संघ ही परदेशी विचारधारा आहे का?
rss is a foreign ideology explained by Vishwambhar choudhari
X
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही परदेशी विचारधारा आहे. तिचा आदर्श वंशवादी हिटलर आणि मुसोलिनी आहेत. सैनिकीकरण आणि सैन्याचं उदात्तीकरण यावर त्यांचा गाढ विश्वास आहे, स्वातंत्र्य, समता, न्यायावर नाही.
कम्युनिस्ट ही देखील परदेशी विचारधारा आहे. रशिया आणि चीन हे त्यांचे रोल मॉडेल आहे. गांधीवाद अस्सल भारतीय आहे. म्हणून गांधी भारताचे नेते होऊ शकले. भारत मध्यम मार्गावरून चालणारा देश आहे.
त्यांनी लिहिलेल्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांनी यांचं विस्तृत विश्लेषण केलं आहे. ते म्हणतात...
संघ ही परदेशी विचारधारा आहे असं लिहिल्यावर बरेच जण खवळले. खरं तर आता दसरा येईल दहा दिवसात, त्या दिवशी तुम्ही स्वतः तुमचंच संचलन पहा, आपोआप लक्षात येईल.
मुळात सैनिकी संचलन कुठल्या भारतीय परंपरेतलं आहे? संघाचा गणवेश कोणत्या भारतीय परंपरेतला आहे? काळी टोपी हिंदू परंपरेत निषिद्ध आहे. कोणत्याही मंगल प्रसंगी काळं घालू नये असा संकेत आहे. गावातली जुनी मंडळी काळी टोपी (साधी, संघाची नव्हे) घालतात. ते आजही स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला आवर्जून पांढरी टोपी घालतात, एरवीची काळी टोपी घालत नाहीत. गणवेशातली (आधीची अर्धी आताची पूर्ण) पॅन्ट भारतीय नाही. शर्ट 'इन' करणं ही पण भारतीय परंपरा नाही.
संचलनात जी वाद्यं वाजवली जातात ती भारतीय नाहीत. मूळ भारतीय वाद्य म्हणजे पखवाज अथवा मृदंग. तो संचलनात का नाही?
बाह्यरुपाचं सोडून द्या...
हिंदुत्वाचा विचार तरी भारतीय आहे का? हा प्रश्न मुख्य प्रश्न आहे. भारतात अनेक वंश आले, स्थिरावले, इथलेच झाले. एका धर्माच्याच मालकीचा देश ही कल्पना कुराणात आहे, ती तुम्ही जशीच्या तशी उचलली.
एकाच धर्माचा देश ही कल्पना कुराणाची आणि एकाच वंशाचा देश ही कल्पना हिटलरची. या दोन्ही कल्पनांचा भारतीय अविष्कार म्हणजे हिंदुत्व. हिंदुत्व हा ना वेदांचा भाग आहे ना उपनिषदांचा, ना गीतेचा भाग आहे ना रामायण महाभारताचा. हिंदू असणं म्हणजे सगळ्या जगाला आपलं घर मानणं. हिंदू धर्म टिकावा म्हणून आद्य शंकराचार्य काश्मिर ते कन्याकुमारी फिरले. त्यांनीही हिंदुत्व हाच या भूमीचा एकमेव धर्म अशी घोषणा केलेली नाही.
अस्सल भारतीय परंपरांचा आणि संघाचा संबंध लावायचा कसा ते तरी एकदा सांगा.