Science Day: हातात माळा घेऊन हिंडणारे दाढीवाले…
विज्ञान म्हणजे नक्की काय? वैज्ञानिक दृष्टिकोनातील अडथळे कोणते? वाचा विज्ञान दिनानामित्त डाॅ प्रदीप पाटील यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जागवणारा लेख
X
विज्ञान मला खूप उशीरा भेटलं.. मी विज्ञान शाखेत शिकत असताना विज्ञान शिकलोच नव्हतो! प्रयोग आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलाॅजी..एवढंच शिकलो. विज्ञानाचा गाभा शिकलोच नव्हतो.
प्रश्न उपस्थित करायचे..करत रहायचे..उत्तरं शोधण्यासाठी खोल बुडी मारायची..याची देही याची गात्रं सत्य पाहायचं अन् अनुभवायचं.. हे विज्ञानाच्या गर्भात दडलेलं महासत्य समजायला खूप काही करावं लागलं.
देवा-धर्माचं जोखड मानेवर होतं ते भिरकावून द्यावं लागलं. हे दोघं मिळून मला त्याच त्याच विचारांच्या रिंगणात घुमवत होते. अंतिम सत्य म्हणजे फक्त देवाचे दर्शन या पलिकडे काही नव्हतंच!
विज्ञानाचे दरवाजे जसजसे खुलत गेले तेव्हा कळलं की अंतिम सत्य अजुनही कुणाच्या बापालाही कळलेलं नाहीयं. हातात माळा घेऊन हिंडणारे दाढीवाले हे विज्ञानाचे दरवाजेच बंद करणारी लबाडी करत हिंडताहेत हे विज्ञानाचे किलकिले करत उघडत जात असणाऱ्यांनी दरवाज्यांनी सांगितलं. सालं विज्ञान शिकून देखील विज्ञानाची समज येत नाही हे खरंय.
त्यासाठी काय करायचं हे विज्ञानानेच शिकवलं....
प्रयोग कर..प्रत्येक प्रश्नाला जाऊन भिड... प्रश्नांचा भडिमार कर.. अचूक उत्तर मिळेस्तोवर सारं खरवडून काढ! मी फक्त प्रयोगशाळेतच खरवडायचो. तिथून बाहेर पडल्यावर प्रश्न बंद..चिकित्सा बंद..डोकं धर्माच्या घाण्यावर नाहितर कोणा मठ्ठाच्या पायावर.
ही आपली संस्कृती नव्हे असं विज्ञान शांतपणे म्हणत होतं. आपली संस्कृती वैज्ञानिक दृष्टिकोनाची. सत्य आणि सारासार विचार जन्माला घालणाऱ्या वैज्ञानिक वृत्तीची. इतिहासाच्या थडग्यात निर्बुद्धांची प्रेतं संपून गेलेली असतात. ती उकरत रहाणं हे काम लबाडांचं असतं. विज्ञानाचं नव्हे!!
आपलं काम वर्तमानातलं. आत्ता इथं मी कसं जगायचं हे शिकवणारं ! इथंच मी विवेक जागवत मरणार हा धीटपणा मुरवणारं!! विज्ञान जन्माला घालतं वैज्ञानिक दृष्टिकोनाला. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसवतं विवेकाला. किती सुंदर प्रसुती आहे ही? निसर्गाच्या कुशीतली. प्रत्येक मानव बाळाला भेट मिळालेली.
हीच नैसर्गिक प्रकृती प्रत्येकाच्या ठायी ठायी असते. पण भक्ती आणि श्रद्धा नावाची हत्यारं विवेकाची आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची नाळ कापून टाकतात. विज्ञानाच्या नैसर्गिक विश्वातून अध्यात्म नावाच्या निबिड जंगलात घेऊन जातात. बुद्धीचे लचके तोडतात..कुठल्यातरी अज्ञात शक्तीची भूल आणि भीती घालून जिवंतपणी गुलाम आणि मुडदे घडवतात!
कोणत्याही प्रश्नाला विज्ञानाचे थेट भिडणे मला मोहित करते. निर्भय बनविते. खरं काय हे शोधताना समाधान प्रदान करते. आणि सत्य कळल्यावर शांती!! वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मायबाप असणाऱ्या विज्ञानाने सारा आसमंत सुखसुविधांनी उधळून टाकलाय..कल्पनेतलं वास्तवात उतरवलंय! विज्ञानाचा वापर लबाड लांडग्यांनी धर्मा-देवाच्या आणि स्वतःच्या फायद्यासाठी करत युद्धं घडवली. यांनी विवेक गमावला कारण वैज्ञानिक दृष्टिकोन गाडला म्हणून! आयुष्याच्या कानाकोपर्यात विज्ञान विसावलेय तरीही भस्म लेपणारं टाळकं देवाची देणगी म्हणत टाळ कुटत बसले आहेत.
त्याची खंत विज्ञान बाळगत नाही. ते देत राहिलयं..विश्वातल्या जीवांना आणि चराचराला! दातृत्व शिकावं ते विज्ञानाकडूनच. विवेक मिळवावा तो विज्ञानाकडूनच. आयुष्य सुरळीत व्यतीत करावं ते विज्ञानाकडूनच. मी ते करत आलोय. विज्ञान माझा धर्म नाही. ते माझं अवजार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ही माझी वृत्ती आहे. विवेक माझं जगणं आहे. विज्ञान साजरं अशानेच होईल.
- डाॅ. प्रदीप पाटील