी संपूर्ण स्वराज्याची उभारणी केली. अनेक नवनवीन क्षेत्रातील व्यक्ती तयार केल्या, माणसं उभी केली, नवे तंत्रज्ञान आणले आणि मग स्वतः ला राज्याभिषेक करून घेतला. एका नव्या युगाचा आरंभ केला. हिंदुस्थानात एका शककर्त्याचा उदय झाला. नवे चलन नवी कालगणना सुरू झाली.

शिवाजी महाराजांनी नवे तंत्रज्ञान, नव्या संकल्पना, नव्या नीती, अनेक व्यक्तीमत्व उभी केली; याची काही उदाहरणे आपण आजच्या प्रसंगी दिली तर ती अप्रस्तुत होणार नाही. भारताच्या इतिहासात प्राचीन काळात आपल्याकडे आरमाराचे ज्ञान होते. पण मध्ययुगात अशी परिस्थिती आली की, जो हिंदुस्थान जंबुव्दिप म्हणून ओळखला जात होता. ज्या देशाच्या तिन्ही बाजूला समुद्र होता. त्या देशात 'समुद्र उल्लंघन हे पाप आहे' अशी मांडणी धर्म मार्तडांनी केली. त्यामुळे संपूर्ण समुद्र हा परकीय सत्ताधीशांना रिकामा पडाला होता आणि त्यामुळेच या समुद्रावर परकीय लोकांची सत्ता निर्माण झाली.

"मध्ययुग हे दर्यावर्दींचे युग होते" असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. म्हणूनच या पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज या दर्यावर्दी सत्तांनी संपूर्ण जगाला पालान घातले आणि संपूर्ण जगभर स्वतःच्या वसाहती निर्माण केल्या. ज्या देशात गवताचे तृणपाते ही उगवणे मुश्कील असा इंग्लंड सारख्या शीत हवामानाचा देश तत्कालीन जगातील सर्वात समृद्ध आणि सुखी देश म्हणून गणला जाऊ लागला. त्याचे कारण आरमार होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ही गोष्ट ओळखली आणि कोणत्याही धार्मिक गोष्टीला बळी न पडता त्यांनी स्वतःच्या आरमाराची उभारणी केली. शिवछत्रपतींनी दुर्घाडीच्या किल्याच्या साक्षीने जे पहिले आरमार उभे केले त्यासाठी त्यांनी ज्यांची सावलीही निषिद्ध होती. अशा परकीय पोर्तुगीज कारागीरांची मदत घेतली, त्या कारागीरांकडून आपल्या लोकांना त्यांनी ते तंत्रज्ञान शिकायला लावले आणि त्यांनी आरमाराची उभारणी केली. आणि आपण हेही पाहतो की, पुढे जाऊन शिवाजी महाराजांचे आरमार हे या पोर्तुगीज, इंग्रज या दर्यावर्दी सत्तांना आव्हान देण्याएवढे प्रबळ बनले.

दुसरे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे गडकोट. गडकोट हे आपले जीवरक्षक - गडकोट हेच प्राण असे शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात म्हटले आहे. शिवाजी महाराजांना The Last Fort Architect म्हटले जाते. कारण जगाच्या इतिहासात दूर्ग बांधणारा आणि त्या दूर्गांचा उपयोग करून भूमीपुत्रांचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य टिकवणारा असा हा एकमेव राजा आहे.

जगात भारत सोडून इतर देशातही दूर्ग आहेत. पण त्या दूर्गांचा उपयोग हा आपले राज्य, स्वातंत्र्य, सार्वभौमत्व टिकविण्यासाठी, भूमीपुत्रांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या आब्रूच्या आणि हिताच्या संरक्षणासाठी करणारा हा पहिला आणि शेवटचा (एकमेव) राजा आहे. कारण मध्ययुगीन भारतातही मुघल, रजपूत या सर्वांकडेही दूर्ग होते पण ते दूर्ग राजसत्तेच्या वास्तव्यासाठी आणि लष्करी ठाणे म्हणून वापरले जात होते. पण शिवाजी महाराजांचे दूर्ग - मराठ्यांचे दूर्ग हे त्या दूर्गांच्या परिसरातील जी रयत होती, सामान्य जन होते, स्त्रिया लहान मुले होती. यांच्या संरक्षणासाठी परचक्र आल्यानंतर वापरले गेले. याची अनेक उदाहरणे आपल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासात उपलब्ध आहेत.

पुरंदरच्या तहाच्यावेळी ही शिवाजी महाराजांनी जो तह केला. तो किल्यावर असणाऱ्या बायाबापट्यांना, लहान मुलांना, सामान्य रयतेला वाचवण्यासाठी केलेला होता. हे आपणा सर्वांना ज्ञात आहे. म्हणूनच आजही आपल्या भूमीपुत्रांना महाराष्ट्रातील दूर्गांचे महत्त्व दूर्गांविषयी जी आत्मीयता आहे. ती त्यामुळेच टिकून आहे.

तिसरे उदाहरण : शिवाजी महाराजांनी महिलांविषयी जो दृष्टिकोन मध्ययुगामध्ये ठेवलेला होता. असा दृष्टिकोन संपूर्ण मानवाच्या इतिहासामध्ये इतर कोणत्याही राजाने किंवा लष्करी सत्ताधीशाने ठेवल्याचे दुसरे उदाहरण नाही.

आपल्याला माहिती आहे की, शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाने बदनजर केली म्हणून त्याचे हातपाय कलम (चौरंग) केले होते. तसेच शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाहून परत येत होते. तेव्हा त्यांना बेलवडीच्या मल्लवा देसाई यांचा अपमान केल्याचे समजले. यावेळीही शिवाजी महाराजांनी अपराधी असणाऱ्या सखोजी गायकवाड या स्वतःच्या नातेवाईकाचे डोळे काढून त्याला आदबखान्यात ठेवले होते.

स्त्रियांकडे कारभार देण्याची, स्त्रियांनीही राजशकट चालविले पाहिजे, प्रशासनात आले पाहिजे. यासाठी त्यांना स्वातंत्र्य देण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी त्याकाळी केले होते. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आऊसाहेब आहेतच आणि त्यानंतरचे दुसरे उदाहरण म्हणजे ज्यांनी एका राज्याची स्थापना केली आणि औरंगजेबाला सतत सात वर्षे झुंजवत ठेवले आणि शेवटी या महाराष्ट्राच्या मातीतच गाढले अशा महाराणी ताराबाईसाहेब. या शिवाजी महाराजांच्या सुष्ना होत्या.

त्यांनी शिवाजी महाराजांचे स्त्रियांनी राज्यकारभार केला पाहिजे, स्त्रियांनीही हातात तलवार घेतली पाहिजे आणि प्रशासन ही चालविले पाहिजे. हा जो काही शिवविचार त्यांनी लहानपणापासून पाहिला होता. तो महाराणी ताराबाईसाहेबांनी ज्यावेळेला मराठ्यांचे राज्य नेतृत्वहीन होईल अशी परिस्थिती होती. त्यावेळेला स्वतः हातात नेतृत्व घेतले आणि तोच शिवछत्रपतींचा आदर्श त्यांनी पुढे चालविला. हे तिसरे उदाहरण आहे.

चौथे उदाहरण जे आपण शिवाजी महाराजांचे सांगू शकतो. ते म्हणजे शिवाजी महाराजांनी राज्य चालवताना कोणत्याही जाती - जमातींच्या विरूद्ध किंवा कोणत्याही धर्माच्या विरूद्ध आपली तलवार उगारली असे झाले नाही आणि म्हणूनच शत्रूचे इतिहासकारही शिवाजी महाराजांच्या धोरणाचा पुरस्कार करतात किंवा त्यांचा गौरवाने उल्लेख करतात की, शिवाजी महाराजांच्या सैन्याला जर कुराण सापडले तर शिवाजी महाराज ते सन्मानाने त्यांच्या मुस्लीम सैनिकाकडे सुपूर्द करत होते. असे उल्लेखही इतिहासात आपल्याला आढळतात.

अशा या राजाला स्वतःस राज्याभिषेक करून घेताना अनेक धार्मिक अडचणी अनेक लोकांनी आणल्या. तुम्ही क्षुद्र आहात असे सांगितले. त्यावरही शिवरायांनी मात केली आणि त्यातूनही मार्ग काढला. स्वतः धार्मिक बंधने तोडून जुगारून दिली. त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करायला आपण पात्र आहोत. असे सिद्ध करून घेतले आणि मग राज्याभिषेक केला.

शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवछत्रपतींच्या अनेक पैलूपैकी हे तीन चार पैलू मला जास्त महत्त्वाचे वाटतात. आपण शिवचरित्राचा अभ्यास करताना हे ध्यानात घेतले पाहिजेत असे मला वाटते.


शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
डॉ. देविकाराणी पाटील 6 जून २०२१
कोल्हापूर

(लेखिका डॅा. देविकाराणी पाटील यांनी क्षात्रजगदगुरू : सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील योगदान या विषयावर संशोधन केले आहे. सध्या त्या शाहू संशोधन केंद्र शिवाजी विद्यापीठ येथे २००७ पासून संशोधन सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. )

Updated : 6 Jun 2022 8:00 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top