Home > मॅक्स ब्लॉग्ज > परिवर्तनवाद्यांसाठी डॉ. गेल ऑम्वेट यांनी दिलेल्या 3 गोष्टी कोणत्या?

परिवर्तनवाद्यांसाठी डॉ. गेल ऑम्वेट यांनी दिलेल्या 3 गोष्टी कोणत्या?

काही लोक खूप अभ्यासू असतात, मात्र, त्यांच्या अभ्यासाच जर समाजाला उपयोग झाला नाही तर.. मात्र, काही माणसं आपल्या अभ्यासावरच न थांबता त्या अभ्यासातून जी निरिक्षणं जाणवली ती बदलण्यासाठी थेट जनतेत जातात आणि समाजात बदल घडवतात. त्यापैकी एक समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्वेट. त्यांचं नुकतंच निधन झालं. त्या संदर्भात त्यांच्या परिवर्तनवादी विचारांचा घेतलेला मागोवा

परिवर्तनवाद्यांसाठी डॉ. गेल ऑम्वेट यांनी दिलेल्या 3 गोष्टी कोणत्या?
X

अर्जेंटिनामध्ये जन्मलेल्या, पण क्युबाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन, नंतर कोलंबियाच्या स्वातंत्र्यलढ्यात अखेरचा श्वास घेणाऱ्या क्रांतिकारीचे गव्हेरा प्रमाणेच अमेरिकेत जन्मलेल्या पण भारताला आपली कर्मभूमी मानून क्रांतिकारी काम करत गेल ऑम्वेट यांनी या आपल्या कर्मभूमीत अखेरचा श्वास घेतला.

भारतातील सामाजिक राजकीय व आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करणारे अनेक पाश्चाात्त्य संशोधक आहेत. पण केवळ अभ्यासावरच न थांबता त्या अभ्यासातून जी निरीक्षणं जाणवली ती बदलण्यासाठी थेट मैदानात उतरून चळवळ करणारी गेल ऑम्वेट यांच्यासारखी संशोधक विरळच.

गेल यांच्याबाबतीत तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे केवळ अकॅडमिक गोष्टींपुरते मर्यादित न राहता जे आपण लिहितोय-मांडतोय ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी चळवळीतला त्यांचा प्रत्यक्ष सहभाग. दुसरी गोष्ट म्हणजे जात आणि वर्ग याबाबत भारतातल्या वास्तवाची त्यांना असलेली जाणीव आणि त्या अनुषंगाने त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण आणि सखोल मांडणी. तिसरी गोष्ट म्हणजे फक्त वास्तवाच्या मांडणीवर न थांबता जातीविहीन आणि वर्गविहीन आदर्श समाज कसा निर्माण करता येऊ शकतो याचे त्यांनी पाहिलेले आणि प्रत्यक्षात येऊ शकेल असे स्वप्न.

एकाच वेळी संशोधन अभ्यास या माध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी प्रबोधन करत राहणे आणि त्याच वेळी परिवर्तनासाठी प्रत्यक्ष काम करणे अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी करू शकणारी मंडळी आपल्याकडे कमीच आहेत. आधुनिक काळात फुले-आंबेडकर यांच्यानंतर असे दोन्ही आघाड्यांवरचे काम शरद पाटलांनी केले आणि आणखी काही मोजकी मंडळी असू शकतात. गेल यांनी हे करून दाखवले हे त्यांचे वेगळेपण! भारतीय सामाजिक व्यवस्थेबद्दल अतिशय महत्वाचे असे संशोधनात्मक लिखाण त्यांनी केलेच, पण त्याच वेळी येथील दलित, आदिवासी, महिला, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी त्यांनी थेट जमिनीवर उतरून संघर्ष केला. डॉ. भारत पाटणकर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून श्रमिक मुक्ती दलात त्या सक्रिय होत्याच, सोबतच स्त्री मुक्ती संघर्ष चळवळ, शेतकरी महिला आघाडी यांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण महिलांची भक्कम चळवळही उभी केली. गेल यांचं संशोधन इतके महत्त्वाचं की अमेरिकेहून आलेल्या या महिलेनं आपल्यालाच आपल्या मातीच्या इतिहासातील प्रबोधनाचे, क्रांतीचे सशक्त धागे उलगडून दाखवले. लेखन आणि संशोधनासोबतच चळवळीत प्रत्यक्ष सहभागी होणे हे अत्यंत महत्त्वाचा आहे हे गेल यांच्या उदाहरणातून आपण समजून घेणे गरजेचे आहे. पुरोगामी चळवळीतील अनेक पेचांपैकी तो एक महत्त्वाचा पेच आहे.

गेल यांच्याबाबत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातील जात आणि वर्ग या दोन्ही गोष्टींची त्यांना असलेली जाण. भारतीय सामाजिक व्यवस्थेमध्ये परिवर्तन करत असताना जातीचा मुद्दा महत्त्वाचा की वर्गाचा मुद्दा महत्त्वाचा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आता यावर काही प्रमाणात सहमती झाली असली तरी आजही अनेकांची टोकाची भूमिका आहे. जात हाच एकमेव शोषणाचा मुद्दा असून वर्गाचा भारतात काही प्रभाव नाही असे मानत फुले - आंबेडकरी चळवळीतील अनेकांचा डाव्या विचारांना पूर्ण नकार आहे. तर डाव्यापैकी अनेकांनी अजूनही जातीचा मुद्दा नीटपणे समजून घेतलेला नाही आणि वर्गालाच प्राधान्य देत आहेत. डाव्या असलेल्या गेल यांनी जातीचा मुद्दा अत्यंत प्रखरपणे मांडून डावा विचार आणि फुले-आंबेडकरवादी विचार यांची अगदी सुयोग्य अशी सांगड घातली. आज परिवर्तनवादी चळवळ पुढे नेत असताना ही मांडणी अत्यंत महत्त्वाची अशी आहे. फुले-आंबेडकरी चळवळीला डाव्या विचारांना दूर ठेवून आणि डाव्यांना जातीचा मुद्दा दुय्यम ठेवून पुढे जाता येणार नाही हे वास्तव आहे.

गेल यांच्याबाबत तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सीकिंग बेगमपुरा या पुस्तकातून मांडलेलं आदर्श समाजाचं स्वप्न. बेगमपुरा हे खरं तर संत रविदास यांच्या कल्पनेतलं एक भेदाभेद विरहित शहर. रविदास यांच्या संकल्पनेतील हे शहर प्रत्यक्षात येऊ शकते अशी मांडणी गेल यांनी आपल्या पुस्तकात केली. जात आणि वर्ग विहीन, शोषणमुक्त समाज प्रत्यक्षात येऊ शकतो अशी त्यांची मांडणी आहे. चोखामेळा जनाबाई, कबीर, रविदास, तुकाराम, फुले, आयतीदास, पंडिता रमाबाई, पेरियार, आंबेडकर यांच्या स्वप्नातील हे बेगमपुरा प्रत्यक्षात येऊ शकतं अशी गेल यांची भूमिका होती. गांधींच्या स्वप्नातील रामराज्याला नकार देणारी अशी ही त्यांची संकल्पना होती. ज्याला आपण ' युटोपिया', म्हणजे आदर्श समाजव्यवस्थेचे स्वप्न म्हणतो अशी स्वप्नं अनेक वेळा जगभरात मांडली गेली आहेत. पण त्यातली बहुसंख्य स्वप्नवत वाटावी आणि प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाही अशीच आहेत. सीकिंग बेगमपुरा मधून गेल जे युटोपियन स्वप्न पाहतात ते मात्र प्रत्यक्षात येऊ शकेल असे आहे. प्रत्येकाला आपल्या शोषणाची जाणीव झाली, विषमतेची जाणीव झाली आणि तो प्रत्येक जण जर समानतेसाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरला तर असा बेगमपुरा प्रत्यक्षात येऊ शकतो.

गेल ऑम्वेट या तीन गोष्टी परिवर्तनवाद्यांसाठी देऊन गेल्या आहेत. त्यावर विचार करणे, त्यावर काम करणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल.

(लेखक : अभिजीत कांबळे, Letsupp मराठीचे संपादक आहेत)

Updated : 26 Aug 2021 12:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top