Money heist : दरोडा,प्रतिकार आणि स्वातंत्र्याची प्रतिकं
Netflix वरील मनी हाइस्ट ही वेबसीरीज जगभरात का गाजतेय? तरूणांना जास्त का भावतेय ही सीरीज? काय आहे या सीरीज मध्ये जाणून घेण्यासाठी वाचा मुकुल निकाळजे यांचा रिव्ह्यू सांगणारा लेख…
X
मूळची "ला कासा दे पापेल" म्हणजे "कागदांच घर" हे नाव असलेली स्पॅनिश टीव्ही सीरियल असलेल्या "मनी हाइस्ट" या नेटफ्लिक्स वरील सीरिजने जगभरात प्रसिद्धीचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. भारतातही मनी हाईस्टची प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. 3 सप्टेंबर रोजी या सिरीजचा पाचवा सीजन रिलीज होतोय म्हणून जयपूर मधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क सुट्टी दिली आहे. मनी हाईस्ट म्हणजे एक सशस्त्र दरोड्याची कथा. परंतु या दरोड्यात कुणाचीही व्यक्तिगत संपत्ती लुटल्या गेलेली नाही. हा दरोडा घातला जातो "रॉयल मिंट ऑफ स्पेन" मधे म्हणजे स्पेन मधील चलनी नोटा छापण्याच्या कारखान्यात. हे दरोडेखोर शस्त्रास्त्रांच्या आधारे रॉयल मिंट ऑफ स्पेनचा ताबा घेतात. तेथे असलेल्यांना ओलीस ठेवून पोलिसांना आत येण्यापासून रोकतात.
आतमध्ये आपल्यासाठी नोटांची छपाई सुरू करतात. 984 मिलियन युरोस छापतात. ते घेऊन फरार होतात. ह्या चोरीचा मास्टर माईंड असलेलं यातील पात्र "प्रोफेसर" या चोरीस भ्रष्ट व्यवस्थे विरुद्ध आणि प्रतीकार समजतो. समाजाने टाकून दिलेल्या, अपराधी ठरवल्या, स्वतः ला हरलेलं समजलेल्यांना गोळा करून तो या चोरीसाठीची टीम बनवतो, त्यांना प्रशिक्षण देऊन तयार करतो. त्यांना ही चोरी करण्यासाठी पाठवतो व स्वतः बाहेरून त्यांना ऑपरेट करत असतो. प्रोफेसरने या चोरीसाठी आखलेले प्लॅन आणि त्यासाठी लावलेलं डोकं प्रेक्षकांना थक्क करून सोडतं. प्रत्येक शक्यतेचा आधीच विचार करून त्यासाठीची रणनीती प्रोफेसरने आखलेली असते. तर कुठल्याही परिस्थितीत चोरीच्या दरम्यान मनुष्यहानी होणार नाही हा यातील सर्वात महत्त्वाचा नियम त्याने बनवलेला असतो.
प्रेक्षक ज्याचं भाकीत मुळीच करू शकणार नाही अश्या सस्पेन्सेस चा थरार प्रेक्षकांना या कथानकात अडकवून ठेवतो. ही सिरीज बघताना प्रेक्षक त्यातील पोलिसांच्या बाजूने नाही तर चोरांच्या बाजूने असतात, ते यशस्वी होतील की नाही याची चिंता त्यांना लागलेली असते. यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना जोडून ठेवत आणि त्यांच्या मनात आपली वेगळी छाप सोडून जातं. जे पात्र आधी खलनायक वाटत त्याच्या बद्दलही नंतर सहानुभूती वाटायला लागते.
या सीरिजच कथानक, दिग्दर्शन हे सगळ तर जबरदस्त आहेच. परंतु ही सीरिज वेगळ्या कारणांमुळे सुद्धा चर्चेचा विषय बनली आहे. ते म्हणजे यात वापरलेल्या प्रतिकार, स्वातंत्र्याची एतीहासिक प्रतिकं व त्याद्वारे दिलेला प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातील संदेश.
यातील चोरांनी स्वतः ला आणि बंधक बनवून ठेवलेल्या इतरांना लाल रंगाचा पोशाख घातला आहे. लाल रंग प्रेम, मृत्यू, प्रतिरोध आणि क्रांतीचा रंग म्हणून ओळखला जातो. इ.स. 1700 मधील फ्रेंच राज्यक्रांती असो किंवा 1957 ची क्युबा मधील क्रांती असो. जगभरातील अनेक क्रांतिकारी उठवांमधे लाल रंगाच्या वापर केला गेलेला आहे. ही सीरिज आल्या नंतर यामधील या लाल पोषाखाचा वापर सुद्धा जगात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये केला जात आहे. हे या सीरिजच्या जगभरातील लोकप्रियतेचे एक प्रमाण आहे. अंगात लाल जंपसुट तर चेहरा लपवण्याची साल्वाडोर डाली या स्पेन मधील विवादित चित्रकाराच्या चेहऱ्याचे मास्क वापरलेले आहे. हे मास्क डालीचेच आहे असे यातील पात्रांच्या संवादातून स्पष्ट केले आहे. डाली एक अत्यंत जिनियस पेंटर होता, जो भांडवलशाही विरुध्द आणि प्रस्थापित व्यवस्थे विरुद्ध आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून संदेश द्यायचा.
या सीरिज मधे "बेला चाओ" या इटालियन लोकगीताचा उपयोग केला गेलेला आहे. जगभरात हे गीत एक क्रांतिगीत म्हणून ओळखल्या जातं. एकोणाविसाव्या शतकात इटली मधील शेतमजुरी करणाऱ्या महिला जमीनदारांच्या विरुद्ध निषेधाच्या रुपात हे गान म्हणायच्या. विसाव्या शतकात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे गाणं नव्या बोलांसह पुन्हा लोकप्रिय झालं. लोकशाहीच्या स्थापनेसाठी संघर्षाचा संदेश असलेलं हे गाणं 1943 ते 1945 या काळात तर फॅसिझमचा प्रतिकार करणाऱ्यांचा आवाज बनल. जगभरातील अनेक देशांत, अनेक भाषेत फॅसिझम विरोधी आंदोलनांत हे गीत गायले जाते. या सीरिज मधे प्रतिकाराचे प्रतीक म्हणून "बेला चाओ" चा उपयोग केला आहे व नव्याने या पिढीत ते लोकप्रीय केले आहे.
सत्तेच्या, व्यवस्थेच्या विरुद्ध स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचा उद्घोष करणारी कलाकृती प्रत्येक काळातील तरुणाईला प्रिय असते. या सर्व सत्ता आणि व्यवस्था विरोधी प्रतिकांमुळे या सीरिजला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.