खेळ कुणाला दैवाचा कळला , नट असो वा कुणीही असो ...
रवींद्र महाजनी एक असा नट ज्याला "हँडसम हंक" म्हणून ओळखलं जायचं. रंजना आणि रवींद्र महाजनी यांचा मुंबईचा फौजदार हा चित्रपट तर आजही मराठी माणसाच्या हृदयात कोरला गेला आहे. त्यातील रवींद्र यांची भूमिका अनेक तरुणांना भुरळ पडणारी होती. व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या झुंज या चित्रपटाद्वारे १९७५ साली चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील "कोण होतीस तू ,काय झालीस तू " या गाण्याने अवघ्या तरुणाईला वेड लावलं. या गाण्यात रवींद्र महाजनी यांचा लूक आणि हावभावाने या गाण्याला अजून जिवंतपणा आला आहे. यात सुद्धा रंजना आणि रवींद्र महाजनी यांचीच जोडी आहे. १९७५ ते १९९० या काळात यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवली. पण आता हा मुंबईचा फौजदार आपल्यात राहिला नाही. रवींद्र महाजनी यांच्या भाग्यश्री पाटील यांनी त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा नक्की वाचा…
X
कलाकाराचं आयुष्य जितकं झगमगाटी तितकाच शेवट काळोखात
आयुष्यभर झगमगाटात राहिलेल्या या देखण्या नटाचा शेवट मात्र हृदय पिळवटून टाकणारा वाटतो. गेली ८ महिने पुण्यातील एका फ्लॅट मध्ये ते भाड्याने राहत होते. तब्येत ठीक राहत नसल्याने हवा पालटण्यासाठी मुंबई ऐवजी पुण्यात राहायला गेले होते.पण कुटुंबाला ३ दिवस झाले तरी थांगपत्ता कसा लागला नाही ?हा महत्वाचा प्रश्न माणसांच्या मनात उपस्थित होत आहे. कोण होतास तू ,काय झालास तू ? ही त्यांच्या गाण्यातील वाक्य त्यांच्या मृत्यूच्या वास्तव पाहून आठवायला लागतात. आयुष्यभर एक देखणा ,रुबाबाबदार नट म्हणून मिरवलेला चेहरा त्याच्या शेवटच्या क्षणात ओळखेनासा झाला होता. सामान्य लोकांना येणार म्हातारपण किती गुंतागुंतीचं असतं. त्यात "नट" तोही नेहमी प्रकाशझोतात राहिलेला याच रुबाबदार नटाला त्याच्या शेवटच्या काही दिवसात हा अंधार झेलावा लागला असेल का?
रवींद्र महाजनी यांची अभिनयाची कारकीर्द
१९७५ ते १९९० या काळात यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवली.त्यांनी झुंज या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि या चित्रनगरीत एक सितारा चमकायला सुरुवात झाली . रवींद्र महाजनी यांनी एकापाठोपाठ एक मराठी हिट चित्रपट दिले . व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या झुंज या चित्रपटाद्वारे १९७५ साली चित्रपट सृष्टीत पदार्पण केले . त्यांनी भूमिका साकारलेले "दुनिया करी सलाम", लक्ष्मी, गोंधळात गोंधळ ,मुंबईचा फौजदार या चित्रपटातील त्यांची स्वतःची वेगळी भूमिका त्यांनी मांडली आहे. मुंबईच्या फौजदारी चित्रपटातुन त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. रंजना देशमुख सोबत मुंबईचा फौजदार चित्रपटात रवींद्र महाजनी यांची भूमिका मराठी प्रेक्षकांना वेड लावून गेली . मराठी सोबतच गुजराती आणि हिंदी चित्रपटात सुद्धा रवींद्र महाजनी यांनी काम केले आहे तर 'बेलभंडार' आणि 'अपराध मीच केला' ही त्यांची नाटकेही गाजली.
"ज्या वर्षी आणीबाणी लागू झाली त्याच वर्षी, म्हणजे 1975 साली रवींद्र महाजनीचा किरण शांताराम दिग्दर्शित 'झुंज' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा रवींद्र आणि रंजना यांची जोडी म्हणजे मराठीतले धर्मेंद्र आणि हेमा मालिनी. सूर्यकांत, चंद्रकांत यांच्या ग्रामीणपटांच्या साच्यातून मराठी सिनेमा हळूहळू बाहेर पडू लागला होता. त्यामध्ये विनोद खन्नासारखे लुक्स आणि आवाजही असणारा रवींद्र एकदम वेगळा भासला. प्रेक्षकांनाही तो आवडला. विजय, भानुविलास, आर्यन, प्रभात या चित्रपटगृहांत मी रवींद्रचे आराम हराम आहे, हळदीकुंकू, दैवत, लक्ष्मी असे अनेक चित्रपट आले होते. इतका देखणा, प्रमाणबद्ध शरीरयष्टीचा, उंचापुरा, तगडा नायक मराठी चित्रपटसृष्टीत अभावानेच आढळला. गंमत अशी की, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांत त्याने कामे केली. तो अभिनेता म्हणून अजिबात ग्रेट नव्हता. मात्र त्याचे हसणे अत्यंत प्रसन्न असे होते. "असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी मांडले आहे.
चाहत्यांच्या मनाला चटका लावून जग सोडलेले कलाकार
श्रीदेवी, ललिता पवार, परवीन बाबी यांचा मृत्यूही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांना दुःख होईल, अशा पद्धतीनेच झाला.आज रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे 'खेळ कुणाला दैवाचा कळला?' हा प्रश्न आपसूक पडतो . मग तो नट असो व कुणीही असो ...
भाग्यश्री पाटील