रवीश, तुझं अभिनंदन नाही करत दोस्ता...
Max Maharashtra | 2 Aug 2019 10:14 AM IST
X
X
आवाजात नाही, शब्दांत वजन असलं पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून मुख्यप्रवाहातील माध्यमांमध्ये गोंगाटवीरांची पैदास वाढलीय. या क्षेत्रात माझा जो काही अल्प अनुभव आहे, त्यावरून मला स्पष्टपणे सांगता येतं की, हा गोंगाट कोण करतंय, कोणासाठी करतंय, कशासाठी करतंय, कधी करतंय इ.इ. या गोंगाटाच्या पलिकडे एक आवाज रवीश कुमारचा होता. हा आवाज या गोंगाटात क्षीण वाटत होता, पण काळाच्या कसोटीवर हाच आवाज ऐकला गेला.
रवीश कुमार ला प्रतिष्ठेचा रोमन मेगासेसे पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळणं प्रतिष्ठेचं समजलं जातं. मला वाटतं या पुरस्कारामुळे रवीश ची प्रतिष्ठा किती वाढेल माहित नाही, पण यामुळे भारतीय पत्रकारितेची, राजकारणाची घसरलेली मुल्ये-स्तर अधोरेखित मात्र झाला. ज्या कारणांसाठी पुरस्कार दिले जातात, त्या पुरस्कार देण्यामागे ‘कारणांची’ चर्चा होणं, किंवा दखल घेणं हा मुद्दा असतो. रवीशच्या पुरस्काराच्या निमित्ताने या सर्व मुद्द्यांची चर्चा व्हायला हवी.
भारतीय पत्रकारितेत सध्या बाजारूपणा सुरू आहे, हे काही लपलेलं नाही. खंडणीचा गुन्हा असलेला एखादा संपादक जोरजोरात राष्ट्रवाद बोलतो, बहुसंख्य चॅनेल्स हिंदू-मुस्लीम, हिंदू-दलित अशाच अजेंड्यावर काम करतायत. व्यवस्थेला प्रश्न विचारायचं सोडून भूतकाळाला प्रश्न विचारतात. जवळपास सर्वच माध्यमांमध्ये हा पैशाचा रोग जडला आहे. यामध्ये सामान्य पत्रकाराला काहीच जागा नाही. त्यांचा आवाज ऐकला जात नाही. अशा परिस्थितीत सामान्य लोकांची बात तर सोडाच..
देश ज्या लोकशाही मुल्यांवर, समानतेच्या धोरणांवर उभा आहे त्या मुलभूत तत्वांनाच हरताळ फासण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. सरकार स्वतः भेदभावाचं राजकारण करतंय. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सतत हल्ले होत आहेत. आर्थिक पातळीवर देश गडबडलाय तरी त्याचं एक साजरं-गोजरं रूप दाखवलं जातंय. मुलभूत प्रश्नांवर बोललं की देशद्रोही ठरवलं जातं. जातीय-धार्मीक उन्माद वाढीस लागला आहे. टोकाच्या राष्ट्रवादाच्या नावाखाली सर्व दडपण्याचा प्रयत्न केला जातोय. सरकारच्या या कटात माध्यमं महत्वाची भूमिका बजावत आहेत. बहुमताच्या जोरावर सुरू असलेल्या दडपशाहीला महाजनादेश म्हणून कव्हर चढवलं जातंय.
या देशात पहिल्यांदा असं घडतंय अशातला भाग नाही. माध्यमं सत्तेच्या पुढे-मागे सतत राहत आलीयत. तरीही सामान्य माणसांच्या प्रश्नांवर-मुद्द्यांवर एक स्पेस होती. गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये सर्व स्पेस एकाच माणसासाठी देण्यात आलीय. त्या माणसाचा अजेंडा हाच माध्यमांचा अजेंडा बनला आहे. जे व्यवस्थेला करायचंय, लोकांच्या माथी मारायचंय, त्या व्यवस्थेचा एक भाग माध्यमं बनलीयत. पत्रकार निष्पक्ष कधीच नसतो. त्याचा ही एक पक्ष( राजकीय नव्हे )-विचारधारा असते. व्यापक अर्थाने पत्रकार कायम विरोधी पक्ष असतो. मात्र, तो जर सत्तापक्ष झाला तर आजची परिस्थिती ओढवते. बातमी विकली जाणं आणि संपादकीय विकलं जाणं याच्याही पुढचं माध्यमंच विकलं जाणं इथपर्यंतचा प्रवास भारताने अनुभवला आहे. यात रवीश कुमार हा एक वेगळा पत्रकार. तो या विषयांवर बोलत आलाय. तो ज्या विषयांवर बोलत होता ती किती महत्वाची आहेत? यावर त्याला मिळालेल्या पुरस्काराने शिक्कामोर्तब केलं आहे.
मध्यंतरी मॅक्समहाराष्ट्र साठी रवीश ने लिहावं म्हणून मी त्याच्याशी बोललो. मॅक्समहाराष्ट्र हा काय प्रकार आहे हे सांगीतलं. त्याने त्याचे लेख मॅक्समहाराष्ट्रवर वापरण्याची परवानगी दिली. तो ज्या विषयांवर बोलतोय, ते सगळीकडे पसरावं अशी त्याचीही इच्छा आहे. सामान्य माणसाचे प्रश्न मांडण्याची छोटी छोटी केंद्र मोठं काम करू शकतात. ही त्याची मांडणी. प्रश्न मांडत राहिलं पाहिजे, विचारत राहिलं पाहिजे. सत्तेत असणाऱ्यांनी ऐकायचं नाही ठरवलं तरी जनता ऐकते.
आता प्रश्न दुसऱ्या बाजूच्या लोकांचा आहे. तुम्ही आवाज चढवून चढवून जे बोलत होतात ते तकलादू आहे. तुम्ही जे सत्य म्हणून लोकांना सांगण्याचा प्रयत्न करताय त्याची ताकद कमजोर आहे. त्यामुळे तुम्हाला आवाज चढवून चढवून बोलावं लागतंय. सध्या माहौल ठीक नाही, घसा खराब होऊ शकतो. आवाज चढवून मांडलेलं सत्यच असेल असं नाही. जरा विचार करा. व्यावसायिक मर्यादांच्या पुढे झुकू नका, नोकऱ्या काय पन्नास मिळतील.
रवीशला अत्यंत कठीण काळात पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराने भारतातल्या सध्याच्या परिस्थितीचं चित्र जगासमोर मांडलंय. अशा वेळी, रवीश दोस्ता, मला तुझं या पुरस्कारासाठी अभिनंदन करता येत नाही.
Updated : 2 Aug 2019 10:14 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire