सरकार मायबाप 'तमाशा' जिवंत कसा ठेवायचा ?
X
कोरोना महामारीमुळे लागलेला लॉकडाऊन अनेकांच्या जीवावर उठला आहे. लॉकडाऊननंतर नाका कामगारांपासून ते ज्येष्ठ कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. गावाकडे रात्रीचा चालणारा तमाशा लॉकडाऊनमुळे बंद झाला. आता अनलॉकमध्ये दिलेली वेळ ही लोककला असलेला तमाशा मारू लागली की काय असा प्रश्न तमाशा कलावंतांना पडू लागला आहे. खरंतर हाती रोजगार नसल्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. कलावंतांकडे सरकारचं दुर्लक्ष झालं आहे. सरकार अनेकांना मदत जाहीर करत असून तमाशा कलावंतांचा उल्लेख त्यांच्या पटलावर नाही. तमाशा कलावंतांला उभं करण्यासाठी सरकारने मदत जाहीर केली पाहिजे अन्यथा तमाशा कलावंतांसह महाराष्ट्राची लोककला असलेला पारंपरिक तमाशा ही संपेल अशी खंत ज्येष्ठ कलावंत दत्तोबा तीसंगीरकर यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्रालय तमाशा कलावंतांसाठी काही करत नाही असा आरोप या कलाकारांचा आहे. एखादा कलाकार जेंव्हा मृत्यू पावतो तेंव्हा केवळ त्याचा मृत्यू होत नाही तर त्याच्या कलेचा देखील मृत्यू होतो. या संकट काळात तमाशा कलावंत जगाला नाही तर त्याची कला देखील लुप्त होऊन जाईल. या संकटकाळात या कलेतून कलाकार दुसरीकडे वळतील. जो सांस्कृतिक वारसा म्हणून आपण उल्लेख करतो तो तमाशा येत्या काळात महाराष्ट्रातून नामशेष व्हायला वेळ लागणार नाही.