Home > मॅक्स ब्लॉग्ज > अशी घाई बरी नाही!

अशी घाई बरी नाही!

नाना पटोले यांची वक्तव्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा टाकणारी ठरतील का? वाचा पत्रकार अमेय तिरोडकर यांचं विश्लेषण

अशी घाई बरी नाही!
X

courtesy social media

नाना पटोले स्टेटमेंट्स करत नाहीत. ते फायरिंग करतात. आजची नाही, ही त्यांची जुनी सवय आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर राज्याच्या हे लक्षात आलं. जे आधीपासून नानांना ओळखतात त्यांना ही त्यांची सवय माहिती आहे.

नाना मेहनती आहेत. इरेला पेटले तर फायद्या तोट्याचा हिशोब न करता वाट्टेल ते करतात. मोदींचा सूर्य तळपत असताना त्यांच्यावर टीका करून खासदारकी सोडणं, पक्ष सोडणं आणि खाली झालेल्या जागेवर मित्रपक्षाचा उमेदवार निवडून आणणं लहान गोष्ट नाही. नानांनी ती करून दाखवलीय. मुख्यमंत्र्यांचा फेव्हरेट कॅबिनेट मंत्री विधानसभेत पाडून दाखवलाय. नाना कर्तबगार आहे याबद्दल त्यांच्या जुन्या - नव्या कुठल्याच विरोधकांना शंका नाही.

पण नानांची फायरिंग अनेकांना त्यांच्यापासून तोडते. आताही तेच सुरू आहे. फक्त आताची रिस्क एरव्हीपेक्षा मोठी आहे. आता ते पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यांची फायरिंग त्यांच्यापुरती मर्यादित नाही. त्यांचं बोलणं पक्षाची भूमिका असते.

आता जे सुरू आहेत याचे परिणाम धड होणार नाहीत. पक्ष वाढवायचा तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करावा लागतो हे बरोबर. पण, हा उत्साह सध्या सुरू असलेली व्यवस्था मोडणारा तर ठरणार नाही ना हे बघावं लागेल.

सध्याचं राज्य सरकार डळमळीत आहेच. ते मोडावं म्हणून सुरू असलेले प्रयत्न जगजाहीर आहेत. अश्यावेळी, त्याचं खापर आपल्या डोक्यावर फुटणार नाही ना, आपली नॉन स्टॉप वक्तव्यं निमित्त ठरणार नाहीत ना याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. तसं खापर फुटलं तर फार मोठी हानी होईल. एक मोठा वर्ग पक्षापासून कायमचा तुटेल.

सत्ता असली तर पक्ष वाढेल. कार्यकर्त्यांना ताकद मिळेल. ती गेली तर अडचणी वाढतील. आता आणखी अडचणी वाढून चालणार नाही. पक्ष वाढवायचा आहे. ही जबाबदारी मोठी आहे. त्यासाठी हालचालींची घाई करायला हवी हेही बरोबर आहे. पण ही आता जशी घाई सुरू आहे ती काही फार बरी नाही. एवढं भान राहू द्यावंच लागेल. पडत्या काळात शांत राहून काम करणं गरजेचं असतं. राजकारण त्यालाच म्हणतात.

अमेय तिरोडकर

(फेसबुक साभार)

Updated : 15 July 2021 10:11 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top