शेन वॉर्नची वेदनादायी एक्झीट- द्वारकानाथ संझगिरी
गोलंदाज शेन वॉर्न जगाला सोडून गेला. मात्र, शेन वॉर्नने या जगाला काय दिलं? त्याचं असं अकाली जाण्याचं नक्की काय कारण असावं? वाचा क्रीडा विश्लेषक द्वारकानाथ संझगिरी यांनी व्यक्त केलेल्या भावना
X
शेन वॉर्न आपल्यात नाही याच्यावर माझा अजिबात विश्वासच बसत नाही. जेव्हा मी बातमी बघितली ना मोबाईलवर तेव्हा मला वाटलं ही फेक न्यूज आहे. 52 वर्षं हे काय जायचं वय आहे का एखाद्या क्रिकेटपटूचं? आणि तो तर वजन कमी करायला निघाला होता, सर्जरी वगैरे करून आणि तो क्षणात नाहीसा झाला. ?
काही तास आधी त्याने यष्टिरक्षक मार्श गेला म्हणून ट्विट केलं होत. त्याच्यावर काही तासात त्या वरच्या पॅव्हेलियन मध्ये जायची पाळी यावी ?
मला असं वाटलं की स्वतः शेन वॉर्न ट्विट करील की, 'मी जिवंत आहे. काळजी करू नका.' पण असं काही घडलंच नाही. टीव्हीवर जेव्हा बातम्या बघायला लागलो त्यावेळी जाणवलं की, शेन वॉर्न आपल्यात नाहीय. अहो, दोन वर्षांपूर्वी शेन वॉर्नला मी त्या इंग्लंडच्या वर्ल्डकपमध्ये कितीतरी वेळा पाहिलंय. त्याच्या हातात ती सिगारेट असायची आणि तो सिगारेटचा आस्वाद घेत असायचा. त्यावेळी मला असं वाटलं की त्याला सांगावं की स्मोकिंग वाईट आहे. पण ती त्याची साथीदारच होती.
शेन वॉर्न गेला म्हणजे नेमकं काय झालं?
लेगस्पीन या कलेमधला "नवा ब्रह्मदेव "गेला. लेगस्पीनची कला ही काही शेन वॉर्नने निर्माण केली नाही. लेगस्पीनची कला पूर्वीपासूनच होती. म्हणजे अगदी ऑस्ट्रेलियाचा जरी विचार केला तरी ओरायली, ग्रिमेट, आपल्याकडे सुभाष गुप्ते ज्याला आतापर्यंतचा ग्रेटेस्ट लेगस्पीनर असं मानलं जातं असे लेगस्पीनर या जगामध्ये होते. ऑस्टेलियात होते, भारतात होते, पाकिस्तानात होते, पण ज्या काळात शेन वॉर्न आला त्या काळामध्ये लेगस्पीनर कमी व्हायला लागले होते. कारण वनडे क्रिकेट आणि टी-20चं प्रस्थ वाढायला लागलं होतं. आणि असा एक गैरसमज होता की वनडे क्रिकेट आणि टी-20 मध्ये लेगस्पीनरचं काही काम नाही.
शेन वॉर्न 1992-93 च्या सुमारास आला बघता बघता मोठा झाला आणि त्याने लेगस्पीनच्या कलेचं पुनरुज्जीवन केलं. अरे त्याने लेगस्पीनची नवीन सृष्टी निर्माण केली. आणि ही नवीन सृष्टी एवढी सुंदर होती, मोठी होती की आज तुम्हाला आयपीएलच्या संघातसुद्धा अनेक लेगस्पीनर दिसतात. अर्थात शेन वॉर्नच्या दर्जाचे तर कुणीच असू शकत नाही. पण निदान लेगस्पीनची कला, त्या कलेत आपण रस घ्यावा, आपण लेगस्पीन टाकावां हे या पीढीला वाटावं ही केवढी मोठी गोष्ट आहे.
लेगस्पीनची कला जोपासणं सोपं नसतं. कारण मनगटाने चेंडू टाकताना अचूक टप्पा, त्या टप्प्यावरची आपली पकड, ती ठेवणं फार फार कठीण असतं. ऑफस्पीनचं कसं असतं की नैसर्गिकपणे ती तुम्हाला येते. लेगस्पीनची कला ही अत्यंत कठीण कला आहे. त्याला मेहनत लागते आणि नैसर्गिक गुणवत्ताही लागतेच लागते. पण एक नवा अध्याय क्रिकेटपटूच्या आयुष्यात शेन वॉर्नने सुरू केला. आणि . शेन वॉर्न हा जगाचा झाला.
शेन वॉर्न एक लेगस्पीनर म्हणून कसा होता?
मी सांगेन की त्याच्याकडे लेगस्पीनरला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी होत्या. सगळय़ात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आक्रमक होता. मार खायला तो घाबरायचा नाही. त्याच्याकडे मोठ्ठा टर्न होता. तो बॉल हातभर वळवायचा. त्याच्याकडे फ्लिपर होता, त्याच्याकडे गुगली होता, त्याच्याकडे फास्टरवन होता. आणि तो चेंडूला फ्लाईटसुद्धा द्यायचा. महत्त्वाची गोष्ट की त्याने राऊंड-द-विकेट गोलंदाजी टाकायला सुरुवात केली. त्याने गोलंदाजांच्या बूटमार्कमधे चेंडू टाकले. पूर्वीचे लेगस्पीनर हे सहसा त्या भानगडीत पडायचे नाहीत. पण शेन वॉर्नने ती सुरुवात केली आणि तो मागून फलंदाजांचे बोल्ड काढायला लागला. कारण त्याचे चेंडू हात-हातभर वळायला लागले. त्याच्यावर आक्रमण जरी केलं तरी तो डगमगायचा नाही. तो पुन्हा आक्रमण करायचा आणि विकेट घ्यायचा. हे त्याच्या लेगस्पीनची सगळय़ात महत्त्वाची गोष्ट आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट काही युग काही खेळाडूंनी गाजवली आहेत.
म्हणजे एक युग ब्रॅडमनचं. .
नंतरच युग गारफिल्ड सोबर्सच.
गारफिल्ड सोबर्स म्हटला की देव असं वाटायचं.
त्यानंतर व्हीव्ह रिचर्डसचं एक युग आलं. आणि त्यानंतरचं युग तेंडुलकर आणि शेन वॉर्नचं. फलंदाजीसाठी सचिन तेंडुलकर आणि गोलंदाजीसाठी शेन वॉर्न.! आधीच्या युगात जास्त फलंदाज होते. गोलंदाज इतका मोठा झालेलं हे पाहिलं युग. . महान गोलंदाज झाले, पण असा जग व्यापणारा, एका अख्ख्या पिढीला वेड लावणारा असा गोलंदाज नव्हता आला. तो शेन वॉर्न होता.
ऑस्ट्रेलियासाठीसुद्धा तो गोलंदाजांमधला ब्रॅडमन होता. म्हणजे त्याच्यावेळेला मुरलीधरन होता. आणि मुरलीधरनने त्याच्यापेक्षा जास्त विकेट काढल्या. पण शेवटी मुरलीधरनच्या गोलंदाजीबद्दल संशय व्यक्त करण्यात आला होता. पण शेन वॉर्नबद्दल तसा कुठला ही वाद नव्हता. तो महान कर्णधार झाला असता पण त्याच्या इतर उद्योगामुळे त्याला कधी कर्णधार केलं गेलं नाही. पहिल्या आयपीएल मध्ये "लहान मुलांना" घेऊन तो राजस्थान साठी आयपीएल जिंकला.
दुर्दैवाची गोष्ट अशी होती की शेन वॉर्न हा अत्यंत वेगवान आयुष्य जगला. त्याला मद्य आवडायचं, मदनिका आवडायची, त्याला सिगारेट आवडायची, आणि त्याला सिगारेट एवढी आवडायची की मला आजही आठवंतय की, बऱ्याचवेळेला शारजामध्ये आणि इतर ठिकाणी पाहिलं की, ड्रीक्स इंटरव्हलला तो आतमध्ये यायचा आणि सिगारेट ओढायचा आणि मग मैदानात जायचा. अगदी 2019च्या वर्ल्डकपमध्येसुद्धा लॉर्डसच्या प्रेस बॉक्स च्या बाजूला खाली उतरायला एक जिना आहे. आतमध्ये सिगारेट ओढता येत नाही म्हणून तो त्या जिन्याच्या पायरीवर बसून सिगारेट ओढताना मी काही वेळा पाहिलेला आहे. तो वेगवान आयुष्यात वाहून गेला त्यामुळेच कदाचित हे घडलं असेल. शेन वॉर्नचा मृत्यू दाखवून गेला की, माणसाचं आयुष्य किती क्षणभंगूर असतं. एका क्षणी तुम्ही असता आणि दुसऱ्या क्षणी तुम्ही नाहीसे होता.
आपण नेहमीच सवयीने एखादा माणूस गेल्यावर असं म्हणतो की, पोकळी निर्माण झाली. पण ही अशी पोकळी आहे की जी कधी भरून येण्यासारखी नाही. हे जसं आपण लतादीदींच्या बाबतीत म्हणतो ना किंवा ब्रॅडमनच्या बाबतीत, तसं आपण शेन वॉर्नच्या बाबतीत म्हणू शकू. ती पोकळी कधीही भरून येणार नाही!