साने गुरुजी १२५ अभियान कोकण यात्रा
साने गुरुजी १२५ अभियान कोकण यात्रा
X
साने गुरुजींच्या शतकोत्तर जयंती वर्षानिमित्ताने साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या पुढाकाराने साने गुरुजी १२५ अभियान गेले वर्षभर राबविले जात आहे. महाराष्ट्रातील ८० हून अधिक संस्था संघटनांचा या अभियानात सक्रीय सहभाग आहे. या अभियानाचा एक उपक्रम म्हणून साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने 'साने गुरुजी १२५ अभियान कोकण यात्रा' आयोजित करण्यात आली आहे.
ही पाच दिवसीय यात्रा दि. २५ ते २९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर येथून ही यात्रा निघाली आहे. समता भूमी, चवदार तळे महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करुन २५ नोव्हेंबर २०२४ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्वर, देवरुख येथे ही यात्रा पोहोचली.
साने गुरुजी १२५ अभियान कोकण यात्रेचा पहिला टप्पा चिपळूण एज्युकेशन ट्रस्टचे महाराष्ट्र हायस्कूल चिपळूण येथे २५ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू झाला. आंतरभारतीचे स्वप्न पाहिलेल्या साने गुरुजींचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आयोजित या कोकण यात्रेची सुरवात उर्दु माध्यमाच्या शाळेतून होणे हे औचित्यपूर्णच! चिपळूण एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन अब्दुल रऊफअली वांगडे यांच्या सौजन्याने हे शक्य झाले.
चिपळूणमधीलच डी. बी. जे. महाविद्यालयात यात्रा पोहोचली. डॉ. जी. बी. राजे यांनी आयोजनात महत्वाची भूमिका निभावली. चिपळूण येथील विद्यार्थ्यांच्या सोबत साने गुरुजींच्या विचारांचा जागर करण्यात आला. आणि मग चिपळूनहून ही यात्रा निघाली संगमेश्वरच्या दिशेने. सुषमा इंदुलकर, सावित्री होमकळस, विनायक होमकळस हे चिपळूणमधील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील जेष्ठ कार्यकर्ते चिपळूणमधील कार्यक्रमांना उपस्थित होते.
नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी संगमेश्वर येथील कॉलेज ऑफ नर्सिंग येथे यात्रेचे स्वागत केले. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातून नर्सिंग शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत साने गुरुजींचे विचार या यात्रेच्या माध्यमातून पोहोचवण्यात आले.
संगमेश्वर येथील बुरंबी या गावातील दादासाहेब सरफरे विद्यालयात ही यात्रा पोहोचली. खेड्यापाड्यातून आलेले विद्यार्थी त्यांच्या परतीच्या एसटीची वेळ असूनही मन लावून ऐकत होते. ही किमया होती ती साने गुरुजींच्या विचारांची. देवरुखमधील सामाजिक कार्यकर्ते युयुस्ते आर्ते यांनी येथील नियोजन केले होते.
शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर विचारांचा जागर करुन यात्रा पुढे निघाली देवरुखच्या दिशेने. मातृमंदिर मधील गोकुळ प्रकल्पातील मुली आणि वाचनकट्ट्यातील सजग वाचक यांच्याशी यात्रेत सामिल असलेल्या स्मारक टीमने संवाद साधला. मातृमंदिरचे विनय पानवकर यांच्या सहयोगाने हे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्त्यांचे मोहोळ असलेल्या देवरुख मधल्या मातृमंदिरमध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांबरोबरचा संवाद हा या यात्रेत सामिल झालेल्यांचा उत्साह वाढविणारा ठरला.
२६ नोव्हेंबर संविधान दिवस. साने गुरुजी १२५ अभियान कोकण यात्रेचा दुसरा दिवस. रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी हा दिवस साजरा होत असतानाच साने गुरुजी १२५ अभियानाच्या कोकण यात्रेतल्या कार्यक्रमांतही हा दिवसाचे औचित्य होतेच. साने गुरुजींच्या समतेच्या विचारांची संविधानातील समतेच्या विचारांशी सांगड घालत वक्त्यांनी समतेच्या मुल्यांचा जागर केला.
देवरुख जवळील सडवली येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या इंदिरा इंस्टीट्युट ऑफ फार्मसी येथे संविधान दिनाच्या कार्यक्रमात साने गुरुजी १२५ अभियान कोकण यात्रेचे स्वागत करण्यात आले. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना साने गुरुजींच्या विचारांचा जागर करताना श्यामच्या आई ही ओळख असलेले साने गुरुजी हे समता सेनानी साने गुरुजी कसे झाले हा जीवनपट उलगडून सांगितला गेला. देवरुखमधील युयुत्सू आर्ते यांच्या प्रयत्नाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय, साखरपा, संगमेश्वर येथेही युयुत्सू आर्ते यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साने गुरुजींच्या विचारांचा प्रसार प्रचार करायला निघालेली ही यात्रा गावागावातील कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी खेड्यापाड्यात पोहचत आहे.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ५, लांजा येथील प्राथमिक शाळेतील मुलांशी राजन इंदुलकर यांनी मुलात मुल होऊन संवाद साधला आणि गीतातून त्यांना साने गुरुजी कोण होते, कसे होते हे सांगितले. संविधान जागराच्या कार्यक्रमातच हा कार्यक्रम घेण्यात आला. लांजा येथील जेष्ठ समाजवादी कार्यकर्ते नाना मानकर यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
लांज्यानंतर यात्रा पोहोचली राजापूर तालुक्यातील वाटूळ गावातील शाळेत. आदर्श विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स, या वाटूळ या आडगावातल्या शाळेतील मुलांचे डोळे साने गुरुजींच्या गोष्टीने भरुन आले, गीतालाही मनापासून साथ दिली. अपुऱ्या सोयींनी वैतागलेल्या शिक्षकांनीही श्यामच्या आईच्या आठवणी जागवल्या आणि अभावातही मूल्यांशी तडजोड न करता शिकवण्याचा वसा चालूच ठेवण्याचा निर्धार केला. यात्रेतील हा सकारात्मक अनुभव मनाला उभारी देणारा!
साने गुरुजी १२५ अभियान कोकण यात्रेचे नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, ओणी तालुका राजापूर येथे झांज लेझीमच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. शाळा व महाविद्यालयातील मुलांनी संचलन करत यात्रेत सामिल असलेल्यांना शाळेत नेले. साने गुरुजी १२५ अभियान समितीतील मिरगुळे सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. साने गुरुजींच्या विचाराचा वसा चालविणाऱ्या ओणीतील या शिक्षण संस्थेने साने गुरुजींचे विचार विद्यार्थ्यांमधे जागे ठेवण्याचे काम अखंड सुरू ठेवले आहे.
ओणी येथील वात्सल्य मंदिर बालगृहालाही यात्रेतील सदस्यांनी भेट दिली. डॉ. महेंद्र मोहन गुजर या सेवाव्रतीने चालविलेल्या या बालगृहातीलच्या भेटीनंतर यात्रा कणकवलीच्या दिशेने रवाना झाली.
कणकवलीला मुक्कामाला आल्यावर गोपुरी आश्रमातील ट्रेनिंग सेंटरमध्ये चिपळूणवरुन कणकवली कॉलेजला क्रिडास्पर्धेसाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमवेत यात्रेतील सदस्यांनी संवाद साधला. या संवादाबरोबरच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा खादी संघ, गोपुरी आश्रम कणकवली आयोजित साने गुरुजी १२५ अभियान मेळाव्याला कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. साने गुरुजी १२५ अभियान कोकण यात्रेचा उद्देश समजून घेत कार्यकर्त्यांनी या यात्रेत सहभागी होण्याचे ठरविले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुढील दोन दिवसाच्या यात्रेच्या नियोजनात सामिल झाले.
२८ नोव्हेंबरला सकाळी स्मारकाचे माजी अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ या यात्रेत कणकवलीहून सामिल झाले. हा दिवस हा कणकवली तालुक्यातील शाळा व महाविद्यालये तसेच ओरस, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुक्यातील शाळा महाविद्यालये यांच्या भेटी तसेच कार्यकर्त्यांच्या बैठका यामध्ये व्यस्त गेला. कणकवलीतील माजी गटशिक्षण अधिकारी मोहन सावंत व कणकवली कॉलेजचे प्रा. मुंबरकर यांच्या सौजन्याने व गोपुरी आश्रमाचे सचिव विनायक मेस्त्री यांच्या प्रयत्नाने कणकवली तालुक्यातील पाच शाळा महाविद्यालयांत गुरुजींच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारी ही यात्रा गेली.
स्मारकटीम मधील एक टीमने आज सर्वात प्रथम वरवडे येथील ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडीयल इंग्लिश स्कूल अॅंड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अॅंड कॉमर्स येथे विद्यार्थ्यांसोबत गुरुजींच्या विचारांचा जागर केला. यात्रेत आजच सामिल झालेल्या स्मारकाचे माजी अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी कणकवली तालुक्यातील कनेडीगट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेच्या माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कनेडी या शाळेत जिंदाबादचा नारा देत यात्रेत जोश भरला. आता उठवू सारे रानच्या घोषात विद्यार्थ्यांना साने गुरुजींच्या लढवय्येपणाची जाणीव त्यांनी करुन दिली. कणकवली तालुक्यातील प्रसिध्द भिरवंडे गावातील सावंतांनी गावातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थापलेल्या या शाळेतला मुलांचा प्रतिसाद यात्रेतील कार्यकर्त्यांचा जोश वाढविणारा ठरला.
यात्रा पुढे निघाली ती कुंभवडे गावातील निवासी शाळेकडे. शंकर महादेव सावंत ग्रामविकास संस्थेच्या शंकर महादेव सावंत हायस्कूल या गुरुकुल पध्दतीच्या शाळेतील मुलं मुली साने गुरुजींच्या गोष्टींत तल्लीन झाली. समता सेनानी साने गुरुजींचा परिचय करुन देताना स्वातंत्र्यलढ्यातील गुरुजींच्या योगदानाची माहिती मुलांना मिळाली. गुरुकुल पध्दतीच्या या शाळेतील विद्यार्थी अमळनेरमधील प्रताप हायस्कूलमधील छात्रालयातील गुरुजींबद्दल, त्यांच्या मातृप्रेमाबद्दल, त्यांच्या मातृह्रदयाबद्दल ऐकून भारावून गेले.
मुंबईत नोकरीधंद्यासाठी गेलेल्यांनी आपल्या गावातील पंचक्रोशीतील गावांतील मुलांसाठी शाळा काढणे हा पॅटर्न कणकवली तालुक्यातील इतर शाळांतही पहायला मिळाला. नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्थेच्या सरस्वती हायस्कूलमध्ये विद्यार्थी व शिक्षकवर्ग यात्रेची वाटच पाहात होते. सकाळपासून कणकवली तालुक्यात चालू असलेला साने गुरुजींच्या विचारांचा जागर इथेही सुरूच राहिला. यात्रेला इथेही खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
कणकवली तालुक्यातीलच तरेळे येथील तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई चालवत असलेल्या वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तरेळे येथे यात्रेचे स्वागत करायला शिक्षक व मुलं उत्सुक होती. यात्रेने भेट दिलेली दिवसभरातील ही पाचवी शाळा, गुरुजींच्या विचारांचा जागर करत होती. गुरुजींच्या आंतरभारती बद्दल माहिती मिळालेल्या मुलांनी निदान एकतरी इतर भाषा शिकावी असं आवाहन केल्यावर मुलांनी लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला.
स्मारकाची एक टीम कणकवली तालुक्यात दिवसभर फिरत असताना यात्रेची दुसरी टीम ही ओरोस, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुक्यांचा पल्ला गाठत होती. तिथल्या शाळा कॉलेजांत गुरुजींच्या विचारांचा जागर करत होती. कार्यकर्त्यांच्या बैठका घेत होती.
कुडाळ तालुक्यातील वाडी हुमरमळा पुष्पसेन ज्ञानपीठ संचलित पु्ष्पसेन सावंत फार्मसी कॉलेज मध्ये यात्रेतील कार्यकर्ते पोहोचले आणि भावी औषधविज्ञान पदवीधरांना त्यांनी साने गुरुजी १२५ अभियानाबद्दल माहिती दिली. साने गुरुजी विचार अभियानात या तरुणाईला जोडून घेऊन यात्रा कुडाळच्या दिशेने निघाली.
कुडाळमधील महात्मा गांधी लोकसेवा संघ पुणे संचालित नाथ पै विद्यालयात साने गुरुजींच्या विचारांचे बाळकडू मिळालेला विद्यार्थीवर्ग होता. समाजवादी साथींनी चालू केलेल्या या शाळेतील शिक्षकांनी या यात्रेचे स्वागत केले. साने गुरुजींच्या विचारांनी चालणाऱ्या या शाळेतील विद्यार्थ्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादाने स्मारक टीम भारावून गेली. साने गुरुजींच्या विचारांचा जागर करणाऱ्या या शाळेला स्मारकाची माहिती व स्मारकात येण्याचे आमंत्रण देऊन यात्रा पुढे निघाली.
वेंगुर्ला तालुक्यातील पाट या गावातील पाट हायस्कूलमध्ये यात्रेचे स्वागत करण्यात आले. अख्खी शाळा गुरुजींचे विचार ऐकायला उत्सुक होती. पाचशेच्यावर विद्यार्थी गुरुजींचे विचार ऐकत होती, त्यांचे गीत होती हे दृश्यच खूप आश्वासक होते.
पाटवरुन यात्रा पुढे निघाली सावंतवाडीच्या दिशेने. सावंतवाडीच्या राणी पार्वतीदेवी विद्यालयात साने गुरुजी १२५ अभियानाची, कोकण यात्रेची व साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाची माहिती उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना देण्यात आली. समता सेनानी साने गुरुजींच्या विचारांचा जागर सावंतवाडीत सुरूच राहिला तो यानंतर झालेल्या कार्यकर्ता बैठकीच्या निमित्ताने. सावंतवाडी व वेंगुर्ल्यातील कार्यकर्त्यांनी सावंतवाडीत गुरुजींच्या विचारांचा जागर करणाऱ्या या यात्रेचे स्वागत केले. भविष्यात समता सेनानी साने गुरुजींचे विचार कसे पुढे नेता येतील यावर कार्यकर्त्यांनी चर्चा केली. भविष्यातील काही कृती कार्यक्रमांची चर्चा केली आणि कार्यकर्त्यांचे मोहोळ असलेल्या मालवणमधील नाथ पै सेवांगणात मुक्काम करण्यासाठी यात्रा निघाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साने गुरुजी १२५ अभियान कोकण यात्रेला प्रा. राजेंद्र मुंबरकर, बाळू (विनायक) मेस्त्री, सरिता पवार, कमलताई परूळेकर, ॅड्. संदिप निंबाळकर, ॅड्. देवदत्त परूळेकर, प्रविण बांदेकर, हरिहर वाटवे, विद्या राणे, खोबरेकर , मोहन सावंत, संध्या तांबे इत्यादी कार्यकर्त्यांनी जोडून घेतले आणि ही यात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
मालवणमधील शाळा महाविद्यालयांत गुरुजींच्या विचारांचा जागर करत यात्रा कुडाळमार्गे परतीच्या प्रवासाला निघेल. दापोली व पालगडमधील शाळा महाविद्यालयांत गुरुजींच्या विचारांचा जागर करत या कोकण यात्रेची सांगता गुरुजींच्या जन्मगावी पालगड येथे होईल.
यात्रेत ठिकठिकाणी विद्यालये, महाविद्यालये तसेच संस्थांमध्ये व्याख्याने, कार्यकर्ता सभा, भेटीगाठी आणि स्वागत कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. तसेच साने गुरुजींच्या साहित्याचे वितरणही करण्यात येत आहे. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे प्रतिनिधी राजन इंदुलकर, माधुरी पाटील, प्रमोद जाधव, सिरत सातपुते, विनायक धुरी, डॉ. संजय मं. गो. या यात्रेत सामिल झाले आहेत.
गुरुजींच्या आंतरभारतीचा विचार आणि वाटचाल हे पुस्तक या यात्रेत शाळा महाविद्यालयातील ग्रंथालयाला स्मारकातर्फे भेट देण्यात येत आहे. शामची आई पलिकडील सेनानी साने गुरुजी आणि साने गुरुजींचा आंतरभारतीचा विचार या यात्रेनिमित्त कोकणात पुन्हा एकदा पोहोचतो आहे.
सिरत सातपुते