होय, शरद पवारच!- संजय आवटे
राजकारण हा शक्याशक्यतांचा खेळ आहे. ७८ वर्षांचे ज्यो बायडन अमेरिकेचे अध्यक्ष होऊ शकतात, तर ८० वर्षांचे शरद पवार यूपीएचे अध्यक्ष का नकोत? शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष करणे हीच विरोधकांची आजच्या घडीची सगळ्यात योग्य व्यूहरचना ठरू शकते सांगातहेत वरीष्ठ पत्रकार संपादक संजय आवटे ....
X
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही, शरद पवारांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले, हा पराक्रम होता. साहस होते. बुद्धिचातुर्य होते. आणि, त्याचवेळी मुत्सद्दी खेळीही होती.
मुळात, हातातून गेलेली निवडणूक पवारांनी आपल्या हातात घेतली. विरोधकांनी सेंच्युरी मारली. त्यानंतर भाजपला दूर ठेऊन तीन पक्ष एकत्र आले. तरीही, सत्ता स्थापन करण्याचा क्षीण प्रयत्न भाजपने केलाच. पण, पवारांनी तो उधळून लावला. रस्त्यावर, न्यायालयात, सभागृहात सगळीकडे दमदार झुंज देत, अखेर हे सरकार स्थापन झाले.
शरद पवार नसते, तर हे सरकार स्थापन होणे निव्वळ अशक्य होते. महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणे हा फक्त एका राज्यापुरता मुद्दा नसतो. त्यातून देशभर गेलेला मेसेज फार वेगळा आहे. आणि, महाराष्ट्राचा हाच प्रयोग देशपातळीवर करण्याचे आव्हान विरोधकांसमोर आहे. हा प्रयोग केवळ शरद पवारच करू शकतात. तसा आवाका आणि तशी प्रतिभा असणारे अन्य नेतृत्व सध्या विरोधकांकडे नाही.
शरद पवारांच्या क्षमतेचा 'मास बेस' असणारा नेता सध्या महाराष्ट्रातच काय, देशात नाही. शिवाय, शरद पवार म्हणजे मुत्सद्दी राजकीय खेळी हे तर आहेच. पण, शरद पवार म्हणजे पुलंपासून ते जयंत नारळीकरांपर्यंतचं मैत्र असं सगळं आहे. राजकारण ही समग्र गोष्ट असते. अशा समग्रतेने राजकारण करू शकणारे एकच नेते सध्या देशात आहेत आणि अर्थातच ते शरद पवार आहेत. क्रिकेटपासून ते उद्योगांपर्यंत आणि शेतीपासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल असे समग्र भान असणारे शरद पवार हे आजचे एकमेव नेते आहेत.
महाराष्ट्रात शिवसेनेसारखा वा राष्ट्रवादी कॉंग्रेससारखा पक्ष आहे. बिहारात 'नंबर वन' ठरलेला तेजस्वी असा राष्ट्रीय जनता दल आहे. द्रमुक आहे, झारखंड मुक्ती मोर्चा आहे. अशा सगळ्या पक्षांना तर शरद पवार एकत्र ठेऊ शकतातच. पण, तृणमूल कॉंग्रेस, अगदी बिजू जनता दल वा नितीशकुमारांचा संयुक्त जनता दल यांनाही सोबत घेत पुढे जाऊ शकतात. या सर्व पक्षांशी आणि नेत्यांशी पवारांचे असणारे सलोख्याचे संबंध सर्वज्ञात आहेत. प्रादेशिक पक्षांचा चेहरा पुढे करत कॉंग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने आता आपले नवे राजकारण विकसित केले आहे. आणि, व्यूहरचना म्हणून ते बरोबरही आहे.
असे सगळे पक्ष एकत्र आले, तर भाजपची कशी भंबेरी उडू शकते, हे महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीने सिद्ध केले आहे. 'तीन पक्षांची एकत्र ताकद जोखण्यात आम्ही कमी पडलो', असे देवेंद्रांनी म्हणणे हा त्याचाच पुरावा.
यूपीएचे नेतृत्व सोनियांनी तडफेने केले. त्यांच्यानंतर शरद पवार हेच तसे ज्येष्ठ आणि सर्वमान्य नेते आहेत. केंद्रात संरक्षणमंत्री आणि कृषिमंत्री म्हणून त्यांची कामगिरी जशी चमकदार होती, त्याचप्रमाणे, सोनिया गांधी यांच्यापूर्वी लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून पवारांनी काम पाहिलेले आहे. आज राष्ट्रपतींना भेटलेल्या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळात राहुल गांधी होते, पण नेतृत्व शरद पवारांनी केले, हे लक्षात घेतले पाहिजे.
हाच तो बदल आहे.
महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर मी म्हटले होते :
ही निवडणूक 'आणखी एक' अशी निवडणूक नव्हती. निकाल ऐतिहासिक होता आणि सरकार स्थापन झाले, ती पद्धत तर अभूतपूर्वच आहे! राजकारणाची परिभाषा बदलून टाकणारा हा घटनाक्रम आहे. निवडणुकीच्या रिंगणात मतदार हाच केंद्रबिंदू आहे, हे महाराष्ट्रातील मतदारांनी सिद्ध केले. तर, घोडेबाजार करून, सारे संकेत पायदळी तुडवून तथाकथित चाणक्यांनाही सत्तास्थापनेचा खेळ खेळता आला नाही, हे निकालानंतरच्या घडामोडींनी अधोरेखित केले. महाराष्ट्राने भल्या भल्यांचा तोरा उतरवला आणि अवघ्या देशाला नवी प्रकाशवाट दाखवली. महाराष्ट्राचे राजकारण आगामी काळात बदलत जाणार आहेच, पण पर्यायाच्या वाटा सर्वदूर दिसू लागणार आहेत. विरोधी अवकाश रुंदावत जाणार आहे. एकध्रुवीय राजकारण बहुध्रुवीय, बहुपेडी होत जाणार आहे. देशाचे राजकारण बदलत जाणार आहे आणि शरद पवार या नव्या राजकारणाचे नायक असणार आहेत!
महाराष्ट्रातल्या 'गेम ऑफ थ्रोन्स'ची मराठी पटकथा देशाच्या पडद्यावर सिद्ध होऊ शकते, हा विरोधकांना वाटणारा आत्मविश्वास हीच त्या बदलाची चाहूल आहे.
- संजय आवटे
वरीष्ठ पत्रकार संपादक