संभाजीराजे प्रेम, मराठा समाज आणि वास्तव
संभाजी राजेंना खासदारकीची उमेदवारी नाकारल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले. मात्र यात संभाजी राजे 2009 पुर्वी कुठे होते? त्यांची राजकीय वाटचाल कशी झाली? त्यांच्या सोबतच्या लोकांचं काय झालं? संभाजी राजेंमुळे मराठा समाजाला काय मिळाले? याबाबत वैभव कोकाट यांनी सडेतोड भुमिका मांडली आहे.
X
संभाजी छत्रपती यांच्याबरोबरचा माझा फोटो 2013 सालचा आहे. तेव्हा मी कॉलेज शिकत होतो. संभाजी छत्रपती यांचा खांद्यावर असलेला हात पाहून तुम्ही समजू शकता की, त्यांचे अन माझे संबंध कसे असतील! त्या काळात संभाजी छत्रपती यांना कोल्हापूर बाहेर फारसे कुणी ओळखत नव्हते. पुण्यात 2007 साली शैलजा ताई मोळक यांनी संपादित केलेल्या 'बुधभूषणम' ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात अजित दादासोबत ते पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. तो योग प्रवीणदादानींच जुळवून आणला. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत 'राष्ट्रवादी काँग्रेस'च्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या संभाजी छत्रपतींचा कोल्हापूरच्या जनतेने दणदणीत पराभव केला होता.
तेव्हा अंबाजोगाईच्या एका व्यक्तीने त्यांना प्रथम मराठवाड्यात आणून लोकांना ओळख करून दिली. आमची पण त्यांच्याशी ओळख झाली. त्यांना पश्चिम महाराष्ट्र मध्ये कोणी विचारत नसताना अंबाजोगाईचे काही लोकं दरवेळी त्यांचे भव्य असे स्वागत- सत्कार करायचे.
मराठा संघटनांनी आझाद मैदानात त्यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण मोर्चा काढलेला. त्याला मी उपस्थित होतो. त्यानंतर 'शिव-शाहू यात्रा' काढली. असं म्हणतात, की या यात्रेचा सगळा खर्च आणि नियोजन प्रवीण गायकवाड यांनी केले होते. यातही मी त्यांच्या सोबत काही ठिकाणी फिरलो. या यात्रेत ते प्रत्येक सभेत म्हणायचे की, 'आमदार- खासदार- मंत्री पेक्षा छत्रपती पद महत्वाचे आहे! मी कधीच राजकीय पद घेणार नाही!'
2014 ला राज्यात आणि केंद्रास सरकार बदलले. 'भाजप'कडून राजेंना खासदारकी ऑफर आली, असं त्यांनी दाखवलं. पण त्यासाठी त्यांनीच प्रयत्न केले होते. खासदारकीसाठी आपल्या तोंडचे शब्द ते विसरले आणि छत्रपती पदाला दुय्यम मानून त्यांनी स्वहितासाठी खासदारकी स्वीकारली.
राजे खासदार झाले...
आता राजे खासदार झाले, अनेकांना त्याबद्दल चांगलं वाटलं तर काहींना नाही. राजे खासदार झाले पण राजेंना खासदार पदापर्यंत पोहोचवण्यामागे अनेक हात होते. त्यांना ते आपसूकच विसरून गेले. अगदी राजेंना राजवाड्याबाहेर काढून जनतेत नेणाऱ्या व्यक्तींना सुद्धा त्यांनी कधी विचारलं नाही. एक उदाहरण म्हणून सांगतो. संभाजी राजे यांच्या नांदेड येथील सभेसाठी संतोष गव्हाणे (ज्यांना तुम्ही ओळखताच) यांनी आपल्या बायकोचे दागिने गहाण ठेवले आणि राजेंच्या स्वागत-सत्काराचा जंगी कार्यक्रम केलेला. या माणसावर केसेस पडल्या पण संभाजी छत्रपती यांनी त्यांना साधं कधी विचारलंही नाही. संतोष गव्हाणे या माणसाच्या आयुष्याची वाताहत झाली. हे फक्त एक उदाहरण झाले. असे अनेक संतोष गव्हाणे आहेत, की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांचे वंशज म्हणून या व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारे प्रचंड पैसा अन वेळ खर्च केली. म्हणून यांना खासदारकी मिळाली. पण यांनी त्या लोकांना ठेंगा दाखवला .
राजे खासदार झाले, मराठा समाजाला काय मिळाले ?
मराठा समाजाला काही सरकारी सुविधा मिळाल्या, त्या फक्त 'मराठा क्रांती मोर्चा'मुळे! बाकी संभाजी छत्रपती यांच्या 6 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 6 मराठा तरुणांना पण स्वतःच्या पायावर उभा केलेले नाही. आज जे त्यांच्या 'सपोर्ट'मध्ये मीडियात विखारी बोलतात ते कोण? नाशिक, पुणे, नगर, बीड, औरंगाबाद मधील क्रांती मोर्चातून निघालेले दलाल लोकं! ते कोण आहेत? स्थानिक भागात त्यांची इमेज काय आहे ? याची जरा माहिती घ्यावी. त्यांची नावे अनेकांना माहित असतीलच.
आता विषय मराठा क्रांती मोर्चावर आलाय, तर सांगतोच. मित्रहो हे आंदोलन संपल्या नंतर क्रांती मोर्चा या नावावर अनेक दलाल समोर आले. समाजातील चांगले लोकं आपापल्या कामात गुंतले. मात्र या दलालांनी आपण म्हणजेच समाज असं चित्र तयार केलं. आज सरकार दरबारी 'मराठा क्रांती मोर्चा'च्या लेटरहेडवर या दलालांनी 'आम्हाला एखादे कंत्राट द्या', 'ह्याची बदली करा', अशी अनेक पत्रे शासकीय विभागात दिलेली आहेत. मोर्चा कशासाठी निघाला होता अन या दलालांनी काय सुरु केले?
क्रांती मोर्चा निघायच्या आधी एसटी- बसने फिरणारे समन्वयक आता इनोव्हा-एन्डेव्हर ने फिरतात. कुठून आले एवढे पैसे ? यांचे मी नावे सांगू का?
आता हेच लोक समाजाला काही भेटलं नाही, यापेक्षा संभाजी छत्रपतींना महाविकास आघाडी तर्फे खासदारकी भेटली नाही म्हणून टिव्ही चॅनल्सच्या माध्यमातून राग व्यक्त करत आहेत. समाजापेक्षा छत्रपती मोठे झाले का? संभाजी छत्रपती हे नेते असतील तर ते ह्या दलालांचे असतील. मराठा समाजाचे नाहीत.
क्रांती मोर्चा हा विषय खूप लांबला आपण मूळ विषयावर येऊ...
राजेंना फडणवीस यांनी रायगड प्राधिकरणाच्या प्रमुख पदी नियुक्त केले. सरकार बदलले आणि राजेंना चाहूल लागली की आपली रायगड प्राधिकरण वरून उचलबांगडी होणार! मग त्यांनी स्वतःच पत्रकार परिषदा घेऊन रायगड प्राधिकरण मध्ये असा असा भ्रष्टाचार झाल्याचे लोकांसमोर मांडले. हे घोटाळे ते प्राधिकरणाचे प्रमुख असतानाच झाले होते बरे. MVA सरकारने त्यांना कायमस्वरूपी पुढे अध्यक्ष केल्यावर त्यांनी आरोप केलेला भ्रष्टाचारच गायब झाला. असो पुढे जाऊ...
संभाजीराजे, इथे भरपूर लिहायचे होते, पण हा भाग रिकामा ठेवतो. संभाजीराजे यांची संघर्षात सोबत असणाऱ्या लोकांना कधी शब्दाने पण विचारलं नाही. हे खोटं वाटत असेल 2014 पर्यंत त्यांच्या सोबत असणाऱ्या हजारो सहकाऱ्यांना विचारा. त्यातील किती जण आज त्यांच्या सोबत दिसतात? असं सगळ्यांना फाट्यावर मारत त्यांची खासदारकीची टर्म हि संपली. चळवळीतल्या चाणाक्ष लोकांनी हे प्रॉडक्ट लगेच ओळखले. चळवळीच्या जीवावर हे मोठे झाले यांनी चळवळीला 6 वर्षात काय दिले? उलट यांच्यामुळे चळवळीत राजकीय इच्छाशक्ती वाढल्याने चळवळ दुभंगली, संपली, प्रचंड नुकसान समाजाचे झाले. यांच्या जवळच्या सर्कलमध्ये जे आले त्यांना 'दुरून डोंगर साजरे' या म्हणीचा प्रत्यय येतो. सदैव सोबत असणारे अनेक जण खासदार झाल्यावरही यांना सोडून गेले. आता हे सगळे सोडून देऊ नव्याने पुन्हा खासदार करण्याच्या यांच्या मागणीकडे पाहू...
तर संभाजी छत्रपती यांना दुसऱ्यांदा खासदार करावे
खरं तर मी माझ्या कॉलेजवयात जसं त्यांच्या व्यक्तीमत्वाला भुललो होतो, तशी काही मुले फार भुलून गेलेली आहेत. संभाजी छत्रपती म्हणजे आताचे शिवाजी महाराज आहेत, असेच ते समजू लागलेत. अनेकांना छत्रपती घराण्यातली लोकं म्हणजे फार काही थोर वाटतात. पण ह्या महान घराण्यातल्या लोकांना खासदारकी- आमदारकी हेच 'छत्रपती पदापेक्षा मोठे' वाटते.
मागे आम्ही विनायक मेटेच्या नावाने शिव्या घालायचो. विनायक मेटे हा माणूस कसा का असेना, पण त्याने आमदारकीसाठी कधी जाहीर भिका मागितल्या नाहीत. समाजाच्या जीवावर 5 टर्म आमदारकी उपभोगली, म्हणून त्यांना पूर्वी नावे ठेवली गेलीत. याचे आज वाईट वाटते. कारण ह्यांच्या तुलनेत मेटे खूपच बरे होते, असे म्हणायची वेळ यांनी आणली. खासदारकीसाठी घराणे भोळ्याभाबड्या समाजाला हे वेठीस धरत आहेत.
भाजपने राजेंची साथ का सोडली ?
भाजपने राजेंना दुसऱ्यांदा खासदार का केले नाही? कारण भाजपला राजेंचा उपयोग आणि उपद्रवमूल्यता शून्य वाटली. मागच्या 6 वर्षात छत्रपती पक्षात असूनही मराठा समाजाचा म्हणावा तसा पाठिंबा त्यांना मिळाला नाही. म्हणून त्यांनी यावेळेस राजेंना वाऱ्यावर सोडले. अन्यथा भाजपला एक खासदार करणे फार अवघड नाही. विनय सहस्त्रबुद्धे ऐवजी राजेंना पाठवता आले असते. तसेच देशातून कुठूनही खासदार केले असते. पण भाजपने ओळखले की, या व्यक्ती मागे जनाधार नाही आणि हे 100 टक्के सत्यही आहे.
आता संभाजीराजे यांच्या राजकीय ताकदीकडे वळू. संभाजी छत्रपती हे लोकांतून कोणत्याही निवडणुकीला उभा राहिले तर ते निवडून येणार नाहीत. ते काल परवा बोलले कि छत्रपती घराण्याचा सन्मान टिकवण्यासाठी मला खासदारकी द्यायला हवी. उद्या सरदारांचे वंशज पुढे येतील आणि म्हणतील की, आमच्या घराण्याचा सन्मान टिकवण्यासाठी आम्हाला विधानपरिषद, महामंडळ द्या! असे देता येईल का? त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला कुठल्याही इलेक्शनमध्ये लोकांतून निवडून आणले तरी मी ढोपरापासून राजेंना मुजरा करेल...
माझा तरुण कार्यकर्त्यांना मेसेज आहे की.... आपण छत्रपती घराण्याच्या प्रेमापाई अगदी वेडावले असाल, तर राजर्षी शाहू महाराज यांच्यानंतर छत्रपती घराण्यात कोणाचा आदर्श घ्यावा, मान-सन्मान करावा अशी व्यक्ती राहिलेली नाही, हे आधी लक्षात घ्या. आता जे वंशज आहेत, ते सत्तापिपासू आहेत. लोकांतून निवडून येणाऱ्यांबद्दल मला आदर आहे. पण जे स्वतःच्या फायद्यासाठी समाज आणि छत्रपती घराण्याचा वापर करतात, हे पाहवत नाही म्हणून हे लिहले आहे... तरुण मुलांनो आपण चांगले शिका. उमेदीचा वेळ यात घालू नका. नोकरी-व्यवसाय करा, विदेशात जा, समाजाचा आपोआप उद्धार होईल!!
नेत्या सोबतचे लोकं, सल्लागार कोण आहेत ? त्यावर नेता कसा होतो, हे अवलंबून असते. एकेकाळी चळवळीतल्या विद्वान लोकांच्या सोबत असणाऱ्या या माणसाच्या आजूबाजूला आज कोण लोकं आहेत ? सल्लागार कोण आहेत? याचे निरीक्षण करा.
मला कल्पना आहे कि हे सर्व लिहून मी अनेकांचा रोष अंगावर घेतला आहे, पण समाजाचा कोणी कडीपत्त्यासारखा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर करावा अन मुलांना इतिहासाच्या खाईत लोटावे हे मनाला पटलं नाही. म्हणून लिहीले. राजेंनी राजकारणात खूप मोठे व्हावे, खासदार, मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती व्हावं पण स्वतःच्या कर्तृत्वावर, समाजाचे भांडवल करून नाही. एवढेच माझे प्रांज्वळ मत आहे. राहीला विषय छत्रपती घराण्याच्या सन्मानाचा तर वंशजांनी राजकारणाच्या चिखलापासून लांबच राहिले तर घराण्याचा मान-सन्मान अबाधित राहील, बाकी माझे अन त्यांचे काही वैर नाही.