Home > मॅक्स ब्लॉग्ज > कॉम्रेड केतकर !

कॉम्रेड केतकर !

ज्येष्ठ संपादक आणि खासदार कुमार केतकर यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. प्रत्येकाच्या कुमार केतकर यांच्याबद्दलच्या आठवणी आहेत. श्रद्धा बेलसरे- खारकर यांना केतकर कॉम्रेड का वाटतात हे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये मांडले आहे

कॉम्रेड केतकर !
X

माझी आणि कुमार केतकरांची ओळख १९८० मध्ये झाली. त्यावेळी मी औरंगाबाद येथे राहत होते. माझी मैत्रीण सुमती लांडे हिच्याकडे ग्रंथालीचे श्रीरामपूर केंद्र होते. त्यावेळी विजय तेंडूलकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर संवादयात्रा निघणार होती. ग्रंथालीचे औरंगाबादचे काम माझ्याकडे आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात वाचनसंस्कृती जागवण्यासाठी अनेक सभा-संमेलने आयोजित केली जात होती. औरंगाबादच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण असावे याची चर्चा करण्यासाठी मी मुंबईला आले होते. दिनकर गांगल हे ग्रंथालीचे सर्व काम बघत होते. तेंव्हा ते महाराष्ट्र टाईम्सच्या रविवार पुरवणीचे संपादन करत. मी पुष्कळदा पुरवणीसाठी लिहित असल्यामुळे ते चांगल्या परिचयाचे झाले होते. दिनकर गांगल, अरुण साधू व कुमार केतकर हे तीन तरुण पत्रकार तेंव्हा मराठी वाचकांनी पुस्तके विकत घेऊन वाचली पाहिजेत, नव्या लेखकांनी लिहिले पाहिजे ही भूमिका ग्रंथालीचळवळीमार्फत महाराष्ट्रात रुजवत होते.

प्रमुख पाहुण्यांच्या नावाविषयी मी गांगलांना विचारले त्यावर ते म्हणाले, 'तू कुमार केतकरांकडे जा. ते याच इमारतीत वरच्या मजल्यावर बसतात. मी इकॉनॉमिक टाईम्सच्या ऑफिसमध्ये गेले. एक तरुण हसतहसत समोर आला आणि म्हणाला, "हं बोल. मी कुमार." म्हणजे गांगलांनी आधीच त्यांना मी येणार असल्याचे सांगितले होते तर! लख्ख गोरा वर्ण, दाट केस असलेल्या त्या तरुणाने लालभडक रंगाचा शर्ट घातला होता. तो लालभडक रंग माझ्या डोळ्यात खुपू लागला. हा असा रंग त्यांनी का निवडला असावा हा प्रश्न मनात तरळून गेला. पण पुढच्या सगळ्या संवादानंतर त्यांच्या विचाराची माझ्यावर इतकी छाप पडली की मी तो विचित्र भडक रंग पार विसरून गेले.

"तुला प्रमुख पाहुणे म्हणून कोण हवे आहे?" त्यांनी विचारले. "जयंत नारळीकर." मी म्हणाले.
"अरे वा!" त्यांनी चक्क टाळी दिली!
"पण नारळीकरच का?" "कारण त्यांनी सामान्य लोकांना विज्ञानकथा वाचण्याची गोडी लावली आहे. केवढे मोठे काम आहे त्यांचे." असे बरेच काहीबाही मी बोलले.
"मग तू जा त्यांना भेटायला. मी त्यांना फोन करतो."
"मी एकटी जावू?" मी गोंधळले.
"अर्थात एकटीच जा. अग, मुंबईत बघ. मुली कशा निर्भयपणे फिरतात, धीटपणे वागतात. तुलाही ते शिकायला नको का?"

त्यांनी मला कुठून बस घ्यायची, कसे जायचे ते सगळे समजावून सांगितले. मग मी शोधतशोधत गेले. नारळीकरांना भेटून आले. मी परतले ते त्यांचा होकार घेऊनच याचे केतकरांना कौतुक वाटले.

एकदा इंदिरा गांधीच्या निधनानंतर जी निवडणूक झाली त्याची पूर्वपाहणी करण्यासाठी केतकर आणि अरुण साधू राज्यभर दौरा करत होते. ते औरंगाबादला आले तेंव्हा माझ्या घरीही आले होते. आमच्या स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील लोकांशी त्यांनी सहज बातचीत केली. अगदी घरगुती बायकांची मतेही जाणून घेतली. इंदिरांजींच्या मृत्युपूर्वी त्यांच्या शिवाजी पार्कला झालेल्या विशाल सभेचा विषय गप्पात निघाला. मी विचारले, 'तुम्ही इतके मोठे पत्रकार आहात, म्हणजे तुम्हाला पहिल्या ओळीत बसायला मिळाले असेल ना?' त्यावर ते दोघेही हसले म्हणाले, 'बातमी लिहायची असेल तर लोकात मिसळावे लागते. आम्ही दोघे गर्दीत, शेवटच्या रांगेत उभे होतो.

राज्यभर फिरून आल्यावर 'आता राजीव गांधीना मते मिळतील ती 'मॅटर्नल' असतील' अशा आशयाची बातमी त्यांनी दिली. पुढे कित्येक वर्षे तीच लाईन अनेकांकडून राजकीय पृथ:करणात वापरली गेली. ती बातमी लिहिली जात होती त्याला मी एक साक्षीदार होते याचेच त्यावेळी मला अप्रूप वाटून गेले.

मी धुळ्याला असताना काही कामासाठी त्यांना भेटायला गेले होते. 'अग तू धुळ्याला असतेस ना? मला एक निमंत्रण आहे धुळ्याचे, येऊ का?' पुढच्याच आठवड्यात ते धुळ्याला आले. तेही रेल्वेच्या सेकंद क्लासने! दिवसभर कार्यक्रम झाले. 'रात्री घरी जेवायला येणार ना?' मी विचारले. जेवणासाठी मी कांद्याचे थालीपीठ केले होते. 'अग, मी दुपारी फार जेवलो आहे. आता भूक नाही.' ते म्हणाले. 'तू थालीपीठ केले आहेस ते मला बांधून दे, रात्री उशिरा खाईन.' मी थालीपीठ बांधून दिले.

स्टेशनवर जायचे होते, माझी सरकारी जीप होती. ते म्हणाले, 'तू समोर बस, मी मागे बसतो.' 'नाही नाही, संपादकसाहेब, तुम्ही पुढे बसा.' मी खूप आग्रह केला. महाराष्ट्र टाईम्सचे संपादक असणा-या केतकरांचा साधेपणा मला फार भावला. एक छोटीशी बॅग खांद्याला लावून ते आले होते. मी संपादक आहे, माझी बगॅ कुणी उचलेल असा विचारही त्यांच्या मनात आला नाही. म्हणजे खरे तर कधी येतच नाही.

जागतिकीकरण आणि त्यामुळे बदलणारे नातेसंबंध हा त्यांच्या चिंतनाचा आणि निरीक्षणाचा विषय आहे. 'बदलत्या विश्वाचे अंतरंग' या विषयावरील त्यांची लेखमाला फार गाजली होती. आजही ती वाचकांच्या स्मरणात आहे. अलीकडच्या कुटुंबातील वाढत्या कलहाची कारणमीमांसा करताना ते म्हणतात – 'हातात मोबाईल आल्याने वादाला लगेच तोंड फुटते. हा तंत्रज्ञानाचा नकारात्मक प्रभाव आहे. काही वर्षापूर्वी कधी कुणाशी मतभेद झाले तर मी विचार करायचो कि घरी गेल्यावर फोन करू. व्हीटी ते ठाणे प्रवासात एक तास जायचा. घरी गेल्यावर आठवण राहिली तर फोन व्हायचा नाही तर नकळत कधी विसरूनही जायचो. आता तसे होत नाही. रागाचे प्रकटीकरण लगेच होते, मग दोघांचा इगो आड येतो, समोरच्याचे पटले तरी नंतर भूमिका बदलता येत नाही. आणि संबंध दुरावतात.'

हल्ली फारशी भेट होत नाही. देश-विदेशात त्यांचे दौरे चाललेले असतात. आता तर ते खासदारही झाले आहेत. पण जेंव्हा भेट होते त्यावेळी मैत्रीचा जिव्हाळा पूर्वीसारखाच कायम आहे हे जाणवते. माझी ओळख झाली त्यावेळी ते 'इकॉनॉमिक टाईम्स'चे रिपोर्टर होते. पुढे महाराष्ट्र टाईम्सचे संपादक झाले, नंतर लोकमत, लोकसत्ताचे संपादक आणि आता तर खासदार झाले पण त्यांचे वागणे बदलले नाही. मित्रांची खबरबात ठेवतात. मी मंत्रालयात असताना ते कधीही आले तर मला आवर्जून भेटत असत. माझ्या खोलीत येऊन चौकशी करत. आमच्या 'जय महाराष्ट्र' या दूरदर्शनवरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत घ्यायला आम्ही हक्काने त्यांना बोलावत असू तेही येत.

आजही भेटल्यावर 'चल, आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी जेवायला जावू.' असे म्हणून ते मित्रांना जेवायला नेतात. त्यांना डाळ डिशमध्ये वाढलेली आवडत नाही. मग वाटीची आठवण देणारा बाउल ते मागवतात. बरोबरचे सगळे जेवत असतात आणि कुमार केतकर हातात चमचा धरून कुठल्या तरी विषयावर पोटतिडीकेने बोलत असतात! आमच्या खात्यात माहिती अधिकार्यांची भरती करताना संचालक म्हणून मी इंटरव्ह्यू पॅनलमध्ये असायची. लेखी आणि तोंडी परिक्षेत आम्ही 'आपले आवडते पत्रकार कोण?' असा प्रश्न टाकला होता. त्यावर सर्वांनी 'कुमार केतकर!' हे उत्तर दिले होते.

मी कामामुळे देशातील त्यावेळच्या अनेक नामवंत पत्रकारांना भेटले. त्यांचे लिखाण वाचले, भाषणे ऐकली. परंतु कार्ल मार्क्स ते रिबेका मार्कपर्यंत कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने अभ्यासपूर्ण बोलू आणि लिहू शकणारे हे एकमेव पत्रकार आहेत असे माझे ठाम मत आहे. असा हा बुद्धिमान, चिरतरुण, पद्मश्री खासदार माझा मित्र आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या पहिल्या भेटीतला तो लाल शर्ट मी अजूनही विसरले नाही. त्यामुळे मी आजही त्यांना 'कॉम्रेड केतकर' असेच म्हणते.

Updated : 23 Jan 2021 1:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top