Home > मॅक्स ब्लॉग्ज > एका विद्यापीठाचा अमृतमहोत्सव !

एका विद्यापीठाचा अमृतमहोत्सव !

ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक कुमार केतकर यांचा ७५ वा वाढदिवस साजरा होतोय. कुमार केतकर ही केवळ एक व्यक्ती नाही तर विद्यापीठ आहे. कुमार केतकर सरांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, पत्रकार मनोज गडनीस यांनी....

एका विद्यापीठाचा अमृतमहोत्सव !
X

आपणच स्वतःला भाग्यवान वाटावे, अशा काही मोजक्याच घटना असतात. अशा घटनांच्या माझ्या यादीत एक घटना चिरंतन आहे ती म्हणजे कुमार केतकर नावाची व्यक्ती माझ्या आयुष्यात येणे. सुरुवातीला ही व्यक्ती पत्रकारितेच्या कॉलेजमधील एक प्राध्यापक या रुपाने, मग माझे बॉस म्हणून आली अन् कालौघात, या व्यक्तीच्या प्रज्ञेने माझ्या आवाक्याच्या अवकाशाचा परिघ विस्तारला आणि त्यांच्या प्रभेने माझ्याही कुतुहलाला नवे कोंदण दिले आहे.

विद्वान, व्यासंगी, साक्षेपी संपादक कुमार केतकर यांचा आज ७५ वा वाढदिवस. म्हणून खरंतर त्यांच्याबद्दल मनापासून लिहावेसे वाटले. पत्रकारितेच्या निमित्ताने ज्या थोड्या लोकांच्या प्रभावाने माझ्या मनाचे अवकाश आजही व्यापून राहिलेले आहे अशा व्यक्तींच्या यादीमध्ये केतकर सरांचे नाव अग्रक्रमावर आहे.

पत्रकारितेचा विद्यार्थी असताना, केतकर सरांचे लेक्चर होणार, याचे आकर्षण मला होते. ते लेक्चर झाल्यापासून, ते प्रत्यक्ष त्यांच्यासोबत 'लोकमत', 'लोकसत्ता' अशा ठिकाणी काम करायला मिळालेली संधी ते आज खासदार झाल्यानंतर त्यांच्या व्यस्ततेमुळे होणारा तुरळक संवाद हा आजही भारून टाकणारा असतो. प्रत्येक भेटीत, प्रत्येक संवादात त्यांच्याकडून मिळणारी नवी माहिती, किंवा आपण त्यांच्यासोबत शेअर केलेल्या माहितीला त्यांच्याकडून मिळणारे जागतिक संदर्भ, त्या अनुषंगाने येणारी पुस्तके, सिनेमे असं सार काही तुमच्या प्रगल्भतेवर नवे पैलू पाडते. हा केवळ माझाच अनुभव नसून त्यांच्या संपर्कात आलेल्या, त्यांच्या चाहत्यांचा आणि विरोधक अशा दोघांचाही अनुभव आहे, याची मला खात्री आहे.

खरंतर, २००१ च्या दरम्यान अत्यंत अल्पकालावधीसाठी केतकर सर 'लोकमत'चे समुह संपादक होते. तेव्हा त्यांच्यासोबत जेमतेम काही महिने काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते लगेचच 'लोकसत्ता'मध्ये मुख्य संपादक म्हणून रुजू झालो. तोवर 'सकाळ' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' असा प्रवास करून मी 'लोकसत्ता'मध्ये रिपोर्टर म्हणून रुजू झालो. २००४ ते २००६ अशी दोन वर्षे मी तिथे होतो. या दोन वर्षांत केतकर सरांसोबत अत्यंत जवळून असा संपर्क आला. जवळपास आठवड्यातून दोन ते तीनवेळा त्यांना शहरात होणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण असे. योग असा होता की, त्या दोन वर्षांत केतकर सर प्रमुख पाहुणे असलेले बहुतांश कार्यक्रम कव्हर करण्यासाठी रिपोर्टर म्हणून मला असाईनमेंट मिळायची. संपादक प्रमुख पाहुणा म्हणून बोलावला, की वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळेल, असा काहीसा खोड्याळ सूर लावला जाण्याच्या त्या काळात, मला जाणवलेले सर्वात प्रमुख वैशिष्ट म्हणजे, ज्या ज्या कार्यक्रमांना मला जाण्याची संधी मिळाली, ते सारेच कार्यक्रम शहरातील त्या दिवसाच्या प्रमुख कार्यक्रमांपैकी एक असत. त्यामुळे तिथे केवळ लोकसत्तेचा प्रतिनिधी नव्हे तर तेव्हा कार्यरत असलेल्या सर्वच मीडियाचे प्रतिनिधी तिथे उपस्थित असत. या निमित्ताने मला अनेक दर्जेदार पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम कव्हर करताना लेखकांसोबत परिचय अशी श्रीमंत वाढ झाली. अमेरिकन सोसायटीमध्ये, मुंबईत वास्तव्यास असलेल्या अमेरिकी लोकांनी अमेरिकी निवडणुकांबद्दल आयोजित केलेले केतकर सरांचे भाषण, पं. बिर्जू महाराजांसारख्या अभिजात शास्त्रीय नर्तकाने विविध रागांच्या संगमावर बांधलेले नृत्य आणि शास्त्रीय नृत्यावर त्यांचे विवेचन असे काही उत्तुंग ऐकता आले.

या निमित्ताने आठवलेली गोष्ट म्हणजे, लोकसत्तेत असताना एकदा नाईट शिफ्ट होती. वर्तमानपत्रातली नाईट शिफ्ट म्हणजे साधारणपणे संध्याकाळी सहा ते रात्री ११.३० अशी. दुपारी घरीच होतो. तेव्हा केतकर सरांचा मोबाईलवर फोन आला आणि विचारले की कुठे आहेस. मी नाईट आहे, घरी आहे सांगितले, मला म्हणाले की चारपर्यंत ट्रायडंट हॉटेलला पोहोच. तिथे अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांचे भाषण आहे. लगबगीने आवरून मी तिथे पोहोचलो. मी पोहोचलो, तेव्हा नुकतेच भाषण सुरू झाले होते. तेवढ्यात यांनी एसएमएस करून मी पोहोचलो की नाही याची खात्री करून घेतली. कार्यक्रम संपला आणि स्टेजवरून खाली येत डॉ. विजय केळकर यांनी, 'कुमार कसे झाले भाषण', असे स्वतःच विचारत त्यांच्याशी हस्तांदोलन केले. तोवर मी पुढपर्यंत तिथे पोहोचलो. सरांनी, विजय केळकर यांच्याशी माझा परिचय करून दिला आणि चहासाठी पांगापांग झाल्यावर, माझ्या हातात दोन कागदं दिली. मला म्हणाले, मीच बातमी लिहिली आहे. बघ, योग्य वाटतेय का, वाटले तर काही बदल कर आणि देऊन टाक ! बिनाखाडाखोडीचे आणि एकटाकी बातमी लिहिली तरी कधी, मी आश्चर्याने विचारले तर ते म्हणाले, आत्ताच विजय केळकर यांचे भाषण संपले आणि पुढच्या वक्त्याचे भाषण सुरू होते तेव्हा !, मला थक्क व्हायला झाले.

आता गोष्टच आठवली तर आणखी एक गोष्ट आवर्जून नमूद करायला आवडेल, म्हटल तर खाजगी गोष्ट आहे. पण मुद्दाम शेअर करतोय. माझे लग्न ठरले तेव्हा मी लोकसत्तेतच होतो. त्यावेळी काही सहकारी मित्रांसोबत बॅचरल पार्टी करायचे ठरले. मित्रवर्य, पत्रकार योगेश मेहेंदळे याचा जानी दोस्त अनुभव मांजरेकर याच्या बदलापूरमधील फार्म हाऊसवर पार्टी ठरली. अनुभव केतकरांचा फॅन. त्याने केतकर येणार म्हणून फार्म हाऊसलाच लायटिंग केले. बदलापूरला कोण कसे तिथे पोहोचणार, याचे नियोजन सुरू असताना, केतकर मला म्हणाले की, मी ट्रेनने बदलापूरला येईन. तू मित्राचा नंबर देऊन ठेव. मी अनुभवचा नंबर देताना, अनुभवला असलेली शेतीची आवड आणि तो करत असलेले शेतीचे प्रयोग याची माहितीही सहजच केतकरांना दिली. त्यांनी त्यांच्या फोनमध्ये शेतकरी या नावाने अनुभवचा नंबर स्टोअर केला. पार्टी झाली. मजा आली, आणि काही महिन्यांनी अनुभवचा मला फोन आला आणि म्हणाला, इस्रायलमधे कृषीविषयक मोठे प्रदर्शन आहे. मला जायचे आहे. काही मदत होऊ शकते का. मदतीचे स्वरूप आर्थिक नव्हते तर संपर्क, माहिती अशा स्वरूपाचे असावे. मी म्हणालो तू केतकरांन फोन कर. अनुभव म्हणाला पण मी आता त्यांच्या लक्षात असेन का. म्हटलं तू फोन तर कर. त्याने फोन केला आणि सरांनी जणू कालच पार्टी संपल्याप्रमाणे, आज त्याचा फोन आला, अशा ओळखीने गप्पा सुरू केल्या. त्याला यथावकाश मदतही केली आणि एवढेच नव्हे तर तो इस्त्रायलला जाऊन आल्यावर लोकसत्तेत, ते प्रदर्शन आणि कृषीविषयक तंत्रज्ञान यावर लेख लिहिण्यासाठी देखील प्रवृत्त केले.

अशीच एक गोष्ट, माझ्या पहिल्या परदेश दौऱ्याची. २००५ मधे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत जगातील सर्वात मोठ्या प्रदर्शानाचे निमंत्रण मला आले. होते तैवानला. प्रथेप्रमाणे ते मी संपादक म्हणून केतकरांपुढे ठेवले. मला म्हणाले, जर तैवानचा व्हीसा मिळत असेल तर नक्की जा, थोडी कटकट होते व्हीसाची. पण झाला व्हीसा. अन् ते मी केतकरांना कळवले त्यावेळी ते हैदराबाद येथे होते. तो दौरा तसा आरामदायी म्हणजे आठ दिवसांचा होता. मी केतकरांना हे कळवले तेव्हा म्हणाले की, आता एक काम कर. त्या प्रदर्शनाच्या बातम्या वगैरे पाठवायचा फार ताण घेऊ नको. त्यापेक्षा तो देश जितका फिरता येईल तितका फिरून घे. मी तिथे जाऊन आलो. आठ दिवसांत दीडवेळा तरी तो देश फिरून होईल. आलास की, ते प्रदर्शन, आणि देश अशा दोन्हीवर लेख लिही. बातमीचा ताण नष्ट झाल्यामुळे मनसोक्त तैवान फिरलो. मुद्दा मी तैवानचे पर्यटन करण्याचा नव्हता, तर त्यामुळे नवा देश, नवी संस्कृती, तिथली स्थित्यंतर उमजून, पत्रकार म्हणून माझा विकास कसा होईल, असा विचार यामागे होते. अर्थात, असा अनुभव केवळ माझाच नाही तर, त्यांनी संपादक असताना ज्यांना ज्यांना परदेश दौऱ्यावर पाठवले, त्यावेळी त्या दौऱ्याच्या स्वरुपानुसार त्यांनीही असाच अनुभव घेतला आहे.

केतकरांवर काही लिहावे आणि त्यात राजकारणाचा संदर्भ असू नये, असे झाले तर ते लेखन अपुरे ठरेल, असे जर वाटत असेल तर तो भ्रम आहे. कारण मला राजकारणावर बोलणारे केतकर जितके माहिती आहेत. पण इथे आवर्जून नमूद करायचा मुद्दा असा की, टिकाकार किंवा ट्रोलर्स आज त्यांच्याबद्दल काहीही बोलोत, लिहोत, पण केतकरांना मी कधीही अशा लोकांना प्रत्यृत्तर देताना पाहिलेले नाही. वैचारिक भूमिकेला वैचारिक विरोध करतील, पण ज्या अर्वाच्य अन् गलिच्छ भाषेत लोक त्यांच्या विषयी लिहीतात, त्यांना ते फार रॉयली इन्गोर करतात. मला जे केतकर माहिती आहेत ते राजकारण या विषयाच्या पल्याड, साहित्य,अभिजात कला, विज्ञान, यात प्रचंड रुची असणारे आणि भरभरून लेखन करणारे केतकरही ठावूक आहेत. ठावूक नव्हे ते मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. जागतिक पातळीवर ज्या ज्यावेळी विज्ञानात काही नवे प्रयोग झाले, तेव्हा तेव्हा केतकरांनी त्यावर भरभरून लिहिलेले आहे, 'विश्वामित्राचे जग', हे विज्ञान लेखनावरचा एक उत्कट नमुना आहे. तर, त्याचवेळी त्यांच्या संपर्कात आलेली अथवा न आलेली, परंतु आपल्या कर्तुत्वाने सामाजिक उत्क्रांतीवर आपल्या पाऊलखुणा उमटविलेल्या लोकांच्या मृत्यपश्चात त्यांच्यावर लिहिलेले मृत्यूलेख अतिशय भावस्पर्शी आहेत. 'ओसरलेली वादळं', या नावाने हे संकलित लेख पुस्तक रुपाने वाचायला उपलब्ध आहेत.

केतकरांच्या सानिध्यात तुम्ही आलात की, मग एक व्यक्ती एवढी मर्यादीत नोंद त्यांच्या मनात होत नाही तर, तुमचे व्यक्तीमत्व, तुमच्या आवडी-निवडी, छंद, तुमच्या सामाजिक संवदेना, राजकीय भूमिक या साऱ्याची नोंद त्यांच्या मनात होते. अन् मग,खरे केतकर तुम्हाला तिथे भेटतात. ते असे की, जगभरात भ्रमंती करताना मग एखादे तुमच्या आवडीचे पुस्तक त्यांच्या नजरेस पडले की, ते तुमच्यासाठी घेऊन ठेवतात. भारतात आले की तेच फोन करून तुम्हाला ते पुस्तक आणल्याचे आवर्जून कळवतात. मग, तुम्ही जरी त्यांच्या संपर्कात दोन-तीन वर्षे नसलात तरी काही बिघडत नाही. किंवा, तुमच्या आवडीच्या विषयातील एखादा कार्यक्रम असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तर ते तुम्हाला आवर्जून त्याबद्दल माहिती कळवतात. विज्ञान, तंत्रज्ञान या विषयातील माझी आवड ठावूक असल्याने केतकरांनी एका कार्यक्रमात चक्क मला नोबेल विजेते गणितज्ज्ञ सर जॉन नॅश यांनाही भेटवले आहे. त्याच दरम्यान सर जॉन नॅश यांच्या जीवनावर आधारित द ब्यूटिफूल माईंड या सिनेमाचे गारुड मनावर कायम असताना, चक्क त्यांनाच भेटायची संधी मिळाल्याने मी अत्यंत भारावून गेलो. किंवा सॅम पित्रोडा मुंबईत आल्यावर होणाऱ्या कार्यक्रमांच्या निमंत्रित यादीत मी असतोच, हे एखाद्या सन्मानापेक्षा कमी नाही.

संपादक केतकर यांच्या काळात मटा असेल वा लोकसत्ता, यात व्यावसायिक वाढ झाली किंवा कसे, याचे विश्लेषण त्या त्या क्षेत्रातील मंडळी करतील. पण त्याकाळात समाजमनाच्या उत्क्रांतीचा एक टप्पा पुढे नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे, हे नाकारणे खुजेपणाचे ठरेल. मटा, लोकसत्तेच्या पुरवण्यांतून, ओपेड पानांतून त्यांनी अनेक नवे लेखक पुढे आणले. अनेक विषय मांडले. पहिल्या बाजू इतकीच दुसऱ्या बाजूलाही ठळक प्रसिद्धी दिली. चर्चा, वाद यातून घुसळण करत नव्या विचारांच्या रुजवातीसाठी वाचकांना प्रवृत्त केले. किमान एवढ्या बाबीचा जरी बारकाईने विचार केला तर, त्यांचा लोकसंग्रह आणि विविध विषयांबद्दल त्यांना असलेली रुची, याचा अंदाज येऊ शकेल.

...अन्यथा, पत्रकार म्हणून माझा विकास कदाचित साचेबद्ध झाला असता. मात्र, नेमका हाच साचेभेद केतकरांमुळे झाला अन् प्रगल्भता नावाच्या गुणाच्या वाढीसाठी आवश्यक अशा कुतुहल नावाच्या घटकाचा प्रवास त्यांच्यामुळे सुरू झाला आणि जो आता चिरंतन आहे.

अफाट स्मरणशक्ती, थक्क करणारी विद्वत्ता, अन् समोरच्या व्यक्तीच्या मेंदूत न सामावणारा व्यासंगी आवाका, याचे दृष्य स्वरूप म्हणजे केतकर. अशा बहुआयामी व्यक्ती जेव्हा तुमच्या आयुष्यात येतात, तेव्हा त्या केवळ एक व्यक्ती म्हणून तुमच्या आयुष्यात मर्यादीत राहात नाहीत तर, त्यांचे स्थान एखाद्या ज्ञानसंचित विद्यापीठा इतके विस्तीर्ण होते आणि अशा विद्यापीठात प्रत्यक्ष शिकण्याची संधी मला मिळाली आहे.

केतकर, तुम्हाला ते आवडोत किंवा नावडोत, पण एकदा ते तुमच्या आयुष्यात आले किंवा त्यांचा विषय जरी निघाला तरी ते तुमच्यासोबत राहतात !

केतकर सरांना ७५ व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

- मनोज गडनीस

(या पोस्टमध्ये, वाचकांना कदाचित 'मी'पणा जास्त जाणवेल. पण त्या 'मी'चे स्वरूप हे त्यावेळी घडलेल्या घटनांचा साक्षीदार एवढ्याच पुरतेच मर्यादीत आहे. मुद्दा हा त्या त्यावेळी मला दिसलेले केतकर हा आहे, हे सुज्ञांना सांगणे नको. या लेखावर काही अनुचित टिपण्णी देखील होईल, याचीही मला कल्पना आहे. पण तशी जो तो आपल्या अनुभवानुसार अन् वबुकानुसार टिप्पणी करतो, अशी माझी धारणा असल्याने आजतरी प्रत्युत्तर देण्याची भावना मनात नाही.)

Updated : 7 Jan 2021 9:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top