Home > Election 2020 > मातोश्री परिसरातल्याच शिवसैनिकांचा कल जिथे उद्धव ठाकरेंना समजू शकला नाही...!!!

मातोश्री परिसरातल्याच शिवसैनिकांचा कल जिथे उद्धव ठाकरेंना समजू शकला नाही...!!!

मातोश्री परिसरातल्याच शिवसैनिकांचा कल जिथे उद्धव ठाकरेंना समजू शकला नाही...!!!
X

शिवसेना २०१४ ला स्वतंत्र लढली होती. ६३ आमदार होते. यावेळी भाजपासोबत युतीत लढली, ६३ चे ५६ झाले. खरंतर हा पराभवच. त्यात शिवसेनेचं होमग्राऊंड मातोश्रीतच ठाकरेंना मात खावी लागलीय. वांद्रे पूर्वमधील पराभव शिवसेनेला सलतोय. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उद्धव ठाकरेंनी बांद्रा पूर्वमधून तिकीट दिलं. विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांचं तिकीट कापलं. कदाचित सावंत यांनाच तिकीट दिलं असतं तर बांद्र्याची जागा राखता आली असती असं त्यांच्या बंडखोरी नंतरची निकालातही आकडेवारी सांगतेय. मातोश्री परिसरातल्याच शिवसैनिकांचा कल उद्धव ठाकरेंना कळू शकला नाही, हे निकालावरून स्पष्ट झालंय.

हे ही वाचा

तृप्ती सावंत ह्या माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी. २०१४ ला मोदीलाटेतही बाळा सावंत आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर निवडून आले होते. ४१ हजार ३५१ मते त्यांना मिळाली होती. भाजपाच्या कृष्णा पारकर यांनी त्यांना लढत दिली होती. पारकर यांना २५ हजार ७७८ मते मिळाली होती. एआयएमआयएम ने २३९७६ घेतली तर काॅंग्रेस १२२२९ मतांसह चौथ्या क्रमांकावर फेकली गेली होती.

[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="58395,58396,58397,58398,58399"]

बाळा सावंतांच्या मृत्यूनंतर शिवसेनेने तृप्ती सावंत यांना पोटनिवडणुकीत उभं केलं. नारायण राणे लढले त्यांच्यासमोर. तृप्ती सावंतांनी ५२७११ मतं घेऊन राणेंवर १९ हजारांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. या मतदारसंघात कोकणवासियांची मोठी मतं आहेत. राणे त्या जोरावरच उभे होते, पण मतदारांनी कौल तृप्ती सावंत यांना दिला. आमदार म्हणून सुरूवातीचा काही काळ तृप्ती यांचा चाचपडण्यात गेला, पण गेल्या तीन वर्षात त्यांनी जनमानसात पकड निर्माण केली होती. त्या शिवसेनेच्या उमेदवार असत्या तर निवडूनही आल्या असत्या, पण मातोश्री परिसरातल्याच शिवसैनिकांचा कल उद्धव ठाकरेंना समजू शकला नाही. तो पोचण्यात मोठा अडसर ठरला आमदार व विभागप्रमुख अनिल परब यांचा.

अनिल परब आणि बाळा सावंत यांचं आपसात पटत नव्हतं. पण बाळा हयात असेपर्यंत अनिल परब यांचं फारसं चाललं नाही. बाळा सावंत यांचा जनसंपर्क इतका दांडगा होता की २०१४ च्या निवडणुकीत आजारपणामुळे फारसा प्रचार न करताही ते निवडून आले होते. बाळा सावंतांच्या मृत्यूनंतर अनिल परबांकडे स्थानिक राजकारणाची सगळी सूत्रं आली.

तृप्ती सावंत ह्या शिवसेनेच्याच आमदार असल्या तरी त्यांच्यावर स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी यांचा अघोषित असहकार किंवा बहिष्कारच होता. त्याला अनिल परब यांची फूस होती, असं समजतं.परब यांनीच तृप्ती यांच्या सोबत कोण नसल्याचं सांगून त्यांचं तिकीट कापलं, असा शिवसैनिकांचा आरोप आहे. विश्वनाथ महाडेश्वरांना तिथे उभं केलं. हे राजकारण पूर्वनियोजित असल्याने महाडेश्वर काही महिन्यांपूर्वीच त्या भागात राहायला आले होते. मध्यंतरी एका महिलेचा हात पिरगाळणारा त्यांचा विडीयो गाजला होता. तो पसरवण्यात मोठा पुढाकार होता मनसेचा. मनसेच्या अखिल चित्रे यांनी विधानसभा निवडणुकीत १०६८३ मतं घेतली, पण शिवसेनेच्या जिव्हारी लागली तृप्ती सावंत यांची बंडखोरी !!!

वांद्रे पूर्व मधून काॅंग्रेसचे झीशान बाबा सिद्दीकी निवडून आलेत. त्यांना ३८३३७ मते पडली आणि विश्वनाथ महाडेश्वरांना ३२५४७. अवघा ५७९० मतांचा फरक आणि तृप्ती सावंतांनी मतं घेतली, २४०३४. एआयएमआयएमचे उमेदवार मोहंमद सलीम कुरेशी यांनी १२५९१ मते घेऊनही काॅंग्रेसचा उमेदवार निवडून आला हे विशेष.

"तृप्ती सावंत यांच्या उमेदवारीमुळे कुरबुरी असलेल्या शिवसैनिकांना पर्याय मिळाला. सावंत यांनी २४ हजार मतं घेतल्याने शिवसेनेच्या मतांची फाटाफूट झाली," असं आमदार अनिल परब यांनी "मॅक्समहाराष्ट्र" ला सांगितलं. तिकीट कापण्याच्या आरोपावर परब म्हणाले की मातोश्री ज्या मतदारसंघात आहे, तिथे उमेदवाराचा फिडबॅक द्यायला आणखी कोणाची काय गरज आहे ? विद्यमान आमदार म्हणून त्यांचा प्रभाव असता तर मिळालं असतं तिकीट !!! महाडेश्वरांच्या विडियोचा नकारात्मक परिणाम आलेला असू शकतो, असंही परब यांनी एका प्रश्नावर बोलताना मान्य केलं.

वांद्रे पूर्व मतदारसंघात सद्या तणावाचं वातावरण आहे. तृप्ती सावंत यांच्या घरावरही मोठा बंदोबस्त आहे. शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी झालेली आहे. पण तृप्ती सावंत राजकारण सोडायच्या पवित्र्यात नाहीत. ज्या २४ हजार मतदारांनी बाळा सावंतांवरचं प्रेम दाखवून दिलं, त्यांच्यासाठी आपण पुढेही कार्यरत राहू, असं त्यांनी "मॅक्समहाराष्ट्र"ला सांगितलं. मंडळांचं एक मोठं जाळं बाळा सावंतांनी या भागात उभं केलं. मला त्यांची काळजी आहे, असं त्या म्हणाल्या. भाजपासोबत जायचा विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे त्या काॅंग्रेस किंवा राष्ट्रवादीचा मार्ग पत्करतील, अशी चिन्हं आहेत. निवडणुकीचा माहौल ओसरल्यावर सर्वांशी चर्चा करूनच, पुढे काय करायचं ते ठरवू, असं त्यांनी सांगितलं.

Updated : 25 Oct 2019 8:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top