लैंगिक शिक्षण काळाची गरज
एकतर्फी प्रेमातील हल्ल्यात वाढ झाली आहे. वयाच्या या टप्प्यावर येणारे भावनिक चढ उतार कसे हाताळावे याबाबत भारतीय कुटुंबात आजही खुलेपणाने चर्चा होत नाही.अशा घटना घडल्या की समाज माध्यमांवर पोस्ट टाकणारे आपण या घटनांच्या खोलात जाणार आहोत का ? वाचा मॅक्सवुमनच्या संपादिका प्रियदर्शिनी हिंगे यांचा विचार करायला लावणारा लेख…
X
एकतर्फी प्रेमातील हल्ल्यात वाढ झाली आहे. वयाच्या या टप्प्यावर येणारे भावनिक चढ उतार कसे हाताळावे याबाबत भारतीय कुटुंबात आजही खुलेपणाने चर्चा होत नाही.अशा घटना घडल्या की समाज माध्यमांवर पोस्ट टाकणारे आपण या घटनांच्या खोलात जाणार आहोत का ? वाचा मॅक्सवुमनच्या संपादिका प्रियदर्शिनी हिंगे यांचा विचार करायला लावणारा लेख…
लैंगिक शिक्षणाची गरज किती आहे यावर चर्चा होते. पण हे द्यायचे कसे ?याबाबत अजूनही संभ्रम आहे. शिक्षकांनी मुलांना समजावुन सांगावे अशी पालकांची अपेक्षा असते. तर मुलांना हा विषय कसा समजून सांगावा या विषयी शिक्षकच संभ्रमात असतात. शिक्षकांना याबाबत तज्ज्ञांकडून सखोल प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या वयातील मुलांना त्यांच्या वयानुसार तसेच वेगवेगळ्या शैक्षणिक साधनांचा वापर करून ही माहिती देणे गरजेचे आहे. केवळ शारिरीक माहिती दिली म्हणजे झाले असा आपल्याकडे समज आहे. पण लैंगिक शिक्षणाला अनेक पदर आहेत. या वयात काही गैरसमज मनात घर करुन बसतात. ज्याचे घातक परिणाम पुढील आयुष्यावर होऊ शकतात. भारताला लैंगिक शिक्षणाचा समृद्ध वारसा आहे. या क्षेत्रात अनेक तज्ञांनी काम केलेले आहे. वात्सायन यांनी लिहिलेला कामसूत्र हा ग्रंथच आपल्याला खूप काही सांगुन जातो. १९२७ साली रघुनाथ धोंडो कर्व यांनी “समाजस्वास्थ” या मासिकाची सुरवात केली आणी या द्वारे संततीनियमनाच्या माहिती व प्रसारासह लैंगिक शिक्षणाची सुरवात केली. या मासिकात कर्वेनी कामशास्त्र, व्यायाम, वेश्यागमन,गुप्तरोग याबरोबरच समलिंगी संबंध यावर परखड भाष्य केले. समाजस्वास्थ म्हणजे केवळ लैंगिक शिक्षणाची सुरवात नाही तर या विषयाचा तो संदर्भ ग्रंथ अभ्यासक्रम आहे.असे मानले पाहिजे. लैंगिक शिक्षणा विषयी कर्वे सांगतात कि “मुलांना लैंगिक शिक्षण देण्याआधी ते पालकांना द्यावे.” १९२७ साली जी गोष्ट सांगितली गेली ती आजही २०२३ मध्येही लागु होते. यावरून आपल्या लक्षात येते की लैंगिक शिक्षण देण्यामध्ये आपण किती मागे आहोत. याचे परिणाम आपण सगळेच बघत आहोत. कर्वे नंतर शकुंतला परांजपे या त्यांच्या बहिणीने त्यांचा वारसा पुढे चालवला. पिरोज आनंदकर यांनी मुलींसाठी लेखन केले तर य.गो.नित्सुरे यांनी मुलांसाठी पुस्तक लिहिले. यानंतर विवाह जीवनावर पुस्तके येण्यास सुरवात झाली. तर काहींनी पुढे येऊन या विषयावर व्याख्याने देण्यास सुरवात केली. हा सर्व प्रवास बघितल्यावर आपल्या लक्षात येते की कमी अधिक प्रमाणात लैंगिक शिक्षण देण्यास सुरवात झाली होती मात्र त्याचा जोर हवा तसा तीव्र राहिला नाही. शालेय स्तरांवरही विविध प्रयोग होत राहिले. मात्र यात मुख्यत्वे करून प्रजनन शाखा व एच.आय.व्ही./एड्स यावर भर दिला गेला. त्याची परिणीती काय आहे ते आपण जाणतोच.१९८८ पासुन अभ्यासक्रमात शरीराच्या वाढीच्या प्रक्रियेचा अंतर्भाव करण्यात आला. नाही म्हणायला काही बिन शासकीय संस्थांनी काळाची पाउले ओळखून खरे लैंगिक शिक्षण देण्यास आप आपल्या परीने प्रयत्न केला. “जिज्ञासा,निकोपा, आभा” अशी काही उपक्रम अतिशय उपयोगी ठरले. काहींनी आरोग्या बाबत मुला -मुलींमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी वयात येणा-या मुला मुलींच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास मदत केली. असे असले तरही अजुनही आपल्या सर्वांना खुप लांबचा पल्ला गाठायचा आहे.
आपल्या सगळ्यात जास्त जवळच्या, हक्काच्या माणसांना 'मला आजकाल असं का होतंय?' हे विचारायचा मोकळेपणा, विश्वास आपल्या किशोरवयीन मुलाच्या मनात निर्माण करणं ही प्रत्येक कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.कुटुंब हे एक केंद्र स्थान आहे, ज्यातुन वेगवेगळ्या परिस्थितीला हाताळण्याचे बळ मिळते. म्हणूनच तर कुटुंब संस्था अजूनही तग धरून आहेत. काळाच्या ओघात या संस्थेतही काही बदल करणे गरजेचे आहे. जेव्हा मुलांना आपली गरज आहे, तेव्हा त्यांच्याशी मुक्त संवाद आई वडीलच नाही तर कुटुंबातील इतर सदस्यांनाही करता आला पाहिजे. हा संवाद एका दिवसात होणारा नसतो. मुल अगदी लहान असल्या पासुन या प्रक्रियेची सुरवात होते. पालकत्व आणि संवाद या दोन्हीही कौशल्याच्या गोष्टी आहेत. त्या आत्मसात करणे सहज शक्य आहे. आपल मुल हि काही आपली मालमत्ता नसते त्यांना गरज असेल तेंव्हा पालक म्हणून आपल्याला आधार देता आला पाहिजे. कधी तो भावनिक असेल, तर कधी तो आर्थिक असेल मात्र आधार देण्याची वेळ पालक म्हणून आपल्या लक्षात आली पाहिजे. वयात येताना मुलांची एकूण विचारप्रक्रिया विकसित होत असते. ठाम मतं तयार होत असतात तर दुसरीकडे हळूहळू होणारे शारीरिक बदल, घडामोडी गोंधळात टाकत असतात. या वयात असलेल्या मुलांना आपल्या शरीरात घडणार्या बदलांबाबत थोडीफार माहिती असली तरी या बदलांना, त्याबद्दलच्या उत्सुकतेला कसं सामोरं जावं याबाबत बर्याचदा खात्री नसते. या काळात काय काळजी घ्यावी, सावधगिरी बाळगावी, मित्रमैत्रिणींमध्ये निर्माण होणार्या आकर्षणाला नक्की कसं हाताळावं ? योग्य वेळी योग्य ते प्रश्न विचारणं, चर्चा करणं, मन मोकळं करणं याकरता जे अवकाश लागतं ते एक पालक म्हणून आपण कसं निर्माण करू शकतो? कसोटीच्या क्षणी मुलांना आपला आधार वाटावा म्हणून मुलांना मानसिक नैतिक बळ देणारा सुसंवाद कसा साधू शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तर आई वडिलांना माहिती असली पाहिजेत. हि माहिती योग्य वेळी योग्य वयात, योग्य स्वरूपात मुलांन पर्यंत पोहोचवता आली पाहिजे. मुले बोलतील न बोलतील मात्र त्यांच्या उत्सुकतेच शमण मात्र झाले पाहिजे. हि जबाबदारी कोणा एकाची नाही तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आहे.
जीवनशैली बदलते आहे त्याचप्रमाणे संस्कारांचे अर्थ आणि स्वरूपही. या बदलत्या संस्काराचे स्वरूप नीटसे स्पष्ट न समजल्यामुळे अनेक समस्याहि त्या बरोबर तयार होण्यास सुरवात झाली आहे. मुलामुलींचा मोकळेपणा वाढला. जवळीक वाढू लागू लागली आणि त्याबरोबरच लहान वयात लैंगिक आकर्षणही वाढले. सतत मारा होत असलेले सिनेमे सिरियल्स यात केले जाणारे बिभत्सचित्रण हे कमी होत कि काय? म्हणून त्यात इन्टरनेट सारख्या माध्यमांनी भर घातली. पूर्वी मुलं मुलींशी बोलायला लाजायची. काही वाटले तरी मनात; उघड नव्हे. कारण तेवढा मोकळेपणा नव्हता. मान्यता नव्हती. म्हणूनच सगळे सीमित होते. पर्यायाने दृश्य समस्याही कमी होत्या. आता मात्र या समस्यांनी गंभीर रूप घेतले आहे. शारीरिक त्याबरोबर मानसिक आरोग्यही लैंगिकजीवन शैलीशी संबंधित असतात. तसेच त्यासाठी हार्मोन्स बदलही कारणीभुत असतात. अनेकदा परस्परांतील आकर्षण हे शोषणच्या व पिळवणूकीचे कारण बनते. याबरोबरच व्यसने,किशोरवयीन लग्न,मुलींची फसवणूक,गर्भधारणा,टी.व्ही.संगणक,मोबाईल नेमका वापर व पौगंडावस्थेतील मुला-मुलींशी वागावे कसे ?अनेक प्रश्न तयार होण्या आधीच आपण थांबवु शकतो. मात्र त्यासाठी सर्वच अंगाने विचार तसेच सर्वच बाजुने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
जेंव्हा या युवा वर्गाशी तुम्ही बोलता तेव्हा लक्षात येते की त्यांना लैंगिक शिक्षणाचे योग्य ज्ञान नाही. बाल लैंगिक शोषण तर आता खुप मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. या सर्वांवर उपाय करायचा असेल तर लैंगिक शिक्षणाची गरज किती आहे हे न सांगता सहज समजते. लैंगिक शिक्षणासाठी केवळ विद्यार्थ्यांना तयार करुन उपयोग नाही तर शिक्षक त्याबरोबरच पालकांनाही याची माहिती असणे गरजेचे आहे. मात्र हे लैंगिक शिक्षण हे सर्व व्यापी असावे केवळ शरीरशास्त्र समजावुन घेऊन विविध प्रश्न सुटणार नाहीत. शारीरिक व सामाजिक असे दोन्हीही प्रकारचे प्रश्न सुटावे असे वाटत असेल तर मुळात लैंगिक शिक्षणात कुठल्या कुठल्या पदरांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. यांचा विचार होणे अतिशय आवश्यक आहे. आणि या सर्वाबरोबरच हि जबाबदारी केवळ शिक्षकांची नाही तर पालकांचीदेखील आहे. दोघांनीही जर आप आपल्या भुमिका योग्य पद्धतीने पार पाडल्या तर समोर येणारे चित्र हे निश्चितच आशादायी असेल.
प्रियदर्शिनी हिंगे
हे हि पहा...