युक्रेनमधील युद्धपरिस्थितीच्या निमित्ताने...
रशिया- युक्रेन संघर्षानंतर युध्दाचे वारे वाहू लागल्यानंतर युक्रेनची राजधानी किव्हमधे भारतीय संगणक अभियंते आणि लेखक डॅनिअल मस्करणीस यांनी युक्रेनच्या अभियंत्यासोबत केलेल्या कामाचा अनुभव Max maharashtra साठी मांडला आहे.
X
आयटी क्षेत्रात कार्यरत असल्याने जगभरातील विविध संगणक अभियंत्यांबरोबर संपर्क येत असतो. अगोदर ८-९ वर्षे आयबीएममध्ये असताना, अमेरिका, युरोप (ब्रिटन, इटली, स्पेन , जर्मनी), ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर, येथील मूळ नागरिकांबरोबरच, भारत, चीन, अरब देश, रशिया, ह्या देशातून तेथे स्थायीक झालेल्या व आयटी क्षेत्रात नोकऱ्या करणाऱ्या बऱ्याच लोकांशी कामानिमित्त संपर्क आला. तंत्रज्ञानात चीनच्या इंजिनअरर्सचा एक दबदबा आहे. सलग १०-१२ तास काम करून कोणतेही किचकट प्रश्न निकाली लावणाऱ्या ह्या सिंगापूर/चीन येथील इंजिनिअर्स सोबत वार्तालाप करताना एक दडपण यायचं.
मला आठवते आयबीम या तशा अमेरिकनांच्या ताब्यात असलेल्या कंपनीत, एकदा चीन येथे जन्मलेले व सिंगापूर येथून काम करणारे एक गृहस्थ आमच्या विभागाचे हेड म्हणून नियुक्त केले गेले. ते जेव्हा जेव्हा पुण्यात यायचे तेव्हा 'छडीवाले मास्तर' येणार म्हणून सगळ्यांची घाबरगुंडी उडायची. भारतीय इंजिनीअर एकवेळ मोकळ्या ढाकळ्या अमेरिकनांसोबत किंवा ७ तासापेक्षा जास्त काम न करणाऱ्या युरोपमधील लोकांबरोबर सहज compete करू शकतील. पण अग्ग्रेसिव्ह चायनीस अभियंत्यांबरोबर एक वेगळाच कस लागतो.
नंतर मी आयबीएम सोडली व माझी सध्याची कंपनी जॉईन केल्यांनतर मला kiv येथील युक्रेनच्या इंजिनियर्ससोबत काम करण्याची प्रथमच संधी मिळाली. काही महिन्यातच युक्रेन टीमचं वैशिष्ट्य लक्षात येऊ लागलं. टेक्निकली, चायनीस लोकांपेक्षाही सरस असलेल्या तरीही, नम्र, शान्त अशा ह्या लोकांनी माझं लक्ष वेधून घेतलं. यूरोपमधील असूनही तेथील अर्थव्यवस्था मात्र आपल्यासारखी, विकसनशील. त्यामुळे 'आपण बरे आपलं काम बरं', नोकरी/पगार/घर/संसार/बायका-मुले आपण भारतीय सहज रिलेट करू शकू अशी जुन्या वळणाची त्यांची मानसिकता...
त्यामुळे युक्रेनचे सहकारी आपल्याला खूप जवळचे वाटू लागतात..एखादा किचकट प्रॉब्लेम जर युक्रेन टीमच्या डोळ्याखालून गेला तर तो solve होणारच असा त्यांच्याबद्दलचा विश्वास आम्हा सहकाऱ्यांत दृढ आहे. या युक्रेनच्या टीममध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त. आणि सर्वच्या सर्व डोळ्याचे पारणे फिटावे इतक्या देखण्या. software engineer नसत्या तर सहज मॉडेल होऊ शकतील अशा Beauty with brains. जड रशियन उच्चारातील त्यांचं बोलणं जरी ब्रोकन इंग्रजी भाषेत असलं तरी त्यांची technical expertise वादातीत. सध्या कॅलिफोर्नियात वास्तव्यासाठी असलेला माझा मेंटॉरही मूळचा युक्रेनचाच (जेव्हा कधी पुण्याला यायचा तेव्हा आवर्जून चितळेंतून 'बाकर-वडी' घेऊन जाणारा)..पुढे कुतूहलातून अधिक चौकशी केल्यावर कळलं की युक्रेनच्या इंजिनिअर्सचा फक्त आयटी क्षेत्रातच नाही तर स्पेस, मूलभूत विज्ञान ह्या क्षेत्रामध्येही दबदबा आहे. यूरोपमधील सर्वात जास्त सुपीक जमीन युक्रेनमध्ये आहे.
भांड्वलखोर अमेरिकनांसाठी युक्रेन तसा economically insignificant. आयटीमध्येही तसंही चीन आणि भारताच्या workforce चा दबदबा, पण तरीही काही लाखांत असलेल्या युक्रेनच्या ह्या निष्णात तंत्रज्ञांचे योगदान दुर्लक्षित करण्याजोगे नाही...
शांत स्वभावाचे, आपल्या मेहनतीने, संथ पण सातत्यपूर्ण वाटचाल करून आपली प्रगती करू पाहणाऱ्या युक्रेनमध्ये आक्रमक पुतिनची रशिया सैन्य घुसवू पाहतेय. कोरोनातून अर्थव्यवस्था अजूनही रुळावर आलेली नसताना व्रात्य पुतिनच्या ह्या नसत्या हालचालीकडे जग श्वास रोखून पाहतेय..एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी बाजारपेठा, तंत्रज्ञान अशा क्षेत्रांचा वापर होण्याच्या आधुनिक काळात 'लॅंड वॉर' तसं outdated आहे... पण पुतिनला आपलं महत्व पटवून देण्यासाठी ते महत्वाचं वाटतंय हे जगाचं दुर्दैव. एकंदरीत जगातील leadership crisis ठळक करणारं हे आणखीन एक उदाहरण ..anyways बघूया काय होतंय ते .. काल कामाचं निमित्त करून माझ्या युक्रेन येथील सहकाऱ्याला मी टीम्सवर मेसेज पाठवलाय, 'हाऊ आर यू माय फ्रेंड?' हे कळकळीने विचारण्यासाठी !
- डॅनिअल मस्करणीस